खादीच्या आडोशाला दहशतवादी शेंडी !!

खादीच्या आडोशाला दहशतवादी शेंडी !!


मनुवादी प्रवृत्ती दिवसेंदिवस आक्रमक होत असून तथाकथित संस्कृती रक्षणाचा ठेका घेतलेल्या मनुच्या वारसदारांनी समता, बंधुता आणि स्वातंत्र्याला मातीमोल करण्याचा विडा उचललेला दिसतो. धार्मिकतेच्या बुरख्याआड राहून दहशतवादाला खतपाणी घालणाऱया या पवृत्ती दिवसेंदिवस निर्ढावत आहेत ही चिंतेची बाब आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱयांचा शोध लावण्यास सरकार अपयशी ठरल्याने अशा प्रवृत्ती जास्तच मग्रूर झाल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रवृत्तीपैकी कोणीतरी वारकरी संप्रदायातील ख्यातनाम प्रवचनकार, इतिहास संशोधक डॉ. संदानंद मोरे यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिली. 'जास्त शहाणपणा केलात तर तुमचा नरेंद्र दाभोळकर करु' अशा आशयाची ही धमकी असून, डॉ. सदानंद मोरे यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. डॉ. मोरे संत-वारकरी संप्रदायातील विद्वान, लोकशाही मूल्यांना मानणारे साक्षेपी संशोधक आहेत. वारकरी पंथ, या पंथाची विठ्ठलभक्ती,भक्तीमार्गावरील श्रद्धा याबाबत त्यांची स्वत:ची ठाम मते आहेत. यामुळे ते कोणाच्याही श्रद्धेला ठेच पोहचेल अशाप्रकारचे चुकीचे वक्तव्य किंवा लेखन करणार नाहीत असे त्यांच्याबाबतीत ठामपणे म्हणता येऊ शकते. ईश्वर आराधना करताना द्वेष-मत्सराच्या हिशोबात अडकण्यात वारकऱयांना रस नसतो. कारण आयुष्यभर पुजाअर्चा, भजने, वाऱया, उपासतापास याद्वारे निष्ठापूर्वक भक्ती अर्पण केली की, इच्छित फलप्राप्ती होते यावर त्यांचा दृढ विश्वास असतो. डॉ. सदानंद मोरे अशा वारकऱयांचे नेतृत्व करत असल्याने, त्यांच्या ठायी कुणाविषयी द्वेष, मत्सर असणे शक्य नाही. समाजात वावरताना आपण सारी ईश्वराची लेकरं आहोत त्यामुळे एकमेकांविषयी सद्भाव, जिव्हाळा असणे आवश्यक असल्याचे मत मांडणारे डॉ. मोरे इतिहासाचे गाढे अभ्यासक व संशोधकही आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
 




स्वातंत्र्योत्तर भारताची सामाजिक रचना व पाया लोकशाहीने प्रस्थापित केलेल्या समता, सामाजिक न्याय व बंधुतेवर आधारित असल्याने जात-सांप्रदाय इ.सारे पवाह गौण ठरतात. डॉ. मोरेंना हा विचार अभिप्रेत असल्याने त्यांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणा या प्रकारावर कडाडून टीका करण्यास मागेपुढे पाहिले नाही. प्रा.श्याम मानव व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर प्रबोधनाचे मिशन चालविताना त्यात झोकून दिलेल्यापैकी ते एक आहेत. धर्माबद्दल कुणाला असूया असू नये. पण धर्माच्या नावाखाली इतरांना भयभीत करणे हा गुन्हा आहे. 


