असगर अली इंजिनियर यांच्या निधनाने आपण काय गमावले !!

असगर अली इंजिनियर यांच्या निधनाने आपण काय गमावले !!



असगर अली इंजिनियर यांच्या निधनाने आपण काय गमावले आहे, याची जाणीव त्यांचे विचार वाचताना यापुढे वेळोवळी होत राहील. इस्लामच्या सर्व छटांचा, सर्व पंथांचा अभ्यास करणाऱ्या असगरअलींनी समाजाची घडी आज अशी का दिसते आहे, याच्या उत्तरांचा शोधही नेहमीच घेतला. धर्म आणि आजच्या धारणा एकमेकांशी विसंगत आहेत, हे सत्य त्यांनी निर्भीडपणे मांडले. समाजधारणांतील दोष सुधारण्यासाठी चळवळही उभारली. अशा सक्रिय समाजहितैषी विद्वत्तेमुळेच स्वधर्मातून (दाऊदी बोहरा पंथातून) बहिष्कृत ठरलेल्या या धर्मसमीक्षकाने सुधारकी भूमिकेची मुळेही धर्मात कशी आहेत, हे दाखवून दिले. त्यांच्या विचारांची ही सारी वैशिष्टय़े दाखविणारे हे चिंतन..


स्त्रीवाद किंवा हिंदीतला 'नारीवाद' - हे सारे शब्द मुळात आपले शब्द नसून इंग्रजीतला 'फेमिनिझम' ही संकल्पनाच तद्दन पाश्चात्त्य आहे, असे अनेकांना वाटते. आम्ही 'इस्लामिक फेमिनिझम' याच नावाची एक कार्यशाळा घेतली होती, तेव्हा एका मौलानांनी तर आपण 'फेमिनिझम' वगैरे बिगरइस्लामी विषयांवर बोलणार नाही, या कारणासाठी भाषण करणेच नाकारले. वास्तविक, ही संज्ञा इस्लामी दृष्टिकोनाला खरोखरच आक्षेपार्ह वाटावी, असे काहीही अजिबात नाही. वास्तविक, स्त्रिया या जेव्हा पुरुषांच्या गुलामच समजल्या जात, त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्याही समान हक्काने व समान प्रतिष्ठेने जगू शकतात असे कुणाला वाटत नव्हते, त्या काळात स्त्रियांच्या सबलीकरणाची व्यवस्था घडवू पाहणारा इस्लाम हा धर्म निर्माण झाला.



स्त्रीवाद तरी वेगळे काय म्हणतो? स्त्रीवादी चळवळ ही स्त्रीला पूर्णपणे मानव म्हणून जगण्यासाठी बळ देऊ पाहणारी चळवळ आहे. स्त्रीवादी लेखिका सिमॉन द बूव्हॉ हिनेदेखील 'सेकंड सेक्स' या पुस्तकातून स्त्रीवर लादला गेलेला दुय्यमपणाच नाकारला होता. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत पाश्चात्त्य देशांमधील स्त्रियांनादेखील समान वागणूक तर सोडाच, परंतु स्वतंत्र नागरिकाची प्रतिष्ठाही नव्हती, हे आपल्याला माहीत आहे. त्या (पाश्चात्त्य) देशांमध्ये १९३०च्या दशकापासून स्त्रियांनी आपले हक्क मागायला आणि मिळवायला सुरुवात केली, त्यामुळे त्या देशांतील ज्या कायद्यांनीच स्त्री-पुरुष भेद चालवला होता, त्या कायद्यांत हळूहळू बदल घडू लागले. मात्र पुरुषसत्ताक व्यवस्था त्याही वेळी या देशांत कायमच राहिली.



इस्लाममध्ये, कुराणाने स्त्रीला समान प्रतिष्ठेची वागणूक दिली असूनही मुस्लिमांनी ही स्त्री-पुरुष समानता स्वीकारलेली नाही. ही समानता स्वीकारण्यास राजी होण्यापासून मुस्लीम समाज फारच दूर राहिला. अरब संस्कृतीइतकी पुरुषसत्ताक, की समानता स्वीकारणे त्यांना जमलेच नाही.. मग स्त्रीची प्रतिष्ठा कमीच असली पाहिजे यासाठी अनेक हदिस (कुराणाज्ञा) बदलून टाकल्या गेल्या आणि पुढे अन्यही अनेक देशांतील मुस्लीम समाजांत कुराणातील वचनांचे सोयिस्कर अर्थ लावून तिला बंधनांमध्ये- म्हणजे कायम पुरुषावर अवलंबूनच- ठेवले गेले. 'सजदा' किंवा पायी लोटांगण घेणे याबद्दल कुराणातील वचन काहीही म्हणत असले, तरी स्त्रीने तिच्या पतीच्या पायी लोटांगणच घातले पाहिजे, यावर एकमत झाले. हे कुराणाशी पूर्णत: विसंगत होते, परंतु पर्वा कोण करतो? इस्लामी देशांतसुद्धा स्त्रीविषयक कायद्यांवर प्रभाव आहे तो कुराणाचा नसून पुरुषसत्ताक पद्धतीचाच. जेव्हा जेव्हा पुरुषसत्ताक पद्धती की कुराण असा प्रश्न आला असेल तेव्हा कुराण बाजूला पडले, म्हणजेच कुराणातील वचने एक तर अनादरपूर्वक गुंडाळूनच ठेवण्यात आली किंवा पुरुषसत्ताक पद्धती अबाधित राहील अशाच पद्धतीने कुराणवचनांचा अर्थ लावण्यात आला, हा इतिहास आहे.



