नागपंचमी निम्मित … सापांबद्दल माहितीपट सांगणारा हा लेखं !!

नागपंचमी निम्मित... सापांबद्दल माहितीपट सांगणारा हा लेखं !!

 

 

नाव उच्चारताच बहुतेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण हि भीती जितकी भयानक वाटते तितकीच ती पोकळ आहे असं मला वाटतं, कारण सापांबद्दल भारतीय समाजात अवास्तव अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत ज्याला कारणीभूत काही अंशी येथील अंधानुकरण करणारी सांस्कृतिक मानसिकता आहे. परवा दिवशी माझ्या एका फेसबुकीय भगिनीने" सापाची भीती वाटते, त्यांचे फोटो मला ट्याग करू नका.." अशा आशयाची एक पोस्ट टाकली होती, तेव्हा याचे गांभीर्य लक्षात आले व हा लेख लिहिण्याचे मनात आले.




मी सापांविषयी जनमानसांत असलेल्या काही महत्वाच्या अंधश्रद्धा व त्यांची शास्त्रीय कारणासहित निरसन करून त्यांच्याविषयीची भीती घालवून मित्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. हि 'लेखमाला' प्रश्न उत्तराच्या स्वरूपात असेल. ती वाचा आणि स्वतःसोबत इतरांनाही प्रबोधित करा....

प्रश्न १ - साप किंवा नाग डुख धरतो का..?? किंवा नागीण बदला घेते का..??

  

उत्तर - गावा-खेड्याकडे एक समजूत असते कि मिलनाच्या काळात जर साप किंवा नागाला, नागीणीला मारले तर त्याची माधी किंवा नर त्याचा बदला घेतात, अर्थात डुख धरतात. म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीनेसुद्धा याचा नको तितका बाऊ करून हि अंधश्रद्धा वाढवण्याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. पण हे असे खरेच असते काय..??



या प्रश्नांची उत्तरं शोधताना सापांच्या जीवनातील काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. सापांचा मिलनाचा काळ फेब्रुवारी-मार्च यादरम्यान असतो. साप हा कळपाने राहणारा प्राणी नाही, तो एकट्याने राहणारा प्राणी आहे. म्हणून मिलनाच्या काळात नर सापांस आकर्षित करण्यासाठी मादीच्या शरीरातून एक चिकट द्रव स्रवत असतो, ज्या द्रवाच्या वासावरून नाग किंवा तत्सम साप हा मिलनाच्या इच्छेने मादिपाशी पोहोचत असतो. याकाळात अशी मिलनेच्छुक मादी ज्या रस्त्यावरून गेली असेल त्या रस्त्यांवर नर साप फिरताना हमखास दिसतात.






वर चित्रात दाखवल्याप्रमाणे सापांची जोडपी गावच्या बाजूस अनेकांनी पाहिली असतील, यालाच काही जण मिलन किंवा "जुगाम' म्हणतात; पण ते खरे नाही. अशा जोड्या या बहुतांशी नर आणि मादीच्या नसतातच मूळी..!! तर कोकीळ जसा गाऊन, मोर जसा नाचून आणि वाघ- सिंहामध्ये जसं युध्द करून नर मादीला मिळवण्याचा, तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो अगदी तोच प्रकार सापांच्या बाबतीतही दिसून येतो. जर मादीच्या वासाचा माग काढत दोन नर एकाच वेळी एकमेकांसमोर आले तर मग त्यांच्यात एक छोटेखानी युद्ध होतं. जो नर पहिल्या नरापेक्षा आपली मान उंचावर ठेवण्यात यशस्वी होतो, तो ती लढाई जिंकतो व मादीशी मिलन करण्याची त्याला परवानगी मिळते. वर दाखवलेल्या चित्रातही असेच दोन नर आहेत, जे मादीसाठी लढत आहेत. पण बरेच जण याला मिलन समजतात व प्रसंगी त्या सापांना (गरज नसतानाही) मारतात.


अशावेळी जर त्यातील एखादा साप किंवा नाग मारला गेला आणि त्याच्या शरीराला सरपटताना जर मादीचा तो द्रव लागला असेल तर त्याला मारलेल्या काठीला लागून तो द्रव घरात येऊ शकतो, व त्याच्या वासाने पुन्हा दुसराच एखादा नाग घरात येण्याची शक्यता असते व लोक या प्रकाराला "नाग बदल घ्यायला आला" असे समजतात.


