शिकणाऱ्या भावा...

शिकणाऱ्या भावा...


चाळींतल्या वातावरणात कुणाच्या घरात काय चाललंय याची इत्थंभूत माहीती प्रत्येकाला असते. अण्णाच्या घरची परिस्थिती तशी सगळ्यांनाच ठावूक होती. पण ह्यावेळेस जरा जास्तच काहीतरी बिनसलंय हे सगळ्यांनाच कळून चुकलं होतं. लहान्या भावाच्या वियोगाने हतबल झालेला अण्णा आणि त्याची बायको शोभा अख्ख्या कॉलनीने अनुभवले होते.

 




गेल्या दोन दिवसापासून अण्णा घरातच पडून होता. नाक्यावर धंद्याला सुद्धा गेला नव्हता. कामाला दांडी मारली होती. आजुबाजूचे लोक येऊन विचारपुस करत होते. अण्णाची बायको शोभा हलकेच रडायची आणि शांत व्हायची. शोभा वहिनी तशी अख्खा कॉलनीत फेमस. पण ती देखील दोन दिवसापासून कुठेही न दिसल्याने सगळ्यांनी तीच्या घरचा रस्ता धरला होता. कारण दोन दिवसाआधी एवढ्या आनंदात नटून थटून अण्णा, शोभा आणि तीचा लहान दिर गिरीष तीघेही जण त्यांच्या अधिकारी झालेल्या भावाला भेटायला चालेले होते. त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद काही औरच होता. आणि आत्ताची स्थिती काही वेगळीच. नेमकं काय घडलंय याचा कुणालाही काडीमात्र अंदाज लागत नव्हता. जे काही घडलं होतं ते त्यांनी त्यांच्या उदरात दडवून ठेवलं होतं.

 



अण्णा पगारे मुळचा अशोक पगारे. घरातला मोठा पोरगा म्हणून त्याचा बाप तात्या त्याला अण्णा म्हणूनच हाक मारायचा. तात्याला एकुण तीन अपत्य. अण्णा, अण्णाच्या पाठीवर झालेली दोन मुलं. 1986-87 च्या काळात नोकरीच्या शोधात नाशकातलं छोटंसं झोपडं सोडून तात्यासाहेबानं त्याच्या अख्ख्या बिऱ्हाडासोबत मुंबई गाठली होती. तेव्हापासून तात्याने घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत आपलं बस्तान बसवलं. रमाबाई कॉलनीत एंट्री केल्या केल्या डी.बी.पवार चौकातून आत जाणाऱ्या चिंचोळ्या गल्लीतनं आत आलं की सम्राट अशोक चाळ सुरू होते. चाळ म्हणजे नावालाच. ठिकठिकाणी फरश्या निघालेल्या. एकावेळी फक्त तीनच जण जाऊ शकतील एवढीशी बोळ. घराच्या मागे पुढे दोन्हीकडे गटारीचं समांतर रेषेत वाहणारं साम्राज्य. त्या साम्राज्यात छोटंसं घरटं करून पगारे कुटूंब रहायचं.

 



घाटकोपर पूर्व मध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या लगत वसलेली रमाबाई नगरची वसाहत. मुंबईचं अंडरवर्ल्ड तसं सगळ्यांनाच परिचित. पण त्या अंडरवर्ल्डपेक्षाही एक भयानक अंडरवर्ल्ड मुंबईने आपल्या उदरात जोपासलंय. खुलेआम जागा मिळेल तसं विस्तारत गेलंलं हे अंडरवर्ल्ड. रमाबाई कॉलनीचं ते अंडरवर्ल्ड. परिस्थितीनं नाडले गेलेले सारे गुण्यागोविंदानं आपल्या शोषणाची वाट पाहत जगतायेत. त्या शोषणानं कळस गाठला होता तो दिवस अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहेत. त्या जखमा अजूनही ताज्या आहेत. 11 जुलै 1997 च्या भल्या पहाटे रमाबाई कॉलनीत झालेल्या गोळीबाराने 11 निष्पापांचा बळी घेतला. 30 च्या आसपास जखमी झाले. सरकारी दफ्तरी फक्त ह्या 41 लोकांची दखल घेण्यात आली. पण खरं तर गोळीबार प्रकरणानंतर उसळलेल्या जनक्षोभावर पोलिसांनी केलेल्या अत्याचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. काहींना कायमचं अपंगत्व आलं. तर काही हत्याकांडाचा धक्का सहन न करू शकल्याने आपले प्राण सोडले. गोळीबार झाला त्या दिवशी सकाळी तात्या त्याच्या बायको आणि पोरासोबत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आंदोलनासाठी उतरला. पोलिसांचा गोळीबार आणि जबर लाठीमार सहन करू न शकल्याने अण्णाच्या आईने प्राण आठवडाभर राजावाडी हॉस्पीटलमध्ये मृत्यूशी झूंज देऊन प्राण सोडले. बीएमसीमध्ये गटार खात्यात कामाला असलेला तात्या आधीच खंगलेला होता. टीबीच्या आजाराला तोंड देत होता. तो देखील लाठीमार सहन करू शकला नाही. अवघ्या महिन्याभरात त्यानेही सगळ्यांचा निरोप घेतला. जाता जाता अण्णाच्या अंगावर दोन भाऊ आणि दोन बहिणींची जबाबदारी सोडून गेला.

