म्हणे जातिभेद संपला ???
वर्तमानपत्रातील वधुवर वर सूचक जाहिरातीतील पानावर लक्ष गेले, सहजच म्हणून वाचले, निम्म्या जाहिरातींच्या शेवटी "sc /st क्षमस्व" असे लिहिलेले दिसले, मुलगी किंवा मुलगा स्वजातीय हवी असे नमूद केल्यावर सुद्धा असे कुत्सित लिहिण्याची गरज खरच आहे का ? या समाजातील लोक काय आमची मुलगी घ्या, आमचा मुलगा घ्या असे म्हणून मागे लागतात का ? प्रसिद्ध वर्तमानपत्रे (जशी लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स) सुद्धा हे उघडपणे छापत आहेत. यावरून यांचे पुरोगामित्वाचा बुरखा दिसून येतो. एखाद्या भिकाऱ्याला आपण क्षमा करा पुढे, पुढे जा असे म्हणतो मला तर हे असेच वाटते.
प्रेम विवाह सोडला तर महाराष्ट्रातील अभेद्य अशी जातीव्यवस्था मोडून दुसऱ्या जातीच्या लोकांकडे विवाहासाठी म्हणून मागणे घेऊन कुणीही जात नाही तेव्हा पूर्वग्रह असलेला आकस मनात ठेऊनच हि ओळ जाहिरातीत छापली जात असावी.
मराठा/कुणबी समाजातील जाहिरातीत हा उल्लेख सर्रास आढळतो, म्हणजे जातीचा माज आणि पोकळ अभिमान हे लग्नाच्या बाजारात सुद्धा मिरवताना दिसतात.दलित समाजातील मुले/ मुली आता प्रगती करत आहेत, उच्च पदावर, मोठ्या पगाराची नोकरी करीत आहेत असे, सुशिक्षित आहेत, सुंदर आहेत परंतु त्यांच्या जाहिरातीत "जातीची अट नाही" असे लिहिलेले आढळते, यावरून या समाजबांधवांच्या मनाचा मोठेपणा आणि जातीअंताची तळमळ दिसून येते.
डॉ. बाबासाहेबांनी आंतरजातीय विवाह हा जातीअंतसाठीच्या लढ्यातील एक पर्याय सुचवला होता आणि आम्ही तो स्वीकारतो. पण कदाचित हिंदू धर्मातील अनिष्ठ रूढी, देव देवस्की,अंधश्रद्धा आणि हेकेखोर वृत्तीमुळे मागील काही महिन्यांपासून सुशिक्षित बौद्ध समाजातील मुलामुलींचा कल बौद्ध समाजातच लग्न करण्यात दिसून येतो, सोशल साईट्स वर तर तसे ग्रुप्सही आहेत म्हणजे दोन्ही बाजूने आता हि दरी मोठी होणार हे मात्र नक्की !
जात या महाराष्ट्रातल्या मातीत इतकी खोल रुजली आहे, रुजवली गेली आहे कि तिला मुळासकट उखडून फेकणे अशक्य आहे, हिरोशिमा नागासाकी या जपान मधील शहरांवर अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब टाकून हे शहरं उध्वस्त केली होती पण नंतर जन्माला येणारया प्रत्येक मुलावर याचा परिणाम झालेला दिसत होता. जातीयतेचे अणुबॉम्ब भारत भूमीवर फोडण्यात आले होते आणि त्याची पाळेमुळे इतकी घट्ट रोवली गेली आहेत कि जन्माला येणारा प्रत्येक भारतीय जातीयतेचे अपंगत्व घेऊनच जन्माला येतोय !! हे सत्य आहे.
जातीबाहेर लग्न केलं म्हणून मुलीचा खून करणारी जात पंचायत याच महाराष्ट्रात दिसून आली तिथे आणखी काय बोलायचे !!
वर पाहिजे
ReplyDelete----------
वर पाहिजे
वधू ९६ कुळी
कोकणस्थ मराठा
वय उलटल की
शिळा झाल्यावर कोण खातो पराठा ?
मग नाईलाजास्तव
अपेक्षा कमी केल्या जातात
स्वजातीय ची अट
आंतरजातीय केली जाते
एव्हढ्या समाज प्रबोधना नंतर सुद्धा
खालची वृती आहे तशीच राहते
s c /s t नको किव्वा
s c /s t क्षमस्व
असे जाहिरातीत दिले जाते
खरंतर इथंच खऱ्या अर्थाने
s c /s t वर उपकार होते
s c /s t प्रवर्गात जन्मलेल्यांनी
न खपलेल्यान्ना का करावं
हाच उदात्त हेतू असतो जाहिरातीत
हे s c /s t ने आपल्या डोक्यात धरावं
वांझोट्या विचारांच्या स्त्री - संघटना
अश्यावेळी नेहमीप्रमाणे गप्प राहतात
आणि स्त्रीच्या उदरात अनौरस जातीयवादाचे अपत्य असल्याचे
साक्षात आपल्या डोळ्याने पाहतात
कवी प्रशांत गंगावणे (मोबाईल क्रमांक -०९३२२९०६३१८)यांच्या "प्रस्थापितांची फुसकी चळवळ" या कवितासंग्रहातुन