तसेच याकाळात जर 'तशी' एखादी मादी गेलेल्या रस्त्यावरून आपण गेलो तर तिच्या शरीरातून पाझरलेला तो द्रव आपल्या चपलेला लागून घरात येऊ शकतो. त्याच वासाने पुन्हा एखादा नर साप आपल्या घरापर्यंत येण्याची दाट शक्यता असते. व त्या दरम्यानच्या काळात जर चुकून एखादा साप आपल्याकडून दुखावला गेला असेल तर मग अशावेळी घरात आलेला 'तो' साप किंवा नाग बदल घेण्यासाठी आला कि काय...?? अशी समजूत होते, पण तो सापही भलताच असतो आणि तो केवळ मिलनाच्या इच्छेने आलेला असतो किंवा एखाद्या उंदराच्या मागे...डुख धरून किंवा बदल घेण्यासाठी नव्हे..!!


दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सापांचा मेंदू अविकसित असतो, त्याला केवळ "कृष्ण-धवल" म्हणजे 'black & white' दिसते, त्याची दृष्टी हि द्विमितीय (two dimensional) असल्याने त्याला लांबी, रुंदी आणि खोलीचे ज्ञान होत नसते तसेच त्याला ३ फुटांच्या वरचे सगळे अतिशय अंधुक दिसते, अशावेळेस साप एखाद्याचा चेहरा लक्षात ठेवणे आणि त्याचा बदला घेणे हे कोणत्याही सापकारीता शारीरिक आणि नैसर्गिकदृष्ट्या अशक्य कोटीतील गोष्ट आहे.


तेव्हा इथून पुढे जर तुम्हाला कुणी म्हणालं कि, साप बदल घेतात, डुख धरतात तर त्यांना वरील शास्त्रीय करणे देऊन त्यांचे अज्ञान दूर करा, अंधश्रद्धा दूर करून समाज प्रबोधित करा.




माझे पप्पा आणि आजोबा आम्ही लहान असताना सांगायचे कि, गावाकडे काही तांत्रिक बाबा असतात म्हणेजे आपल्याकडच्या जालीम मंत्रांनी सापाचं विष उतरवतात. ते मंत्र इतके जालीम असतात कि' अक्षरशः लोकांनी उचलून आणलेला माणूस सुद्धा त्यांच्याकडून जाताना स्वतःच्या पायांनी चालत जातो.. लहानपणी ते ऐकायला जाम भारी वाटायचं पण जसजसं विचारांमध्ये प्रगल्भता येत गेली तसतसं मन या समजुतीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलं, आणि जिथे प्रश्न पडतो तिथे उत्तर शोधणं आलंच..!! मग मी याचा पाठपुरावा केला ज्यातून माझ्यासमोर जे आलं तेच मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे, आशा करतो मला पडलेला हा प्रश्न तुमच्या मनातील प्रश्नचंही निरसन करेल.

 

प्रश्न २ - तंत्र-मंत्रांनी सापाचे विष उतरवता येते का..??

 




 

उत्तर:- या प्रश्नाचं उतार शोधताना आधी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. मुळात भारतात सापांच्या एकूण ६०० आढळतात, त्यातील केवळ पाचच जाती विषारी आहेत. जशा कि-

 

१. नाग राज (king cobra ) किंवा साधा नाग-




२. मण्यार-



३.घोणस (Russel viper)-



४.फुरसे-
 



त्याचप्रमाणे काही निमविषारी जातीही आहेत.


वरील गोष्टी ध्यानात घेता लक्षात येते कि, विषारी जातींची संख्या व बिनविषारी जातींची संख्या यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. आपल्याला गावखेड्या कडे दिसणारे व चावणारे बरेचसे साप हे मुळात बिनविषारीच असतात. पण भारतीय समाजात एकूणच सापांविषयी असलेली अवास्तव भीती यामुळे 'चावलेला साप हा विषारीच असणार' या समजुतीने, या भीतीनेच माणूस गर्भगळीत होतो, अर्धमेला होतो व त्याला विष चढले कि काय असा सर्वांचा समज होऊन जातो. गावाखेड्याकडे दवाखाने, हॉस्पिटल्स जवळ नसतात आणि देवभोळी माणसं मग साप चावलेल्या माणसास एखाद्या ढोंगी तांत्रिक बाबाकडे घेऊन जातात. (लक्षात ठेवा मित्रांनो, या तांत्रिक बाबांना सुद्धा चांगलेच ठाऊक असते कि, त्या विभागात विषारी जातीचे साप किती असतात, त्यांचा तितका अभ्यास असतो म्हणून ते लोकांना सहज मूर्ख बनवू शकतात.)