 




तात्या गेल्यानंतर त्याची तीन्ही लेकरं पोरकी झाली होती. पण अण्णा थोडा मोठा होता. जेमतेम 22 वर्षांचा असेल तेव्हा. आई गेली, बाप गेला तेव्हा बिल्कूल रडला नाही. त्याला बिलगून बिलगून रडणाऱ्या छोट्या भावंडांना धीर देत होता. त्याचं रडणं त्याच्या मनातच राहीलं होतं. तात्या जीवंत असतानाच त्याने अण्णाचं कामराज नगरमधल्या महादू जाधवाची मुलगी शोभा सोबत जमवून ठेवलं होतं. तात्याच्या जलदान विधीच्या कार्यक्रमातच महादूनं अण्णाला शोभाशी लगेच करून टाकायला गळ घातली. गंधकुटीच्या विहारात अवघ्या दहा जणांच्या उपस्थितीत लग्न उरकून घेतलं. लग्न झाल्यापासून शोभानं आणि अण्णानं त्या चार चिमुकल्या जीवांचा भार जबाबदारीने उचलला. खरं तर शोभावहिनी आणि अण्णा जरा जबरदस्तीनेच मोठे झाले. सुरूवातीला काही काम धंदा नव्हता. आज नाक्यावर गंधकुटीजवळ जेथे आत्ता बाबासाहेबांचा आलिशान पुतळा उभा दिमाखात उभा आहे तेथे बोंबील फ्राय, वडे पाव विकून अण्णा भावंडांना वाढवायला लागला. अकाली लादलं गेलंलं मोठंपण तो बिनतक्रार सोसत होता. काही दिवसांतच बापाच्या जागी बीएमसीत त्याच गटारखात्यात त्याला नोकरी देखील मिळाली. आधी जातीनिहाय सर्विस पुरवत होते. आत्ता कॉर्पोरेशनमध्ये सरकारी बिल्ला लावून सर्विस पुरवण्याचे काम सुरू केले होते. अण्णा कामाला लागल्यापासून गाडी सांभाळायची जबाबदारी शोभा वहिनीवर येऊन पडली. वहिनी सकाळीसच उठून अख्खा माल भरायची. घरातलं सगळं आवरून मग गाडीवर जायची. अण्णा रोज कुठे ओवरटाईम मिळेल याच्या शोधातच असायचा. त्यामुळे सकाळी पाचला घरातून बाहेर पडला की संध्याकाळी आठलाच परत येई. शिक्षण जेमतेम असल्याने आपली अशी अवस्था आहे एवढेच त्याला पक्के ठावूक. अख्खी चपटी जिरवून, तोंडात मावेल एवढी तंबाखू कोंबून विष्ठलेल्या गटारींत गुडघाभर पाय रुतवताना अण्णाला कधीच लाज वाटली नाही. हाताने लोकांची गुखाडी साफ करून घरी आल्यावर शोभा वहिनी त्याला प्रेमानं दोन घास भरवायची. गटारानं माखलेल्या हातांनी जेवायची सुद्धा त्याला किळस वाटायची. पण भावांची जबाबदारी त्याला कुठे तोंड वर काढूच देत नव्हती.

 



अण्णाचे दोन भाऊ गिरीष आणि गौतम. अगदी चुणचुणीत. गौतम आईवर गेलेला. रूबाबदार चेहरा, रंग गोरा, पण अंगाने जरासा स्थूल. लहानपणापासून अभ्यासात हुशार. शाळेत पहिला नंबर ठरलेला. प्रत्येकाच्या शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर पडताना पाहून सगळे खुष व्हायचे. गौतमच्या हुरहुन्नरीपणामुळे शोभा वहिनीनं आधीपासूनच जिद्द धरलेली. गौतमला खुप शिकवायचं. मोठ्ठा अधिकारी बनवायचं. त्याने टेबलावर घंटी दाबल्या दाबल्या चार नोकर त्याच्या सेवेत उभे राहीले पाहीजेत. जेव्हा आपला गौतम अधिकारी होईल तेव्हा गोळीबार करणाऱ्या सगळ्या लोकांना शिक्षा करील. आपल्यासारख्या लोकांना न्याय मिळवून देईल. ह्या भाबड्या आशेपायी गाडीवर होणारा सगळा धंदा, अख्खा गल्ला ती फक्त गौतमच्या शिक्षणासाठी वेगळा काढून ठेवी.

