स्त्रियांना क्रूरपणाने वागविणेचे नाहीसे करावे किंवा त्यास प्रतिबंध करावा म्हणून केलेले नियम- छत्रपती शाहूमहाराज

स्त्रियांना क्रूरपणाने वागविणेचे नाहीसे करावे किंवा त्यास प्रतिबंध करावा म्हणून केलेले नियम -छत्रपती शाहूमहाराज


नियम करणेचे उद्देश-  इं. पी. कोडमध्ये ज्यासंबंधी सांगितलेले नाही, अशा प्रसंगी स्त्रियांना क्रूरपणाने वागविण्याबद्दल शिक्षा करण्याबाबत कायदा करणे योग्य आहे, असे दिसून आल्यावरून खालीलप्रमाणे कायदा करण्यात येत आहे.


१. कायद्याचे नाव, आरंभ आणि त्याची व्याप्ती-

या नियमांना ‘स्त्रियांना क्रूरपणाने वागविण्याचे बंद करण्याबद्दल नियम’ असे नाव दिले आहे. आणि तारीख 2 ऑगस्ट 1919 पासून ते अंमलात येतील. हे नियम करवीर संस्थानातील सर्व हिंदी प्रजेस लागू होतील. आणि रेसिडेंट साहेबांनी मंजूर केल्यास ते फ्युडेटरी जहागिरीनाही लागू होतील.


२. शब्दांच्या अर्थाचे कलम : विषयास अगर पूर्वापार संबंधास बाधा येत असेल तर, या नियमामध्ये पुढील शब्दांचा अर्थ पुढे लिहिल्याप्रमाणेकरणेचा आहे. म्हणजे -

(अ) ‘क्रूरपणाची वागणूक’ म्हणजे, तिच्या योगाने अयोग्य प्रकारची अनावश्यक शारीरिक दु:ख अगर पीडा उत्पन्न होते, अगर तिच्या योगाने प्रकृतीस इजा होणेसारखे मानसिक क्लेश होतात, अगर तिच्या योगाने प्रकृतीस शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होण्यासारखी योग्य भीती उत्पन्न होते, ती वागणूक.

(ब) ‘तो’ हे सर्वनाम आणि विभक्ती लागून झालेले शब्द हे पुरुष अगर स्त्री कोणत्याही मनुष्याच्या अर्थाने योजिलेले आहेत.

(क) एकवचनाच्या शब्दात बहुवचनाचा समावेश होतो आणि बहुवचनामध्ये एकवचनाचा समावेश होतो.

(ड) ‘समजुतीचे वय’ म्हणजे 16 वर्षे.

(ई) या नियमात योजिलेले शब्द ज्यांची या कायद्यामध्ये व्याख्या केलेली नाही, परंतु इं. पी. कोड व क्रि. प्रो. कोड यात व्याख्या केलेली आहे, त्या शब्दांचे अर्थ त्या त्या कोडात सांगितल्याप्रमाणे आहेत असे समजावे.


बाब २ ) साधारण अपराध-


3. इं. पी. कोडाची कलमे 76 ते 106 (दोन्ही धरून) यांचा समावेश या नियमात केलेला आहे व ती कलमे या कायद्यात प्रत्यक्ष घातल्याप्रमाणे त्यांचा परिणाम समजणेचा आहे.


बाब ३) या नियमाखालील अपराध-


४.  जो कोणी समजुतीचे वयात आलेला असून पूर्वीचे व्याख्येत सांगितल्याप्रमाणे कोणाही स्त्रीशी आपखुशीने क्रूरपणाची वागणूक करील, तर त्यास दोहो प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकारच्या कैदेची शिक्षा दिली पाहिजे, आणि ती कैद सहा महिन्यापर्यंत ठरविणेचे अखत्यार आहे किंवा त्यास दंडाचीही शिक्षा दिली पाहिजे आणि तो दंड 200 रुपयेपर्यंत करणेचा अखत्यार आहे किंवा दोन्ही शिक्षा दिल्या पाहिजेत. आणखी असेही ठरविण्यात येते की, ज्या स्त्रीस क्रूरपणाने वागविले ती स्त्री समजुतीने वयात आली नसेल तर ती शिक्षा दुप्पट करण्याचा अखत्यार आहे.
खुलासा- कैद दोन प्रकारची आहे. 1. सक्तमजुरीची, 2. साधी


