ऊन लागले असेल तर हे उपाय नक्की करा !!

ऊन लागले असेल तर हे उपाय नक्की करा !!


ऊन लागल्यानं ताप आल्यास थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवाव्यात. अनेक जण ताप आला की, अंगावर ब्लँकेट टाकून, स्वेटर घालून शरीरातला घाम काढतात. पण असं न करता पाण्याच्या पट्ट्यासोबत पंखा (कमी वेगावर) लावावा / तसेच दिवसातून दोन-तीन वेळा पूर्ण शरीराचं स्पंजिंग करावं. म्हणजे शरीरातील तपमान लवकरात लवकर खाली उतरतं.

ऊन लागल्याच्या त्रासात कांदा हा अतिशय गुणकारी ठरतो. ताप लवकर उतरत नसल्यास कांद्याचा रस संपूर्ण शरीराला विशेषत: कपाळाला आणि पोटाला चोळावा. कांद्याच्या थंड प्रवृत्तीनं ताप उतरण्यास मदत होते.

नाकाचा घोळणा फुटून रक्त येत असल्यास रुग्णाला कॉटवर झोपवून रुग्णाचे डोके कॉटखाली येईल याची काळजी घ्यावी. रुग्णाच्या नाकावर आणि कपाळावर बर्फ फिरवावा, दुर्वांचा रस लावावा किंवा हे दोन्ही उपलब्ध नसल्यास कांद्याचा रस लावावा.

उन्हाळ्यात भरपूर घाम येतो. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी घामावाटे बाहेर पडतं. इतर ऋतूत जास्त प्रमाणात ते लघवीवाटे बाहेर पडतं. घामामुळे पाणी जास्त बाहेर पडत असल्यामुळे उन्हाळ्यात लघवीचं प्रमाण कमी होतं. लघवीचं प्रमाण अतिशय कमी झाल्यास लघवीला जळजळतं. ज्यांना उन्हाळ्यात खूप घाम येतो त्यांनी पाणी जास्त प्रमाणात प्यावं.

पाण्यात धने आणि जिरे रात्रभर भिजवून सकाळी ते प्यावं किंवा गरम पाण्यात धने आणि जिरे उकळवून दिवसभर ते पाणी प्यावं. गोखरू हे औषधही रात्री पाण्यात भिजवून किंवा गरम पाण्यात उकळवून प्यावं. पण हे औषध घेण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्यावा.

उन्हाळ्यात येणार्‍या घामामुळे अनेकांना घामोळ्यांचा त्रास होतो. बारीक पुरळीच्या स्वरूपात येणार्‍या घामोळ्यांमुळे खाजणं, जळजळणं यामुळे रुग्ण बेजार होतात. घामोळ्यांचा त्रास ज्यांना नेहमी होतो त्यांनी उन्हाळ्यात सिंथेटिक कपड्यांऐवजी कॉटनचे कपडे वापरावे. सिंथेटिक कपड्यांमुळे बाहेर न पडता त्वचेत जिरणारा घाम कॉटनच्या कपड्यांमुळे बाहेर पडतो. शरीराच्या ज्या ठिकाणी जास्त घाम येतो त्या जागेवर दिवसातून दोन-तीन वेळा स्पंजिंग करावं किंवा त्या जागेवर वाळा आणि चंदन पावडर आपण वापरत असलेल्या टाल्कम पावडरमध्ये मिसळून वापरावी किंवा टाल्कम पावडरमध्ये न मिसळता ती तशीच लावली तरी उपयुक्त असते.

उन्हाळ्यात खूप घाम येणार्‍या लोकांनी वाळा आणि चंदन पावडर पाण्यात मिसळून पोटातून घ्यावी. तसेच वाळ्याचं सरबत प्यावं.

हातापायाची जळजळ होत असल्यास पायांच्या तळव्यांना वाळा आणि चंदन पावडरचा लेप लावावा. साजूक तूपही तळव्यांना लावल्यास स्निग्धता आणि थंडावा मिळतो.

कितीही पाणी प्यालं तरी तहान भागत नाही हेही ऊन लागण्याचं लक्षण आहे. या प्रकारच्या लक्षणात रुग्णानं साधं, माठातलं किंवा फ्रीजमधलं पाणी न पिता वाळ्याचं पाणी प्यावं. वाळ्याची चव तुरट असते. तृष्णेच्या आजारात वाळ्याच्या पाण्यानं तहान शमते किंवा दिवसभर गरम पाणी प्याल्यासही तहान शमते. आभासी तहानेवर माठाचं किंवा फ्रीजचं पाणी हा तात्पुरता उपाय ठरतो.

ऊन लागलेलं असल्यास कैरी भाजून त्यातला गर काढून त्यात धने, जिरे घालून केलेलं पन्हं फायदेशीर ठरतं. तसेच रोजच्या जेवणात कांद्याची कोशिंबीर खावी.

ऊन बाधलेल्या रुग्णांनी थंड प्रकृतीच्या भाज्यांचा वापर अधिक करावा. हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा. तसेच ताजी, हंगामी फळं जास्त खावीत.

प्रसारक- निलेश रजनी भास्कर कळसकर.(सोबत प्रबोधन टीम)

धन्यवाद - डॉ .रजनी गोखले.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...