 



अण्णाचा ओवरटाईम सुद्धा त्याच्यासाठीच शिलकीत पडायचा. ज्या पुस्तकावर फुले, बाबासाहेब, शाहू, सावित्रीमाई, शिवाजी, जिजाबाई दिसायचे ते पुस्तक काहीही विचार न करता विकत घेऊन यायचा आणि गौतमच्या हातात सोपवायचा. खिशाची ऐपत नसताना त्याला महागड्या कॉलेजात शिकायला टाकलं. घाटकोपर ते चर्चगेट प्रवासात आपल्या भावाची दमछाक होऊ नये. त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून रेल्वेचा फर्स्ट क्लासचा पास काढून देणारा अण्णा मात्र रोज रमाबाई कॉलनी ते प्रियदर्शनीच्या सर्कल पर्यंत पायपीट करत जायचा. अण्णा बुद्धीने जेमतेमच होता. आपल्या भावाला जबरदस्तीने चारचौघांत उभा करून इंग्लिश बोलायला लावायचा. भावाचं बोलणं ऐकून झालं की मस्त दहाची नोट काढून ओवाळणी हमखास ठरलेलीच. गौतम जेव्हा ग्रॅज्युएट झाला तेव्हा आनंदाने रडणारे दोघं पगारे दांम्पत्य अख्या चाळीला जेवणावळीला आमंत्रित करताना अख्ख्या कॉलनीने पाहीले होते.

 



गौतम कॉलेजला जायला लागल्यापासून मात्र थोडा चिडचिडा झाला होता. घरातल्या आणि आजुबाजूच्या वातावरणावर त्याची होणारी चिडचिड अख्खं घर डिस्टर्ब करून सोडायची. नेहमी ओरडायचा मला चारचौघांत मी रमाबाई कॉलनीत राहतो हे सांगायचं नाहीये. मला इथे राहिलेलं माझ्या मित्रांना सांगायला आवडत नाही. असल्या चिडचिडीचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होऊ नये म्हणून अण्णाने गावाला जाऊन तिथलं डोमेसाईल काढून आणलं. गावचा पत्ता लावून गौतमला हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय करून दिली. युपीएससीच्या अभ्यासक्रमाला लागणारा खर्च भागवण्यासाठी स्वतःचा पीएफ रिकामा केला. हरप्रकारे अण्णा आणि शोभा त्यांच्या दोन लेकरांची काळजी घेत होते. आपलं मुल झालं तर कदाचित आपण ह्या दोन लेकरांवर कमी प्रेम करू या भीतीनं शोभानं कधीच आपल्या पदरात स्वतःचं मूल येऊ दिलं नाही. तीच्या दोन दिरांनांच स्वतःची मुलं म्हणून वाढवलं. शोभाचं लग्न झालं तेव्हा गौतम पंधरा वर्षांचा असेल आणि गिरीष तसा 4 वर्षांचाच होता. तो आजही शोभाच्या अंगावरच आहे. गौतम घरातून बाहेर पडला तेव्हापासून एक अनामिक दुरावा सतत वाढत चालला होता. पण शोभा नेहमी अण्णाला समजवायची. अभ्यासाचं टेंशन असेल. त्याला करूदे काय करायचं ते. आपण आपलं काम करत राहू. त्याला त्याचं काम करू दे. भाऊ हळूहळू आपल्यापासून दूर चाललाय हे अण्णाला कळत होतं. पण ती वेदना त्याला कोणासमोरही बोलून दाखवता येत नव्हती. विषाचा कडू घोट घ्यावा तसा तो आतल्या आत गिळून गप्प रहायचा. कामावरून घरी परतल्यावर अण्णा रोज वहिनीला एकच प्रश्न विचारायचा, काय गं बारक्याचं (गौतमचं) कॉलेज चालू आहे ना बरोबर? आज त्याचा काही फोन बिन आला होता का दुकानावर? डोळे मिचकावून उत्तर देणारी शोभा वहिनी मौन साधून असायची.

 



दुसरीकडे गौतम मात्र इमाने इतबारे आपलं काम चोख बजावत होता. त्याचा अभ्यास एकदम नीट चालू होता. दादा-वहिनीच्या जीवावर आणि स्वतःच्या बुद्धीबळावर त्याने एकामागोमाग एक यशाची शिखरं सर केली. 2007 च्या बॅचमध्ये युपीएससी क्लीअर झाला. मग काय एकदम जोरदार धडाकाच होता त्या दिवशी चाळीत. गौतम ज्या दिवशी पास झाला त्या दिवशी शोभानं बँडवाल्यांना बोलावून आपल्या लेकाचं जंगी स्वागत केलं. नीळ उधळली. परातीत दिवा घेऊन त्याला ओवाळंलं. शाल आणि फुलं देऊन त्याचा तीनं सत्कार केला. त्याच्या कपाळावरून हात फिरवून बोटं मोडत, डोळ्यांतून अश्रु ढाळणारी शोभावहिनी त्या दिवशी त्याची शोभामाय झालेली अख्ख्या कॉलनीनं पाहीलं होती. अख्खा दिवस तीनं सगळ्यांना फ्री वडे पाव वाटले. त्या दिवसापासून ती कायम स्वतःला कलेक्टकरची आई म्हणवून घ्यायला लागली होती.

