आपल्या प्रबोधन परिवारातील सदस्य हास्यसम्राट देवा झिंजाड यांच्या जीवनाची संघर्षपूर्ण कहाणी त्यांच्याच शब्दात !!

आपल्या प्रबोधन परिवारातील सदस्य हास्यसम्राट देवा झिंजाड यांच्या जीवनाची संघर्षपूर्ण कहाणी त्यांच्याच शब्दात !!

बरेच जण मला म्हणतात तुम्ही फार हसता, हसवता याचा अर्थ तुमचा जन्म फार मोठ्ठ्या श्रीमंत कुटुंबात झाला असेल?? बालपण फार चांगल गेल असेल ?? खूप ऐश केली असेल लहानपणी,खूप मज्जा केली असेल ? पण... त्यांना काय माहिती माझा जन्म एका गरीब कुटुंबात झालाय म्हणून.... अश्या कुटुंबात जिथे वडील लहानपणीच देवाच्या घरी रहायला गेले... आईला एकटीला टाकून... अन मला पण...


 

वडील गेले तेव्हा पहिलीला होतो. अन आमच्याकडे दहा शेळ्या होत्या. मला एवढच कळले होते कि आता आईला शेळ्या सांभाळायला मदत नाही होणार...पण आई मला म्हणाली कि "अप्पा" परत पेणार आहेत... मग मी म्हटल आई , मग त्यांना जाळून का ग टाकलं ?? त्यावेळेस ती म्हणाली अरे जी माणसे देवाला आवडतात त्यांना देव बोलावून घेतो आभाळात... अन मग त्यांना देवाकडे पाठविण्यासाठी.... त्यांना अग्नी द्यावा लागतो !! हे बोलताना ती माझ्याकडे न पाहता बोलायची... मी वाट पाहिली दिवाळीपर्यंत. पण मग कळले कि जाळून टाकलेली माणसे परत कधीच येत नाहीत. मी सुन्न झालो पण सुन्न होऊन आईला जाणवून द्यायचं नाही एवढी प्रगल्भता माझ्यात आली होती त्यावेळेस...आईने सांगितलेले खोटे ठरू नये म्हणू मी ते खरे मनात गेलो ते आजवर.

 

पावशेर गोडेतेल माझी आई एका महिन्याला पुरुवून पुरवून वापरायची.. कालवणात जर चुकून जास्त तेल दिसलं तर मला केवढा आनंद व्हायचा. ताटली ला थोड हि तेल राहू द्यायचो नाही... सगळ चाटून पुसून घ्यायचो. कधी कधी कालवण नसल कि आई अन मी मीठ पाणी घ्यायचो अन त्यात बाजरीची भाकर चुरून खायचो.

 

वेगवेगळ्या रंगाच्या लुगड्या चे चार तूकडे जोडून ती लुगड तयार करायची... फाटलेल्या पदरातून तिचे काळेभोर केस डौलाने डोलायचे... आमच्या दारिद्र्याची ठिगळे ती अख्ख्या समाजात मानाने मिरवायची.. माझ्या शाळेच्या खाकी हाफ चड्डीवर पाठीमागे ठिगळावर ठिगळ वाढत जायची तशीच वरची ईयत्ता गाठायची.. चार ईयत्ता तरी आरामात पास व्हायचो एका चड्डीवर... मग कधी कुणाल थोडीफार दया आली तर त्यांच्या पोरांच्या नको असलेल्या अन वापरून वापरून खराब झालेल्या कपड्यांची एखादी जोडी मला दिवाळीला भेटायची. ती कपडे घालून ज्याने दिलेत त्याच्यासमोरून जाताना फार कसतरी वाटायचं पण " गरिबीला आग लागली होती न " !

