सारं काही आलबेल आहे...

सारं काही आलबेल आहे...


हो हो... सारं काही आलबेल आहे. प्यायला पाणी नाही, खायला भाकर नाही. अंगाला कपडा नाही, घराला छप्पर नाही एवढंच..!! तरीही सारं काही आलबेल आहे. कशासाठी जगतोय, कसे जगतोय माहित नाही. जिवंत आहोत की गाठलाय तो नसलेला स्वर्ग, काही समजत नाही. तरीसुद्धा सारं काही आलबेल आहे.

अन्न पाण्यासाठीही इथे भांडावे लागतंय. आम्ही सत्यासाठी भांडतोय आणि असत्यासाठीही भांडतोय. आम्ही हिरव्या, निळ्या आणि भगव्यासाठीही भांडतोय. भांडताना रक्त मात्र लालच सांडतोय. तरीही सांगतोय, सारं काही आलबेल आहे. रंगासाठी भांडता भांडताच ठरलेलं आमचं मरण आहे. कारण " विचारांना कायमची श्रद्धांजली, आणि पुतळे मात्र अमर रहे" , हेच आमचं धोरण आहे. कुणी काय करून ठेवलं, याचं आम्हाला महत्व नाही. कारण फक्त विचार स्वीकारून अनुकरण करणं, हे आमचं कधीच तत्व नाही. जमिनीच्या बांधापासून देशाच्या बांधापर्यंत लढाई सुरूच आहे. तरीही सारं काही आलबेल आहे.


 सारं काही आलबेल आहे....

सारं काही माझंच, हाच आजचा सुविचार आहे. तुमच्यासाठी काय पण , हा तर फक्त प्रचार आहे. घरातून निघताना डोळ्यावर पट्टी बांधायची आणि पाहत राहायचे तमाशे दिवसाढवळ्या चालणारे. कळ्यांना फुलण्याआधी खुडणारे इथलेच आणि अन्नपाण्यावाचून तडफडणारेही इथलेच. खुर्चीवर बसून नाचवणारे इथलेच आणि बेभामपणे नाचणारेही इथलेच.. खेळवणारे हात बदलत आहेत आणि खेळ तोच पुढे पुढे सरत आहे. तरीही सारं काही आलबेल आहे.

स्विस बँक जितकी ओसंडून वाहते, तितक्याच वाहतात दानपेट्याही . संसदेतल्या डुलक्या काय आणि समाधी लागलेले बाबा काय, दोन्हीही सारखेच. दोघांनाही आठवण येते आपली फक्त हात पसरतानाच.. उंचावरच्या राजवाड्यांना तळाशी असलेल्या झोपड्यांचे काय?? वरच्या दिसणाऱ्या आणि ' नसणाऱ्याही ' मजल्यावर हाच निरोप पोचत असेल की, खाली सारं काही आलबेल आहे.

गेलातच देवळात , तर विचारा त्या असल्या-नसल्या देवाला एकदा .. या सगळ्यात कुठंकुठं आहेस तू..? आणि असलास तर असा कसा आहेस तू..?? तोही मग डोलावेल मान आणि म्हणेल हळूच, " बाबा रे, तू आपला शांत रहा .. कारण माझ्या माहितीप्रमाणे तर सारं काही आलबेल आहे. सारं काही... आलबेल आहे....!!!"

लेखं - रवि मेमाणे (पुणे)

1 comment:

  1. its really funny but its true . who will change it . what do you think that who should change it .

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...