 



अण्णाचा आणि शोभाचा त्या दिवशीचा आनंद आजही प्रत्येकाच्या मनात तसाच ताजा आहे. कदाचित तो शेवटचा दिवस होता. ज्या दिवशी गौतमचे पाय त्या घराला लागल्याचा. आजवर परत तो कधीच त्या चाळीत येताना दिसलेला नाही. वस्तीतला बारक्या आत्ता साहेब झाला होता. गौतम शिकला, साहेब झाला पण तो एकटाच पुढे गेला. कालचा व्यवस्थेचा शोषित, शोषणाच्या गप्पा मारता मारता बूर्झ्वा लोकांच्या पंगतीला बसायला लागला. तेव्हापासून माझ्या वस्तीच्या गळक्या छपरातलं उन त्याला शिवलेलं नाही. भावाची वहिनीची नजरानजर घेतलेली नाही. अडाणी भाऊ मनातल्या मनात म्हणायचा, सायबाला लय काम असंल, येईल तो भेटायला. त्याला ठावूक होतं त्याचा बारक्या आत्ता साहेब झालाय याचं. 2007 पासून अण्णा गौतमची वाट पाहत होता. पण गौतम परत कधीच फिरकला नव्हता. तरी गौतम त्याला अधून मधून भेटायचाच. कधी त्याच्या ऑफिसात किंवा पेपर मध्ये आलेल्या बातम्यांमधून.

 



त्यात एके दिवशी पेपर मध्ये आलेली बातमी वाचनात आली. गौतमचा सरकारतर्फे सत्कार समारंभ ठरवलाय. अण्णानं काकुळतील येऊन त्याला फोन करायचा प्रयत्न केला. दहा-दहा रुपयाचे वोडाफोनचे रिचार्ज मारून मारून फोन वैतागला पण बारक्याच्या पीएनं गौतमला काही फोन दिला नाही. अण्णा आत्ता मजबूत वैतागला आणि म्हणाला बघू माझ्या लेकराला भेटायला मला अडवतंय तरी कोण ? आपण स्वतःहून जाऊ. तसेही गौतमची आणि सगळ्यांची भेट होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला होता. अधून मधून वहिनीनं मिस्ड कॉल दिला की कधीतरी एक कॉल यायचा तो ही पाच-एक मिनिटापुरता. त्याची वहिनी तेवढ्यावरच समाधान मानायची.

 



गौतमच्या सत्कार समारंभाला जाताना त्या दिवशी त्या मोठ्या भावानं पाकमोडीया स्ट्रीटवरून अत्तराची एक बाटली खरेदी केली. बायकोला गजरा आणि चांगलं पातळ घेतलं. गिरीषला चांगले कपडे घेतले. वहिनीने गौतमला आवडणारी खीर बनवून घेतली होती. मोठमोठ्याला लोकांमध्ये जायचं म्हणून अंगभर अत्तर लावून तीघांचं अख्खं बिऱ्हाड तयार झालं होतं. तीघंही हॉल मध्ये पोहोचलो. अण्णा सारं वातावरण पाहून भारावला. डोळे पुसत होता, वहिनी हमसून रडत होती. अण्णाच्या लग्नांतर चौदा वर्ष उलटून गेली तरी वहिनीनं पदरात मूलबाळ घेतलं नव्हतं. ती तीच्या दोन दिरांसाठी बिनलेकराची थांबली होती. आईच्या मायेने तीनं दोघांना लेकरांसारखं वाढवलं होतं.

 



आज बारक्या मात्र नजर चुकवतच या तीघांकडे गेला. पण नेहमीसारखा अण्णाच्या आणि वहिनीच्या नजरेला भिडला नाही. त्याला आत्ता मोठ्या भावाची त्याला लाज वाटू लागली होती. नवऱ्याला साथ देणारी त्याची अडाणी वहिणी आज त्याला एका पुरूषाची गुलाम वाटत होती. तर दारू पिऊन काम करणारा मोठा भाऊ त्याला सद्विवेक बुद्धी गहाण ठेवणारा एक वर्चस्ववादी आणि जातीयवादी माणूस भासत होता.