उदाहरणे-

अ. आपली बायको राहत असलेल्या आपल्या घरी ‘अ’ हा आपखुशीने एका रखाऊ स्त्रीस आणतो, आणि आपल्या स्त्रीच्या इच्छेविरूद्ध आणि ती नको म्हणत असता, त्या रखाऊ स्त्रीस त्या घरी ठेवतो, आणि त्या योगे आपल्या स्त्रीच्या प्रकृतीवर शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होईल अशी योग्य भीती उत्पन्न करतो.
‘अ’ हा या नियमान्वये अपराध केलेबद्दल गुन्हेगार आहे.

ब. ‘अ’चे धाकटे भावाची एक विधवा आहे. ती त्याच्या कुटुंबापैकी एक इसम आहे. तिला आपले ताब्यात ठेवणेसाठी ‘अ’ हा सतत दोन दिवस आणि दोन रात्री तिला मुद्दाम अन्नपाण्यावाचूनठेवतो किंवा तिला झोपू न दात उभी करतो. ‘अ’ हा या कायद्याप्रमाणे गुन्हेगार आहे.

क. ‘अ’ हा मुद्दाम बरेच दिवस आपल्या स्त्रीचा सहवास टाळतो किंवा तिची मुद्दाम अवहेलना करतो, आणि अशा टाळण्याने आणि अवहेलनेने तिच्या प्रकृतीस शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होणेची योग्य भीती तो उत्पन्न करतो.
‘अ’ हा या नियमाप्रमाणे अपराध केल्याप्रमाणे गुन्हेगार आहे.

ड. ‘अ’ ही आपल्या सुनेस मुद्दाम अत्यंत उपमर्दक भाषा वापरून किंवा तिजवर थुंकून किंवा तिला रस्त्यावरून ओढून चारचौघात तिच्या मनाला धक्का देते आणि त्यायोगे तिच्या प्रकृतीस शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होण्यास योग्य अशी भीती उत्पन्न करते.
‘अ’ ही या नियमान्वये अपराध केलेबद्दल गुन्हेगार आहे.

ई. ‘ब’ ही ‘अ’ची सावत्र आई आहे आणि ती ‘अ‘ वर अवलंबून आहे. तिच्या मनास दु:ख व्हावे म्हणून तिच्या समक्ष बुद्धिपरस्पर ‘अ’ हा तिचे मुलांना वाईट रितीने वागवितो, आणि असे करून ‘ब’च्या प्रकृतीस शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होणेसारखी भीती उत्पन्न करतो.
‘अ’ हा या नियमान्वये अपराध केल्याबद्दल गुन्हेगार आहे.

फ. ‘अ’ हा आपल्या स्त्रीची, तिच्या पातिक्रत्यासंबंधी वारंवार आणि निराधार दूषणे देऊन, बेअदबी करतो, आणि त्या कारणावरून, तिच्याकडे दुर्लक्ष करून आणि तिला अर्धपोटी ठेवून, तिला इतक्या जुलुमाने वागवितो की, तिला वेड लागल्यासारखी भीती उत्पन्न होते.
‘अ’ हा या नियमान्वये गुन्हेगार आहे.


५. वरील शेवटचे नियमान्वये अपराध केल्याबद्दल एखाद्या इसमास शिक्षा झाली आणि पुन्हा त्याच नियमाखाली अपराध केल्याबद्दल पुन्हा तो गुन्हेगार ठरला तर त्यास दोहो प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारचे कैदेची शिक्षा द्यावी आणि ती दोन वर्षेपर्यंत देणेचे अखत्यार आहे, शिवाय तो दंडासही पात्र आहे.


