संहारक स्वत: स्वस्थ, भवताल मात्र उद्ध्वस्त हा चमत्कार तर खरांच !!

संहारक स्वत: स्वस्थ, भवताल मात्र उद्ध्वस्त हा चमत्कार तर खरांच !!



हिन्दु धर्माच्या मान्यतेनुसार ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रयीतील महेश म्हणजे शंकर सृष्टीचा संहारकर्ता असल्याने त्याने उत्तराखंड राज्यात जो हाहाकार माजवून सोडला त्याकडेही कदाचित काही लोक भक्तिभावाने पाहू शकतील. पापाचार वाढल्याने अखेर महादेवालाच आपला तिसरा नेत्र उघडावा लागला असे म्हटले जाईल वा होते ते बर्‍याकरिता अशीदेखील याची संभावना केली जाईल.


 
त्याउलट परमेश्‍वराच्या दर्शनाला गेलेल्या भाववेड्या आणि भक्तिवेड्या पापभीरुंचे प्राणहरण करणारा, सारे काही होत्याचे नव्हते करुन सोडणारा आणि स्वत: मात्र नामानिराळा राहून कलियुगातील मानवजातीनुसार स्वत:च्याच पायापुरता पाहणारा असा कसा तुमचा देव आणि अशी कशी तुमची अंधश्रध्दा असाही एक युक्तिवाद जाज्वल्य बुध्दिप्रामाण्यवादी करु शकतील. पण या दोन्ही तर्कांमध्ये आणि तर्कटांमध्ये तसा काहीही अर्थ नाही. पाप-पुण्याच्या भाषेतच बोलायचे झाल्यास ही सारी तुमचीच म्हणजे मानवजातीचीच पापे आहेत व ती आता तुमच्या अंगाशी आली आहेत असे म्हणण्यावाचून गत्यंतर नाही.


हिन्दु धर्मियांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणार्‍या चार धाम यात्रेचा अवघा प्रवास हिमालयाच्या कुशीतून होतो. तो सुखद, सुखकारक आणि सुरक्षित नाही हे एक प्राचीन सत्य असल्यानेच पूर्वीच्या काळी या यात्रेवर निघताना गडीमाणसे म्हणे आपापल्या बायकांचे कुंकु पुसूनच घराबाहेर पाऊल टाकीत असत. ठायीठायी आणि पावलापावलांवर धोका दबा धरुन बसलेला असतो हे जितके खरे तितकेच या धोक्याला अधिक धोकेदायक बनविण्याचे काम मात्र परमेश्‍वराने वा निसर्गाने केलेले नाही तर ते केले आहे मानवजातीने हेहि तितकेच खरे.


 
द्वादश ज्योतिर्लिंगांच्या वर्णनातील श्लोकामध्ये ‘हिमालये तु केदारं’ असा ज्याचा उल्लेख येतो त्या केदारनाथाचे मंदीर हे या चार धाम यात्रेतील एक धाम. सदर मंदीर कधी, कोणी, का आणि कसे बांधले याविषयीचा कोणताही दस्तावेज उपलब्ध नाही. आहे त्या केवळ आख्यायिका. त्यातील एका आख्यायिकेनुसार पाच पांडवांपैकी मधल्या म्हणजे भीमाने हे मंदीर बांधले असे सांगितले जाते. महाभारताचा काळ सनपूर्व तीन ते पाच हजार वर्षांचा गृहीत धरला तर तब्बल पाच ते सात हजार वर्षे जे मंदीर अनेक प्रपात आणि उत्पात सहन करुन आजही दिमाखाने उभे आहे त्या जागी जर ते तसेच स्थिर राहत असेल तर तो दैवी चमत्कार मानायचा की या मंदिराच्या निर्माणकर्त्या अभियंत्यांचे मनोमन कौतुक करायचे? इतक्या प्राचीन काळात आजच्या तुलनेत कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना (?) हजारो वर्षे जशीच्या तशी टिकून राहील अशा वास्तूची निर्मिती करण्याचे कौशल्य जर अवगत असेल तर हा आजच्या काळातील तथाकथित अत्याधुनिक अभियांत्रिकीचा, वास्तुशास्त्राचा आणि पर्यावरण तसेच हवामान तज्ज्ञतेचा पराभवच नाही का?


 
निसर्गाशी म्हणजेच आजच्या परिभाषेत पर्यावरणाशी खेळ करु नका, अंती तो तुमच्याच अंगलट येईल असे कितीही सांगितले तरी हा खेळ थांबत नाही. निसर्गाच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या विरुध्द म्हणून जे जे असेल ते केले जाते हा एक भ्रष्टाचार आणि आजच्या काळात सर्वमान्य झालेला दुसर्‍या प्रकारचा भ्रष्टाचार यांचा एकत्र परिणाम म्हणजे उत्तराखंडातील उत्पात आहे. पंडुपुत्राने निर्माण केलेल्या केदारनाथ मंदिरातील शिवलिंगावर म्हणे दुधाचा वा पाण्याचा अभिषेक केला जात नाही तर त्या लिंगावर तुपाचे गोळे थापले जातात (भारतीय संस्कृती कोश). कुणी निर्माण केली ही (कु)प्रथा? थापलेले हे धृत कुठे जाते, ते सडून त्याचे काय होते, त्यापासून कोणती हानी होते याचा कुणीतरी विचार केला आहे?