 



स्वरचित विश्वात वावरणारे आभासी पुरोगामी लोक हे प्रतिगाम्यांपेक्षा जास्त वाईट असतात. प्रतीगाम्यांचे विश्व एका सुंदर कोशात वसलेले असते.. जिथून त्याना बाहेर बघायची कुठलीच गरज नसते आणि वाटत सुद्धा नाही. खरं तर गौतमची यात काहीच चुक नव्हती. त्याची जडणघडण ज्या अभिजन वर्गात झाली. त्या वर्गात स्वतःचे स्वतंत्र विश्व स्वतःपुरते जोपासण्याची छुपी ट्रेनिंगच दिली जाते. जातिनिहाय मागासलेपणाच्या, तिथल्या जीवनसंघर्षाच्या जाणीवा बोथट करण्याची स्लो प्रोसेसच असते ती. म्हणून शिक्षण घेतलेल्या गौतमला पुस्तकं वाचायची अक्कल तर आली होती. पण माणसं वाचायचा तो विसरला होता. जिंदगी वाचायला विसरला होता.

 



अण्णांचं पीणं मधल्या काळात खुप वाढलं होतं. त्याला अण्णाचं पिणं दिसत होतं पण त्याच्या नाकाला श्वासाला झोंबणारा गुवाचा वास हूंगला नव्हता. वहीनीचं गुलाम पण दिसत होतं. पण एका शब्दानं तीला त्या वस्तीच्या बाहेर तुला कॉलनीबाहेर असलेल्या माझ्या घरात घेऊन जातो असं म्हणाला नाही. अण्णाला कळलं होतं. आयुष्यभर घाण काढून माखलेल्या हातांनी भरवलेली भाकरी पण बारक्याला गोड लागायची. पण आज त्याला त्या अंगावर माळलेल्या अत्तराचा दर्प मारत होता. सारं पाहून वहिनी अक्षरशः चक्रावली होती. दोन वर्षांनंतर आज जेव्हा तीचा दीर भेटेल तेव्हा किती आनंदून जाईल ह्या भ्रमात असणारी शोभा एकदम भन्नावली होती. तीच्या ओटीतून हलकेच कोणीतरी तीचं बाळ पळवून नेल्याचं दुःख तीच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तीने हलकेच अण्णाचा हात धरला. आणि कार्यक्रमातून तीघांना घेऊन चालती झाली. गिरिष हलकेच मागे वळून पाहत होता, बारक्याचा फाट्यावर मारलेला भाव, अण्णाचे पाणावलेले डोळे, वहिनीचा रागने लालबुंद झालेला चेहरा..


 

(साप्ताहिक कलमनामाच्या 2013 सालच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली माझी कथा.. नातेसंबंधातील बदल दर्शवणारी ही गोष्ट. फक्त नावं बदलली आहेत. परिसर तोच आहे. संदर्भ देखील अस्सल खरे.. )


लेखं- वैभव छाया.



जंगली पशु आणि आपल्यात काहीतरी फरक आहे हे ज्याला उमगले तो खरा माणूस !!



जंगली पशु आणि आपल्यात काहीतरी फरक आहे हे ज्याला उमगले तो खरा माणूस !!

'एखाद्या मुलीने आपल्याला धोका दिलाय म्हणून तो आकस मनात दाबून धरत त्याचा बदला म्हणून त्यानंतर अनेक मुलींची आयुष्य बरबाद करणे' हि आजकाल सर्रास दिसणारी आणि बळावणारी मानसिकता माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडली आहे.




'बरबाद' या शब्दाचा स्पष्टच अर्थ सांगायचा झाल्यास बदल्याच्या 'त्या' आगीत एकाच वेळी अनेक मुलींशी रिलेशन ठेऊन त्याअंतर्गत "साल्ला..यांची हीच लायकी आहे.." असं कुठल्यातरी अपोक्त मित्राने सांगितलेलं वाक्य डोक्यात ठेऊन त्यांच्या शरीराचा येथेच्छ भोग घेणे आणि मन भरल्यावर त्यांना सोडून दुसऱ्या 'शिकारी'कडे वळणे याला माणूसपण म्हणता येईल काय..?? केवळ प्रणयकाळात मादीशी संभोग करून झालेल्या व त्यानंतर तिला तसेच सोडून इतर मादिंशी प्रणयाराधन करण्यास जंगल भटकणाऱ्या एखाद्या नर (male) पशुत आणि या असल्या विचारांच्या मानवात फरक तो काय राहिला..??? पशुंत भावना नसतात ते केवळ 'निसर्गचक्र' पाळत असतात..पण माणसात भावना असतात..आणि त्यामुळे असंख्य निष्पाप मुलींची आयुष्य कलाटणी घेऊ शकतात..कधी कधी कायमची ..!!