अ. या नियमान्वये अपराध केल्याबद्दल कोणा इसमाचा तपास अगर चौकशी चालू आहे, असे असता, त्याच इसमाविरूद्ध वरील नियमाखाली पुन्हा त्या इसमाने अपराध केला असेल तर त्या दुसर्या गुन्हय़ाबद्दलचीचौकशी चालू चौकशीचे वेळीच होईल. आणि त्यावर गुन्हा शाबीत झाल्यास तो जास्त शिक्षेस पात्र होईल.


ब. या नियमान्वये तपास अगर चौकशी चालू असता, त्यातील फिर्यादी आरोपींचे अंगावर चालून जाईल अगर त्याचा उपमर्द करील, तर अंगावर जाणे, अगर उपमर्द करणे, शाबीत झाल्यास, निकाल सांगणेच्या पूर्वी, केव्हाही फिर्यादीची फिर्याद काढून टाकण्यास पात्र होईल. फिर्याद काढून टाकण्यास अंगावर जाणे व उपमर्द करणे कोणत्या प्रकारचे पाहिजे, हे ठरवणे केवळ मूळ अपराधाचा तपास अगर चौकशी करणार्या कोर्टाचे मर्जीवर आहे.


६. साह्य करण्यासंबंधी इं. पी. कोडमध्ये जी कलमे व त्यांच्या व्याख्या आहेत, ती सर्व कलमे या कायद्याखालील अपराधांस साह्यास लागू आहेत.


बाब ४)


७. या कायद्याखालील सर्व गुन्हय़ांची चौकशी सेशन कोर्ट 1 ला अगर 2 रा वर्ग मॅजिस्ट्रेट यांनी करावी आणि ती प्रचलित क्रि. पो. कोडप्रमाणे करावी.


८. एखाद्या स्त्रीसंबंधाने जी वागणूक झाली असे म्हणणे असेल, ती वागणूक इं. पी. कोडाप्रमाणे अपराध होईल किंवा या कायद्याप्रमाणे अपराध होईल, याजबद्दल शंका येईल त्याप्रसंगी, आरोपीवर वैयक्तिक चार्ज करावा. परंतु इं. पी. कोडप्रमाणे त्या अपराधास जी शिक्षा सांगितली आहे त्यापेक्षा जास्त शिक्षेस तो पात्र होणार नाही.


९. या कायद्याखालील प्रत्येक अपराध हा नॉनकॉग्निजिबल आहे, जमिनीचा आहे व तो आपसात भागवता येईल.


१०. एखादे कज्ज्यातील अखेरचा निकाल होणेपूर्वी ‘यापुढे आपण फिर्यादीस क्रूरपणाने वागवणार नाही’ असे जर आरोपी कबूल करील तर कोर्टांनी ती फिर्याद निकालात काढून टाकावी आणि मर्जीस येईल तर 50 रुपयेपेक्षा जास्त नाही, अशी योग्य ती रक्कम त्या स्त्रीस आरोपींकडून देवविणेबद्दल हुकूम करावा.


११. या कायद्याचे धोरणास विरूद्ध नाहीत, अशा रितीने चालू क्रि. प्रो. कोडाची कलमे लागू आहेत असे समजावे.


हा कायदा करण्याचा उद्देश व त्याची कारणे-

अनुभवांती असे दिसून आले आहे की, पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार फार मंद गतीने होत आहे, म्हणून हिंदुस्थानातील स्त्रियांची स्थिती सुधारणेचे कामी त्या शिक्षणाचा उपयोग व्हावा तितका होत नाही. हिंदुस्थानातील लोकांचे जे निरनिराळे समाज आहेत, त्यांच्या शास्त्रकारांनी हिंदू कुटुंबाचे पुढार्याना प्रसंगाविशेषी स्त्रियांना हलकेसे शासन करण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु त्या परवानगीचा दुरुपयोग होऊन, स्त्रियांना वाटेल तशा वाईट रीतीने वगाविण्यात आपणाला सनातन कालाचा परवानाच मिळाला आहे, अशी पुरुषांची समूजत झालेली दिसते. याकरिता स्त्रियांना होत असलेल्या जाचांचे हे प्रकार इं. पी. कोडच्या मर्यादेत येऊ शकत नाहीत, अशा प्रकारच्या जाचांपासून होणार्या दुष्परिणामास आळा घालावा म्हणून, हे नियम करणे योग्य व अवश्य असल्याचे दिसून आले आहे.

