सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा(१२ मे) !!
फोटो मधल्या व्यक्तीची आई जरी वृध्दाश्रमात असली तरी या व्यक्तीला आईला `मदर डे` निमित्त भेटायची ईच्छा आहे. हे ऐकून त्याच्या पत्नीचा संताप अनावर होतो आहे, तिच्या अंगाची लाही लाही होत आहे असे हे चित्र आहे. खरं म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती चांगली असतांना आईला वृध्दाश्रमात ठेवणं हा एक प्रकारचा गुन्हाच, बरीच मुलं अशी आहेत ज्यांना `मदर डे` म्हणजे काय असतो हेच माहित नसतो, तो कधी येतो आणि कधी जातो हे सुध्दा माहित नसतं त्यांच्यासाठी ही पोस्ट...
'मदर्स डे' [मातृदिन]
दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार हा `मदर्स डे` म्हणून साजरा केला जातो. या वर्षी येत्या रविवारी म्हणजे दि. १२ मे २०१३ रोजी मदर्स डे येत आहे.
मदर्स डे ही खरतर पाश्चिमात्यांची कल्पना. सन १८७२ पासून अमेरिकेत मदर्स डे साजरा करण्याची पद्धत प्रचलित आहे. ज्युलिया हार्वे यांनी बोस्टनमध्ये शांतता प्रीत्यर्थ हा दिवस साजरा करण्याची प्रथा रूढ केली. इंग्लंडमध्ये "मदरिंग संडे" म्हणून सन १६०० च्या दरम्यान साजरा केला जात असल्याचा उल्लेख आढळतो. श्रीमंतांच्या घरी राहून चाकरी करणारी मुले या दिवशी आपल्या आईला भेटायला आपल्या स्वतःच्या घरी जात असत. तर ग्रीस मध्ये "रिया" नावाच्या जननाच्या देवतेच्या सन्मानार्थ मदर्स डे साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानंतर युरोपमध्ये युरोपियनांची जीवनदात्री, रक्षणकर्ती अशा मदर चर्चला अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सन १९०७ मध्ये अॅना जार्विस या महिलेने राष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा केला जावा म्हणून फिलाडेल्फिया येथे खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर मे महिन्याच्या दुसर्या रविवारी घरोघरी आपल्या आईच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.
'मदर्स डे'. मातेला प्रणाम करण्याचा, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. मुळात 'आई' ही संकल्पनाच अशी आहे, की तिच्यासाठी एखादा दिवस साजरा करणे ही औपचारिकता ठरेल. शिवाय ही संकल्पना इतकी व्यापक आहे, की तिची व्यापकताही मोजणे अवघड जावे.
भारतीय संस्कृतीतही आईचे महत्त्व अपार आहे. एखाद्या मोठ्या वृक्षाची मूळे जमिनीत दूरवर रूतलेली असतात, तशी आई आपल्या मनामनांत आतमध्ये खोल असते. ही मुळे आपल्या व्यक्तिमत्वाशी आत्मीयतेच्या, प्रेमाच्या बंधनांनी बांधलेली आहेत.
'आई' ही हृदयातून आलेली प्रेमळ साद आहे. आपल्या जीवनावर, अस्तित्वावर प्रेमळ विश्वासाची सावली आहे. जिथे फक्त प्रेमच मिळत असं विश्वातलं एकमेव स्थान म्हणजे आई. तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षितता दुसरीकडे कुठेही मिळत नाही. तिच्या मायेची उब जोपर्यंत मिळते तो पर्यंत जणू चिमणीच्या घरट्याचा भास होतो. आपल्या घासातला घास आपल्याला देणारी मूर्ती म्हणजे आई. असे म्हणतात, `जगातलं प्रत्येक कर्ज फेडले जाते पण मातृऋणातून कोणीच मुक्त होत नाही`.
आईच्या हाताची वरण-पोळी-भाजी आजच्या पिझ्झा बर्गरापेक्षा ही अधिक चवदार होती.
आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाढवायला जगातली प्रत्येक आई सक्षम आहे. या नंतर मनात एक विचार येतो. जिच्यामुळे आपण ह्या जगात येतो, आपल्या रडण्याची 'मूक' भाषा ओळखून जी आपल्याला लहानाचं मोठं करते, जिचा हात धरून आपण जग पाहायला शिकतो, जिच्या छत्रछायेत आम्ही वाढतो, जगाचा सामना करतो अशा देवतुल्य मूर्तीला आपण तिच्या उतारवयात यथायोग्य मानसन्मान देतो का? तिची योग्य काळजी घेतो का? तिच्या वयोमानाप्रमाणे हळूवार झालेल्या भावना जपायचा प्रयत्न करतो का? सर्व घरांचं सांगणं कठीण. पण बहूतांश घरात ही परिस्थिती सामान्य आहे. म्हातारे झालेले आई-बाप जड होतात, आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यात त्यांची अडचण होते. त्यांची जगाचे अनुभव घेतलेली मत आपल्यासाठी निरूपयोगी ठरतं. का?
आम्ही लहान होतो त्यावेळी बालसुलभ प्रश्न विचारून आईला भंडवून सोडत होतो. आता ती उतारवयात आम्हाला विचारते. जेव्हा आम्ही चालणं शिकत होतो, आमची पावलं डगमगत होती. तेव्हा तिने सहर्ष आधार दिला. पण आम्ही आता तिच्या ''म्हातारपणाची काठी' बनत नाही. आम्हाला विविध पदार्थांचे स्वाद आवडत होते, पण आता आम्हाला तिच्या सरत्या वयाचे हट्ट पुरवायला कष्ट होतात. पाहिलं ना? परिस्थिती एक सारखीच आहे. फक्त जीवनाचे टप्पे वेगवेगळे आहेत. आधी आमचं बालपण होतं. आता तिचं आहे.
हे प्रश्न आजच्या दिवशी मांडण्याचं कारण एकच. कुणाकडूनही अशा प्रकारची चूक होत असेल तर आत्मनिरिक्षण करा. चिंतन करा आणि वेळ आहे तोपर्यंत स्वत:ला सावरा. ही सांजवात आहे. सरत्या तेलाच्या दिव्याला प्रेमाच्या हाताची सावली द्या. कारण त्यानंतर एकलेपणाचं उन आपल्याला झेलायचं आहे. ''आई'' ह्या मायेच्या हाकेला ''काय बाळा'' या उद्बोधनाला टिकवण्याचा प्रयत्न करा. आपलं काही चुकत असेल तर ते सहर्ष स्वीकार करा.
मातृदिन असा एक दिवसच का, ३६५ दिवस आपल्या हातात असतात. हे ३६५ दिवस (निदान जास्तीत जास्त) तिच्यासाठी काहीतरी करीत राहा. तिच्या कष्टांचे कौतुक करा, तिच्याशी दोन शब्द गोड बोला ती भरून पावेल. आईला आवश्यकता नसते मातृदिनाची. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच.
अहो आई ती आईच रहाणार. मातृदिन साजरा केल्याने वा न केल्याने तिचे प्रेम कमी होणारच नाहीये. मातृदिन साजरा करा अथवा करु नका... आई ती आईच !
सर्व मातांना येत्या मातृदिनाच्या शुभेच्छा !!
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!