मुलींचे वैरी !!

मुलींचे वैरी !!



वंशाला दिवा मुलगाच हवा, अशा जुनाट-राक्षसी अंधश्रध्देच्या विळख्यात अडकल्यानेच, भारतात दररोज हजारो मुलींची सामुहिक हत्याकांडे घडत आहेत, ही समाजाला लाजिरवाणी-शरमेची बाब होय! स्वातंत्र्यानंतरच्या 64 वर्षात देशाने कृषी, विज्ञान, उद्योगाच्या क्षेत्रात चौफेर प्रगती केली. गेल्या काही वर्षात देशाची जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचा डांगोरा पिटला जात आहे. प्रत्यक्षात मात्र सोळाव्या शतकातल्या जुनाट अंधश्रध्दांच्या विकृतीतून हा समाज बाहेर पडलेला नाही, हेच स्त्रीभ्रूण आणि मुलींच्या हत्यांच्या घटनांनी जगासमोर आले आहे. राजस्थानातल्या काही समाजात, जन्मजात बालिकेचा गळा घोटून किंवा तिला विष पाजून ठार मारायची अघोरी प्रथा अद्यापही अस्तित्वात आहे.


सोनोग्राफी यंत्राद्वारे गर्भवती महिलेची तपासणी करून गर्भजल चिकित्सेद्वारे स्त्रीचा भ्रूण असल्यास, तो काढून टाकायची शस्त्रक्रिया करणाऱ्या नराधम डॉक्टरांनी बीड जिल्ह्यात हैदोस घातला होता. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही असे नरपशू डॉक्टर्स असल्याचे निष्पन्न झाले होते. सरकारने कडक कारवाई केल्यामुळे, स्त्रीभ्रूण हत्येचे हे बेकायदा प्रकार आता बंद झाले आहेत. पण जेव्हा जन्मदातेच मुलीच्या जीवावर उठतात तेव्हा मात्र, या अश्राप बाळाला वाचवणे कायद्याला-पोलिसांनाही अवघड ठरते.


नवजात अर्भकाने मरावे, यासाठीच त्याच्यावर विष प्रयोगाच्या घटना देशात तशा नव्या नाहीत. राजस्थानात, विशेषत: जैसलमेर जिल्ह्यात ही असली रानटी प्रथा अद्यापही अस्तित्वात आहे. या जिल्ह्यातल्या काही समाजात मुलगी जन्मल्यास, अवघ्या काही तासांच्या आतच तिचा गळा घोटून खून केला जातो. या अर्भकाच्या पार्थिवाची घाईगडबडीने विल्हेवाटही लावली जाते. या राज्यात दररोज अडीच हजार नवजात बालिकांचे बळी जात असावेत, असा अंदाज आहे. या राज्यात केंद्र सरकारची जननी सुरक्षा योजना अंमलात आली. सरकारी रुग्णालयात प्रसूत होणाऱ्या मातेला चौदाशे रुपयांचे अनुदान मिळायला लागले. ते मिळवायसाठी सरकारी रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या वाढली. पण मुलीला घेवून घरी गेल्यावर मात्र नव्या जन्मलेल्या या बालिका बेपत्ता होत असल्याचे आढळून आले आहे. या जिल्ह्यात अत्यंत क्रूरपणे नवजात बालिकांचे बळी घेतले जातात.


इथल्या काही समाजात विवाहित स्त्रीला चार भिंतीच्या आतच जन्मभर कोंडून ठेवले जाते. तिला बाहेर फिरू दिले जात नाही. ती बाहेर गेल्यास, सतत ती घुंगट ओढूनच असते. तिचा चेहराही कुणाला दिसत नाही. गर्भवती महिला तर घराच्या बाहेरच पडत नाहीत. गावातल्याच सुईणीकडून या महिलांची परंपरागत पध्दतीने प्रसुती होते. मुलगी जन्मली असल्यास, त्या अर्भकाने रडायसाठी तोंड उघडताच त्याच्या इवल्याशा मुखात आईच्या दुधाऐवजी अफूतून विष दिले जाते. काही वेळा अर्भकाच्या मुखात मातीचा तोबरा भरला जातो. श्वास गुदमरून हे बालक तडफडून जीव सोडते. पण त्याच्या आई-वडिलांना आणि घरच्यांना मायेचा पाझर फुटत नाही. या बालिकेला फुलासारखे जपावे, तिला मारू नये, असे या नराधमांना वाटत नाही. या बालिकेने प्राण सोडताच, काही वेळातच त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते. याच जिल्ह्यातल्या देवडा या पंचवीस हजार वस्तीच्या गावात गेल्या दहा वर्षात फक्त अठरा मुली जन्मल्याची सरकारी दप्तरात नोंद आहे. याचाच अर्थ या गावातल्या शेकडो बालिका, दुष्ट प्रथेच्या बळी ठरल्या, हे उघड आहे.


केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री रेणुका चौधरी यांनी, गेल्या दहा वर्षात भारतात एक कोटी मुलींचे हत्याकांड झाल्याची कबुली संसदेतच दिली होती. राजस्थानात सन्माननीय मृत्यूच्या (ऑनर किलिंग) नावाखाली हजारो बालिकांची अशी हत्याकांडे घडतात. राज्य घटनेने स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार आणि हक्क दिले असले तरी, मुलीला जन्मायचाच हक्क नाकारला जातो आणि जन्मल्यास तिचा जगायचा हक्क हिरावून घेतला जातो, हे सत्य आहे. वंशाला दिवा म्हणजे मुलगाच हवा, या वेड्या अंधश्रध्देतून भारतीय समाज मुक्त झाल्याशिवाय जन्मजात बालिकांना आणि गर्भातल्या स्त्रीभ्रूणांना न्याय मिळणार नाही.

 

लेखं- वासुदेव कुलकर्णी.


संदर्भ-  http://www.dainikaikya.com/20130521/5419198250662094378.htm


धन्यवाद- दै. ऐक्य



No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...