खरे लक्ष्मीपूजन !!

खरे लक्ष्मीपूजन !!


 

गेली अनेक शतके, सहस्त्रके भारतात परंपरेनुसार दिवाळीला लक्ष्मीपूजन करण्यात येते. कोट्यवधी भारतीय लोक दीपावलीला दिव्यांची आरास करून मोठ्या श्रद्धेने व थाटामाटात लक्ष्मीची पूजा करतात. वर्षात इतर सणावारांना दुर्गा देवी, सरस्वती यांचीही पूजा होते. ज्ञान, समृद्धी, स्थैर्य व वीरतेची ही पूजा असते. स्त्रीच्या ठायी या सर्व शक्ती वास करतात असाही समज भारतात रूढ आहे. परंतु हे सर्व करताना घरातील व समाजातील स्त्रीला मिळणारी दुय्यम दर्जाची विपरीत वागणूक हे विरोधी चित्र भारतात ठायीठायी दिसते.

 



स्त्री व पुरुष यांच्यात फरक करणे व तो फरक जोपासणे.या फरक करण्याच्या मनोवृत्तीचे पडसाद कसे, कोणत्या पद्धतीने दिसून येतात यांचा हा थोडक्यात आराखडा...


 


१. जन्मण्याचा हक्क- स्त्रियांना अनेकदा जन्मण्याच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. सध्या भारतातील स्त्री:पुरुष टक्केवारी पाहिली तर किती स्त्रियांची भ्रूणावस्थेतच नामोनिशाण मिटवले जाते याची कल्पना येईल. मात्र हे चित्र फक्त भारतापुरतेच नव्हे तर जगातील अनेक देशांसाठी लागू आहे.

 


२. मृत्यूचे प्रमाण- आफ्रिका व आशियातील अनेक देशांमध्ये स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. स्त्रियांना पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. तसेच कुपोषण, अपुरी वैद्यकीय मदत, स्त्रियांची हिंसा अशा कारणांमुळे आजही स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात मृत्युमुखी पडतात.

 


३. मूलभूत सोयींचा अभाव-  शिक्षणासारख्या अतिशय मूलभूत गोष्टीपासून वेगवेगळ्या कारणांमुळे आजही स्त्रियांना मुकावे लागते. आकडेवारीनुसार भारतात ७५ टक्के पुरुष तर फक्त ५४ टक्के स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळते. भारतासारख्या देशात मुली लहान वयातच धाकट्या भावंडांचे पालनपोषण, घरकाम, मोलमजुरी, दूरच्या ठिकाणाहून पाणी भरणे अशा कारणांमुळे शाळा व शिक्षणापासून पारख्या राहतात.

 


४. सुसंधीची कमतरता- स्त्रियांच्या प्रगतीच्या आड येणारा आणखी एक अडसर म्हणजे त्यांना अनेक क्षेत्रांमध्ये पुरेसा वाव न मिळणे, संधीचा अभाव असणे. तसेच प्राथमिक - माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध नसणे.

 


५. व्यावसायिक स्तरावर लिंगभेद- नोकरी, बढती, व्यवसायाच्या क्षेत्रात सामोरा येणारा लिंगभेदही गंभीर स्वरूपाचा आहे. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी स्त्रियांसाठी अपुर्या स्वच्छता सुविधा व मूलभूत सुविधा, त्याच दर्जाच्या कामाला / पदाला इतर पुरुष सहकार्यांपेक्षा कमी पगार, बढतीच्या संधी नाकारल्या जाणे, शोषण, निम्नस्तरीय वागणूक, चारित्र्यहनन यांसारख्या गोष्टी अर्थार्जन करणार्या स्त्रियांना सहन कराव्या लागतात.

 


६. मालकी हक्काबाबत असमानता- स्त्रियांच्या नावे जमीन-जुमला, घर, इस्टेट करण्याची तयारी नसल्यामुळे, त्यांचा हक्क डावलण्याच्या प्रथेमुळे आजही स्त्रियांच्या नावे केलेल्या, त्यांच्या मालकीच्या इस्टेटी, जमिनी, घरे, उद्योग-व्यवसाय कमीच दिसून येतात.

 


७. घरातील लिंगभेद- स्त्रियांना घरात निम्न दर्जाची वागणूक, त्यांचे आरोग्य - पोषण यांकडे दुर्लक्ष, शारीरिक-भावनिक-मानसिक शोषण, घरातील स्त्रीच्या एकटीच्या वाट्याला घरकाम-अर्थार्जन-मुलांचे पालन-पोषण यांची संमिश्र जबाबदारी यातूनही पूर्वापार चालत आलेला लिंगभेद सामोरा येतो. स्त्रियांना घरी, समाजात, धर्मात, राजकारणात व संस्कृतीत, सर्वत्र दुय्यम दर्जाची वागणूक देणे व त्यांना त्याच दृष्टिकोनातून बघणे थांबवले गेले पाहिजे. अन्यथा केवळ दुर्गा- लक्ष्मी-सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करून काहीही साध्य होणार नाही.

 



घरातील स्त्रियांना समान वागणूक द्या. मुलगा व्हावा म्हणून व्रतवैकल्ये - नवस - उपासतापास करणार्या माता, नातू मिळाला नाही म्हणून सुनेचा छळ करणार्या सासवा भारतात कमी नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे. स्त्रीला शिकवा, तिला समान संधी द्या, तिचे आरोग्य - शिक्षण - स्वास्थ्य उत्तम राखण्याची काळजी घ्या, तिच्या खांद्याला खांदा लावून काम करा, घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तिची साथ द्या, घरी वा समाजात तिची हेटाळणी होईल असे वागू नका, तिला सन्मानाने जगू द्या... त्यातून होणारी प्रगती ही खरी प्रगती असेल. स्त्रियांना जगात सक्षम होण्यास सर्वतोपरी साहाय्य करणे, स्त्री- पुरुषांच्या पारंपरिक पुरुषप्रधान विचारसरणीत बदल घडवून आणणे, स्त्रियांना समान वागणूक देणे ही लक्ष्मीची खरीखुरी पूजा असेल.



धन्यवाद- जरा विसावू या वळणार (फेसबुक पेज)

 

लेखं- अरुंधती कुलकर्णी.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...