पण हेच कशाला. अतिरेकी हिन्दु धर्माभिमान्यांना कटू वाटेल (नव्हे, ते वाटलेच पाहिजे) पण जी जी म्हणून हिन्दु देवालये आहेत ती अत्यंत गलिच्छ (किंचित अपवाद दक्षिणेकडच्या देवालयांचा) अस्वच्छ, कोंदट आणि निसर्गनियमांशी पूर्णत: फारकत घेणारीच असतात. वाढविलेल्या व त्यातही पुन्हा पावलेल्या म्हणजे नासक्या नारळाची दुर्गंधी, पाण्याचे आणि नारळपाण्याचे वाहणारे पाट, फुले आणि कालांतराने झालेले त्याचेच निर्माल्य, प्रसादाच्या वा अन्य सामुग्रीच्या पुड्या बांधलेले कागद, मंदिरांच्या गाभार्‍यात लटकणारी कोळीष्टके ही सारी हिन्दु देवालयांची आजची व्यवच्छेदक लक्षणे मानली जातात. तुलनेत मशिदी, चर्चेस, गुरुद्वारे, अग्यारी, पॅगोडा, जैन मंदिरे अशा अन्य धर्मियांच्या प्रार्थनागृहांमध्ये नेहमीच अत्यंत स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण असते. या सर्व ठिकाणची स्वच्छता नजरेत भरत असते तर हिन्दु देवालयांमधील अस्वच्छता सतत नजरेला टोचत असते. तिचा पर्यावरणाच्या र्‍हासाशी अगदी निकटचा संबंध असतो.


 
पर्यावरणाचे संतुलन ढासळायला लावणारा आणखी एक कारक वा पर्यावरणाचा शत्रू म्हणजे आवाज! ‘शांतीतुल्यं तपो नास्ती’ असे शास्त्रवचनच आहे. शांततेसारखे दुसरे तप नाही. पण हिन्दु देवालयांना जसे स्वच्छतेचे वावडे तसेच ते शांततेचेही वावडे. ‘मी तुझ्या दर्शनासाठी आलो आहे तेव्हां निजला असशील तर उठ’ असे बजावणारा घंटानाद केल्याशिवाय एकही ‘भावभोळा हिन्दु’ मंदिरात प्रवेश करीत नाही. गोंगाट, कलकलाट, घंटानाद, चित्रविचित्र आवाजातील श्लोकपठण यापायी जे ध्वनी प्रदूषण सतत आसमंत छेदीत असते त्याचाही पर्यावरणाच्या असंतुलनाशी निकटचा संबंध असतो. पर्यावरणाचे संतुलन ढासळले तर त्याच्या परिणामी कोणते आणि कसे अरिष्ट ओढवते हे जाणून घ्यायचे असेल तर ज्यांनी अगोदरच पाहिला असेल त्यांनी ग्रेगरी पेकचा ‘मॅकानाज गोल्ड’ हा इंग्रजी सिनेमा आठवावा आणि ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो जरुर पहावा.


 
इत्यर्थ इतकाच की उत्तराखंड राज्यात जी हानी झाली आहे तिची व्याप्ती केवळ त्या राज्यापुरतीच र्मयादित नसल्याने ती नि:संशय अपरिमित अशीच आहे. पण अनुभवांती माणूस शहाणा होतो असे जे म्हटले जाते ते खरे असेल तर या हानीपासून काही बोध घेतला जातो वा नाही हेच आता महत्वाचे.


 
महाराष्ट्राला असा बोध घेण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. अरबी समुद्रात शिवछत्रपतींचे अतिभव्य स्मारक उभारण्याला केन्द्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. पण ही परवानगी विनाशर्त नाही. एक शर्त आहे. ती म्हणजे स्मारकाच्या परिसरात कोणतीही दुकाने, व्यावसायिक आस्थापना व संकीर्ण बांधकामे येता कामा नयेत. तशी काळजी घेतली गेली तरच पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. तथापि आघाडीतील राष्ट्रवादी आणि युतीमधील शिवसेना या दोहोंकडे ‘उद्यमशील’ कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी असल्याने त्यांच्या स्वयंरोजगाराची हळूहळू तिथेही व्यवस्था होऊ लागली तर काय होईल याचा विचारही तूर्तास न केलेलाच बरा.
 
लेखं- हेमंत कुलकर्णी

 
संदर्भ- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=NashikEdition-6-1-23-06-2013-19dde&ndate=2013-06-23&editionname=nashik

 
धन्यवाद- दै.लोकमत

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...