आधार गट, बचत गटातून जनजागृती- सत्यशोधक मनीषा तोकले ताई !!
''बीड येथे १९९६ मध्ये राहायला आलो आणि तेव्हापासून आजपावेतो माझा मानवी हक्कासंदर्भातील कामाचा आलेख वाढताच आहे. रचनात्मक व संघटनात्मक अशा दोन्ही बाबींवर काम करण्याचे मी ठरवले होते. त्यानुसार एकशे वीस गावांत आधार गट स्थापन केले. साडेतीनशे बचत गटांची स्थापना करून सुमारे साठ हजार महिलांचे संघटन उभारले. पैसा कमावून महिलांना स्वत:च्या पायावर उभे करणे हा त्याचा एकमेव उद्देश नसून यामार्फत गावागावात स्त्री-भ्रूणहत्या व मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी व कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ चा प्रसार करण्याचे महत्त्वाचे काम यामार्फत केले जाते.'' सांगताहेत गेली सतरा वर्षे सामाजिक कार्यातून महिला जागृती करणाऱ्या मनीषा तोकले.
माझा जन्म येलम समाजातला. माझे वडील गुरांचे प्रसिद्ध डॉक्टर होते. बाबांच्या वेगवेगळय़ा गावांत होणाऱ्या बदलीमुळे मला ग्रामीण भागातील बोलीभाषेची, आपलेपणाची शिकवण त्या काळातच मिळाली. परळी येथील दवाखान्याच्या क्वार्टरमध्ये राहत असताना दलित मुलींबरोबर मैत्री झाली. एके दिवशी त्या मैत्रिणीच्या घरी गेले असता तिथल्या वातावरणाने माझ्या विचारांना कलाटणी मिळाली. दलित समाजाविषयी माझ्या मनात असणारे अनेक समज यानिमित्ताने पुसले गेले. समाजातील या वंचित घटकांबद्दल आत्मीयता वाटू लागली. पुढे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या विचारांचा प्रभाव वाढू लागला आणि तेव्हापासून वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारविरोधात मी मानवी हक्क संघटनेद्वारे उभी राहू लागले ते आजपर्यंत.
१९९० साली लातूरमधील राजर्षी शाहू महाविद्यालयात मी बी.ए.ला प्रवेश घेतला. त्या वेळी समवयस्क तरुणांचा मैत्रीगट तयार करून 'भाकवान' हे अंधश्रद्धेवर, तर 'आम्ही सारे हिंदू आहोत' हे हिंदू धर्मातील वाईट चालीरितींवर प्रहार करणारे नाटक आम्ही सादर केले. याच काळात 'खेडी विकास मंडळ (देवणी)' या संस्थेची ओळख झाली. या संस्थेअंतर्गत गावोगावी जाऊन नवीन आर्थिक धोरणाच्या विरोधात एक लाख लोकांच्या सह्य़ांचे निवेदन सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला. याच वेळी लातूर शहरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे सर्वेक्षण सुरू झाले. त्यात मी, जनाबाई पाटील, शांता रेड्डी प्रामुख्याने होतो. या वेळी गांधी मार्केटजवळ, शाहू चौकात, लाकडी आडय़ाजवळील तसेच सिंध टॉकीजजवळ राहणाऱ्या वेश्यांच्या आयुष्याविषयी, समस्यांविषयी संपूर्ण सर्वेक्षण केले. वास्तवाचे विदारक दर्शन मन हेलावून टाकणारे होते. एका वेश्येच्या घरी गेले, त्या वेळी एक माणूस तिला अक्षरश: बदडून काढत होता. कारण विचारले तर म्हणाला, 'ही आज दुसऱ्या माणसासोबत का बोलली? ती फक्त माझीच आहे. तिने दुसऱ्याशी बोलताही कामा नये.' तिच्यावरच्या व अन्य वेश्यांवरील अन्यायामुळे वेश्यांसाठी काम करण्याची माझी इच्छा अधिकच तीव्र झाली.