तर अशावेळेस एखादा बिनविषारी किंवा मी वर म्हणाल्याप्रमाणे निमविषारी साप चावलेला (बहुतांशी बिनविषारी सापच चावतात, कारण ते विषारी सापांपेक्षा अधिक चपळ असतात व आपले विष वाया जाईल याची त्यांना भीती नसते.) तर असा एखादा बिनविषारी साप चावलेला एखादा व्यक्ती जर अशा बाबाकडे आला तर तसाही कोणत्याही उपचाराविना तो बरा होऊ शकतो, पण त्याच सगळं क्रेडीट त्या तांत्रिक बाबाला जातं आणि लोकांना विषारी अन बिनविषारी सापांमधील फरकच माहित नसल्याने लोकांचा त्याच्यावरील विश्वास वृद्धिंगत होत जातो.


 

निम-विषारी (semi-poisonous ) साप चावल्यानंतरही माणूस मारत नाही, थोडा त्रास जरूर होतो पण मृत्यू होत नाही त्यामुळे असे साप चावल्यासही विना उपचार रोगी बरा होऊ शकतो, आणि जयजयकार त्या बाबाचा होतो.


 

मग काही लोक म्हणतात कि- "आम्ही विषारी साप म्हणजेच नाग, घोणस, मण्यार, किंवा फुरसे चावताना प्रत्यक्षात पहिले आहे.." काही लोक तर साप चावल्यानंतर त्याला शोधून मारतात व दंश झालेल्या व्यक्तीसोबत अशा एखाद्या "तांत्रिक बाबाकडे" घेऊन जातात; जो कधी कधी अस्सल विषारी साप असू शकतो पण तरीही त्याच्या मंत्रांनी तो पेशंट जगतो ते कसे काय..??


 

तर याचे उत्तर देताना एक गोष्ट लक्षात ठेवावी कि, विषारी सापांचे विष हे माणसांना मारण्यासाठी नसतेच मुळी, तर प्रतिस्पर्ध्याला घाबरवण्यासाठी किंवा आपल्या भक्ष्याला चीतपट करण्यासाठी ते असते, त्यामुळे माणसाला चावताना हे साप भक्ष्याला चावताना जितके विष त्याच्या शरीरात सोडतात त्यापेक्षा फार अत्यल्प प्रमाणात ते माणसाच्या शरीरात सोडतात. (ज्याचे प्रमाण भक्ष्यात ३०-३५% तर मनुष्यात फक्त ४-५% च असते). कारण सापाच्या शरीरात हे विष तयार होण्यास बरेच दिवस लागतात, आणि सापांना देखील याची नैसर्गिकरीत्या जाणीव असते त्यामुळे ते विष वाचवण्याच्या प्रयत्नात असतात.


 

महत्वाची गोष्ट म्हणजे याच कारणामुळे बऱ्याच वेळा प्रतिकार म्हणून विषारी साप हे माणसाचा चावा नक्की घेतात पण शरीरात विष सोडत नाहीत, विष सोडायचे कि नाही हे सर्वस्वी त्या सापावर अवलंबून असते. तर हे सांगायचं कारण म्हणजे असा एखादा विषारी साप चावलेला परंतु विष शरीरात न गेलेला माणूस जर अशा तांत्रिक बाबाकडे गेला तर तो कोणत्याही औषधांखेरीज बरा होऊ शकतो. पण परत जयजयकार बाबाचाच होतो.


 

पण असे विष जर शरीरात गेले आणि त्याचा रक्ताशी संपर्क आला तर मात्र लवकर 'प्रतिविष' (anti- venom) न दिले गेल्यास मृत्यू हा अटल असतो, तेव्हा हे मंत्र-तंत्र सुद्धा काहीही करू शकत नाहीत.


 

तेव्हा कधीही कोणाला सर्पदंश झाला तर जखम आधी स्वच्छ पाण्याने धुवा. जर साप विषारी असेल तर जखमेतून रक्तासोबत पांढरे चिकट पाणी वाहू लागेल. जखमेच्या बाजूचा भाग लालसर-काळा पडेल. रोग्याचे शरीर जड झाल्यासारखे वाटेल, बोलताना त्याची जीभ जड होऊन शब्द बोबडे पडतील. अशी लक्षणे दिसल्यास तो दंश विषारी समजावा. अशा व्यक्तीस त्वरित डॉक्टरकडे पाचारण करावे, कारण अशावेळी कोणत्या तंत्रिकाकडे जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.