वाचताना बोचरं वाटत असलं तरी असा एखादा मित्र व माणूस न भेटलेला कोणी सापडणं विरळाच..!!! वैयक्तिक सांगायचे झाल्यास माझ्या आयुष्यात सुद्धा असा प्रसंग घडलेला आहे. अतिशय 'सिरियस' (हा एक परवलीचा शब्द आज-कालचा) असलेल्या रिलेशन मध्ये जेव्हा 'जोडीदार' अचानक सोडून जातो तेव्हा वाटणारं 'ते' सगळं सगळं मी सुद्धा अनुभवलंय, त्यातून सावरता सावरता धडपडलोही कित्येकदा मी... पण माझ्या मनात आजवर बदला घेण्याची भावना आलेली मला आजही आठवत नाही..त्रास झाला खूप..वर उल्लेखल्या प्रमाणे भयंकर सल्ला देणारे अनेक मित्र सुद्धा भेटले पण न जाणे का मी निश्चल राहिलो. कुणी एकीने असं केलं म्हणून बाकीच्या मुलींशी असं वागणं मनाला पटत नव्हतं.आमच्या दोघांत झालेल्या या घटनेत इतर मुलींची काय चूक..?? किंवा त्याची शिक्षा वा बदला इतरांवर काढण्याचा आपल्याला अधिकार तो काय..?? असं वाटायचं आतून..माझी हि मतं जेव्हा मी मित्रांना सांगितली तेव्हा वेड्यात काढलं बऱ्याच जणांनी मला.!! मी ते 'वेडेपण' सुद्धा स्वीकारलं.




या सगळ्यात एक गोष्ट झाली. मी विचार करू लागलो..फक्त माझाच नाही तर अर्ध्यावर सोडून गेलेल्या 'तिचाही'. मी तिच्या मताचा आदर करू लागलो. प्रत्येकाला आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे अधिकार असतात. जसे आपण तसा समोरचाही स्वतंत्र आहे हे समजू लागलो आणि पुढे जात राहिलो..थांबलो नाही..किंवा साचलोही नाही. पण जेव्हा केव्हा असे लोक भेटतात तेव्हा मला त्यांच्या मानसिकतेची कीव येते.




हे केवळ मुलांनाच नाही तर मुलींनाही लागू होतं. 'कुणी एक' चुकीचा निघाला किंवा निघाली म्हणून सगळ्यांना त्याच माळेत मोजू नका. कारण दगडांनी भरलेल्या खाणीतच कुठेतरी हिरा सापडतो. एखाद्या सोबत वाईट व्यवहार करताना आपली बहिण वा भावासोबत असे कुणी केले तर कसे वाटेल..?? याचा विचार करून बघावा.




"शेवटी जंगली पशु आणि आपल्यात काहीतरी फरक आहे हे ज्याला उमगले तो खरा माणूस" भगवान बुद्धानेही हेच सांगितले होते.

 


लेखं-गौरव गायकवाड.

कठीण वाटणारी कसरत महापुरुषांनी करून दाखवली म्हणून ते 'महापुरुष' ठरले !!

कठीण वाटणारी कसरत महापुरुषांनी करून दाखवली म्हणून ते 'महापुरुष' ठरले !!


मी बऱ्याचदा ऐकतो- "आम्ही एवढे चांगले सांगतो, त्यांच्याच भल्यासाठी, प्रगतीसाठी सांगतो तरी लोक आमचं ऐकत नाहीत तेव्हा प्रचंड राग येतो.."

 



असं वाटणं स्वाभाविक आहे. म्हणजे आपण एखाद्याच्या भल्यासाठी सांगायला जावं आणि त्याने त्याकडे सरळ सरळ कानाडोळा करावा म्हणजे राग हा येणारच ना राव..!! पण या सगळ्यात आपण राग हा त्या लोकांवरच काढतो. यात आपली अशी काहीच चूक नाही असं आपल्याला वाटतं. पण हे पूर्णसत्य नाही. चूक आपलीच असते..मी तर म्हणेन कि जास्त चूक हि आपल्याच बाजूने असते.

 



आपण जेव्हा कोणतीही गोष्ट समाजात 'नियम' म्हणून घेऊन जातो, तेव्हा लोक ते स्वीकारण्याच्या दृष्टीने उदासीन असलेले आपल्याला दिसतात. हा मानवी स्वभावच आहे. कारण मानवाला कोणताही 'नियम' नकोच असतो. त्याला स्वतंत्र रहायला आवडते. मग म्हणून आपण सांगणेच सोडावे का..??

 



तर नाही...!! 'एखादी गोष्ट मला योग्य वाटते किंवा अमुक एखाद्या महापुरुषाने सांगितली आहे म्हणून तुम्हाला आता ती करावीच लागेल' असा विचार करणे म्हणजे अपोक्तपणाचे लक्षण आहे. कारण आपण जेव्हा असे करतो तेव्हा तिला एक पाळावयाचा 'नियम' म्हणून घेऊन लोकांसमोर जात असतो. आणि 'नियम हे तोडण्यासाठीच असतात' या सूत्राप्रमाणे माणसाचा कल पळवाटा शोधून ते तोडण्याकडेच अधिक असतो. यावर उपाय काय..?? यावर उपाय त्याच महापुरुषांनी सांगितलेला आहे. तो म्हणजे जोवर कोणतीही गोष्ट माणसाच्या 'तत्वात' बसत नाही तोवर तो तीस गंभीरपणे घेत नाही, त्यावर अंमल करत नाही.