मानवी हक्क अभियानाचे बीड येथील कार्यकर्ते आणि महार असणारे अशोक तांगडे यांच्याशी लहानपणापासूनच परिचय होता. तांगडे कुटुंबीयांनी माझ्यावर सामाजिक जाणिवेचे संस्कार घडविले होते. या कुटुंबातील अशोक यांच्याशी माझा १४ एप्रिल १९९३ रोजी डॉ. आंबेडकर जयंतीदिनी विवाह पार पडला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतल्या कामगारांच्या मोर्चात मी आणि अशोक सहभागी झालो. लग्नाचा आनंद उपभोगण्यापेक्षा आम्ही लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुरुंगामध्ये होतो. लग्न अविस्मरणीय असतेच, पण माझ्यासाठी वेगळ्या अर्थाने लक्षणीय ठरले. त्यानंतर चंद्रपूर येथे आम्ही संसार सुरू केला ते एक तवा, एक वाटी, एक ग्लास, एक थाळी व स्टोव्ह यावर.
३० सप्टेंबर १९९३ च्या भूकंपाच्या वेळी मी लातूरला होते. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी आम्ही 'खेडी विकास मंडळा'मार्फत विविध साहित्यांचे वाटप केले. स्वयंसेवी संस्था व सरकार यांच्या समन्वयाने भूकंपग्रस्तांना नियोजनबद्ध मदत करता यावी यासाठी समन्वय समिती स्थापन केली. मी व अशोकरावांना दहा गावांची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती. आम्ही ती समर्थपणे पेलू शकलो, मात्र त्या वेळचे दिवस अत्यंत तणावाचे गेले.
मानवाधिकारासंबंधी हाताळलेली कामे -
१) कौटुंबिक अत्याचार - १०८० प्रकरणे.
२) दलित अत्याचार - २८० प्रकरणे.
३) आंतरजातीय विवाह - १७ प्रकरणे.
४) दलित महिला अत्याचार - २७० प्रकरणे.
१९९६ साली बीड येथे राहायला आलो आणि तेव्हापासून आजपावेतो मानवी हक्कासंदर्भातील माझ्या कामाचा आलेख वाढताच आहे. रचनात्मक व संघटनात्मक अशा दोन्ही बाबींवर काम करण्याचे मी ठरवले होते. त्यानुसार एकशे वीस गावांत आधार गट स्थापन केले. साडेतीनशे बचत गटांची स्थापना करून सुमारे साठ हजार महिलांचे संघटन उभारले. पैसा कमावून महिलांना स्वत:च्या पायावर उभे करणे हा त्याचा एकमेव उद्देश नसून यामार्फत गावागावात स्त्री-भ्रूणहत्या व मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी व कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ चा प्रसार करण्याचे महत्त्वाचे काम यामार्फत केले जाते.
एकदा एक वेगळाच अनुभव सामोरा आला. रामचंद्र माने नावाच्या कार्यकर्त्यांने आम्हाला वैदू समाजाच्या पंचायतीत नेले. तिथे एक प्रकरण सुरू होते. एका वैदूने दुसऱ्या वैदूकडे आपली पत्नी गहाण ठेवून दहा हजार रुपये घेतले. ती महिला दोन वर्षे त्या वैदूकडे राहिली. त्या वेळी त्यांना मुलगा झाला. दोन वर्षांनंतर त्या महिलेच्या पतीने त्या वैदूचे दहा हजार रुपये व्याजासकट परत केले, मात्र मुलगा तो सांभाळण्यास तयार नव्हता. या वेळी पंचायतीने निर्णय दिला की, ज्याच्यापासून या महिलेला मूल झाले त्याच्या पालन पोषणाचा पूर्ण खर्च मुलाच्या पित्यानेच उचलायला हवा. प्रकरण पंचायतीपर्यंत जाणे, त्यांनी न्याय देणे यादरम्यान त्या महिलेच्या मनात चाललेली भावना व तिची होणारी होरपळ कदाचित एक स्त्री म्हणून फक्त मला समजून घेता येत होती. बाकी सर्व फक्त माना डोलवत होते.