 

तेव्हा मंत्रांनी सर्पदंश बरा होतो असा जर कुणी दावा करत असेल तर त्याला सांगा कि- " बाबा, आमच्यासमोर एखद्या विषारी सापाचा दंश करून घे नि मंत्रांनी विष उतरवून दाखव." मग बघा तो बाबा ढुंगणाला पाय लावून पळून जातो कि नाही.

 

सर्वाना जाहीर आवाहन -


नागपंचमीनिमित्त नागांचे खेळ दाखविण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे. या संदर्भात वन विभागाने खास हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. गावोगावी झाडांवर, घराच्या पडवीत झुलणारे झोके दिसले की नागपंचमी जवळ आल्याचे लक्षात येते. धार्मिकतेच्या दृष्टीने या दिवशी नागांची पूजा करणे भारतीय संस्कृतीत श्रद्धेचे मानले गेले आहे. नागाला पूर्वीपासून संस्कृतीने देवत्व बहाल केले आहे. नागाचे शास्त्रीय स्थानही महत्त्वाचे आहे. शेतातील उंदीर आणि घुशी त्याचे भक्ष्य असल्याने सर्प शेतक ऱ्यांचा मित्र मानला जातो. त्याच्यामुळे शेतातील धान्याचे संरक्षण होते. सर्पाला मात्र श्रध्दा, अंधश्रध्दा, समज-गैरसमजाला नेहमीच बळी पडावे लागत आहे.


विषारी आणि बिनविषारी हा फरक न समजल्याने अनेकदा सापांना नाहक मारले जाते. नागपंचमीला पूजेतून मिळणाऱ्या पैशांसाठी गारूडी या दिवशी शहरात सर्वत्र फिरतात. सापांचा आणि दूध पिण्याचा काहीही संबंध नाही, असे सामाजिक वनीकरण विभागाने स्पष्ट केले आहे. सापाच्या पचनसंस्थेला दूध पचविता येत नाही. असे असताना या दिवशी नागाला दूध पाजले जाते. गारूडी त्यांचे दात काढून टाकतात. कोणतेही भक्ष्य पकडण्यासाठी दात फार महत्त्वाचे असतात. दात काढल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते, आणि अखेर मृत्यूला सामोरे जावे लागते. नागपंचमीच्या दिवशी या प्रकारांना रोखण्यासाठी वन विभागाने शहरात गारूडी सापाचे खेळ करत असल्यास त्याची माहिती त्वरीत कळविण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती विभागीय उपवनसंरक्षक अरविंद पाटील यांनी दिली. विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना सूचित करून फिरती गस्त पथके निर्माण केली आहेत. अनुचित प्रकार दिसल्यास त्वरीत १५५३१४ या हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

(By- राज जाधव सर)


 

अंधश्रद्धा सोडू या शेतकऱ्यांचा मित्र नाग वाचवू या-


 
नाग या प्राण्याला केवळ भारतीय संस्कृतीमध्येच नाही, तर जगभरातील अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये मानाचे स्थान आहे. विषामुळे नागाच्या दंशाबद्दल प्रचंड भीती लोकांच्या मनात वसलेली आहे. नाग- सापाबद्दल भीतियुक्त आदर असतो. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी महिला नागाची किंवा नागाच्या प्रतिमेची पूजा करतात. लाह्या, साळी व दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. भारतीय परंपरेमध्ये महिला नागाला भाऊ मानतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी महिला भावाचा उपवास करतात.

 

 

नागाबद्दलचे गैरसमज व अंधश्रद्धा-



नागाला देवाचे स्वरूप मानले जात असले तरी ग्रामीण भागामध्ये नाग किंवा साप दिसल्यानंतर जिवाच्या भीतीने त्याला ठार मारले जाते. त्यामागे विषारीपणा हा एक महत्त्वाचा भाग असला, तरी साप- नागाबद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत.


नाग डूख धरतो साप किंवा नागामध्ये स्मरणशक्ती विकसित झालेली नाही, त्यामुळे सर्प एखादी घटना लक्षात ठेवू शकत नाहीत.


