अंधश्रद्धेतून जाणार होता जुळ्या बहिणींचा जीव !!

अंधश्रद्धेतून जाणार होता जुळ्या बहिणींचा जीव !!


पनवेल तालुक्यातील औला गावात जन्माला आलेल्या सयामी जुळ्या मुलींची अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्तता झाली असून, आता त्यांना वेगवेगळे करण्यासाठी वाडीया रुग्णालयातील डॉक्टरांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.


पनवेल तालुक्यातील औला गावात जन्मलेल्या सयामी जुळ्या मुलींना गावकर्‍यांच्या मदतीने सोमवारी सकाळी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे प्रकरण किचकट असल्याने रुग्णालयाने पवार कुटुंबीयांना शालूला सायन रुग्णालयात हलवावे, असा सल्ला दिला होता. त्यानुसार, शालू व तिच्या दोन मुलींना सोमवारीच सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अंधश्रद्धेचा पगडा असलेला शालूचा पती अरुणने मुंबईहून एका बीडमधल्या तांत्रिक-मांत्रिकाशी दूरध्वनीहून संवाद साधला. त्यानुसार या मुलींचा गुरुवारच्या अमावस्येच्या रात्री बळी द्यायचे ठरले. शालू आणि दोन्ही मुलींना घेऊन अरुणने सोमवारी पुन्हा गाव गाठले. मात्र, अरुणची ही संशयास्पद वागणूक गावकर्‍यांना खटकली. परिणामी, जागरूक गावकर्‍यांनी मुंबईतल्या ‘प्रथम’ या संस्थेशी संपर्क साधला.


‘प्रथम’च्या प्रतिनिधींनी जुळ्या मुलींचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अरुण दोन्ही मुलींना घेऊन पसार होऊ नये म्हणून त्यांनी मंगळवारी रात्री पनवेल एसटी आगारामध्ये ‘सापळा’ रचला; शिवाय गावकर्‍यांनाही त्याच्यावर पाळत ठेवण्याची विनंती केली. या खबरदारीमुळे मुलींना घेऊन पळून जाण्याचा अरुणचा प्रयत्न फसला.

त्यानंतर ‘प्रथम’च्या सदस्यांनी आणि गावकर्‍यांनी अरुणचे दोन ते तीन तास समुपदेशन केले. हा ‘देवीचा कोप’ अथवा तत्सम घटना नाही, हे त्याला पटवून दिले. यामुळे शालूच्या जुळ्या मुलींचा जीव वाचला असून, संस्थेने त्या तिघींना बुधवारी परळमधील वाडीया रुग्णालयात दाखल केले आले. रुग्णालयाने आता जुळ्या मुलींची तपासणी सुरू केली आहे.


दोन आठवड्यांनंतर होणार शस्त्रक्रिया-

‘प्रथम’च्या सदस्यांनी पालकांचे समुपदेशन केल्याने या जुळ्या बहिणींचे प्राण वाचले. या दोघींच्या किडणीसह इतर अवयवांची तपासणी केल्या नंतरच दोन आठवड्यांनंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.


जन्माला आलेल्या जुळ्या बाळांचे अवयव एकमेकांस चिकटकलेले असणे, असे अपवादात्मक होते. यावर आधुनिक शस्त्रक्रिया करून तोडगा काढता येतो. मात्र, यात फार कमी वेळेला यश येते. अंधश्रद्धेच्या आहारी जात अशा मुलांचा बळी देण्याच्या घटना घडत नाहीत. मात्र, असे होत असेल तर हा विज्ञानाचा पराभव आहे. ही एक जीवशास्त्रीय विकृती वगळता दुसरे काही नाही. - नरेंद्र दाभोळकर (संस्थापक, अंनिस)

 
जन्माला आलेल्या जुळ्या बाळांचे अवयव एकमेकांस चिकटकलेले असण्याचे प्रकार फार दुर्मीळ असतात. लाखो किंवा कोट्यवधीत असे एखादे प्रकरण होते. पोटाचा भाग एकमेकांना चिकटलेला असेल आणि तो केवळ त्वचेचा असेल तर शस्त्रक्रिया करताना फारसा त्रास होत नाही. मात्र, अनेकदा अशा शस्त्रक्रिया करताना अडचणी येतात. कारण, शस्त्रक्रियेनंतर दोघांपैकी कोणत्या एकाला वाचवायचे अथवा दोघांना वाचवणे शक्य आहे का? याचा सारासार विचार शल्यविशारद करीत असतात. त्यामुळे अशा शस्त्रक्रिया करताना सिटीस्कॅनसह इतर तपासण्या कराव्या लागतात. त्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला जातो.
 
- डॉ. अशोक राठोड (बालरोग तज्ज्ञ)


संदर्भ- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-10-05-2013-1e658&ndate=2013-05-10&editionname=main

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...