पोटासाठी ते विकत घेतात आजार !!

पोटासाठी ते विकत घेतात आजार !!


 




रखरखत्या उन्हातील लग्नसराईच्या माहौलमध्ये फटाक्‍यांची आतषबाजी आणि या वातावरणात बॅंड वाजवणारे कलाकार वरातीचे प्रमुख आकर्षण असतात. मात्र, प्रचंड उकाड्यातही अंगावर भरजरी वस्त्र लेऊन बॅंडवाले "ट्रम्पेट', "सेक्‍सोफोन'मध्ये छाती फुटेपर्यंत हवा फुंकत असतात. त्यांच्या भुकेल्या पोटातून निघणाऱ्या संगीताच्या सुरांवर लग्नसोहळ्याचा आनंद वरातीतून ओसंडून वाहत असतो. सुरांचा आनंद देणाऱ्या वाजंत्रींना मात्र दमा, कॅन्सर, टीबी आणि फुफ्फुसांच्या आसुरी आजाराचा घट्ट विळखा असल्याचा डॉ. अशोक कांबळे यांचा पीएचडी प्रबंधातील निष्कर्ष हेलावून टाकणारा आहे.

 


कुटुंबाचा आर्थिक गाढा ओढण्यासाठी शरिराला जडणाऱ्या व्याधी आणि वेदनांकडे दुर्लक्ष करणारा हा बॅंडवाला चितारताना डॉ. कांबळे यांनी वाजंत्री समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचे आकडेवारीतून विष्लेषणात्मक असा ५८० पानांचा प्रबंध विद्यापीठाला सादर केला आहे. नागपूर जिल्ह्यात मातंग समाजाची संख्या ५० हजारांच्या घरात असून, ४२८ बॅंड पार्टीमधील ९ हजार कलावंतांची स्थिती पारखून डॉ. कांबळे यांनी निष्कर्ष काढले आहेत.

 


इतिहासाकडे एक नजर-


 


बॅंड वाजवणारे कलावंत मुख्यतः मातंग समाजाचे. हा त्यांचा पिढीजात व्यवसाय. मातंग शब्दाच्या व्युत्पत्तीपासून तर राज्यात ३५ लाखांवर असलेल्या समाजाच्या वेदनांना त्यांनी या प्रबंधातून वाट करून दिली. मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिनेच बॅंडवाल्यांच्या कमाईचे दिवस. तीन महिने तुमच्या-आमच्या आनंदात सहभागी होणाऱ्या या बॅंडवाल्यांचा इतिहास डॉ. कांबळे यांनी शोधून काढला. स्वातंत्र्यापूर्वी राजे, महाराजे यांच्या काळातही मातंग समाजाचे बॅंडपथक राजदरबारी असायचे. त्यावेळी "मसक वाद्या'ची (पाइप वाद्य) परंपरा होती. या वाद्याला शास्त्रीय आधार होता. परंतु, काळ बदलला. राजे, महाराजांचा काळ गेला आणि मातंग समाजाच्या हातून हे वाद्य सुटले.

 


पूर्वी बॅंडपथकाला वाद्य वाजवण्याचा मोबदला धान्याच्या स्वरूपात अदा करता येत होता. सन १९३५  मध्ये नरेंद्रसिंग यांनी नागपुरात बॅंडपार्टी स्थापन केली. पुढे या पथकाला बिरादीन या पंजाबी व्यक्तीने विकसित रूप दिले. अब्दुला आणि मातंग समाजातील कलाकारांनी ही पार्टी काढली होती. या बॅंडपार्टीचे नाव १९३५  साली "नॅशनल बॅंड पार्टी' ठेवले होते. डॉ. कांबळे यांनी बॅंडची मजुरी आणि व्यवस्थापनासह लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातून झालेल्या लाभाच्या आकडेवारीचा वेधही प्रबंधात घेतला आहे.

 


डॉ. कांबळे यांनी पत्नी सुचेता कांबळे यांच्या साथीने शहरासह जिल्ह्यातील १३  तालुके त्यासाठी पालथे घातले. बॅंड व्यवसायातून मिळणाऱ्या मिळकतीच्या भागिदारीचेही विष्लेषण केले. शिक्षणाच्या अभावाने आजही ३२  टक्के युवक या व्यवसायात आहेत. तर ९४  टक्के बॅंडवाले दारूच्या विळख्यात सापडले असल्याचे त्यांना आढळून आले.