 

दोन रुपये पाच किलो दळण दळायला लागायचे पण, ते वाचवण्यासाठी आई ती पहाटे चार ला उठून जात्यावर दळत बसायची. तिच्या माथ्यावरून निथळलेल्या घामाने त्या पिठाचे सोने करायची.... घरचे रॉकेल वाचावे म्हणून मी घराबाहेर ग्रामपंचायतीच्या लाईट च्या दिव्यावर अभ्यास करायचो किंवा ज्यांच्या घरी लायीट असेल त्यांच्या घरी अभ्यासाला जायचो.. पण ,वर्गात पहिलाच नंबर मिळवायचो. मग शाबासकी म्हणून आई मला मोलमजुरी वरून येताना चिचा,बोरे ,सिताफळे अशी हंगामी फळे आणायची अन माझ तोंड गोड करायची. त्यावेळेस मला तो रानमेवा फार मोठा वाटायचा. मी खूप अगदी Graduate, MBA etc पास झालो तरी कधीच पेढे वाटले नाहीत. कारण मला आई म्हणायची आपण कष्ट करायचे अन लोकांना का बरे पेढे वाटायचे ??? मला ते खरे वाटते.

 

नवीन दफ्तर दरवर्षी मुलांना मिळायची मला पण मिळायचे पण ,माझ्याच वापरून वापरून फाटलेल्या खाकी चड्डीच्या कापडाचे... त्यालाच दोन बंद लावायचे कि झाले नवीन दफ्तर ! फार फार तर त्याला सजवण्यासाठी आई फाटलेल्या तिच्याच चोळीचे काठ लावायची अन मग माझ दफ्तर खूप खूप छान दिसायच... मी ते मुद्दाम दिसेल अस चालायचो.

 

भात सणाला जरी मिळाला तरी मी उड्या मारायचो. कारण रेशन वरले तांदूळ भरायला जे २० रुपये लागायचे ते सुद्धा मिळणे दुरापास्त होते.. पुरण पोळी खायला वर्षभर वाट पहावी लागायची. त्याच आनंदात मी आईला मदत म्हणून दगडाच्या पाट्या वर पूरण वाटून द्यायचो. गावतल्या देवांना ती मला नैवेद्य ठेवायला सांगायची. पण मला लहानपणापासून देवांचा फार राग होता. माहितीय का ? माझा समज होता कि "देवामुळेच" आपले हाल होताहेत... मग घरून नेलेले नेवैद्य मीच खावून घायचो अन अजून पण दुसर्यांचे खावून यायचो.. तेव्हा पण एक प्रश्न होता अन आज पण आहे जो देव खात नाही त्यालाच का बरे सर्वजण खायला देतात अन मंदिरा बाहेर बसलेल्या गरिबांना का खायला देत नाहीत ??? शेवटी ते नैवेद्य कुत्रेच खातात ना ?

 

बिन तेलाच्या मिरचीला ( चटणी ला ) कंटाळून रानात शेळ्या घेऊन गेल्यावर शेळीच दुध डब्यात काढून भाकर चुरून खायचो... अन आईला घरी आल्यावर सांगायचो कि तिच्याच पिल्लाने पिऊन टाकलं म्हणून.... पण हे खोट असूनही आई काही म्हणायची नाही. माझी एक आवडती शेली होती तीच नाव "झिपरी" ती अजूनही माझ्या स्वप्नात येते...फार जीव लावल त्या शेळीने मला... माझी दुसरी आईच वाटायची ती.... रानात गेल्यावर तिच्या "स्तनाला " मी बिनधास्त तोंड लावून दुधू प्यायचो.

 

इयत्ता दहावी पर्यंत पायात घालायला चप्पल मिळालीच नाही.मामाच्या गावाला किंवा जत्रेला जायचे म्हटले कि, आई एक पिशवी द्यायची अन त्यात असायची "वडाची पाने" चटके बसू नये म्हणून ती पाने पायाला बांधायची अन मग बिनधास्त चालायचं मैलो अन मैल उन्हातूनच, आईच्या पडलेल्या सावलीवर पाउल ठेवत ठेवायचे अन पान फाटलं कि परत पिशवीतून दुसरी पाने काढायची अन पायाला बांधायची ती पाने बांधताना माझ्या आईला खूप वाईट वाटायचं. डोळ्यातल पाणी कित्येकदा माझ्या पायावर पडलेलं मी पाहिलंय. पण तिने कधी ते जाणवून दिले नाही. खूपच जर उन्हाचा त्रास व्हायला लागला तर ती मला तिच्या पाठीवर उचलून घ्यायची अन दमत नाही तोवर चालत राहायची. फार दमायची ती घामानी ओलीचिंब होऊन जायची. पदराने माझ्यासहित तीच तोंड पुसायची ओढ्यावर किंवा विहिरीवर गार गार पाणी प्यायचे अन पुढच्या प्रवासाला निघायचे. असा आम्ही दोघे एका दिवसात कमीत कमी २० किलोमीटर चा प्रवास करायचो..