 



एक छोटंसं उदाहरण देतो. समजा तुम्ही एखाद्या मस्त पार्टीला गेला आहात. तिथे छानपैकी नटून-थटून तरुण मुलं-मुली आली आहेत. नुकतंच तारुण्यात आलेलं किंवा तारुण्याच्या मध्यावर येउन सागरी लाटांप्रमाणे उसळणारे मन पार्टीत आलेल्या तरुण तरुणींना शोधत असते. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची फिगर, त्यांचे सौंदर्य आपल्याला भुलवू लागते. त्यातील एखादी वा एखादा आपला पार्टनर असावा पासून ते अगदी शृंगारिक, वासनिक भावनेने सुद्धा आपण त्याकडे आपल्याही नकळत पाहू लागतो, हे कुणीही तरुण नाकारणार नाही. पण त्याच तरुण किंवा तरुणीच्या जागी जर आपली बहिण-भाऊ, मावशी, काकू, भाचा-भाची इ. असतील तर वरील भावना आपल्या मनात येतील काय..?? तर याचे उत्तर 'नाही' असेच देण्यात येईल. मग याचे कारण काय असावे..?? तर याचे कारण हेच कि, आपल्या संस्कारांत किंवा आपल्या जडण-घडणीत आपल्यात खोलवर रुजलेली 'तत्व' आपल्याला तसे करण्यापासून रोखत असतात.

 



मित्रांनो, हे सांगण्याचा उद्देश हाच कि, तुम्ही जे सांगताय ते जरी कितीही योग्य आणि जनकल्याणाचे असेल तरी लोक ते स्वीकारतील असेच नाही, त्यासाठी त्यांचे त्यांच्या 'तत्वांत' रुपांतर करावे लागेल. आणि हि कठीण वाटणारी कसरत महापुरुषांनी करून दाखवली म्हणून ते 'महापुरुष' ठरले.

 



म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- " मी 'नियम' (rules ) आणि 'तत्व' (Principles ) यांच्यात फरक करतो.."

 



आणि बुद्ध म्हणतात- "केवळ मी सांगतो किंवा धर्मग्रंथ सांगतात म्हणून एखादी गोष्ट आंधळेपणाने स्वीकारू नका. ती तुमच्या बुद्धी पटलावर घासून पहा, त्यानंतरही जर ती तुम्हाला पटत असेल तर तिचा स्वीकार करा.."

 



दोन्ही महापुरुष तेच तर सांगतात. कारण नियम तोडणे सोपे असते, पण 'तत्वांशी' तडजोड म्हणजे 'स्व'त्वाशी तडजोड असते जी माणसासाठी फार कठीण सिद्ध होऊ शकते.

 

लेखं- गौरव गायकवाड.


अंधश्रद्धा नकोच ! !

अंधश्रद्धा नकोच ! !
 


'परमेश्‍वराला रिटायर करा!' असं डॉ. श्रीराम लागू यांनी जाहीर आवाहन केलं होतं, तेव्हा त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. "लोकांनी देव या कल्पनेचा त्याग करावा' असाच त्यांचा आजही आग्रह असतो. याचं कारण सगळ्या अंधश्रद्धेचं मूळ "देव' या कल्पनेत आहे, असं त्यांना ठामपणे वाटतं. माणसानं तर्कानं, विवेकानं जगावं. भाबड्या, भ्रामक कल्पनांच्या आधारे नव्हे, तर स्वतःच्या बुद्धीच्या आधारानं; वैज्ञानिक दृष्टीनं जगावं, असं त्यांना सुचवायचं आहे आणि त्यात चुकीचं तर काहीच नाही.




हे सगळं खरं असलं तरी लोक देवाला रियाटर करायलाच काय, थोडीबहुत रजा द्यायलाही तयार नाहीयेत. त्यातून आपल्याकडे तर तेहतीस कोटी देव. देवांची अगदी रेलचेल आहे. दिवसेंदिवस देवळेही वाढताहेत. देवांचे उत्सवही मोठ्या थाटामाटात केले जाताहेत. त्यांना "धर्माचं' पाठबळ असतं. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी "आयटी'त करिअर करणारे तरुण-तरुणीही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला तास न्‌ तास रांगेत उभे राहतात. त्यातून अमिताभ बच्चनसारखा सुपरस्टार पहाटे उठून घरापासून अनवाणी चालत, सिद्धिविनायकाला येतो तेव्हा लोकांच्या श्रद्धेतही "ग्लॅमर'ची भर पडते.




एक तर मान्य करावं लागतं, "देव' ही संकल्पना युगानुयुगे चालत आली आहे. देवानं माणूस निर्माण केला की माणसानं देवाला जन्म दिला, यावर चर्चा होत राहतील; पण देव ही माणसाची एक "गरज' आहे असं दिसतंय. अत्यंत कडक नास्तिक मंडळीही आयुष्याच्या अखेरीस "देव असेल का हो?' असा विचार करीत असल्याचीही उदाहरणं आहेत. तात्पर्य काय, "देव आहे की नाही' याचं ठोस उत्तर देता येणार नाही. कुणी दिलं तर ते मान्य केलं जाणार नाही. "देव मानता का?' या प्रश्‍नातच त्याचं खरं उत्तर आहे. "जो मानावा' लागतो, त्याच्या अस्तित्वाचा पुरावा कसा देणार?