या इतिहासापासून फारकत घेऊन, कुराणाचे मर्म ओळखण्याची वेळ आता आली आहे. परंतु हे कुराणाचे मर्म ओळखून जगण्याची इस्लामी जगाची तयारी नाही, असेच दिसते आहे. याहीपेक्षा वाईट म्हणजे, गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे मुस्लीम स्त्रियांनाच, कुराणाने महिलांना काय हक्क दिलेले आहेत, त्याची जाणीवही उरलेली नाही. मुस्लीम स्त्रियांना त्यांच्याच धर्माने, त्यांच्याच धर्मग्रंथाने स्त्रीला दिलेल्या हक्कांची जाणीव आज करून देण्यासाठीची चळवळ सुरू झाली पाहिजे, अशी परिस्थिती आज आहे.



दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, इस्लामचा स्त्रीवाद आणि पाश्चात्त्यांचा स्त्रीवाद यांत काय फरक आहे.. म्हणजे फरक खरोखरच आहेत की काहीच फरक नाही? स्त्रीवादाला स्त्रियांच्या सबलीकरणाचे तत्त्वज्ञान मानले, तर फरक काहीही नाही. मात्र, ऐतिहासिकदृष्टय़ा इस्लामी जगातला स्त्रीवाद आणि पाश्चात्त्यांचा स्त्रीवाद आज भिन्न पातळय़ांवर दिसतील. इस्लामी देशांमध्ये किंवा इस्लामी समाजांमध्ये स्त्रीला तिच्या धर्मग्रंथाने दिलेले तिचे न्याय्य हक्क नाकारून पुरुषसत्ताक पद्धती स्त्रीला मध्ययुगीत दास्यामध्ये ठेवत आलेली आहे. याउलट पाश्चात्त्य समाजांतील कायद्यांनी स्त्रीला हक्क दिलेलेच नव्हते, ते भांडून मिळवण्यासाठी जी चळवळ उभी राहिली त्या संघर्षांलाच पाश्चात्त्य लोक 'स्त्रीवाद' समजतात.



स्त्रियांना हक्क मिळायला हवेत हा मुद्दा दोन्हीकडे समान असला, तरी इस्लामी आणि पाश्चात्त्य स्त्रीवादात काही लक्षणीय फरकही आहेत. 'सर्वाना सारखाच मान, सर्वाची प्रतिष्ठा समान' अशी समानता इस्लाममध्ये अंगभूत आहे. या मूल्यांशी तडजोड होऊ नये, असे इस्लामला अभिप्रेत आहे. मात्र, 'स्वातंत्र्य' या मूल्यावर जबाबदाऱ्यांची बंधने घालणेच इस्लाम पसंत करतो. पाश्चात्त्य समाजांमध्ये स्वातंत्र्य असे र्निबधयुक्त नसते, ते इतके मिळते की स्वातंत्र्याचेच रूपांतर स्वैराचारातही घडू शकते.. हा स्वैराचार करा, असे कायदा सांगत नसला तरी सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवहारांत स्वैराचार हे स्वातंत्र्याचेच रूप असल्याचे समजून घेतले जाते. योनिशुचितेच्या कल्पना पाश्चात्त्य देशांमध्ये लयाला जाऊन समागम आनंदासाठी करण्याची कृती हाच अर्थ राहिला आणि प्रजननाची कृती म्हणून त्या कृतीला मिळणारे प्राधान्य संपुष्टात आले. दुसरीकडे, कुराण काही बुरखा वापरायला सांगत नाही. हिजाब हे अंगभर सैलसर वस्त्र किंवा नकाब हा चेहरा झाकणारा अडसर वापरण्याची सूचना कुराणाने केल्याचा समज सर्वदूर असला तरीही तसे नाही; परंतु कुराणाने स्त्रीपुरुषांच्या (दोघांच्याही) लैंगिक वर्तनावर अत्यंत कडक र्निबध घातले आहेत. लैंगिक सुख मिळवण्याचा हक्क स्त्री-पुरुषांना समान आहे- स्त्रीलादेखील पुरुषाइतकाच तो हक्क आहे- असे कुराण मानत असले, तरी लैंगिक सुख हे वैवाहिक चौकटीत राहूनच मिळवण्याचे बंधन कुराणाने घातले आहे. कोणतीही लैंगिक वर्तनाची कृती वैवाहिक जोडीदाराखेरीज अन्य कुणाशीही होऊच शकत नाही, विवाहबाह्य़ संबंध असताच नयेत, असे कुराण सांगते. इस्लाममध्ये संभोगाचा मूळ हेतू आनंद हा नसून तो प्रजननाचा मार्गच असल्याने हे पावित्र्य जपलेले आहे.



