गर्भलिंगनिदानाची माहिती कशी द्याल ???

गर्भलिंगनिदानाची माहिती कशी द्याल ???



१९९४ चा गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र वापर (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायदा गर्भाधारणेआधी आणि नंतरही गर्भालिंगनिदानाला प्रतिबंध करतो. या कायद्यानुसार, कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय गर्भाचे लिंग जाणून घेणे किंवा सांगणे हा गुन्हा आहे. परंतु लोकांच्या सहभागाशिवाय आणि त्यांनी असे गुन्हे पुढे आणल्याशिवाय या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकणार नाही. तुम्हाला गर्भलिंग निदानाची एखादी घटना माहित असेल तर तुम्ही या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता. तुमची इच्छा असेल तर तुमची ओळख जाहीर करण्याची गरज नाहे / तेही स्वतःची ओळख उघड न करता.

 

हे लक्षात ठेवा.-

 

तक्रार करताना संबंधित दवाखाना किंवा रुग्णालयाचे पूर्ण नाव आणि पत्ता द्यावा लागेल.
   
 

तुमची बाजू बळकट करण्यासाठी तुम्ही फोटो, दवाखान्यात दिलेली चिट्ठी इत्यादी संकेतस्थळावर पाठवू शकता.
   
 

तुमच्या तक्रारीची आधी छाननी केली जाईल. अशा छाननीशिवाय आणि पुरेशा पुराव्याशिवाय कोणताही डॉक्टर किंवा दवाखाना दोषी मानला जाणार नाही.
   
 

तुम्ही तुमची ओळख उघड न करता तक्रार नोंदवू शकता.


 

तक्रार नोंदवण्याच्या पायऱ्या-

   


१. तुमची तक्रार इथे नोंदवा असे लिहिलेल्या बाणावर क्लिक करा.
   


२. तुम्ही तुमची माहिती दिल्यास आम्हाला तुमच्या तक्रारीची चौकशी करणं सोपं जाईल. परंतु, तुम्हाला तुमची ओळख उघड करायची नसेल तर नाही वर क्लिक करा आणि पुढे चालू (continue) वर क्लिक करा.


 



तक्रार अर्ज भरताना-

 

टीप: * अशी खूण असलेले सर्व रकाने भरणं आवश्यक आहे.
   


१. ‘जिल्हा निवडा (Select District) वर क्लिक करा, यानंतर येणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीतून तुम्हाला ज्या जिल्ह्यातील घटनेची तक्रार नोंदवायची आहे त्यावर क्लिक करा.
   


२. ज्या दवाखान्याची किंवा डॉक्टरची तक्रार करायची आहे त्यांचे नाव आणि पत्ता सोबत ठेवा. कारण तक्रार नोंदवण्यासाठी हे लागेलच. डॉक्टरचे किंवा संबंधित दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचे नाव तुम्हाला माहित असल्यास द्या.
   


३. गर्भालिंग निदानाची घटना तुम्हाला कशी समजली याचे उत्तर दिलेल्या पर्यायांमधून निवडून त्यावर क्लिक करा.
   


४. तुम्हाला संबंधित घटनेची जास्त माहिती द्यायची असेल तर सोबतच्या घटनेचे तपशील (Description of the Complaint) चौकटीत जास्तीची माहिती लिहा.
   


५. जर संबंधित घटना तुमच्या स्वतःच्या बाबतीत, तुमच्या कुटुंबातील कुणाबरोबर किंवा ओळखीच्या कुणाबाबत घडली असेल तर पुढील प्रत्येक प्रश्नासमोर हो, नाही किंवा माहित नाही यातील योग्य पर्याय निवडा.
   


६. तुमच्याकडे या घटनेसंदर्भात औषधाची चिठ्ठी, फोटो किंवा इतर कागदपत्र असल्यास तेही सोबत ठेवा. म्हणजे तेही नेटवर लगेच पाठवा. यामुळे तुमची तक्रार जास्त सबळ होईल.
   


७. या केससंदर्भात जास्त माहितीसाठी तुम्हाला संपर्क केलेला चालणार असेल तर सोबतच्या चौकटीवर क्लिक करा. टीप: ही माहिती सक्तीची नसली तरी ती दिल्यास केसच्या तपासात नक्कीच मदत होते.
  

