जोतीरावांच्या मृत्यूची हकीगत !!

जोतीरावांच्या मृत्यूची हकीगत !!


 




जोतीरावांच्या मृत्यूची हकीगत हि काहींच्या आठवणींमध्ये आलेली आहे. शेवटची तीनएक वर्षे जोतीरावांना लकवा झाल्यानं उजवा हात चालत नव्हता. तरी डाव्या हातानं त्यांनी ' सार्वजनिक सत्यधर्म ' हे पुस्तक लिहिलं. शेवटी ते पडूनच असत. त्यांनी अन्न कमी केलं. मृत्युच्या तीन दिवस आधी मुंबई व इतरत्रच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतल. पुण्यातले लोकही बोलावले. ' आता माझ्या निरोपाची वेळ आली आहे. माझ्यानंतर सत्यशोधक समाज चालवा… ' या अर्थाचं बोलले. पण ते जातील असं कुणालाच वाटलं नव्हतं. सगळे पांगले. तोच ओतूरचे भाऊ कोंडाजी व इतर कार्यकर्ते आले. त्याचं समवेत बोलले. त्यांना जेवायला बसवलं. स्वतः न जेवता शांत झोपले. रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी जोतीरावांनी एक मोठा श्वास सोडला. आणि सगळं संपलं.


या महापुरुषांच्या बाबतीत सगळचं वेगळ घडत गेलं. त्यांच्याशी न पटणारे, आयुष्यभर भांडणारे, बहिष्कार टाकणारे भाऊबंद पुढं आले आणि हे शरीर उचलायचा अधिकार फक्त आमचा आहे, कोणी हात लावायचा नाही असं म्हणू लागले. पोलिस आणून त्यांना बाजूला केलं. जोतीरावांच्या अंत्ययात्रेत पुढं गाडगं धरून चालल्या सावित्रीबाई !



एवढा युगप्रवर्तक विचारवंत, समाजसुधारक गेला, तरी पुण्याच्या ' केसरी ' व 'सुधारक ' या प्रसिद्ध वर्तमानपत्रांमध्ये दोन ओळींची बातमीही आली नाही. नंतर काही ठिकाणी स्फुटं आली, तीही हात राखून., ख्रिस्ती न झालेल्या फुल्यांवर रागावलेल्या एका ख्रिस्ती नियतकालिकात ' हे चांगले गृहस्थ होते, पण वाट चुकलेले होते, ' या अर्थाचं चापून आले. जे काल्प्रवत आज टिकलेत, त्यांची समकालीनांकडून हि उपेक्षा ! का असेल ? ते स्वातंत्र्यचळवळीपासून फटकून राहिले म्हणून ? जोतीरावांचा सवाल होता की,' ब्रिटीश सत्ता गेल्यावर परत पेशवाईतल्यासारख आमच्या गळ्यात मडकं अडकवणार नाही कशावरून ? ' तो रास्त नव्हता का ? आणि 'सुधारक'नही या उपेक्षित सामील व्हावं ?



आज फुल्यांना जाऊन शंभराहून अधिक वर्षं होऊन गेली. त्यांनी शेतकऱ्यांचे, स्त्रियांचे, जातीभेदाचे प्रश्न उठवले. ते आजही वेगळ्या स्वरुपात आहेतच. त्यासाठी त्या प्रश्नांवर फुल्यांची भूमिका समजूनच पुढं जावं लागतं. जोतीरावांची समकालीनांनी उपेक्षा केली, आणि शिष्यांनी त्याला स्वार्थी राजकारणच स्वरूप दिलं, तरी फुल्यांनी महाराष्ट्राला हे दिलं ते मी विसरू शकत नाही. खेड्यापाड्यांतल्या बहुजन समाजाला त्यांनी गदागदा हलवलं. त्याची चुणूक जिथं ती चुणूक रुजली तिथं आजही पाहायला मिळते.



मला जुन्नर भागातल्या आदिवासी खेड्यांमध्ये चळवळ बघायला मिळाली. महादेव कोळी जमातीची वस्ती होती. आम्ही गेलो त्या घरी जख्ख म्हातारी चक्क पेपर वाचत बसली होती. मी विचारलं " तुम्हाला वाचायला कुणी शिकवलं ? " ती म्हणाली, " माझा आज सत्यशोधक होता, त्याला मुलींना शिकवायची फार हौस." पण घरातील सून मात्र निरक्षर होती.



दुसरं दृश्यं, त्याच भागातलं, साखरपुडा होणार होता. मुलगा मुंबईचा. त्यानं ताटं, भांडी, साड्या, सफरचंद असं काय काय मांडून ठेवलेलं. एक म्हातारा उठला आणि त्यांना म्हणाला, "उचला सगळी घाण. तुम्ही एक दिवस याल आणि पद्धत पाडून जाल. नंतर गरिबाला कठीण होऊन बसंल. आपली पद्धत सव्वा रुपया, नारळाची. तेवढं दया आणि चालू पडा. लग्नानंतर मुलीला सोन्यानं मढवा हवं तर ! " त्या म्हाताऱ्यानं ते सगळं उचलायला लावलं.



जोतीरावांची धडपड, ध्यास कुठंतरी पोहोचलेला होता आणि तो शिल्लक होता, हे पाहून खूप बरं वाटलं...



- डॉ. अनिल अवचट ( शिकविले ज्यांनी या पुस्तकातून )

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...