येथे आता एक मुद्दा भर देऊन सांगितला पाहिजे तो असा की, पुरुषसत्ताक पद्धतीत संभोग, लैंगिक वर्तन यांविषयीचे नेमनियम पुरुषांनीच ठरवलेले असतात. त्यामुळे इस्लामी समाजांतही पुरुषांनीच कुराणाचा असा अर्थ काढला की, पुरुषांची कामेच्छा अधिक असते आणि म्हणून त्यांना एकापेक्षा अधिक स्त्रिया (पत्नी) असण्याची मुभा असावी- याउलट स्त्री ही केवळ प्रतिसाद देणारी असल्याने तिने एकाच पतीवर समाधान मानावे. कुराणदृष्टय़ा हे (बहुपत्नीत्वाची मुभा देण्याचे समर्थन) खरे ठरत नाही.



याबाबत कुराणाचा दृष्टिकोनच मुळात निराळा आहे. कामेच्छा स्त्रीला अधिक की पुरुषाला यावर कुणी एकापेक्षा अधिक जोडीदार करावेत हे ठरवा, असे कुराण सांगत नाही. कुराणाच्या ४:३ आणि ४:१२९ या आयतींचा भर तर स्पष्टपणे एकाच वैवाहिक जोडीदाराशी एकनिष्ठा, यावरच आहे. बहुपत्नीत्वाचा उल्लेख कुराणात येतो, तो विधवाविवाहाचा आहे- विधवांना आणि त्यांच्या अनाथ मुलांना आधार द्यावा, यासाठी ही मुभा आहे. उलट एकपत्नीत्वाचा आदर्श पाळून पतीने आपल्या (पहिल्या) पत्नीला अशा (विधवा अथवा अनाथ महिलांना आधार देण्यासाठी केलेल्या, दुसऱ्या) विवाहाबाबत स्पष्ट कल्पना द्यावी आणि कधीही (पहिल्या पत्नीला) अंतर देऊ नये, तिला दुर्लक्षित सोडू नये, असेही बंधन कुराणाने (४:१२९) घातले आहे. याचा अर्थ असा होतो की, कुराणात कामपूर्तीचा हक्क महिलांनाही वादातीतपणे पुरुषांइतकाच दिला आहे. त्या हक्काबाबत तडजोड नाही, म्हणून विधवांना लग्नाची मुभा.



पाश्चात्त्य, भांडवलशाही देशांत स्त्रियांचे शोषण निराळय़ा पद्धतीने होताना आपण पाहतो. स्त्रीला तेथे भोग्य वस्तूच समजून तिची अर्धवस्त्रांकित पोस्टरे जाहीरपणे लावून, स्त्रीदेहाचा जणू बाजार मांडला जातो, हे दुर्दैवी आहे. त्याहीपेक्षा, ते स्त्रीचा (माणूस म्हणून) मान आणि प्रतिष्ठा या संकल्पनेशी विसंगत आहे. पाश्चात्त्य फेमिनिस्टांना हे आक्षेपार्ह वाटत नाही, उलट हेही स्त्रीचे स्वातंत्र्यच असा समज त्यांचा असतो. स्वातंत्र्याबद्दलच्या अशाच समजातून काही जणी (फार नव्हेत) तर वेश्याव्यवसायाचाही विचार 'स्त्री करू शकते असा एक चरितार्थाचा व्यवसाय' म्हणून करावा, असे म्हणू लागल्या आहेत. हा विचार मात्र स्त्रीवादाच्या इस्लामी संकल्पनेच्या विरोधात आहे.. ती इस्लामी संकल्पना म्हणजे, 'स्त्रीलाही पुरुषाइतकाच कामपूर्तीचा हक्क.'



समानतेची ही पातळी इस्लामने जाणली. त्यामुळेच असे दिसते की, स्त्रीवादाच्या पाश्चात्त्य संकल्पनांशी इस्लामच्या स्त्रीवादी संकल्पना काही प्रमाणात मिळत्या-जुळत्या असल्या, तरी त्यांत मोठा फरकही आहे. इस्लामी स्त्रीवादय़ांवर (स्त्री आणि पुरुषांवरही) बंधने आहेत, तशी ती पाश्चात्त्य स्त्रीवादय़ांवर नाहीत.


(इंजिनियर यांचे लेख त्यांनीच स्थापलेल्या 'सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझम' या संस्थेकडून ईमेलद्वारे काही पत्रकारांनाही पाठविले जात, त्यापैकी हा ७ जून २०११ रोजीच्या ईमेलमधील लेख. या संस्थेचा ईमेल- csss@mtnl.net.in)

धन्यवाद- लोकसत्ता.

संदर्भ- http://www.loksatta.com/vishesh-news/feminist-islam-113595/

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...