शिकणाऱ्या भावा...

शिकणाऱ्या भावा...


चाळींतल्या वातावरणात कुणाच्या घरात काय चाललंय याची इत्थंभूत माहीती प्रत्येकाला असते. अण्णाच्या घरची परिस्थिती तशी सगळ्यांनाच ठावूक होती. पण ह्यावेळेस जरा जास्तच काहीतरी बिनसलंय हे सगळ्यांनाच कळून चुकलं होतं. लहान्या भावाच्या वियोगाने हतबल झालेला अण्णा आणि त्याची बायको शोभा अख्ख्या कॉलनीने अनुभवले होते.

 




गेल्या दोन दिवसापासून अण्णा घरातच पडून होता. नाक्यावर धंद्याला सुद्धा गेला नव्हता. कामाला दांडी मारली होती. आजुबाजूचे लोक येऊन विचारपुस करत होते. अण्णाची बायको शोभा हलकेच रडायची आणि शांत व्हायची. शोभा वहिनी तशी अख्खा कॉलनीत फेमस. पण ती देखील दोन दिवसापासून कुठेही न दिसल्याने सगळ्यांनी तीच्या घरचा रस्ता धरला होता. कारण दोन दिवसाआधी एवढ्या आनंदात नटून थटून अण्णा, शोभा आणि तीचा लहान दिर गिरीष तीघेही जण त्यांच्या अधिकारी झालेल्या भावाला भेटायला चालेले होते. त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद काही औरच होता. आणि आत्ताची स्थिती काही वेगळीच. नेमकं काय घडलंय याचा कुणालाही काडीमात्र अंदाज लागत नव्हता. जे काही घडलं होतं ते त्यांनी त्यांच्या उदरात दडवून ठेवलं होतं.

 



अण्णा पगारे मुळचा अशोक पगारे. घरातला मोठा पोरगा म्हणून त्याचा बाप तात्या त्याला अण्णा म्हणूनच हाक मारायचा. तात्याला एकुण तीन अपत्य. अण्णा, अण्णाच्या पाठीवर झालेली दोन मुलं. 1986-87 च्या काळात नोकरीच्या शोधात नाशकातलं छोटंसं झोपडं सोडून तात्यासाहेबानं त्याच्या अख्ख्या बिऱ्हाडासोबत मुंबई गाठली होती. तेव्हापासून तात्याने घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत आपलं बस्तान बसवलं. रमाबाई कॉलनीत एंट्री केल्या केल्या डी.बी.पवार चौकातून आत जाणाऱ्या चिंचोळ्या गल्लीतनं आत आलं की सम्राट अशोक चाळ सुरू होते. चाळ म्हणजे नावालाच. ठिकठिकाणी फरश्या निघालेल्या. एकावेळी फक्त तीनच जण जाऊ शकतील एवढीशी बोळ. घराच्या मागे पुढे दोन्हीकडे गटारीचं समांतर रेषेत वाहणारं साम्राज्य. त्या साम्राज्यात छोटंसं घरटं करून पगारे कुटूंब रहायचं.

 



घाटकोपर पूर्व मध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या लगत वसलेली रमाबाई नगरची वसाहत. मुंबईचं अंडरवर्ल्ड तसं सगळ्यांनाच परिचित. पण त्या अंडरवर्ल्डपेक्षाही एक भयानक अंडरवर्ल्ड मुंबईने आपल्या उदरात जोपासलंय. खुलेआम जागा मिळेल तसं विस्तारत गेलंलं हे अंडरवर्ल्ड. रमाबाई कॉलनीचं ते अंडरवर्ल्ड. परिस्थितीनं नाडले गेलेले सारे गुण्यागोविंदानं आपल्या शोषणाची वाट पाहत जगतायेत. त्या शोषणानं कळस गाठला होता तो दिवस अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहेत. त्या जखमा अजूनही ताज्या आहेत. 11 जुलै 1997 च्या भल्या पहाटे रमाबाई कॉलनीत झालेल्या गोळीबाराने 11 निष्पापांचा बळी घेतला. 30 च्या आसपास जखमी झाले. सरकारी दफ्तरी फक्त ह्या 41 लोकांची दखल घेण्यात आली. पण खरं तर गोळीबार प्रकरणानंतर उसळलेल्या जनक्षोभावर पोलिसांनी केलेल्या अत्याचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. काहींना कायमचं अपंगत्व आलं. तर काही हत्याकांडाचा धक्का सहन न करू शकल्याने आपले प्राण सोडले. गोळीबार झाला त्या दिवशी सकाळी तात्या त्याच्या बायको आणि पोरासोबत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आंदोलनासाठी उतरला. पोलिसांचा गोळीबार आणि जबर लाठीमार सहन करू न शकल्याने अण्णाच्या आईने प्राण आठवडाभर राजावाडी हॉस्पीटलमध्ये मृत्यूशी झूंज देऊन प्राण सोडले. बीएमसीमध्ये गटार खात्यात कामाला असलेला तात्या आधीच खंगलेला होता. टीबीच्या आजाराला तोंड देत होता. तो देखील लाठीमार सहन करू शकला नाही. अवघ्या महिन्याभरात त्यानेही सगळ्यांचा निरोप घेतला. जाता जाता अण्णाच्या अंगावर दोन भाऊ आणि दोन बहिणींची जबाबदारी सोडून गेला.

