एका आंबेडकरी कार्यकर्त्याचे मरण !!

एका आंबेडकरी कार्यकर्त्याचे मरण !!



नेमकं सांगायचं तर सोमवार दि. २० मे २०१३ रोजी रात्री १० वाजता आम्ही वरळी स्मशानभूमीत जयवंत कांबळेला जाळून आलो. जाळून म्हणजे आम्ही विधिवत त्याचा देह चितेवर वगैरे ठेवून मग त्याच्या सरणाला आग लावली, असं काही झालं नाही. त्याला सरळ इलेक्ट्रिक भट्टीमध्ये टाकण्यात आलं. अर्ध्या- तासात जयवंतची राख हातात. चित रचायची म्हणजे लाकडे आली, तूप आलं, रॉकेल आलं आणि हे सर्व करण्यासाठी मग पैसे आले. नेमकी पैशाचीच कमतरता होती जयवंतकडे.

 
पैशावरून आठवलं, सगळी दुनिया पैशाला लक्ष्मी वगैरे म्हणते. पण जयवंत मात्र पैशाला 'रंडी' म्हणायचं. रांडेला नैतिकता वगैरे काही नसतं. ती फक्त श्रीमंतांच्याच मांडीवर बसते आणि गरीबाकडे ढुंकूनही बघत नाही. जयवंत म्हणायचा, पैशाचंही तसच असतं. तसा तो मुळात विद्रोहीच होता.

 

पंथारच्या सुरुवातीपासूनच जयवंत त्यात क्रियाशील होता. सुरुवातीला राजा - नामदेव भाईची जी एकत्रित पंथर होती. त्यामध्ये राडे करायला जयवंत सगळ्यांच्या पुढे असायचा. परंतु नंतर पंथर फुटली. राजा ढालेंनी मास मुव्हमेंट काढली. नामदेवची वेगळी दलित पंथर जन्माला आली आणि या दोन्ही संघटना थंड झाल्यावर आठवलेंनी ' बह्रातीय दलित पंथर ' काढली. पुढे ती सुद्धा बरखास्त करून सगळे रिपब्लिकन पक्ष म्हणून एक झाले. आठवले समाजकल्याण मंत्री झाले. या सगळ्या प्रवासानंतर जय्वान्त्ला ' पंथर ' या शब्दाबद्दल प्रचंड घृणा निर्माण झाली.

 

पंथरच्या पहिल्या फळीतला जयवंत जयवंत पंथारच्या मोर्चात घोषणा द्यायचा, ' हर जोर जुल्मके टक्करमें संघर्ष हमारा नारा हैं।' ' सत्ता संपतीसे कोसो दूर ,' असे म्हणणारी पंथर सत्तेला चटावली आणि 'सत्तेसाठीच सर्व काही ' असे म्हणू लागली. पंथारच्या नेत्यांचा आक्रमकपणा संपून त्यांचे राजकीय नेते झाले. युत्या - आघाड्या करून बऱ्याचजनांनी ' चळवळ गेली तेल लावत ' म्हणत आपले हात धुवून घेतले. आपली घरे भरली, माड्या बांधल्या, गाड्या घेतल्या, पण या सर्व प्रकाराने जयवंत मुळापासून हादरला, भांबावून गेला, बाबासाहेबांच्या परिवर्तनाचे एक बुलंद स्वप्न डोळ्यात घेऊन जगणारा जयवंत मग मात्र या तथाकथित चळवळ नावाच्या वळवळीपासून सुटत गेला.

 

पण चळवळीपासून तुटल्यानंतर जयवंत कुणाचा बॉडीगार्ड बन, सिक्युरिटी गार्ड बन अशी काहीना काही कामे तो आपल्या प्रपंचासाठी करीत राहिला. इंदू मिलच्या आंदोलनानंतर त्याचा लहान भाऊ वसंत आंबेडकर भवन मध्ये येऊ लागला. एकदा भीमा कोरेगांवला जात असताना घेऊन वसंत एका तरुण मुलाला घेऊन आला. मला म्हणाला, हा जयवंताचा मुलगा ' लंकेश '. प्रवासात लंकेश बरोबर खूप गप्पा रंगल्या. त्याच्याकडून कळले कि जयवंत खूप आजारी असतो.