नाग दूध पितो दूध हे सस्तन प्राण्याचे अन्न आहे, साप हा सस्तन प्राणी नाही.


नाग पुंगीपुढे डोलतो  सापांना कान नसतात. हलणाऱ्या पुंगीवर तो स्वसंरक्षणाच्या दृष्टीने लक्ष ठेवून असतो, त्यामुळे तो डोलल्याप्रमाणे वाटतो. नाग पुंगीवर डंख मारण्याचाही प्रयत्न करतो.


नागाच्या डोक्‍यावर नागमणी असतो कोणत्याही सापाच्या डोक्‍यावर मणी नसतो. नागमणी म्हणून विकले जाणारे मणी बेन्झाईनचे असतात.


नागाच्या गळ्यावरील पट्ट्यांच्या संख्येवरून तो चावलेल्या माणसाच्या मृत्यूचा अंदाज करता येतो माणसाचा मृत्यू हा शरीरावरील दंशाची जागा, दंशाच्या वेळी सोडलेल्या विषाचे प्रमाण, त्याचबरोबर सर्पदंश झालेल्या माणसाची मानसिक अवस्था व त्याला वेळेवर मिळालेले अथवा न मिळालेले योग्य उपचार यावर ठरतो.


विषारी साप दंश करताना उलटा झाल्याशिवाय विष टोचू शकत नाही ः सापाचे विषारी दात हे तोंडाच्या आतील बाजूला वळलेले असतात. ते एखाद्याच्या शरीरात टोचल्यानंतर परत काढण्यासाठी त्याला धडपड करावी लागते, त्यासाठी तो उलटा होतो. त्याचा विष सोडण्याशी फारसा संबंध नाही.

 

विष उतरवण्यासंबंधी अंधश्रद्धा-

 

 



१) सापाचे विष हे मंत्रातंत्राने उतरवता येते.


२) साप चावल्यावर कोंबडीच्या साह्याने विष उतरवता येते.


३) सर्पदंशाच्या ठिकाणी नागवेलीची मुळी उगाळून लावल्यास उलटीवाटे विष बाहेर पडते.


४) कजरीच्या बिया खाल्ल्यास सर्पविष बाधत नाही.


५) दंशाच्या जागी तापवून लाल केलेले लोखंड लावतात  सर्पदंशावर प्रतिसर्पविष हेच एकमेव औषध आहे, अन्य कशाचाही सापाच्या विषावर परिणाम होत नाही, तेव्हा बाकीचे उपाय करत वेळ घालविण्यात काहीच अर्थ नाही. त्वरित जवळच्या दवाखान्यात नेणे, हा एकमेव उपाय आहे.

 

 

शेतकऱ्यांसाठी साप - नाग हे मित्र-



अन्नसुरक्षेचा प्रश्न बिकट होत असताना तयार झालेल्या अन्नापैकी सुमारे 30 टक्के अन्नाचा उंदीर फडशा पाडतात.


उंदराची एक जोडी महिन्याला 14 ते 15 पिल्लांना जन्म देते, ही पिल्ले पुढील एका महिन्यातच प्रजननक्षम होऊन पिल्लांना जन्म देऊ लागतात. त्यामुळे वर्षभरामध्ये एका जोडीपासून 770 उंदीर तयार होतात. सापाचे मुख्य खाद्य हे उंदीर आहे. साप आठवड्याला किमान दोन उंदीर खातात. सापाचे आयुष्य साधारणपणे 13 ते 15 वर्षे असते. या काळात तो लक्षावधी उंदरांचा फडशा पाडतो. उंदरांचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते.

(by- ऍग्रोवन ई-पेपर , Narsing Deshmukh सर)



 

विषारी सापाशी नाद करू नका !!

 





१) सापाचे दुध हे अन्न नाही आहे , सस्तन प्राणीच दुध पितात ते पण आपल्या आईचेच मनुष्य प्राणी अपवाद सोडल्यास नाग हा सस्तन प्राणी नाही तेव्हा नागाला दुध पाजू नका , नागाने दुध पिल्यानंतर दुधाचे पोटात गाठी होऊन नंतर नाग मारतो


२ ) “Wildlife Protection Act 1972” नुसार ,साप पकडणे ,जवळ बाळगणे ,सापाला मारणे व प्रदर्शन करणे कायद्याने गुन्हा आहे.