 

निवडणुकांमध्ये वापरले जाणारे ह्यानडबिलाच्या पाठीमागे मी गृहपाठ करून न्यायचो... पण अक्षर पाहून गुरुजी फक्त मार्क द्यायचे. सातवीपर्यंत नवीन वही कधीच मिळाली नाही मला. गाईड काय असत ते फक्त इतर मुलांकडे च पहायचं.. जो अभ्यास करायचा तो एखाद्या जुन्या पुस्तकावर किंवा गुरुजींनी फळ्यावर शिकवलेल्या धड्यावरच पास होत जायचं.

 

जेव्हापासून हातात टिकाव ,फावडे उचलता येतंय तेव्हापासून रोजगार हमीच्या कामावर जायचो, वय बसत नसायचं, मग लेबर ऑफिसर अचानक आला कि पळत जाऊन ढेकळात पालथे लपायचे....मग तो तेथून जाईपर्यंत तसच थाम्बायचं तेव्हा उन्हाळा असायचा... त्यावेळेस अंग एवढ भाजून निघायचं कि विचारू नका.. पण जर लेबर ओफिसरने पहिले तर... आईला खड्डे खणायला मदत करता येणार नाही म्हणून गपगुमान तसच राहायचं पडून ढेकळात. खुरपायला माझा कुणी हात नव्हते धरत,ज्वारी,बाजरी,गहू काढायला आई अन मी दोघांत घ्यायचो..तेवढच वर्षाच धान्य मिळायचं ना. भुईमुगाच्या शेंगा तोडायला जायचो, आंबे पाडायला,चिंचा पाडायला,कुणाचे खत पांगवायला अशी कामे मी आनंदाने करायचो. तेवढेच दहा वीस रुपये मिळायचे.

 

दिवाळीला फटाक्यांचा आवाज माझ्यापेक्षा माझ्या आईला जास्त त्रास द्यायचा, आई म्हणायची बाला फटाके फोडून माणूस अजून गरीब होतो.... मी अजून फटाका फोडत नाही. दिवाळीला आई कधी कधी लाडू करायची अन "मी खाईन नंतर" अस म्हणून ती आख्खी दिवाळी काढायची अन मला मात्र पोटभर खायला घालायची..तरी ती फार गोड राहायची ! लाडू संपले तरी ते ज्या पातेल्यात ठेवलेले असायचे त्याचा वास मी महिनाभर घ्यायचो.

 

मला गोड फार आवडायचं पण घरात साखर अभावानेच यायची, ती भरपूर असावी म्हणून मी चौथीत असताना थोडी साखर पेरली होती.अन दररोज तिला पाणी पण घालायचो... एक दिवस आईने पहिले अन म्हणाली "काय करतोस रे" तिला कळल्यावर ती खूप हसली. अन म्हणाली अरे साखर हि उसापासून तयार होते रे... तेव्हापासून मी हुशार झालो.

 

माणसे कधी मरतील ह्याची मी लहानपणी आतुरतेने वाट पाहायचो.... का माहितीय का ???  कारण माणूस मेल्यावर दशक्रियेला बुंदी, शिरा, लापशी, भात अस खायला मिळायचं ना.... गावजेवण असल्यावर जेवायला ताटली घेवून गेलो कि घरी वाढून पण आणायचे अन ते उन्हात वाळवून वाळवून खायचे... शाळेत मिळणारी सुकडी तर खूप मोठा आधार असायची.

 

वाचनाची आवड फार होती पण शाळेचीच पुस्तके मिळणे कठीण तिथे इतर पुस्तके कुठून मिळणार ना... मग मी हॉटेल च्या बाहेर उभे राहायचो अन लोकांनी भेळ खावून टाकलेला वर्तमान पत्राचा तेलकट तुकडा घेऊन वाचनाची भूक भागवायचो... जे मिळेल ते वाचायचो.