 




तात्या गेल्यानंतर त्याची तीन्ही लेकरं पोरकी झाली होती. पण अण्णा थोडा मोठा होता. जेमतेम 22 वर्षांचा असेल तेव्हा. आई गेली, बाप गेला तेव्हा बिल्कूल रडला नाही. त्याला बिलगून बिलगून रडणाऱ्या छोट्या भावंडांना धीर देत होता. त्याचं रडणं त्याच्या मनातच राहीलं होतं. तात्या जीवंत असतानाच त्याने अण्णाचं कामराज नगरमधल्या महादू जाधवाची मुलगी शोभा सोबत जमवून ठेवलं होतं. तात्याच्या जलदान विधीच्या कार्यक्रमातच महादूनं अण्णाला शोभाशी लगेच करून टाकायला गळ घातली. गंधकुटीच्या विहारात अवघ्या दहा जणांच्या उपस्थितीत लग्न उरकून घेतलं. लग्न झाल्यापासून शोभानं आणि अण्णानं त्या चार चिमुकल्या जीवांचा भार जबाबदारीने उचलला. खरं तर शोभावहिनी आणि अण्णा जरा जबरदस्तीनेच मोठे झाले. सुरूवातीला काही काम धंदा नव्हता. आज नाक्यावर गंधकुटीजवळ जेथे आत्ता बाबासाहेबांचा आलिशान पुतळा उभा दिमाखात उभा आहे तेथे बोंबील फ्राय, वडे पाव विकून अण्णा भावंडांना वाढवायला लागला. अकाली लादलं गेलंलं मोठंपण तो बिनतक्रार सोसत होता. काही दिवसांतच बापाच्या जागी बीएमसीत त्याच गटारखात्यात त्याला नोकरी देखील मिळाली. आधी जातीनिहाय सर्विस पुरवत होते. आत्ता कॉर्पोरेशनमध्ये सरकारी बिल्ला लावून सर्विस पुरवण्याचे काम सुरू केले होते. अण्णा कामाला लागल्यापासून गाडी सांभाळायची जबाबदारी शोभा वहिनीवर येऊन पडली. वहिनी सकाळीसच उठून अख्खा माल भरायची. घरातलं सगळं आवरून मग गाडीवर जायची. अण्णा रोज कुठे ओवरटाईम मिळेल याच्या शोधातच असायचा. त्यामुळे सकाळी पाचला घरातून बाहेर पडला की संध्याकाळी आठलाच परत येई. शिक्षण जेमतेम असल्याने आपली अशी अवस्था आहे एवढेच त्याला पक्के ठावूक. अख्खी चपटी जिरवून, तोंडात मावेल एवढी तंबाखू कोंबून विष्ठलेल्या गटारींत गुडघाभर पाय रुतवताना अण्णाला कधीच लाज वाटली नाही. हाताने लोकांची गुखाडी साफ करून घरी आल्यावर शोभा वहिनी त्याला प्रेमानं दोन घास भरवायची. गटारानं माखलेल्या हातांनी जेवायची सुद्धा त्याला किळस वाटायची. पण भावांची जबाबदारी त्याला कुठे तोंड वर काढूच देत नव्हती.