भारतीय राज्यघटनेने व्यक्तीस्वातंत्र्य अर्थात विचार व्यक्त करण्याचे, तद्नुषंगानं विचार प्रसारित करण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार दिला आहे. त्यानुसार परवा डॉ. मोरे यांनी भूमिका मांडताना नरेंद्र मोदी हे फॅसिस्ट विचारांचे असल्याने मोदीच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकारसुद्धा फॅसिस्ट प्रवृत्तीचे असू शकते, फॅसिस्ट प्रवृत्तीचे सरकार स्थापन होणे म्हणजे देश आणि सर्व स्तरातील समाजाला धोका निर्माण होणे आहे असा इशारा एका वृत्त वाहिनीवर बोलताना दिला होता. या मुलाखतीनंतरच डॉ. मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. डॉ. मोरे यांना मिळालेल्या धमकीचे एरवी फारसे गांभीर्य राहिले नसते. परंतु, डॉ. दाभोळकर यांची झालेली हत्या आणि या हत्येच्या सूत्रधारांना हुडकून काढण्यास सरकारला आलेले अपयश या पार्श्वभूमीवर डॉ. मोरे यांना देण्यात आलेल्या धमकीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. मोदींबाबत डॉ. मोरे यांनी व्यक्त केलेल्या शंकेचा प्रतिवाद करता येऊ शकतो. त्यांची ही मते मान्य नसणारेही अनेक लोक असू शकतात. लोकशाही व्यवस्थेत आपल्याला मान्य नसलेल्या मतांविषयी प्रतिवाद करुन जनमत आपल्या बाजूने उभे करण्याचा सक्षम पर्याय उपलब्ध असतो. डॉ. मोरे यांना धमकी देणाऱयांचा मात्र लोकशाही प्रकियेवर विश्वासच नाही. यामुळेच आपल्याला विरोध करणाऱयाचे जीवनच समाप्त करण्याच्या धमक्या ते देऊ शकतात. ज्यांना तर्काने आणि विवेकाने नामोहरम करणे शक्य नाही त्यांचे जीवनच संपवावे अशी मानसिकता तयार होणे हे राज्यकर्त्याच्या अपयशाचे फलित आहे असे आम्हाला वाटते. संविधानात लोकशाही मान्य करण्यात आली. आहे, लोकशाहीनुसार देशात निवडणुका होत आहेत. परंतु समाजात मात्र लोकशाही रुजविण्यात सरकारने कोणतीही पाऊले उचलेली नाहीत. व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात लोकशाही मूल्ये रुजण्यासाठी बालवाडीपासून ते उच्चशिक्षणापर्यंतच्या अभ्यासकमातून लोकशाहीचे संस्कार व्यक्तीवर होणे आवश्यक असते. मात्र आमच्या शाळा कॉलेजात माणसा-माणसात भेद मानणाऱया, जन्माच्या आधारावर विशेष लाभ देणाऱया धर्मव्यवस्थेचाच पुरस्कार केला जातो. विरोधकाचे म्हणणे ऐकून घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याच्या प्रकियेला महत्व देण्याऐवजी धार्मिक पुस्तकात काय लिहिले आहे त्यानुसार वागावे अशी शिकवण दिली जाते. अल्पसंख्य धर्मियांच्या कत्तली करणाऱया लोकांना शिक्षा करण्याचे समर्थन करण्याऐवजी अशा व्यक्तींना नायकत्व बहाल करण्याचे पयत्न पसारमाध्यमातून, नाटक-चित्रपटातून, कथा-कादंबऱयातून काव्य-शाहीरीतून केले जातात. विरोधकांना शिवीगाळ करणारांना, जन्माच्या स्थानावरुन, भाषेच्या स्थानावरुन, धार्मिक श्रद्धांच्या बाबतीतील भिन्नतेवरुन माणसा-माणसात शत्रूत्व वाढीस लावणारांना अमूक-तमूक हृदयसम्राट, जाणते राजे, नवनिर्माणकर्ते, विकासपुरुष अशा सन्मानजनक बिरुदावलीने अलंकृत केले जाते. या स्थितीत लोकशाहीचा आग्रह धरणारांना, विवेकवादाचा पुरस्कार करणारांना, संविधानाच्या अंमलबजावणीची मागणी करणारांना धमक्या मिळणार नाहीत तर काय होणार? डॉ. मोरे यांना देण्यात आलेली धमकी अथवा डॉ. दाभोळकरांचा करण्यात आलेला खून यासाठी धमकी देणारे अथवा खून करणारेच केवळ दोषी नाहीत तर त्यासाठी मुलांवर फॅसिस्ट संस्कार करणारे पालक, विशिष्ठ धर्मियांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती शिकवणारे शिक्षक, संविधानाच्या धर्मातीत दृष्टीकोनाला धाब्यावर बसवून पक्षपाती अभ्यासकम बनविणारे शिक्षणतज्ञ, बहुसंख्यक धर्माची मते मिळावी यासाठी पक्षपाती भूमिका घेणारे राज्यकर्ते, सत्याची बाजू न घेता जातीगत स्वार्थासाठी आणि धार्मिक अहंकारापोटी एकांगी बाजू मांडणारी प्रसारमाध्यमे हे सर्वच जबाबदार आहेत.


