भूकंप पूर वादळापेक्षा जास्त मुडदे हे साम्राज्य आणि धर्म यांच्या नावाखाली पडलेत !!
प्रत्येक माणूस त्याच्या तथाकथित धर्मापेक्षा त्याच्या मानसिक जडणघडणीप्रमाणे जास्त वागतो. बर्याचदा त्याच्या स्वार्थासाठी त्याच्या धर्माची तत्त्व शिताफीने वाकवायला मोडायला मागे पुढे पाहत नाही, मग अशावेळी तो त्याच्या धर्माच्या नावाखाली अविवेकी कृत्य करतो. धर्म माणसाच्या जगण्याचे सर्वसाधारण नितीनियम असे मानले तर प्रत्येक धर्मात समविचार आहेतच की. आपण जे जे विषम आहे त्यावर बोट ठेऊन दंगा घालतो. दंगा म्हणजे डायरेक्ट दंगली. साम्राज्यवाद देखील धर्मप्रसाराचाच एक भाग होता. भूकंप पूर वादळापेक्षा जास्त मुडदे हे साम्राज्य आणि धर्म यांच्या नावाखाली पडलेत.
जगात शेकड्याने धर्म झालेत. अहो उडत्या तबकड्यांवर विश्वास ठेवणार्यांचाही एक युएफो धर्म आहे. जगाचं जाऊ दे किमान आपल्या देशाचं बघूयात. मला नेहमी प्रश्न पडतो, महावीराने वैदिक, बुध्दाने जैन किंवा वैदिक, येशूने बौध्द, पैगंबराने ख्रिस्ति, बसवेश्वराने इस्लाम आणि नानकांनी लिंगायत धर्म का स्विकारले नाहीत. उत्तर सोप्पयं, प्रत्येकजण आपापल्या सद्विवेकानुसार चालला, पुढे त्यांच्या त्यांच्या अनुयायांनी त्याचं अनुकरण केलं. अनुकरण वाईट नाही अंधानुकरण वाईट. धर्म आला की अंधानुकरण येते, येतेच. भिती दंभ यांची सुरुवात होते. मार्क्स धर्माला अफूची गोळी म्हणतो ते याचमुळे, धर्म नशा आहे, व्यसन आहे. एकही धर्म विवेकवादाशिवाय कामाचा नाही, माणूसपण खर्या अर्थाने समृध्द करायचं असेल तर धर्म नावाच्या घटकाची कात टाकावीच लागेल. धर्माच्या संकल्पनांनी विवेक संपतो आणि माणूसपण संकुचित होतं.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!