 
८. ‘यानंतर पाठवा (Submit) वर क्लिक करा.


 



ज्यांना स्वतःची माहिती द्यायची आहे त्यांच्यासाठी जास्तीच्या पायऱ्या:-

   


१. तुमचं नाव, दूरध्वनी क्रमांक (असल्यास), ईमेल (असल्यास) आणि तुम्हाला जिथे संपर्क करता येईल असा पूर्ण पत्ता द्या.
   
 

२. यानंतर तक्रार नोंदवा (Register Complaint) वर क्लिक करा.


www.amchimulgi.gov.in

 


गर्भलिंगनिदानाबाबत काही तथ्यं -

 


एखाद्या समाजात मुलींची संख्या कमी आहे किंवा खालावत चालली आहे हे कसं ठरवायचं?


 

निसर्गाच्या नियमानुसार, १००० मुलांमागे ९४०-९५० (जास्त अचूक म्हणजे ९५२) मुली जन्माला येतात. आपल्या भागात १००० मुलां मागे प्रत्यक्षात किती मुली जन्म घेतात हे जर आपण शोधलं तर आपल्याला जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर (Sex Ratio at Birth) मिळू शकेल. ०-६ वयोगटासाठी १००० मुलांमागे मुलींची संख्या घेतल्यास आपल्याला बाल लिंग गुणोत्तर (Child Sex Ratio) मिळते. एखाद्या समाजात गर्भलिंग निवडीचे प्रमाण किती आहे हे आपल्याला जन्माच्या वेळच्या लिंग गुणोत्तरावरून जास्त अचूकपणे समजू शकते.
 



जनगणनेवरून देशाच्या, राज्याच्या आणि जिल्ह्याच्या पातळीवर ०-६ वयोगटातील लिंग गुणोत्तर काय आहे हे समजते तर सँम्पल रजिस्ट्रेशन सर्वेतून (Sample Registration Survey) जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर समजते.
 



२००१ च्या जनगणनेनुसार देशाचं ०-६ वयोगटासाठी लिंग गुणोत्तर ९२७ होतं. महाराष्ट्रासाठी हे गुणोत्तर ९१३ होतं. त्यातही कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण ८७८ हून कमी होतं.
एस आर एस च्या आकडेवारीनुसार २००६-२००८ साठी महाराष्ट्राचे जन्माच्या वेळचे गुणोत्तर १००० मुलांमागे ८६९ मुली इतके कमी झाले आहे. यातून राज्यामध्ये गर्भलिंगनिदान होत आहे हे स्पष्टपणे दिसून येते.


गर्भलिंग निवड कायद्याने गुन्हा आहे का?


१९९४ चा गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र वापर (गर्भलिंग निदान प्रतिबंध) या कायद्यानुसार गर्भलिंगनिवड गुन्हा आहे. सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी केला जाऊ नये म्हणून हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांपर्यंत कैद आणि १०,००० रु. दंडाची शिक्षा होऊ शकते. परंतु या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही आणि त्यामुळे थोड्याच लोकांना शिक्षा होऊ शकली आहे. गुन्हा सिद्ध करणं हेच सर्वात मोठा आव्हान आहे. कारण गर्भलिंग निदान उघडपणे होत नाही आणि बहुदा दोन्ही पक्षांच्या संमतीने घडत असते. त्यामुळे तक्रार कोण दाखल करणार?



पण गर्भपाताला तर कायद्याने मंजुरी आहे ना ?

हो. १९७२ चा वैद्यकीय गर्भपात कायदा विशिष्ट परिस्थितीत गर्भपात करण्यास मंजुरी देतो. उदा. आईच्या किंवा होणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका असल्यास, बलात्कार झाला असल्यास किंवा गर्भनिरोधक निकामी ठरल्याने दिवस राहिले असल्यास गर्भपात करता येतो. परंतु हा कायदा गर्भलिंग निवड करून नंतर केलेल्या गर्भपाताला परवानगी देत नाही.



लेखं- निलेश कळसकर. (जळगाव)


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...