नवर्‍याने लादला 'एचआयव्ही': अनिता पाटील ठरताहेत 'मृत्युंजय'... 'ती' करतेय समदु:खींची सेवा !!

१ डिसेम्बर जागतिक एडस दिन विशेष... नवर्‍याने लादला 'एचआयव्ही': अनिता पाटील ठरताहेत 'मृत्युंजय'... 'ती' करतेय समदु:खींची सेवा !!




स्वत:ची काहीही कसूर नसताना 'एचआयव्हीग्रस्त'पण लादल्या गेलेल्या तरुणीने निराश न होता आपल्या समदु:खी माताभगिनी आणि बाळांना सार्‍या समाजाचे प्रेम मिळावे.. त्यांना जास्तीत जास्त आयुष्य लाभावे..यासाठी अदम्य, अथक प्रयत्न चालवले आहेत.. ही 'मृत्युंजय' तरुणी आहे, अनिता पाटील.



एकूणच सारे आकाश अंधारून आले असताना प्रकाशकिरण बनलेल्या अनिता यांनी दिल्लीच्या 'पॉझिटिव्ह पीपल लिव्हिंग वुईथ एचआयव्ही' च्या सहकार्याने 'विहान (सूर्यकिरणे) काळजी व आधार केंद्र' १ जून २०१३ पासून जळगावच्या दीक्षितवाडीतील 'अप्सरा' इमारतीत रोज १२ ते १४ तास त्यांची या सेवाकार्यात अथक धडपड सुरू असते. समाजाने एचआयव्हीग्रस्तांना प्रेम दिले, समाजावून घेतले तर अनेक एचआयव्हीग्रस्त महिलांना देहविक्रीच्या गर्तेतून आणि प्रसारातून बाहेर पडता येईल.. अन् २०१५ पर्यंत 'शून्य' वाढ या उद्दीष्टापर्यंत पोचता येईल, असा विश्‍वासही त्यांनी 'लोकमत'ने साधलेल्या संवादात व्यक्त केला. १ ते ७ डिसेंबर या कालावधित विविध उपक्रम घेण्यात येत आहेत, याची माहितीही त्यांनी दिली.



१ डिसेंबर हा 'जागतिक एड्स् दिन'..त्या निमित्ताने स्वकार्याने शेकडोंच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणार्‍या या ज्योतीशी हा संवाद झाला.



अनिता पाटील या मूळच्या बोरखेडा ता.धरणगावच्या रहिवासी. त्या जळगावातील वाघुळदेनगर परिसरात आई लताबाई व वडील ईश्‍वरलाल पाटील यांच्यासमवेत राहात आहेत. पिंप्रीच्या कन्या विद्यालयात आणि पुढे धरणगावला त्यांचे शिक्षण झाले आहे. १९९८ मध्ये त्यांचे भुसावळच्या युवकाशी लग्न झाले.. आणि त्यांच्या आयुष्याला दु:खद वळण मिळाले.. नवरा ९३ पासून एचआयव्हीग्रस्त होता, हे सासरच्यांना माहीत असूनही त्यांनी लपवून ठेवल्याचा अनिता पाटील यांचा आरोप आहे. पुढे अनिता यांना वजन कमी होणे, अंगावर पुरळ येणे, जखम बरी न होणे.. असा त्रास होऊ लागला. सासरचे लोक मूलबाळ होऊ देण्यास विरोध करीतही होते. पण (सत्य माहित नसल्याने) अनिताने जुमानले नाही.. गर्भधारणा झाल्यावर तिच्या डॉ.केळकर यांच्याकडे १३-१४ प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. रिपोर्ट घेण्यासाठी त्या दवाखान्यात गेल्या असता नवर्‍याने ते परस्पर नेल्याचे कळले.. सासरच्यांनी टाळाटाळ केली.. अखेर तिसर्‍या दिवशी अनिताने दवाखान्यात जात रिपोर्टबाबत माहिती मिळवली आणि तिला सत्य कळले. घरी जाते तो सासू, सासरे आणि नवरा यांची घरात गोलकार बैठक बसली होती. वर तिला 'तू कोठे गेली होतीस, तुझे रिपोर्ट चांगले आहेत.' अशी बतावणी ते करू लागले. वादावादीनंतर सासू म्हणाली की तुला सत्य जाणायचे असेल तर आधी वैष्णवी माता हातात घे.. शपथ घे.. की तू सारे काही समजून घेशील! गुप्त ठेवशील.. कुठेच बोलणार नाही' मी शपथ घेताच त्यांनी नवर्‍याला लग्नाआधी पाच वर्षापासून एड्स् असल्याने व तू एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेस' असे सांगितले. 'लपवालपवी का केली?.. मी माहेरी जाते' असे काही विचारात असतानाच माझी शुद्ध हरपली.. शुद्धीवर आल्यावर मी रडत असताना ते म्हणाले चूप बैस, कुठे बोलू नकोस' . पुढे त्यांनी 'मला याचा त्याचा कॅन्सर आहे..' असे लोकांना सांगायला सुरुवात केली. पुढे मी भावाला फोन केला.दिवाळीत तो घरी आला.. सासूच्या विरोधाला न जुमानता त्याने आम्हा दोघांना मुंबईच्या जे.जे.हॉस्पिटलला नेले. तेथे तपासणीसाठी रक्त घेत असताना नवर्‍याने 'तपासणीची गरज नाही..' असे म्हणत पाच वर्षापासून एचआयव्हीग्रस्त असल्याची कबुली दिली.