आणखी एका उदाहरणाने सामान्य स्त्रीमधील असामान्यत्व अधोरेखित होण्यास मदत झाली. माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे राहणाऱ्या राधाबाई सुरवसे यांची कहाणी. अवघ्या बाराव्या वर्षी लग्न झालेल्या या बाईंचा नवरा दहावी पास होता, मात्र शेतातल्या कुठल्याच कामाची सवय त्याला नव्हती. हे लक्षात येताच राधाबाईने रोजंदारीवर दुसऱ्यांच्या शेतात राबून प्रपंचाचा गाडा हाकला. त्याच वेळी गावात घडलेल्या दलित अत्याचाराच्या एका घटनेने राधाबाईंच्या आयुष्यालाही कलाटणी मिळाली. या घटनेविरोधात दलित समाज संघटित झाला. गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आतापर्यंत कधी साजरी झाली नव्हती. ती साजरी करण्यासाठी राधाबाईंनी माझ्या सांगण्यावरून पुढाकार घेतला. गावात त्यांना मानसन्मान मिळू लागला. हळूहळू दारूविक्रीचा धंदा सोडून तिने महिलांचे बचत गट स्थापन केले. गटातील महिलांना बँकेच्या व्यवहारात मदत करणे, त्यांना कर्ज मिळवून देणे ही कामे आनंदाने केली. यासह दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत १४ कुटुंबांना २८ एकर जमीन मिळवून दिली. माजलगाव तालुक्यात १५० घरकुले, अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या १६० लोकांना कर्ज मंजूर करून घेतले. ३५ बचत गट स्थापन करून स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे केले. १०० रुपयांपासून सुरू केलेला संसाराचा गाडा राधाबाईने सत्तर लाख रुपयांवर नेला. तिच्यातील स्त्रीशक्तीने मलाही अंतर्मुख केले.
२०१० मधल्या काळेगाव येथे घडलेल्या घटनेचाही इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. एकतर्फी प्रेमातून भरदुपारी दीपाली घाडगे या दहावीत शिकणाऱ्या मुलीवर रॉकेल टाकून अत्यंत निर्घृणपणे जाळण्यात आले. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री दहा वाजता मला दूरध्वनी आला.मी ताबडतोब काळेगाव गाठले. त्या मुलीच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. पोस्टमार्टेम झाल्यानंतर त्या मुलावर तात्काळ पोलीस कारवाई करावी, अशी मागणी आम्ही सर्वानी लावून धरली. काही वर्षांनंतर न्याय मिळाला व कायद्याने त्या आरोपीला शिक्षा झाली. या खटल्यातील पाठपुरावा कामी आल्याने समाधान वाटले.
पारधी वस्तीवर पोलीस आले की, सर्वजण घाबरून घरात बसतात. कारण कुठेही चोरी, पाकीटमारी झाली की पोलीस आधी पारधी वस्तीवर येतात आणि किमान चार-पाच लोकांना तुरुंगात टाकतात व प्रकरण दाबतात. मात्र मी २०१२ साली बगेवाडी येथील पारधी वस्तीवर बीडचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टांकसाळे यांना सोबत घेऊन दिवाळी साजरी केली. त्या पारधी वस्तीवर पहिल्यांदा दिवाळी साजरी करण्यात आली होती. त्यानंतर सरकारदरबारी खेटे घालून या लोकांसाठी मी रेशनकार्ड व मतदान ओळखपत्र मिळवून देण्याचे काम केले. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरले.
संघटनात्मक कामाचा पसारा दिवसेंदिवस वाढतच होता. अशातच १७ ऑक्टोबर २०१२ ला माझ्या पतीचे पोटाच्या कर्करोगाचे ऑपरेशन झाले. त्या वेळी पैशांची व मनुष्यबळाची अडचण जाणवली. या वेळी बीड पत्रकार संघाने पन्नास हजार रुपयांची मदत केली. आमच्या सामाजिक कार्याची ही पोचपावतीच म्हणायला हवी.