३ ) विषारी सापां पासून दूर राहा , विषारी साप दिसल्यावर आजीबात हाल चाल करू नका ,हालचाली वर द्वंश करणे हा सापाचा स्वभाव आहे.


४ ) विषारी सापाचे विष हे मंत्राने उतरत नाही,त्यामुळे कोणत्याही देवळात दर्ग्यावर विष उतरवणाऱ्या बाबा कडे विषारी साप चावलेल्या व्यक्तीला घेऊन जाऊ नका त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा मरण अटळ आहे । जी व्यक्ती वाचते त्या वेळी नकीच समजावे त्या व्यक्तीला बिन विषारी साप चावला आहे .


५ ) विषारी साप चावल्यावर त्वरित जवळ च्या “A.S.V. INJECTION” असणार्या सरकारी दवाखान्यात घेऊन जा. “A.S.V. INJECTION” (सापाच्या विषा पासून इंजेक्शन बनवतात ) हाच एकमेव वैज्ञानिक इलाज आहे आजच्या घडीला.


(By- विवेक साम)


 

सर्पदंशावर प्रतिसर्पविष हेच एकमेव औषध-



प्रतिसर्पविष हेच एकमेव औषध आहे, अन्य कशाचाही सापाच्या विषावर परिणाम होत नाही, तेव्हा बाकीचे उपाय करत वेळ घालविण्यात काहीच अर्थ नाही. त्वरित जवळच्या दवाखान्यात नेणे, हा एकमेव उपाय आहे. सर्प दंश झाल्यास तात्काळ प्रथमोपचार करून इस्पितळात दाखल करावे. बुवा,बापू,कापू,भोंदू कडे नेऊन वेळ घालवू नका.


 

सर्पदंश झाल्यास -

 



 

१) रुग्णाभोवती गर्दी करु नये. त्याला घाबरू न देता स्थिर द्यावा शांतता राखावी.

२) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस चालणे, बोलणे, पळणे इ. कोणत्याही प्रकारची हालचाल न करता शांत पडून राहण्यास सांगावे.

 

३) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस उबदार ठेवावे. त्यासाठी गरम कपड्यांचा वापर करावा. रुग्णास दारु देऊ नये.

 

४) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस उलटी होत असेल तर त्या व्यक्तीस उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपवावे. त्याने श्वसनक्रियेस अडथळा होणार नाही.


५) सर्पदंश झालेल्या व्यक्तीस लवकरात लवकर जवळच्या सरकारी रूग्णालयात दाखल करावे.

 

६) रुग्णास बुवा-बाबा किंवा मांत्रिक यांच्याकडे नेऊन वेळ वाया घालवू नये. कारण सर्पदंशावर पोटात दिलेल्या औषधाचा परिणाम होत नाही तसेच जगातील कोणत्याही मंत्राने विष उतरत नाही. त्यासाठी केवळ अँटी स्नेक व्हिनम (अेएसव्ही) हे औषध रुग्णास देणे आवश्यक असते.

 

सर्पदंश आणि प्रथमोपचार-


१. प्रथमोपचार, २. रुग्णांचे स्थलांतर, ३. रुग्णालयातील औषधोपचार -
अ. कृत्रिम श्र्वासोश्र्वास यंत्र, ब. डायलीसीस, क. रक्त संक्रमण, ड.



सर्पविष विरोधी औषधे - (ए.एस.व्ही.), न्यूअीस्टीगमीन, रक्त संक्रमण.
(गरज पडल्यास)

 

१. प्रथमोपचार - काय करावे ?


अ) सर्पदंश झालेला व्यक्ती घाबरलेल्या स्थितीत असतो व त्यामुळे शरीरात विष लवकर पसरुन लवकर विषबाधावा होते. त्यामुळे त्यास धिर देणे आवश्यक असते.
 

ब) सर्पदंश झालेला भाग हृदयाच्या पातळीच्या वर उचलू नये. उदा. हात वर करु नये,

 
क) सर्पदंश झालेल्या व्यक्तीने घाबरुन विनाकारण पळू नये. कारण यामुळे शरीरात लवकर विष पसरते व रुग्ण तात्काळ गंभीर होण्याची भिती असते.

 
ड) त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात/ग्रामीण रुग्णालयात घेवून जावे. (प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात / ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशाकरीता प्राथमिक स्वरुपाची औषधोपचाराची सोय उपलब्ध आहे.)