 

जेव्हा मी त्याच्या घरी जाऊन जयवंतला भेटलो तेव्हा मला धक्काच बसला आडदांड जयवंत एकदम ' पोक्या ' झाला होता. अठरा विश्व दारिद्र्यत प्रामाणिक आंबेडकरी कार्यकर्ता कसा जगतो त्याचे जिवंत प्रत्यंतर मला आलं. आंबेडकरी कार्यकर्ता आपलं घरदार वाऱ्यावर सोडून आयुष्यभर चळवळीसाठी काम करतो. परंतु ज्यावेळी त्याचे वाईट दिवस येतात त्यावेळी चळवळ त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही. हाच जयवंत कांग्रेस मध्ये असता तर एखाद्या महामंडळावर गेला असता. राष्ट्रवादीत असता तर एखाद सरकारी कॉन्ट्रक्ट मिळवून गब्बर झाला असता किंवा शिवसेनेत असता तर किमान एखादा शिव- वडापावचा स्टोल तरी त्याला नक्कीच मिळाला असता. जयवंत सारख्या तडफदार कार्यकर्त्याला हे सहज शक्य झाल असतं, पण त्याचा आंबेडकरी निष्ठेने त्याला या सर्वांवर पाणी सोडायला लावलं. संधीसाधू हुशार कार्यकर्ता बार मध्ये बसून चळवळीवर तासनतास चर्चा करताना पाच सहा हजारांचा सहज चुराडा करतात. हातामध्ये, गळ्यामध्ये सोन्याचा जाडजुड सोन्याचा साखळ्या घालून मिरवतात अशा वेळी एक सच्चा कार्यकर्ता पैशाअभावी शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये आपला शेवटचा श्वास घेत असतो. ज्या चळवळीसाठी जयवंत उध्वस्त झाला, त्याचा प्रेतयात्रेत आनंदराज आंबेडकर यांच्याशिवाय एकही आंबेडकरी नेता उपस्थित नसतो. मला प्रश्न पडतो कि जयवंत उश्वस्त झालाय कि चळवळ उध्वस्त झाली ?

 

वाघासारखा काळाकभिन्न जयवंताचा सगळ्यांना खूप आधार वाटायचा. जयवंत उभा राहिला कि वैरी थरथर कापायचा. अन्याय झाला- जयवंत पाहिजे, मोर्चा काढायचा- जयवंत पाहिजे, राडा करायचा- जयवंत पाहिजे, संकट कोसळलं- जयवंत पाहिजे आणि मग जयवंत आजारी पडला, बिछान्याला खिळला, आर्थिक चनचणीने ग्रासला तेव्हा त्याच्या मदतीला चळवळ पाहिजे होती, पण पण त्यावेळी कोणीही त्याच्या मदतीला नव्हते. ज्या चळवळीसाठी, ज्या माणसांसाठी जयवंतने कसलीच फिकीर केली नाही ती चळवळ, ती माणसे आज जयवंतकडे पाठ फिरवून उभी होती. आणि याच अपेक्षाभंगाने जयवंत खचत चालला होता, जयवंत टीबीच्या आजाराने मेला असं जरी दिसत असलं तरी ते पूर्ण सत्य नाही. खरी गोष्ट हि कि, आपल्या चळवळीने त्याचा अक्षरक्षः मर्डर केला आहे. चळवळीसाठी रक्त सांडणारे असे कितीतरी जयवंत आज पैशाअभावी तडफडत मरत असतील. अशावेळी हे सर्व डोळ्यासमोर पाहत असणाऱ्या जयवंतच्या मुलाने, लंकेशने जर चळवळीपासून जाण्याचा विचार केला तर दोष कुणाला द्यायचा ? हि नवीन पिढी जर चळवळीपासून दूर गेली तर हि चळवळ जिवंत राहूच शकणार नाही. सर्वसामान्य कार्यकत्यांची चूल विझवून, त्याला उध्वस्त करून उद्या आपण शासनकर्ती जमात जरी बनलो, तरी त्या शासनकर्ती जमातीला काही अर्थ असणार नाही. आणि म्हणून जर आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवायची असेल तर असे शेकडो जयवंत आपल्याला शाबूत ठेवावेच लागतील व हि जबाबदारी कोणा एकाची नसून आपल्या सर्वांचीच आहे.

लेखं- विवेक मोरे (९९८७९ २९२६६)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...