शहर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा प्रशासनाला शिव्या न घालता स्वत:शीच करूया !!
स्वातंत्र्यपूर्व काळ होता तो. मुंबईतला एक नेहमीप्रमाणेच दिवस. लोक आपआपल्या कामात व्यस्त होते. रस्त्यावर मात्र कचऱ्याचा ढिग साचला होता. कुणाचंच त्याकडे लक्ष नव्हंत. दुर्गंधी सुटली होती पण लोक नाकाला रूमाल लावून ये-जा करत होते.
तेवढ्यात एक गोरागोमटा वृद्ध तिथे आला. आपल्या हातातल्या खराट्याने तो कचरा उचलू लागला. त्याच्या चेहर्यावर तेज अन् समाधान ओसंडून वहात होतं. येणाऱ्या जाणार्यांच लक्ष त्यानं वेधून घेतलं.
आपण केलेला कचरा एक वृद्ध उचलतोय हे पाहून लोकांच्या माना शरमेने खाली गेल्या आणि मग प्रत्येक जण झाडू घेऊन त्या वृद्धाच्या मदतीला धावला. काही वेळातच रस्ता चकाकू लागला.
तो वृद्ध लोकांना उद्देशून म्हणाला-''बाबांनो, तुम्ही एवढ्या मोठ्या शहरात रहाता पण इतकी अस्वच्छता तुम्हाला कशी चालते??? हे शहर आपलं घर नाही का??? जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसा आपला परिसर पण साफ ठेवा म्हणजे प्लेगासारखे महारोग पसरणार नाहीत.
मी गावखेड्यातला माणूस पण एक गोष्ट सांगतो ध्यानात ठेवा रे बाबांनो, जिथे स्वच्छता असते तिथंच समृद्धी... सुख नांदते..'' ठिगळं लावलेल्या कपड्यातला एक अनोळखी माणूस पण त्याच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द वेचायला लोकांनी गर्दी केली होती.
एव्हाना गर्दीतल्या एकाने त्याला ओळखलं आणि ''गाडगेबाबा..'' असं म्हणत तो त्यांच्या पाया पडायला गेला. पण तो खाली वाकताच त्याच्या पाठीवर हात मारून तो अवलिया तरातरा चालत निघून गेला.
आज शहरातला बकालपणा आणि गलिच्छपणा पाहून वाटतं कि आजही समाजाला गाडगेबाबांची गरज आहे. तेव्हा त्यांना आदर्श मानून आपलं शहर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा प्रशासनाला शिव्या न घालता स्वत:शीच करूया तरच या महापुरूषाच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल !!
लेखं -गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!