जो पर्यंत सदसदविवेकबुद्धी वैज्ञानिक निकषांवर घासून तयार होत नाही तो पर्यंत या न त्या मार्गाने अंधश्रद्धा होतच राहणार !!
या देशात अंधश्रद्धा कधीच मुळासकट नष्ट होऊ शकत नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे, देव धर्म आणि आत्मा परमात्मा चे स्तोम इतके प्रबळ आणि खोलवर आहे कि सर्व सामान्य आणि अशिक्षितच नाही तर श्रीमंत आणि सुशिक्षित लोक सुद्धा सारासार विचार करायला तयार नाहीत. दाभोळकरांच्या खुनानंतर दोन्ही प्रकारच्या चर्चेला उत आला उजव्या आणि कट्टर हिंदुत्व समर्थकांनी तर प्रतिक्रियांचा कळस गाठला आहे आणि सुरुवात दस्तुरखुद्द डॉ आठवले यांनीच होती.
हा मुद्दा फक्त हिंदू धर्मियांसाठी मर्यादित नाही तर मुस्लिम समाजात सुद्धा पराकोटीचा अंधविश्वास आणि अनिष्ट प्रथा आहेत, तोच प्रकार ख्रिस्ती लोकांमध्ये दिसून येतो, मिशनरी तर सर्रास "येशु आयेगा" च्या नावाखाली लोकांना अंधभक्तीच्या खायीत लोटत असतात. या दोन्ही धर्मांमध्ये रीतसर लहानपणापासूनच शाळेत आणि मदरशा मध्ये कडवे धार्मिक शिक्षण दिले जाते. अर्थात या समाजात सुद्धा पुरोगामी किंवा माणुसकी हा धर्म मानणारे आहेत पण त्यांचा इतका प्रभाव दिसून येत नाही. जिहाद हि संकल्पना निव्वळ अंधश्रद्धाच आहे आणि लहान मुलांचे सांगोपांग प्रशिक्षण इथे दिले जाते. जगातील दोन बलाढ्य धर्मातील अंधश्रद्धा इतके दिवस तशीच आहे.
अगदी आदी मानावापासूनचा (किंवा त्याच्या आधी एक पेशीय प्राणी नंतर माकड पर्यंत) इतिहास पहिला तर (इव्ह आणि आदम हि संकल्पना सोडून) तर त्याला ज्या गोष्टी त्या वेळी अनाकलनीय वाटल्या, ज्या गोष्टी त्याच्या बुद्धीच्या आणि विचारशक्तीच्या पलीकडे होत्या त्या गोष्टीचे त्याला अप्रूप वाटले, तो त्यांना एक अदभूत आणि अनैसर्गिक गोष्ट समजू लागला , सुपर पावर असे काही तरी त्याला वाटले असावे आणि अशा अनाकलनीय सर्व शक्तिमान रहस्यमय गोष्टीना तो आधी देव मानायला लागला, पाउस कसा पडतो, मुल जन्माला कसे येते, जमिनीतून झाड कसे येते हे त्याच्यासाठी नवीन होते, म्हणून त्याने हवा, पाणी, अग्नी, जमीन यांना आधी देवता मानले आणि आराधना करू लागला. पुढे पुढे जसजसे त्याला या गोष्टींचे आकलन झाले आणि त्याची प्रगती होऊ लागली त्यांनी याच देवांना नावे आणि चेहरे दिले. देव माणसाने निर्माण केले आहेत देवाने माणूस निर्माण केलेला नाही हे इथे सिद्ध होते, आणखी एक बाब म्हणजे देवांची निर्मिती पुरुषांनी केली म्हणून पुरुष केंदस्थानी मानून लिखाण आणि शिल्पकला होत गेली. असं म्हणतात घोड्यांनी देव बनवले तर ते घोडाच असणार त्या प्रमाणे अगदी सर्व धर्मात ९० क्के देव हे पुरुष आहेत(शंकर,विष्णू,इंद्र, अल्लाह,पैगंबर, येशु इत्यादी) आणि म्हणून स्त्रियांना तिची पात्रता असून सुद्धा सुरुवातीपासूनच दुय्यम स्थान दिले गेले.या देवांना पायाभूत मानून पेढे धर्म निर्मिती झाली, विविध विचारसरणीचे पंथ निर्माण झाले, काही एकेश्वरवादी तर कुणी अनेक ईश्वर मानणाऱ्या लोकांचे धर्म तयार झाले, आधी बौद्ध, जैन, हिंदू आणि सिख असे धर्म भारतात तसेच ख्रिस्चन आणि नंतर इस्लाम सारखे धर्म भारताबाहेर जन्माला आले आणि पसरले. त्यामुळे धर्म माणसासाठी आहे माणूस धर्म साठी नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे
अंधश्रद्धा देवावरच्या श्रद्धेला म्हणजेच देवाला अगदी चिटकून आहे, एक तर देवाच्या भीतीमुळे,त्याच्या कोपामुळे किंवा त्याला खुश करण्यासाठी अशा पद्धती लोक अवलंबत राहणारच जो पर्यंत देव आणि त्यांची निर्मिती, त्यांची गरज या वर समाजाचे प्रबोधन व्यवस्थित पद्धतीने होत नाही, जो पर्यंत सदसदविवेकबुद्धी वैज्ञानिक निकषांवर घासून तयार होत नाही तो पर्यंत या न त्या मार्गाने अंधश्रद्धा होतच राहणार !!
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!