'जिथे महिलेवर मारण्यासाठी हात उगारला जातो, तो तिथेच रोखण्यासाठी हात निर्माण झाला पाहिजे' हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही 'समजदार जोडीदार' हा उपक्रम वीस गावांमध्ये राबवला, ज्यात आम्ही पुरुषांनाही सहभागी करून घेतले. याशिवाय दीडशे गावात 'आधार गट' स्थापन करून कौटुंबिक हिंसाचारात होरपळणाऱ्या महिलांना सहकार्य करण्याचे काम सुरू केले. यातला महत्त्वाचा भाग हा की, हे काम गावातील अर्धशिक्षित महिला करीत आहेत. या चौथी-पाचवी शिकलेल्या महिलांच्या तक्रारी घेण्यास अनेकदा पोलीस टाळाटाळ करतात. त्या वेळी ही अर्धशिक्षित, खेडवळ महिला या पोलिसांना कायद्याच्या भाषेतच ज्या प्रकारे ठणकावून सांगते ते बघून समाधान वाटते. गावागावात सावित्रीच्या लेकी, तिचा वारसा ताठ मानेने पुढे नेताहेत हेच खरे.
मानवाधिकाराची कास धरणे, मानवी हक्क या मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट केलेल्या बाबीसाठी काम करणे वाटते तितके सोपे नसते. सुरुवातीला मला याचा फार त्रास झाला. विविध केसच्या निमित्ताने धमक्या यायच्या, केस फिरवावी म्हणून अनेक प्रलोभने दाखवली जायची. पोलिसांचा ससेमिरा आमच्यामागे नेहमीच असायचा, मात्र डगमगून चालणारच नव्हते. चालणार नाही. कारण अन्याय, अत्याचारग्रस्त महिला माझी झोप उडवते आणि त्यातूनच तिला न्याय मिळावा यासाठी मी धडपडते. अशा अनेकजणी मला ताई म्हणून हाक मारतात. मोठय़ा बहिणीच्या आश्वासक सल्ल्यानुसार कृती करतात. त्याची जबाबदारीही वाटते आणि आनंदही. अजून काय हवं आयुष्यात? २०११ साली २८८ देहविक्रय करणाऱ्या महिलांना पिवळे रेशनकार्ड मिळवून दिले, तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ भाऊबीजेची भेट म्हणून मिळवून दिला. त्यांचे फुललेले चेहरे पाहिले आणि माझी दिवाळी साजरी झाली.
वैयक्तिक आयुष्यातही मी समाधानी आहे. अंकुर व अमन ही माझी मुलं. अंकुर बारावीत तर अमन सहावीत असून टी.व्ही.वरच्या बातम्या बघताना त्याला महिलांवरच्या अत्याचाराची बातमी दिसली की तो धावत माझ्याकडे येतो. मला सांगतो, 'आई तू यांच्या मदतीला तात्काळ जायला हवे.' तेव्हा खरोखरच मी करत असलेल्या कामाचे मला सार्थक वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनच्या माध्यमातून आमचे १५० वकील बांधव मराठवाडय़ात कुठेही दलितांवर, महिलांवर अन्याय, अत्याचार झाला तर या केसेस घेतात.
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लखनौ येथे पार पडलेल्या 'युनो' व 'महिला बालकल्याण विभाग, भारत सरकार'च्या 'मिलेनियम डेव्हलपमेंट गोल'च्या परिषदेत बोलण्यासाठी विषय दिला होता. 'वंचित घटकातील महिलांच्या समस्या आणि दलित-आदिवासी स्त्रियांच्या विकासासाठी २०१५ पर्यंत अन्याय, अत्याचारमुक्त करून स्वावलंबी जीवन कसे जगता येईल याविषयी मार्गदर्शन करणे.' देशभरातील विविध भागांतील महिला या वेळी उपस्थित होत्या. समाजव्यवस्थेत महिलांना दुय्यम समजले जाते, यासाठी शासनाने स्वतंत्र धोरण राबवावे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या महिलांना स्वत:च्या अस्तित्वाच्या जाणिवेसाठी शिक्षण, सकस आहार द्यायला हवा, अशी भूमिका मी मांडली. अशा विचारमंथनातून न्यायाच्या दिशेने वाटचाल होते, ती होईलच, यावर माझा विश्वास आहे.
संपर्कासाठी पत्ता -
मनीषा तोकले
ए-१, के. के. प्लाझा, जुना नगर रोड, बीड.
भ्रमणध्वनी- ९६३७५३५८८०
शब्दांकन- संतोष मुसळे
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!