बाबासाहेब कुणाचे??
या देशाला एकसंध ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी मानवमुक्तिचा लढा दिला, हे काम समजून घ्यायला अजून काळ लागेल. मात्र असे बाबासाहेब कुठल्या विशिष्ट समाजाचे वा गटाचे नाहीत. महामानव हा सर्व मानव समाजाला पुढे नेत असतो. आपले बाबासाहेब हा अनेकदा ऐकलेला शब्दप्रयोग आज बाबासाहेबांच्या महापनिरिर्वाणानंतर ५७ वर्षांनी करताना हात थरथरतो आहे. आज आपले बाबासाहेब असं सर्वसमावेशक सर्वनामासह केलेलं विधान कोणाच्या भावना दुखावून जाईल हे सांगता येत नाही. मात्र भारतीय म्हणवून घेणार्या प्रत्येकाला हे म्हणण्याचा अधिकार आहे. हिंदू, बौद्ध, जैन, दिन ए इलाही हे धर्म ज्या भूमीवर निर्माण झाले, महानुभाव, वारकरी पंथासारखे पंथ आपल्या नीतिनियमांसह वृद्धिंगत झाले त्या देशातील प्रत्येक नागरिकासाठी समान हक्काचा कायदा-घटना-धर्म ज्यांनी फार मोठ्या परिशीलनाने निर्माण केला ते बाबासाहेब एका विशिष्ट गटाचे अथवा समूहाचे कसे होऊ शकतात? हा प्रश्न माझ्या मनात सातत्याने येत असतो.
डॉ. बाबासाहेबांचं हे फार मोठं योगदान हळूहळू विस्मृतीत चाललं आहे. डॉ. बाबासाहेब हे केव्हाही एका जातीपुरते किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. सर्वधर्मसमावेशक विचार करणारा हा नेता अखंड भारतातील दलित, उपेक्षित, शोषित समाजाच्या उत्थानाचा मार्ग सांगणारा महान द्रष्टा होता. महाडच्या चवदार तळ्याला आज पवित्र स्थान म्हणून महत्त्व आलं आहे. हा समतेचा स्फुल्लींग ज्या ठिकाणी पडला त्या चवदार तळ्याच्या पाण्याने पेट घेऊन एका क्रांतीला जन्म दिला. त्या दिवशी सवर्णांनी पाणी बाटलं म्हणून सुरबानाना टिपणीसांच्या घरावर काठ्या, सोटे घेऊन हल्ला केला. महत्त्वाचं असं की त्यावेळी खोत सवर्ण म्हणून ज्यांचा उल्लेख येईल असे सुरबानाना, भाई अनंतराव चित्रे, बापुसाहेब पोतनीस यांसारखे धडाडीचे पुरोगामी विचारवंत डॉ. बाबासाहेबांच्या बरोबर होते. सुरबानाना टिपणीसांनी तर डॉ. बाबासाहेबांची साथ अखेरच्या क्षणापर्यंत सोडली नाही. डॉ. बाबासाहेबांना जातीय किंवा धार्मिक बंधनात गुंतवून ठेवणार्यांनी याचा विचार करणं अगत्याचं आहे. अर्थात आपल्या कर्तृत्व शून्यतेवर पांघरूण घालण्यासाठी मूळ वैचारिक गाभा आपल्या सोयीने बदलण्याचा अधिकार राजकीय पुढार्यांना आहे हे मान्य करणंही तितकंच गरजेचं आहे.
डॉ. बाबासाहेबांचा पी.एच.डी. चा प्रबंध अर्थशास्त्रावरचा होता. त्यांनी शेतीविषयक विचार मांडताना म्हटलं आहे की शेतीचा व्यवसाय हा प्रमुख उद्योग आहे. बाबासाहेबांचं लक्ष श्रमिक शेतकर्यांच्या दुरवस्थेकडे त्यांच्या चळवळीच्या सुरुवातीपासूनच वळलं होतं. महाडच्या १९२७ च्या डिसेंबरच्या दुसर्या परिषदेत केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारण्यासाठीची ही चळवळ आर्थिक गुलामगिरी तोडण्यासाठी देखील आहे हे आवर्जून मांडलं आहे.
डॉ. बाबासाहेबांनी कुलाबा जिल्ह्यात उभा केलेला खोती विरुद्धचा लढा हा शेतकरी, शेत कसणारे यांचा जमीनदार-सावकार यांच्याविरुद्धचा लढा होता. महात्मा गांधींनी केलेला चंपारण्याचा लढा जमीनदार विरुद्ध सरकार असा होता. म्हणून आमचे वडील म्हणत की, डॉ. बाबासाहेबांनी खर्या अर्थाने या देशात शेतकरी चळवळ प्रथम सुरू केली. त्यावेळी कुलाबा जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या लढ्यात ज्याप्रमाणे खोत हे सर्व धर्माचे आणि जातीचे होते तसे कुळही विविध जाती धर्माचे होते. चिखलपच्या महार कुळाला एका खोताने चाबुकाने झोडून ठार मारलं. त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी माणगाव तालुक्यात चंदोरे या गावी जी सभा घेण्यात आली त्याचं नेतृत्व सुरबानानांनी केलं. त्यात सामील झालेले कुळ हे कुणबी, मराठा, चांभार, महार अशा विविध जातींचे होते. तिथे जातीभेदाला वाव नव्हता. शोषित समाजाचं शोषणकर्त्याविरुद्धचा लढा होता तो. या ठिकाणी एका गोष्टीची आठवण करून द्यावी असं वाटतं. चवदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतरचं.... मात्र विस्मरणात गेलेली एक गोष्ट इथे नमूद करतो. महाड नगर परिषदेने १९४० साली डॉ. बाबासाहेबांना सन्मानपत्र देऊन गौरवलं. त्याला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात… मला आज मानपत्र देऊन आपण माझा जो सत्कार केलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. कारण गेली दहा-पंधरा वर्षं मी जे काही सार्वजनिक कार्य करत आहे त्याचा उगम महाडातच झाला आहे. तिथेच मला स्फूर्ती मिळाली आणि या शहरात या कार्यात मला सहकारी मिळाले. ते मिळाले नसते तर माझं कार्य यशस्वी झालं नसतं. मागे आम्ही चवदार तळ्याच्या पाण्यासाठी दंगा केला. पण तो विसरून महाडकर मला लोभाने वागवतात. हे विशेष होय. माझं कार्य दिसायला जातीवाचक असलं तरी ते खरं राष्ट्रीय कार्य आहे. देशातील सर्व लोक संघटित होऊन एक राष्ट्र निर्माण व्हावं ही माझी सदिच्छा आपण ओळखली आहे हे आजच्या मानपत्राने सिद्ध झालं आहे.
या देशाला एकसंध ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी मानवमुक्तिचा लढा दिला, हे काम समजून घ्यायला अजून काळ लागेल. मात्र असे बाबासाहेब कुठल्या विशिष्ट समाजाचे वा गटाचे नाहीत. महामानव हा सर्व मानव समाजाला पुढे नेत असतो.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!