तुझे डोळे.. माझे डोळे... प्रकाश देवो जगाला !!

तुझे डोळे.. माझे डोळे... प्रकाश देवो जगाला !!




जळगाव : जीवनात एकदाच येणारा सुखद प्रसंग म्हणजे विवाह होय. आपल्या विवाहाची आठवण आयुष्यभर सोबत राहावी आणि प्रसंग येणार्‍या जोडप्यांना आदर्श ठरावा, यासाठी जळगाव शहरातील रामनगरमध्ये राहणार्‍या परेश शांताराम चौधरी (वय वर्षे २६) यांनी विवाहाच्या दिवशी कोणालाही न कळविता येणार्‍या वर्‍हाडींना आपल्याकडून लग्नाची भेट म्हणून शनिवारी लग्नमंडपातच भावी आयुष्याची सोबतीण प्रिया अरुण चौधरी (वय वर्षे २५) हिच्यासह नेत्रदानाचा अनमोल संकल्प अधिकृतरीत्या पूर्ण केला.
लग्नाच्या दिवशी विवाहबद्ध होणारे अनेक जोडपे भविष्यकाळाची स्वप्ने रंगवित असतात.

 


हे संकल्प कुटुंब नियोजनापासून ते पगाराच्या व्यवस्थापनापर्यंतच र्मयादित राहतात. आपण समाजाचं देणं लागतो याचा त्यांना विसरच पडलेला असतो. जीवनातील आनंदाचा क्षण अनुभवत असताना मग समाजोपयोगी कार्याला वेळ तरी कसा मिळणार... चौधरी दाम्पत्याची मॅरेज स्टोरी आणि संकल्पपूर्ती मात्र या सर्वांना अपवाद आणि वेगळी ठरली.


 

सप्टेंबर महिन्यात मुंबई येथील निर्मन संस्थेबद्दल तसेच त्यांच्या कार्याबद्दलची माहिती परेशला मिळाली. नागरिकत्वाची परिभाषा सिद्ध करून दाखविण्याची ही उत्तम संधी असून ती दवडता कामा नये. म्हणून परेशने होणार्‍या भुसावळस्थीत पत्नीला मागील महिन्यात नेत्रदानाच्या संकल्पाबद्दल माहिती दिली. ७ डिसेंबरला लग्नाच्या दिवशी आलेल्या पाहुण्याच्या उपस्थितीत नेत्रदानाचा संकल्प करण्याची इच्छा निर्मन फाउंडेशनचे प्रकल्प प्रमुख राजू चव्हाण यांना बोलून दाखविली.



परेश आणि त्याची पत्नी प्रिया दोघे संगणक विषयाचे पदवीधर आहेत. पारंपरिक पद्धतीने दोघांचा विवाह पार पडला. नेत्रदानामुळे आम्हाला प्रत्येकी दोनशे वर्षाचे आयुष्य लाभले आहे. अंध नागरिकाला दृष्टी मिळाली तर आमच्या जीवनाचे कल्याण होईल. प्रत्येकाने जर नेत्रदानाचा संकल्प केला तर देशातील अंधत्व नष्ट होईल, असे चौधरी दाम्पत्याने बोलताना सांगितले आहे.


 



शनिवारी भुसावळ येथे चौधरी उपवरांचा विवाह सोहळा पार पडला. विवाहाचे सप्तफेरे पूर्ण करताच दोघांनी आपल्या संकल्पाच्या प्रतिज्ञापत्रावर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. जमलेल्या पाहुण्यांना नेमके काय चालले आहे ते काही मिनिटे कळालेच नाही. झालेला प्रकार कळताच सर्वांनी टाळ्या वाजवून दोघांच्या संकल्पाचे स्वागत केले.


 



परेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा माजी कार्यकर्ता आहे. मार्च महिन्यात त्याच्या लग्नाची बोलणी पक्की झाली होती. विशेष म्हणजे इतरांप्रमाणे याने लग्नाचा हुंडादेखील घेतलेला नाही.


 


THANK U- LOKMAT

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...