अमिताभ बच्चन कुटुंबाचे ज्योतिषी झोपतात १५ किलो सोन्याचा पलंगावर !!

अमिताभ बच्चन कुटुंबाचे ज्योतिषी झोपतात १५ किलो सोन्याचा पलंगावर !!

 
'त्यांचा' पलंग तब्बल १५ किलो सोन्यानं मढवलाय... अवतीभवतीच्या वस्तूही सोन्या-चांदीनं लखलखताहेत... शयनगृह सजवण्यासाठी जवळपास ५० किलोहून जास्त चांदी सहज वापरली असावी... या खोलीतलं एक चकाकणारं कपाट उघडलं तर कोट्यवधी रुपयांची रोकड डोळे दीपवून टाकते... आणि 'त्या' सोन्याच्या बेडवरची उशी उचलली तर १५ लाखांच्या करकरीत नोटा पाहून गरगरायला होतं...


कुण्या मुघल सम्राटाच्या आलिशान महालाचं हे वर्णन नाही किंवा कुण्या राजकुमाराची सूरस काल्पनिक गोष्टही आम्ही सांगत नाही आहोत. तर, बंगळुरूचे प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर स्वामी यांच्या बेडरुममध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांना जे 'वास्तुरंग' दिसले त्याचीच ही 'कुंडली'... अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या या सुपरहिट जोडीची पत्रिका ज्यांनी जुळवली, तेच हे चंद्रशेखर स्वामी... आयकर खात्याच्या धाडीनंतर त्यांच्या स्वतःच्या पत्रिकेतला 'मंगळ' 'वक्री' झाल्याचे संकेत मिळताहेत.


कर्नाटक निवडणुकीदरम्यान झालेल्या आर्थिक 'देवाण-घेवाण' प्रकरणी आयकर खात्यानं नुकतेच चंद्रशेखर स्वामी यांच्या घरावर छापे टाकले. रिअल इस्टेट क्षेत्रातील बडी असामी असलेले स्वामी मनी लॉण्डरिंगमध्येही चांगलेच सक्रिय असल्याचं बोललं जातं. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनाही हा संशय होताच. त्यामुळे त्यांनी १० कोटी रुपयांच्या स्वामींच्या बंगल्यावर धाड टाकली आणि त्यांच्यापुढे जणू अलिबाबाची गुहाच उघडली गेली.


इलेक्ट्रॉनिक गेटमधून आयकर अधिकाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताच, त्यांना बीएमडब्ल्यू, लेक्सस आणि बीटल या महागड्या गाड्या दिसल्या. त्या पाहत-पाहतच ही मंडळी आत शिरली आणि तिथला राजेशाही थाट पाहून अवाक् झाली. स्वतः नेहमीच सोन्यानं मढलेल्या चंद्रशेखर स्वामींचा बंगला म्हणजे सोन्या-चांदीची खाणच होती. त्यांचा नुसता पलंगच १५ किलो सोन्याचा असल्याचं एका अधिकाऱ्यांनं सांगितलं. साधं बाथरुम सजवण्यासाठी त्यांनी तब्बल २ कोटी रुपये खर्च केलेत, तर कपाटात कोट्यवधींचं घबाड लपवलंय. सोन्या-चांदीची मोजदाद करायची तर 'पूज्य' मोजता मोजता आपली दमछाक होईल, असं सूत्रांनी सांगितलं.
राजकारण, उद्योग आणि सिनेसृष्टीत चंद्रशेखर स्वामींची मोठी पोच आहे. अमिताभ बच्चन यांचे बंधुराज अजिताभ यांनी त्यांची बिग बींशी ओळख करून दिली होती. तर, ज्योतिषाचा वारसा वडिलांकडूनच आलेला असल्यानं ऐश्वर्याचे कुटुंबीय त्यांना आधीपासूनच ओळखत होते. त्यामुळे अभिषेक-ऐश्वर्याची पत्रिका त्यांचीच जुळवली होती. त्यानंतर तर त्यांचं भाग्यच फळफळलं होतं. पण आता त्यांचे ग्रह फिरले आहेत.


चंद्रशेखर स्वामी यांच्या प्रेयसीच्या घरावरही आयकर खात्यानं छापा टाकला. तिथेही ८ कोटी रुपयांहून अधिक बेनामी संपत्ती सापडली आहे. त्यामुळे आता स्वामींची 'कुंडली' मांडायला आयकर अधिकाऱ्यांनी सुरुवात केलेय. एरवी लोकांचे ग्रह पाहून भविष्य सांगणाऱ्यां स्वामीजींना आता दिवसाढवळ्या 'तारे' दिसण्याची चिन्हं आहेत.


 
धन्यवाद- सुधीर चौधरी.

संदर्भ - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20025240.cms

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...