‘जादुटोणा’ विधेयकात दडलंय काय ?? प्रिय मित्र-मैत्रिणीनो आता तुम्हीच ठरवा अंधश्रद्धेवर प्रहार की श्रद्धेवर आघात... आपल्या प्रतिक्रिया मांडा ?

‘जादुटोणा’ विधेयकात दडलंय काय ??

 


 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धाविरोधी चळवळीचे अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाल्यानंतर त्यांनी दीर्घकाळ ज्यासाठी लढा दिला त्या जादुटोणा विरोधी विधेयकाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या विधेयकाचा आग्रह धरल्यानेच त्यांची हत्या झाल्याचेही म्हटले जात आहे. राज्य सरकारने या विधेयकाचा जो मसुदा निश्‍चित केला आहे त्यात प्रामुख्याने जी बारा कलमे अशी आहेत. या कलमांवर नजर टाकली असता त्यांच्या अंमलबजावणीने अंधश्रद्धेवर प्रहार होणार आहे की श्रद्धेवर आच येईल, याचा फैसला सुजाण वाचक करू शकतील. अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी कायदा झाला पाहिजे, हा विचार पुढे आल्यापासूनच त्याचे सर्मथक आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आले आहेत. या मुद्याला राजकीय रंगही वेळोवेळी आले.

 

असा झाला प्रवास-



- अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अशासकीय विधेयक ७ जुलै १९९५ मध्ये विधानसभेत मांडण्यात आले.



- १३ एप्रिल २
००५ रोजी शासकीय विधेयक आले. मात्र विरोधामुळे स्थगित.


- १६ डिसेंबर २००५ रोजी विधानसभेत विधेयक मंजूर पण विधान परिषदेत पारित होऊ शकले नाही.



- नंतर विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे गेले पुढे विधेयक व्यपगत झाले.



- २०११ मध्ये नव्याने विधेयक मांडले गेले पण त्यावर चर्चाही झाली नाही. विरोधाचे सूर कायम राहिले.



- चालू वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात ते सुधारणांसह मांडण्याची तयारी सरकारने केली. हे विधेयक या अधिवेशनात आणले जाईल, असा मनोदय सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आला.



- तथापि, विधेयक अधिवेशनात आलेच नाही. वारकर्‍यांशी चर्चा करूनच विधेयक आणले जाईल, असे स्पष्ट करीत सरकारने माघार घेतली.



- आज मंत्रिमंडळाने वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला.

 
या विधेयकात नमूद केलेल्या गुन्ह्यांबद्दल कमीत कमी सहा महिने आणि पाच हजार रुपये दंड ते जास्तीतजास्त ७ वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.

 

ही कलमे अशी-




१) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील.(भूत उतरविण्यासाठी प्रार्थना, मंत्र म्हटले, पूजा केली तर तो गुन्हा ठरत नाही.




२) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल.




३) जिवाला धोका निर्माण होतो, अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणे हा गुन्हा.



४) गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे.



५) अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणे, फसविणे, ठकविणे हा गुन्हा असेल पण केवळ अंगात येणे हा गुन्हा नाही.



६) एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे.



७) चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणे, नग्नावस्थेत धिंड काढणे, रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.



८) भूत पिशाच्चांना आवाहन करून घबराट निर्माण करणे, मृत्यूची भीती घालणे, भुताच्या कोपामुळे शारीरिक इजा झाली, असे सांगणे.




९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडे
दोरे असे उपचार करणे.



१०) बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे. गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे.




११) स्वत:ला विशेष शक्ती असल्याचे सांगून अथवा गेल्या जन्मी पत्नी, प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून लैंगिक संबंध ठेवणे.अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचे आश्‍वासन देत लैंगिक संबंध ठेवणे.




१२) एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा, व्यवसायासाठी करणे.


 

प्रिय मित्र-मैत्रिणीनो आता तुम्हीच ठरवा अंधश्रद्धेवर प्रहार की श्रद्धेवर आघात... आपल्या प्रतिक्रिया मांडा ?


 
संदर्भ- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-22-08-2013-6d8dc&ndate=2013-08-22&editionname=main



धन्यवाद- दै.लोकमत.




लेखं- यदु जोशी (मुंबई)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...