क्रूरपणाची वागणूक कशाला म्हणावे हे ठरविण्यासाठी ज्या गोष्टी जरुरीच्या आहेत म्हणून आम्ही सांगितले आहे त्या गोष्टी मागासलेल्या वर्गाला आणि अशिक्षित समाजाला जास्त कडक आहेत, असे वाटण्याचा संभव आहे. परंतु शिक्षणाच्या सुपरिणामावरच केवळ आपण अवलंबून राहू लागलो तर स्त्रीवर्गाची स्थिती सुधारणेचे काम फारच मंद गतीने चालेल. शिक्षणाचा परिणाम लवकर घडून यावा, या हेतूसाठी मनुष्यास कायद्याचे दहशतीची मदत पाहिजे ही गोष्ट अगत्याची दिसून येत आहे. ‘सर्व गोष्टी रीतीप्रमाणे व क्रमाक्रमाने होतच आहेत, आपण त्यात हात घालणेचे कारण नाही’ हे तत्त्व फक्त उच्च प्रतीच्या सुधारलेल्या समाजालाच लागू पडणारे आहे. मागासलेल्या लोकांची सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे काम कायद्याची मदत घेतल्यावाचून केव्हाही होणार नाही. स्त्रियासंबंधी क्रूरपणाचे वागणुकीचे क्रित्येक प्रकार असे आहेत की, ते अपराध या शब्दाखाली येऊ शकत नाहीत आणि इं. पी. कोडचा अंमल त्यावर चालत नाही. मात्र ते प्रकार केव्हा केव्हा इतके दुष्ट प्रतीचे असतात की, त्यामुळे स्त्रीजातीला आपला जन्म केवळ कंटाळवाणा व भूभार आहे असे वाटू लागते. या गोष्टी लक्षात घेऊन ‘क्रूरपणाची वागणूक’ या शब्दाची व्याख्या आम्ही कशी तयार केली आहे की, त्यातून कोणत्याही प्रकारची वाईट वागणूक सुटून जाता कामा नये.


हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे की, अत्यंत त्रासदायक आणि जुलमी वागणूक वरिष्ठ वर्गाचे लोकांत घडत असली, तरी तिच्याबद्दल केव्हाही तक्रार होत नाही. त्या चारचौघात येत नाहीत किंवा आणण्याचा प्रयत्नही केला जात नाही. म्हणून अशी सर्वसाधारण कसोटी आम्ही घालून दिलेली आहे की, त्या योगाने अत्यंत सुधारलेल्या समाजातील क्रूरपणाचे वागणुकीचे प्रकार आहेत, त्यांचाही यात समावेश करावा.


४ थ्या नियमाखाली काही उदाहरणे अशी घातली आहेत की, ती प्रकृतीवर शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होणेची फक्त भीती आहे, याच कल्पनेवर रचलेली आहेत. त्या उदाहरणांचा हेतू असा की, ज्या प्रसंगी वाईट परिणाम प्रत्यक्ष घडून आला नाही, पण तो इतका समीप आहे की, त्यामुळे शारीरिक अगर मानसिक कायमची इजा होणेचा संभव आहे, अशा प्रकारांचा त्यात समावेश व्हावा. यातील तत्त्व इतकेच आहे की, कायद्याने दुष्ट परिणाम प्रत्यक्ष घडून येणेची वाट पाहत राहू नये, त्याचा आगाऊच प्रतिकार करावा.


या कायद्याने नवरा-बायकोसंबंधीच फक्त क्रूरपणाचे वागणुकीचा विचार केलेला आहे असे नाही. हे नियम असे केलेले आहेत की, स्त्रीजातीला कोणत्याही प्रसंगी जुलूम होत असला तरी त्याचा विचार या कायद्याने करण्यात यावा.



कोल्हापूर, ता. 29 जुलाई १९१९.
- छत्रपती शाहूमहाराज


धन्यवाद- किशोर बाभळे.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...