नंतर मी पुन्हा सासरी गेले.. भावाला का सांगितले, म्हणून माझा राग आणि मला त्रास सुरू झाला. महिनाभरात मला घराबाहेर काढण्यात आले. आम्ही भाड्याचे घर घेतले. नंतर आम्हाला घराची वरची खोली देण्यात आली. पुढे तर वीज व पाणीही तोडले. मारहाणही व्हायला लागली. मी अखेर फसवणूक, मारहाण इ.बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पण तेथील पोलीस अधिकारी सांगायला लाज वाटेल, एवढे घाण घाण बोलला.



मैं भी तो जी रही हू... शबानाने दिली प्रेरणा-


अखेर निराश होऊन पंच फारकत घेऊन माहेरी बोरखेड्याला गेली. भावाने पुन्हा जे.जे.ला दाखल केले. तेथे एकाहून एक दु:खी रुग्ण पाहून आणि त्यांच्या कहाण्या ऐकून आपण स्वत:साठी आणि यांच्यासाठी खूप काही करू शकतो, ही जाणीव झाली. डॉ.अलका देशपांडे यांनी तुम्ही यांची सेवा करा, त्यांना प्रेरणा द्या, हा विचार देत आणखी हिंमत दिली, स्वयंसेवी संस्थांची माहिती दिली.२००५ आणि ०६ मध्ये तेथेच सेवा दिली.. शबाना पटेल या स्वयंपीडित समाजसेविकेची भेट झाली. प्रशिक्षणप्रसंगी तिने 'मैं भी तो जी रही हू' असे म्हणत मला या क्षेत्रात पूर्ण सेवा देण्याचे आव्हान दिले अन् तू ते स्वीकारले तर तुझी पाठ थोपटेन' अशा शब्दात माझ्यात जिद्द निर्माण केली अन् मी पुढे 'नेटवर्क ऑफ ठाणे बाय पीपल लिव्हिंग वुईथ एचआयव्ही' या संस्थेत काम करू लागले.


■ द्रौपदीचे लज्जारक्षण कृष्ण हा जसा भाऊ .. तसे भाऊ उन्मेश यानेच माझे रक्षण केले.. नवर्‍याने लपवलेला आजार आणि मला झालेला संसर्ग कळल्यावर अनेकदा माझ्या पायाखालची जमीन सरकली, मला जगावेसे वाटेना, अनेकदा मी बेशुद्ध पडली.. क्षीण झाली, आपण मरणार असे दीर्घकाळ वाटत राहिले.. पण सत्य पचवण्याचा, जगण्याचा आणि लढण्याचा धीर दिला तो भाऊ उन्मेशने.. तो विक्रोळी (मुंबई) ला एका कंपनीत मोठय़ा पदावर आहे.. त्यानेच सारे दवाखाने केले..



■ २००६ मध्ये त्यानेच प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याबरोबर 'आपण बाळाला एचआयव्हीपासून वाचवू शकता' असा संदेश देणार्‍या चित्रपटात सहभागी होण्याची संधी मिळवून दिली. त्यामुळे माझी ओळख जाहीर झाल्याने मी आता बिनदिक्कत एचआयव्हीग्रस्त म्हणून वावरत सामाजिक कार्य करीत आहे. नि:स्वार्थ सेवेचा झेंडा हाती घेतला आहे. तो फडकवित ठेवणार आहे.



जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.एन.लाळीकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.कुणाल पाटील व सहकार्‍यांचे खूप सहकार्य त्यांना या कार्यात लाभत आहे. भावाने जळगावला घरही घेऊन दिले.. आणि आईवडीलही आपल्या अशा लेकरांना दोन शब्द प्रेमाचे देत नाहीत, अशा जगात माझे आई वडील माझ्याजवळ येऊन राहात असल्याचेही त्यांनी सांगितले २०१० पासून मी जळगावात या जीवांना सेवा देत आहे. आतापर्यंत संस्थेने सुमारे अडीच हजार लोकांची नोंदणी केली असून त्यांना स्वत: पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट करून मार्गदर्शन, शासकीय, निमशासकीय योजनांची माहिती देत आहे. रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करणे, विनामूल्य रक्त व वैद्यकीय सेवा मिळवून देणे, आधारकार्ड, पिवळे कार्ड आणि अन्य सेवा मिळवून देणे, भेदभाव विसरुन त्यांना प्रेमाची वागणूक तसेच संदर्भ सेवा, कायदेविषयक सेवा मोफत दिली जात आहे, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.




 

लेखं- चंदू नेवे, जळगाव


 

धन्यवाद- दै.लोकमत.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...