 



अण्णाचे दोन भाऊ गिरीष आणि गौतम. अगदी चुणचुणीत. गौतम आईवर गेलेला. रूबाबदार चेहरा, रंग गोरा, पण अंगाने जरासा स्थूल. लहानपणापासून अभ्यासात हुशार. शाळेत पहिला नंबर ठरलेला. प्रत्येकाच्या शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर पडताना पाहून सगळे खुष व्हायचे. गौतमच्या हुरहुन्नरीपणामुळे शोभा वहिनीनं आधीपासूनच जिद्द धरलेली. गौतमला खुप शिकवायचं. मोठ्ठा अधिकारी बनवायचं. त्याने टेबलावर घंटी दाबल्या दाबल्या चार नोकर त्याच्या सेवेत उभे राहीले पाहीजेत. जेव्हा आपला गौतम अधिकारी होईल तेव्हा गोळीबार करणाऱ्या सगळ्या लोकांना शिक्षा करील. आपल्यासारख्या लोकांना न्याय मिळवून देईल. ह्या भाबड्या आशेपायी गाडीवर होणारा सगळा धंदा, अख्खा गल्ला ती फक्त गौतमच्या शिक्षणासाठी वेगळा काढून ठेवी.

 



अण्णाचा ओवरटाईम सुद्धा त्याच्यासाठीच शिलकीत पडायचा. ज्या पुस्तकावर फुले, बाबासाहेब, शाहू, सावित्रीमाई, शिवाजी, जिजाबाई दिसायचे ते पुस्तक काहीही विचार न करता विकत घेऊन यायचा आणि गौतमच्या हातात सोपवायचा. खिशाची ऐपत नसताना त्याला महागड्या कॉलेजात शिकायला टाकलं. घाटकोपर ते चर्चगेट प्रवासात आपल्या भावाची दमछाक होऊ नये. त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून रेल्वेचा फर्स्ट क्लासचा पास काढून देणारा अण्णा मात्र रोज रमाबाई कॉलनी ते प्रियदर्शनीच्या सर्कल पर्यंत पायपीट करत जायचा. अण्णा बुद्धीने जेमतेमच होता. आपल्या भावाला जबरदस्तीने चारचौघांत उभा करून इंग्लिश बोलायला लावायचा. भावाचं बोलणं ऐकून झालं की मस्त दहाची नोट काढून ओवाळणी हमखास ठरलेलीच. गौतम जेव्हा ग्रॅज्युएट झाला तेव्हा आनंदाने रडणारे दोघं पगारे दांम्पत्य अख्या चाळीला जेवणावळीला आमंत्रित करताना अख्ख्या कॉलनीने पाहीले होते.

 



गौतम कॉलेजला जायला लागल्यापासून मात्र थोडा चिडचिडा झाला होता. घरातल्या आणि आजुबाजूच्या वातावरणावर त्याची होणारी चिडचिड अख्खं घर डिस्टर्ब करून सोडायची. नेहमी ओरडायचा मला चारचौघांत मी रमाबाई कॉलनीत राहतो हे सांगायचं नाहीये. मला इथे राहिलेलं माझ्या मित्रांना सांगायला आवडत नाही. असल्या चिडचिडीचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होऊ नये म्हणून अण्णाने गावाला जाऊन तिथलं डोमेसाईल काढून आणलं. गावचा पत्ता लावून गौतमला हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय करून दिली. युपीएससीच्या अभ्यासक्रमाला लागणारा खर्च भागवण्यासाठी स्वतःचा पीएफ रिकामा केला. हरप्रकारे अण्णा आणि शोभा त्यांच्या दोन लेकरांची काळजी घेत होते. आपलं मुल झालं तर कदाचित आपण ह्या दोन लेकरांवर कमी प्रेम करू या भीतीनं शोभानं कधीच आपल्या पदरात स्वतःचं मूल येऊ दिलं नाही. तीच्या दोन दिरांनांच स्वतःची मुलं म्हणून वाढवलं. शोभाचं लग्न झालं तेव्हा गौतम पंधरा वर्षांचा असेल आणि गिरीष तसा 4 वर्षांचाच होता. तो आजही शोभाच्या अंगावरच आहे. गौतम घरातून बाहेर पडला तेव्हापासून एक अनामिक दुरावा सतत वाढत चालला होता. पण शोभा नेहमी अण्णाला समजवायची. अभ्यासाचं टेंशन असेल. त्याला करूदे काय करायचं ते. आपण आपलं काम करत राहू. त्याला त्याचं काम करू दे. भाऊ हळूहळू आपल्यापासून दूर चाललाय हे अण्णाला कळत होतं. पण ती वेदना त्याला कोणासमोरही बोलून दाखवता येत नव्हती. विषाचा कडू घोट घ्यावा तसा तो आतल्या आत गिळून गप्प रहायचा. कामावरून घरी परतल्यावर अण्णा रोज वहिनीला एकच प्रश्न विचारायचा, काय गं बारक्याचं (गौतमचं) कॉलेज चालू आहे ना बरोबर? आज त्याचा काही फोन बिन आला होता का दुकानावर? डोळे मिचकावून उत्तर देणारी शोभा वहिनी मौन साधून असायची.