 

मला चांगलं आठवतंय आमच्याकडे एक गारीगार (आईस्क्रीम) वाला यायचा त्याच्याकडे चार आणे आणि आठ आणे अशा दोन प्रकारच्या गारीगार असायच्या. आमच्या शेजारची एक बाई मुंबईहून उन्हाळ्यात आली कि त्याच्या मुलांना गारीगार घ्यायची.... मला पण कधी कधी द्यायची चार आन्यावली गारीगार... तेव्हा मला वाटायचं कि मला आठ आन्यावली द्यावी पण नव्हती मिळत... मग संध्याकाळी आई कामावरू आली कि मी तिच्याकडे आठ आणे मागायचो.. गारीगार् साठी... आई म्हणायची अरे आठ आण्याची गरीगारची "काडी" खाण्यापेक्षा त्याच आठ आण्यातदोन "काडेपेट्या" येतीलं अन त्या महिनाभर पुरतील.. मग मी म्हणायचं जाऊदे ग आई मी असच म्ह्टल ग... पण दुसर्या दिवशी परत तो गारीगार वाला यायचा अन माझ्या मनाला त्रास द्यायचा. मग मी नंतर, तो गारीगार वाला आला कि स्वतःला घरात कोंडून घायचो अन तो निघून गेला कि मगच बाहेर यायचो.

मला चांगल आठवतंय कि, हास्यसम्राट झाल्यावर आई माझी झी टीव्ही वर झळकली खरी..... पण ती कुठल्याच एपिसोडला हसलीच नाही... ती रडली.... ती जशी रडली तशी ती एकदाच रडती होती... बाप गेल्यावर !

 

तीच आजच वय ८० च्या पुढे आहे ,पण माझी सर्वात जवळची मैत्रीण म्हणून मी तिच्याकडे पहातो.... माझी लहानपणाची अंगडी दुपडी ती अजून जपून ठेवते अन त्यातच माझ बालपण शोधते.... तिला म्हटल का ग आई जपून ठेवते अस तू ?? तर ती म्हणते बाळा "कितीही मोठ्ठा झालास तरी मागचे दिवस विसरू नकोस" अन तेच विसरू नये म्हणून मी तुझी अंगडी दुपडी अजूनही ठेवलीत.


आई आय लव यु !!

आई तू जगातली सगळ्यात सुंदर माता आहेस ग !!
 

कधी कधी जेवायला नाही मिळाल तर.....

दोन तांबे पाणी प्यायचं !
 

मग गच्च पोट भरायचं !
 

आई म्हणायची आता
 

आता जेवणाच र काय करायचं ??
 

पोटाला पाय लावून रातभर गपगुमान झोपायचं !

 

खूप शिकलो, खूप अनुभव घेतले खूप चांगली वाईट माणसे भेटली पण मनाला कधी मळून दिले नाही.कविता केल्या, व्याख्याने करतोय,हास्यसम्राट चे शो करतोय, सूत्रसंचालन चालू आहे, माणूस म्हणून चांगली माणसे जोडतो... हे सगळ आपल्याशी शेयर करण्याच कारण म्हणजे , जर कुणी जीवनाला नावे ठेवत असेल , परिस्थितीला दोष देत असेल तर त्यांना थोडा धीर द्यावा !!

 

सांगायला गेल तर खूप आहे.... हे फक्त ०.००००१ % सांगितल मी..... आता.... नाही सांगणार... आत्ता फक्त हसायचं अन हसवायचं.. आईला राणी वाणी ठेवायचं.



आपलाच- कवी/हास्यसम्राट - देवा झिंजाड.


गाव - गारखिंडी, तालुका- पारनेर, जिल्हा- अहमदनगर. सध्या पुणे.


फेसबुक प्रोफाइल- https://www.facebook.com/DevaZinjad.Hasysmrat

1 comment:

  1. Its real facts but today generation is not in a position to accept it !
    Kishor Bhore Nannaj Tq.Jamkhed Dist.Ahmednagar

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...