डॉ. मोरे यांना जिवे मारण्याची धमकी हा प्रकार तसा नवीन नाही. परिवर्तनासाठी निरलसपणे कार्यरत असलेल्या जीवनदानी कार्यकर्त्यांचा धमकीविना एकही महिना देखील जात नसेल! ही धमकी डॉ. दाभोळकरांच्या खूनाच्या रुपाने प्रत्यक्षात उतरल्यानंतर अशा साध्याशा धमकीकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. डॉ. दाभोळकरांचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत. आता त्यांनी डॉ. मोरे यांच्याकडे मोर्चा वळविला आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. धमकी मिळाली म्हणून पोलीस संरक्षण देणे हा खंबीर विश्वास निर्माण करण्याचा पर्याय होऊ शकत नाही. ही वरवरची मलमपट्टी आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद सांभाळणाऱया रामचंद्र पाटलाने यापूर्वीही आम्ही यँव करु, त्यँव करु, अमूकाच्या मुसक्या आवळू, तमुकाची पाळेमुळे खणून काढू अशा बकवास बाता आतापर्यंत भरपूर केल्या आहेत. त्यांच्या या उसन्या अवसानाला नाशिकचा जंगलीबाबासुद्धा घाबरला नाही तेव्हा सनातन शेंडीधारी काय घाबरणार? गुन्हेगारांपर्यंत आपण लवकरच पोहचू असा तेंडफटाका फोडणाऱया गृहमंत्र्यांवरील जनतेचा विश्वास केव्हाच उडाला आहे. दाभोळकरांची हत्या पूर्वनियोजित होती हे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे. हे पाहता परिवर्तनाचा विचार मांडणाऱया आणि मोदीवेड न लागलेल्या डॉ. मोरेंसारख्या अनेकांच्या बाबतीतही असा पूर्वनियोजित प्लॅन तयार नसेल कशावरुन? स्वतंत्र भारतातील दहशतवादाची सुरुवात करणारा पहिला दहशतवादी नथुराम गोडसे अशाच सनातन शेंडीधाऱयांच्या कळपातील होता. या कळपाचा वेळीच बंदोबस्त तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी केला असता तर देशाला लागलेली दहशतवादाची किड गर्भातच ठेचली गेली असती. परंतु त्यावेळचे राष्ट्रपती, गृहमंत्री सोमनाथाची घंटा वाजविण्यात दंग राहिल्याने भगव्या दहशतवादाची शेंडी शाबूत राहिली. आजसुद्धा महाराष्ट्रातील रामचंद्र पाटलासारख्या तोंडाच्या फुलबाज्या उडविणाऱया गृहमंत्र्यांमुळे सनातन शेंडी धोकादायकरित्या फुरफुरत आहे. खादीच्या आडोशाला लपून बसलेल्या या शेंडीने भारतातील सहिष्णुतेचे, सौहार्दाचे वातावरण गढूळ केले आहे. या शेंडीला त्वरीत छाटले गेले नाही तर आणखी किती दाभोळकर महाराष्ट्रातील विविध शहराच्या मोक्षधाम घाटावर पोहचतील हे सांगता येणार नाही.



लेखं- सुनील खोब्रागाडे सर 

(लेखंक दैनिक महानायक या वर्तमानपत्राचे संपादक आहेत)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...