आधुनिक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची सत्यकथा !!
एकदा गाडगेबाबा गावातून जात असताना नदीच्या काठावर त्यांना काही भटजी पिंडदानाची पूजा करत असलेले दिसले. बाबा तिकडे जाउन म्हणाले- "भडजीबुवा..भडजीबुवा.. मले लय भूक लागली बाप्पा, मी हा भात खाऊ का..??"
गाडगेबाबांचा एकंदर वेश एखाद्या भिकाऱ्या सारखाच..!! अंगावर असलेल्या कपड्यात एकसंध कपडा कुठेच नव्हता, ठिकठिकाणी ठिगळ लाऊन तयार केलेलं ते नेसले होते. त्यांचा तो अवतार बघून भटजी त्वेषाने म्हणाले- "अरे वेड्या, हा भात नाही, याला पिंड म्हणतात पिंड..."
"पिंड म्हणजे काय असते बाप्पा..? गाडगेबाबांनी प्रश्न केला.
"अरे हे जे गृहस्थ दिसतायत ना त्यांचे वडील मृत्यू पावले आहेत, ते स्वर्गात गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हे पिंड ठेवले आहे..." बाजूला बसलेल्या डोक्याचा गोटा केलेल्या माणसाकडे बोट दाखवत भटजी म्हणाले.
गाडगेबाबांनी चेहरा प्रश्नार्थक केला, म्हणाले- "त्यायले पिताजी तिकडे स्वर्गात, भात इथं, त्यायले कसला पोहोचते..?? मले खूप भूक लागली..मीच खातो तो भात..द्या मले..."
"अरे वेड्या, त्यासाठीच तर मी मंत्र म्हणतोय ना..??" भटजी रागाने म्हणाले.
"मंत्र बोलून काय होईल बाप्पा..??" गाडगेबाबांनी लग्गेच प्रश्न टाकला.
"वेड्या, अरे मंत्र म्हटले कि, हे पिंड त्यांच्या पिताजींना पोहोचणार, तिकडे स्वर्गात, आणि ते संतुष्ट होणार.." भटजी बाबांना टाळण्यासाठी बोलला.
"माह्या बाप्पा, काय म्हणता भडजीबुवा..?? मंत्र बोलला कि, भात असा सर्गात जाऊन पोहोचते..?? पण सरग तर लय दूर असेल ना..?? गाडगेबाबा म्हणाले.
"होय रे वेड्या स्वर्ग खूप दूर आहे इथून.." इति भटजी.
"मबई इतका दूर..?? गाडगेबाबांनी लग्गेच प्रश्न केला.
"अरे हो रे वेड्या, मुंबई काय घेऊन बसलास..?? इथून लाखो-करोडो मैल दूर आहे स्वर्ग.." भटजी अत्यंत त्रासिकपणे म्हणाले.
"माह्या बाप्पा.. काय म्हणते हे भडजीबुवा.." असं स्वतःशीच बडबडत गाडगेबाबा नदीच्या पाण्यात उतरले.. चांगल्या कंबरेभर पाण्यात गेल्यावर दोन्ही हात वर आकाशाकडे करून ते जोरात म्हणाले- "मह्या बाप्पा, बाप्पा.. ह्यायने मंत्र म्हटला कि, ह्यायचा भात तिकडे दूर स्वर्गात जाते रे..." असं म्हणत त्यांना काय वाटले कोण जाणे..?? त्यांनी दोन्ही हातांनी भर-भरून पाणी जोरात हवेत उडवायला सुरुवात केली. काठावर पूजेसाठी बसलेली माणसं, भटजी सगळे भिजून गेले. सगळे चिडले बाबांवर. भट रागाने म्हणाला- "अरे ए वेड्या, तुला वेड लागले काय रे..?? अरे मुर्खासारखा पाणी काय उडवतोस आमच्या अंगावर...??"
बाबा त्यांच्याकडे बघून हसले आणि म्हणाले- "बाप्पा मी, नाय पाणी उडवत..??
"मग काय करतोयस तू हे..??" भट रागाने म्हणाला.
"माह्या बाप्पा, मी माझ्या शेताले पाणी देऊन ऱ्हायलो..."
"अरे वेड्या, कुठे आहे तुझं शेत इथे..??" त्रासिक भट.
"ते तिकडे अमरावतीला हाव.. मी त्यालेच पाणी देऊन ऱ्हायलो ना बाप्पा.." गाडगेबाबा पाणी उडवत शांतपणे म्हणाले.
"हाहाहा.. अरे वेड्या तू उडवलेले पाणी फार फार तर फर्लांगभर जाईल रे.. अमरावती इथून ४०० मैल दूर आहे, तिकडे कसे जाईल? एवढे साधे कळत नाही तुला.. वेडा रे वेडा..." भट कुत्सितपणे हसत म्हणाला.
गाडगेबाबा तितक्याच शांतपणे म्हणाले- "तुह्या मंत्राने जर हा भात लाखो-करोडो मैल दूर सर्गात जात असेल तर माह्य पानी बी माझ्या शेताले पोचायला हवं ना रे बाप्पा...?"
भट निरुत्तर झाला.
अंगावर चिंध्या पांघरलेल्या वेडगळ दिसणाऱ्या मनुष्याने आज तिथे आपल्या वागण्यातून खूप मोठा संदेश लोकांना दिला होता. एकही इयत्ता न शिकलेल्या गाडगेबाबांना जी गोष्ट कळाली होती ती गोष्ट आज "डिग्र्यांनी" भरलेल्या फाईल्स घेऊन फिरणाऱ्या तुमच्या आमच्या सुशिक्षितांना कळत नाही या पेक्षा मोठे दुर्दैव आणि मानसिक गुलामगिरी ती आणखी काय असावी..??
जेव्हा आज-सारखी नियतकालिके, साप्ताहिके, मासिके किंवा प्रिंट मिडिया नव्हता तेव्हा समाज प्रबोधनाचं अत्यंत जिकरीचं काम महाराष्ट्रात संतांनी लोकांना समजेल अशा भाषेत प्रभावीपणे केले हे आजही त्यांना 'टाळ-कुटे देवभोळे' मानणाऱ्या तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रीयांना माहित नाही, हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे दुर्दैव म्हणावे लागेल..!!
लेखं- गौरव गायकवाड.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!