 


कलावंताचा दर्जा नाही-


 

बॅंडवाले पोटार्थी आहेत, असा समज रूढ आहे. मातंग समाजात संगीताची प्रतिभा घेऊन जन्माला आलेला बॅंडवाला होतो. परंतु, तो कलाकार कधीही होत नाही, हे त्यांच शल्य आहे. बॅंडपथकात वाद्य वाजविण्याच्या संधीवर आता कुटुंबाचे पोट असते. कुटुंबाला जगवण्यासाठी तो शारीरिक वेदना सहन करतो. पुढे वेदना शमविण्यासाठी "दवा'सोबत "दारू' घेणे त्याची "मजबूरी' असते.


 


येथेही सावकारी पाश-


 

तीन महिन्यांत बॅंडपथकात काम मिळतेच. परंतु, पुढचे नऊ महिने संसाराचा गाढा ओढण्यासाठी ते "मयती'त डफ वाजतात. त्यातून पोटापुरतेच मिळते. त्यामुळे लेकरांच्या शिक्षणासाठी वा पोरीच्या लग्नासाठी "सावकारा'पुढे हात पसरावा लागतो. पुढे वर्षभर सावकाराच्या पाशात ते अडकले असतात.

 


डीजेचे अतिक्रमण-


 


बॅंडपथकांची संख्या वाढली, तशी कामात भागीदारही वाढलेत. रोजी वाढली; पण कामात कपात झाली. आज मातंग समाजाच्या यातनांचा आलेख बघितल्यास अतिशय विदारक चित्र आहे. त्यांच्या भुकेल्या पोटाकडे समाजाचे लक्ष जात नाही. फक्त लग्नसराई आली की, आनंदात मशगूल होण्यासाठी बॅंडवाला आठवतो.

 


प्राथमिक हेच "उच्च' शिक्षण-



अशिक्षित - २० टक्के
 

प्राथमिक - ४०  टक्के
 

माध्यमिक- ३२  टक्के
 

उच्च माध्यमिक- ६ टक्के
 

स्नातक- १ टक्का
 

स्नातकोत्तर- ०.२० टक्के
 


(जिल्ह्यातील ९  हजार ०५  बॅंड कलावंतांच्या अभ्यासातून पुढे आलेली माहिती.)

 



नागपुरातील पहिली बॅंड पार्टी-


 


सन १९३५ मध्ये नॅशनल बॅंड पार्टी डॉ. नरेंद्रसिंग प्रधान यांनी स्थापन केली. यानंतर वर्षभरात हिंदू बॅंड पार्टी नत्थूसिंग यांनी स्थापन केली. यापाठोपाठ फुसाजी कांबळे यांनी प्रभात बॅंड पार्टी उभी केली. तर पुढे इतवारीत बोटासिंग आणि रिगल सिनेमाजवळ गुंडासिंग बिहाडे यांनी बॅंड पार्टी सुरू केली. पुढे १९६९ मध्ये संत गुलाबबाबा यांनी रमेश निखारे आणि गंभीरदास अडागळे यांना एक लाख रुपये दिले. यातून संत गुलाब बाबा बॅंड पार्टी सुरू झाली.

 


'सकाळ'चे आभार-


 


दै. "सकाळ'ने डॉ. अशोक कांबळे यांनी लक्तरातून आपल्या आयुष्याची रंगीबेरंगी उबदार गोधडी साकारली. काटेरी आयुष्य जगताना, जिवंतपणी मरणयातना भोगल्या. आज ते शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देताहेत. त्यांच्या आयुष्याची ही चित्तरकथा दै. "सकाळ'ने गुरुवारच्या अंकात प्रकाशित केली आणि डॉ. कांबळे यांच्यावर संपूर्ण विदर्भातून कौतुकाचा वर्षाव झाला. याबाबत अतिशय भारावलेल्या शब्दात डॉ. कांबळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुचेता यांनी दै. "सकाळ'चे आभार मानले.

 


बॅंडवाले मुळात मातंग. कधीकाळी त्यांना राजाश्रय होता. या व्यवसायावर आता डीजेसह इतर समाजांचे, परप्रांतीयांचे अतिक्रमण झाले आहे. यामुळे अर्थकारण वाढले असले तरीही मातंग समाज या वाद्यकलेतून बाद होत आहे. तरुण वादक गंभीर आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. बॅंड वाजवणाऱ्यांना कलावंत म्हणून ओळख मिळून त्यांना शासनाकडून दरमहा किमान तीन हजार रुपयांचे मानधन मिळायला हवे. तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना विशेष आरक्षणाची गरज आहे.

 


संदर्भ- http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5641720671772648479&SectionId=28&SectionName=ताज्या+बातम्या&NewsDate=20130726&Provider=केवल+जीवनतारे+%3A+सकाळ+वृत्तसेवा&NewsTitle=पोटासाठी+ते+विकत+घेतात+आजार


 

धन्यवाद- दै.सकाळ.


लेखं - डॉ. अशोक कांबळे, नागपूर. (9822461593)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...