 



दुसरीकडे गौतम मात्र इमाने इतबारे आपलं काम चोख बजावत होता. त्याचा अभ्यास एकदम नीट चालू होता. दादा-वहिनीच्या जीवावर आणि स्वतःच्या बुद्धीबळावर त्याने एकामागोमाग एक यशाची शिखरं सर केली. 2007 च्या बॅचमध्ये युपीएससी क्लीअर झाला. मग काय एकदम जोरदार धडाकाच होता त्या दिवशी चाळीत. गौतम ज्या दिवशी पास झाला त्या दिवशी शोभानं बँडवाल्यांना बोलावून आपल्या लेकाचं जंगी स्वागत केलं. नीळ उधळली. परातीत दिवा घेऊन त्याला ओवाळंलं. शाल आणि फुलं देऊन त्याचा तीनं सत्कार केला. त्याच्या कपाळावरून हात फिरवून बोटं मोडत, डोळ्यांतून अश्रु ढाळणारी शोभावहिनी त्या दिवशी त्याची शोभामाय झालेली अख्ख्या कॉलनीनं पाहीलं होती. अख्खा दिवस तीनं सगळ्यांना फ्री वडे पाव वाटले. त्या दिवसापासून ती कायम स्वतःला कलेक्टकरची आई म्हणवून घ्यायला लागली होती.

 



अण्णाचा आणि शोभाचा त्या दिवशीचा आनंद आजही प्रत्येकाच्या मनात तसाच ताजा आहे. कदाचित तो शेवटचा दिवस होता. ज्या दिवशी गौतमचे पाय त्या घराला लागल्याचा. आजवर परत तो कधीच त्या चाळीत येताना दिसलेला नाही. वस्तीतला बारक्या आत्ता साहेब झाला होता. गौतम शिकला, साहेब झाला पण तो एकटाच पुढे गेला. कालचा व्यवस्थेचा शोषित, शोषणाच्या गप्पा मारता मारता बूर्झ्वा लोकांच्या पंगतीला बसायला लागला. तेव्हापासून माझ्या वस्तीच्या गळक्या छपरातलं उन त्याला शिवलेलं नाही. भावाची वहिनीची नजरानजर घेतलेली नाही. अडाणी भाऊ मनातल्या मनात म्हणायचा, सायबाला लय काम असंल, येईल तो भेटायला. त्याला ठावूक होतं त्याचा बारक्या आत्ता साहेब झालाय याचं. 2007 पासून अण्णा गौतमची वाट पाहत होता. पण गौतम परत कधीच फिरकला नव्हता. तरी गौतम त्याला अधून मधून भेटायचाच. कधी त्याच्या ऑफिसात किंवा पेपर मध्ये आलेल्या बातम्यांमधून.

 



त्यात एके दिवशी पेपर मध्ये आलेली बातमी वाचनात आली. गौतमचा सरकारतर्फे सत्कार समारंभ ठरवलाय. अण्णानं काकुळतील येऊन त्याला फोन करायचा प्रयत्न केला. दहा-दहा रुपयाचे वोडाफोनचे रिचार्ज मारून मारून फोन वैतागला पण बारक्याच्या पीएनं गौतमला काही फोन दिला नाही. अण्णा आत्ता मजबूत वैतागला आणि म्हणाला बघू माझ्या लेकराला भेटायला मला अडवतंय तरी कोण ? आपण स्वतःहून जाऊ. तसेही गौतमची आणि सगळ्यांची भेट होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला होता. अधून मधून वहिनीनं मिस्ड कॉल दिला की कधीतरी एक कॉल यायचा तो ही पाच-एक मिनिटापुरता. त्याची वहिनी तेवढ्यावरच समाधान मानायची.