 
ऊ) रुग्णाला डोळ्यास झापड पडत असेल, श्र्वास घेण्यास त्रास होत असेल, बोलण्यास त्रास होत असेल, गिळण्यास त्रास होत असेल, नाका, तोंडातून, जिभेतून, लघवीतून रक्तस्त्राव होत असेल तर अशा वेळेस वेळ न घालवता सर्व सोई उपलब्ध असलेल्या रुग्णालयात आपल्या रुग्णास, प्रा.आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन त्वरीत स्थलांतर करावे.

 
ए) साप मारला असल्यास सोबत घेवून येणे.

 

काय करू नये-



१) रुग्णास रुग्णालयात नेण्यास दिरंगाई करु नका,


२) आपले अतिमहत्त्वाचे वेळ इतर प्रयोग करण्यात घालवू नका.


३) प्राथमिक उपचार पद्धतीची आपल्या गावातील काही लोकांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे असते.


४) सर्पदंशा विषयांच्या माहिती, प्रशिक्षण घेवून आपल्या गावातील लोकांना समजावून सांगून गैरसमज दूर करा.






अनेक गारुडी नाग पकडून आणतात. नागांनी फणा काढणे, पुंगीने मोहून जाणे असे खेळ दाखवले जातात. ही प्रथा गेली कित्येक वर्षे सुरू आहे. नाग व इतर अनेक जंगली प्राणी माणसाने भीतीपोटी मारणे फार पूर्वीपासून सुरूच आहे. हे प्राणी निसर्गाचा समतोल टिकवतात, त्यांचे एक विशेष असे काम निसर्गत: सुरू असते. म्हणून त्यांचा नाश होऊ नये आणि विज्ञाना- आधारे अशा प्राण्यांच्या विषयी योग्य माहिती लोकांना कळावी यासाठी चळवळी सुरू आहेत. नागाला मारणार नाही अशा निश्र्चयानेच नागांची चांगली पूजा होईल असा पर्यावरणवादी विचार या उत्सवाबाबत करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते करतात. शेतीचा नाश करणार्या उंदरांचा नाश करण्याचे नागांचे काम सुरू राहणे आवश्यक आहेच. नागाची कात औषधी असते, सुंदर असते, काही सापांचे विष अत्यंत उपयोगी आणि मौल्यवान असते. म्हणूनच साप-नागांची हत्या होऊ नये असा प्रयत्न विज्ञानवादी, पर्यावरण रक्षणासाठी प्रशिक्षित असलेले लोक अलीकडे करत आहेत. या प्रयत्नांमुळे या सणाकडे पर्यावरणीय दृष्टीने पाहण्याचा कल सतत वाढतो आहे. 

 

 

कित्येक भारतीय स्ञीया नागाला दुध पाजण्यासाठी वारुळात दुध सांडतात पण त्याना एकच सागायचे आहे कि तुम्ही जे वारुळात दुध ओततात तेच दुध तुम्ही कुपोशीत बालकांना पाजा ते तुमच नाव तरी घेतील मनुवाद्यांचा कावेपणा आता ओळखा !!



(By- Amol Kore-Mali)


 

लेखं - गौरव गायकवाड (सोबत प्रबोधन टीम) , Amol Kore-Mali, विवेक साम, राज जाधव सर, Narsing Deshmukh सर.


7 comments:

  1. .नाग पंचमीच्या शुभेच्छा

    ReplyDelete
  2. अतिशय छान आणि वैज्ञानिक माहिती.. आभारी आहे.. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

    ReplyDelete
  3. Thanks for giving such important information

    ReplyDelete
  4. Thanks.. NAJA200 anti venom kase aahe.. Ani te kuthe milel?

    ReplyDelete
  5. धन्यवाद खुप महत्त्वाची माहिती आपणाकडून मिळाली.परंतु मादीने सोडलेला द्रव चपलेला लागला आणि त्या वासावर साप(कोब्रा) माझ्या घरी आला.मला तो दिसला असता त्याला मि बाहेर हकलला. त्यानंतर मि पुर्ण घराबाहेर थायमाईड फेकला. तरी यापुढे त्या वासावर किंवा तसाही साप घरात येऊ नये म्हनुन काय करावे plz माहिती मिळावी ही अपेक्षा ......धन्यवाद

    ReplyDelete
  6. भारतात सापाच्या 600 जाती नाही आढळत
    302 जाती आढळतात.

    ReplyDelete
  7. खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...