 



गौतमच्या सत्कार समारंभाला जाताना त्या दिवशी त्या मोठ्या भावानं पाकमोडीया स्ट्रीटवरून अत्तराची एक बाटली खरेदी केली. बायकोला गजरा आणि चांगलं पातळ घेतलं. गिरीषला चांगले कपडे घेतले. वहिनीने गौतमला आवडणारी खीर बनवून घेतली होती. मोठमोठ्याला लोकांमध्ये जायचं म्हणून अंगभर अत्तर लावून तीघांचं अख्खं बिऱ्हाड तयार झालं होतं. तीघंही हॉल मध्ये पोहोचलो. अण्णा सारं वातावरण पाहून भारावला. डोळे पुसत होता, वहिनी हमसून रडत होती. अण्णाच्या लग्नांतर चौदा वर्ष उलटून गेली तरी वहिनीनं पदरात मूलबाळ घेतलं नव्हतं. ती तीच्या दोन दिरांसाठी बिनलेकराची थांबली होती. आईच्या मायेने तीनं दोघांना लेकरांसारखं वाढवलं होतं.

 



आज बारक्या मात्र नजर चुकवतच या तीघांकडे गेला. पण नेहमीसारखा अण्णाच्या आणि वहिनीच्या नजरेला भिडला नाही. त्याला आत्ता मोठ्या भावाची त्याला लाज वाटू लागली होती. नवऱ्याला साथ देणारी त्याची अडाणी वहिणी आज त्याला एका पुरूषाची गुलाम वाटत होती. तर दारू पिऊन काम करणारा मोठा भाऊ त्याला सद्विवेक बुद्धी गहाण ठेवणारा एक वर्चस्ववादी आणि जातीयवादी माणूस भासत होता.

 



स्वरचित विश्वात वावरणारे आभासी पुरोगामी लोक हे प्रतिगाम्यांपेक्षा जास्त वाईट असतात. प्रतीगाम्यांचे विश्व एका सुंदर कोशात वसलेले असते.. जिथून त्याना बाहेर बघायची कुठलीच गरज नसते आणि वाटत सुद्धा नाही. खरं तर गौतमची यात काहीच चुक नव्हती. त्याची जडणघडण ज्या अभिजन वर्गात झाली. त्या वर्गात स्वतःचे स्वतंत्र विश्व स्वतःपुरते जोपासण्याची छुपी ट्रेनिंगच दिली जाते. जातिनिहाय मागासलेपणाच्या, तिथल्या जीवनसंघर्षाच्या जाणीवा बोथट करण्याची स्लो प्रोसेसच असते ती. म्हणून शिक्षण घेतलेल्या गौतमला पुस्तकं वाचायची अक्कल तर आली होती. पण माणसं वाचायचा तो विसरला होता. जिंदगी वाचायला विसरला होता.

 



अण्णांचं पीणं मधल्या काळात खुप वाढलं होतं. त्याला अण्णाचं पिणं दिसत होतं पण त्याच्या नाकाला श्वासाला झोंबणारा गुवाचा वास हूंगला नव्हता. वहीनीचं गुलाम पण दिसत होतं. पण एका शब्दानं तीला त्या वस्तीच्या बाहेर तुला कॉलनीबाहेर असलेल्या माझ्या घरात घेऊन जातो असं म्हणाला नाही. अण्णाला कळलं होतं. आयुष्यभर घाण काढून माखलेल्या हातांनी भरवलेली भाकरी पण बारक्याला गोड लागायची. पण आज त्याला त्या अंगावर माळलेल्या अत्तराचा दर्प मारत होता. सारं पाहून वहिनी अक्षरशः चक्रावली होती. दोन वर्षांनंतर आज जेव्हा तीचा दीर भेटेल तेव्हा किती आनंदून जाईल ह्या भ्रमात असणारी शोभा एकदम भन्नावली होती. तीच्या ओटीतून हलकेच कोणीतरी तीचं बाळ पळवून नेल्याचं दुःख तीच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तीने हलकेच अण्णाचा हात धरला. आणि कार्यक्रमातून तीघांना घेऊन चालती झाली. गिरिष हलकेच मागे वळून पाहत होता, बारक्याचा फाट्यावर मारलेला भाव, अण्णाचे पाणावलेले डोळे, वहिनीचा रागने लालबुंद झालेला चेहरा..


 

(साप्ताहिक कलमनामाच्या 2013 सालच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली माझी कथा.. नातेसंबंधातील बदल दर्शवणारी ही गोष्ट. फक्त नावं बदलली आहेत. परिसर तोच आहे. संदर्भ देखील अस्सल खरे.. )


लेखं- वैभव छाया.



No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...