आता पुढचा प्रश्‍न. देव संकटातून तारतो का?




या प्रश्‍नाचं उत्तर असं देता येईल- संकटं दोन प्रकारची असतात. खरी आणि आभासी. भूकंप, त्सुनामी या खऱ्या संकटांतून देव तारू शकत नाही असंच दिसतं. भूकंपात फक्त अश्रद्ध माणसंच गाडली जातात असं होत नाही. मात्र "भुताची भीती' या आभासी संकटातून एखाद्याला "रामनाम' तारून नेऊ शकतं! त्या प्रसंगी आवश्‍यक ते "बळ' देऊ शकतं, अर्थात "भूत वगैरे काही नसतं!' हा विवेक दृढ असेल तर केव्हाही अधिक श्रेयस्कर.




खऱ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात; पण श्रद्धेमुळे अशा प्रसंगीही मानसिक बळ व शांती मिळते, असा अनेकांचा अनुभव असतो. आता "योगशास्त्र' जगभर अभ्यासलं जातंय. "योग' म्हणजे देवाशी जोडलं जाणं असंच म्हटलं जातं.हा विषय गहन आहे. एका छोट्याशा लेखात "जळी स्थळी' असणाऱ्या "देवा'ला कसं बसवणार? "मजेत जगावं कसं?' या माझ्या पुस्तकात मी हा गहन प्रश्‍न माझ्या पद्धतीनं सोडवून टाकला आहे, कसा ते इथं थोडक्‍यात सांगतो. देव म्हणजे काय, याचं एक सर्वमान्य उत्तर असतं, देव म्हणजे अनादि, अनंत शक्ती. बरं, देवाचा अंश प्रत्येकात असतो असंही म्हटलं जातं. आता आपल्या प्रत्येकात हा अंश कुठल्या स्वरूपात असतो? आपल्या "अंतर्मनाची अमर्याद शक्ती' ही मानसशास्त्रानं स्वीकारलेली संकल्पना आहे. ही अमर्याद शक्ती म्हणजे त्या अनादि, अनंत शक्तीचा अंश असू शकेल, नाही का? आपण "स्वयंसूचना' देऊन अंतर्मनाची शक्ती जागी करू शकतो, वापरू शकतो हेही मानसशास्त्रीय सत्य आहे.




देवाची आपण प्रार्थना करतो तेव्हा देव ऐकतो की नाही, माहिती नाही; अंतर्मन नक्की ऐकत असतं. थोडक्‍यात काय, प्रार्थना ही एक स्वयंसूचनाच असते. स्वतःसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपण "इच्छाशक्ती' वापरतो. इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा शुभेच्छांची शक्ती वापरतो! बस्‌, माझ्यापुरता हा तिढा मी असा सोडवला आहे. मग माझ्या घरात देवाचा फोटो नाही, मी देवळात जात नाही, याचा मला काही त्रास होत नाही. लोक पूजा, कर्मकांड करतात, ती त्यांचं मन गुंतण्यासाठी करतात असं मी मानतो.




श्रद्धा आणि अंधश्रद्धा -

श्रद्धेचे काही लाभ नक्कीच असतात. श्रद्धा ही एक शक्तिशाली भावना आहे. प्रत्येक भावनेत ताकद असतेच. प्रेम, देशभक्ती यात सकारात्मक ताकद असते, तर रागात नकारात्मक श्रद्धेमुळे बळ लाभू शकतं. श्रद्धा तुम्ही कशावरती ठेवता, हा मुद्दा दुय्यम ठरतो. ती दगडाच्या मूर्तीवर असू शकते, जिवंत व्यक्तीवर असू शकते, तत्त्वावर असू शकते. गांधीजी परमेश्‍वर मानी; पण "सत्य हाच परमेश्‍वर' असंही म्हणत. देवावर श्रद्धा ठेवणारे जर असत्य वागतअसतील तर ते देवाचा विश्‍वासघात करतात, असंच म्हणावं लागेल. देव म्हणजे सर्व सद्‌गुणांचं प्रतीक असेल तर तो सत्य, अहिंसा, प्रेम, सदाचार, चांगुलपणा याचंच प्रतीक असायला हवा. देवावर श्रद्धा ठेवणारे, सत्यावर, प्रेमावर, अहिंसेवर, चांगुलपणा व सदाचारावर श्रद्धा ठेवतात का, हा खरा मुद्दा आहे. वर्षभर भ्रष्टाचार करणारी मंडळी वर्षातून एकदा बालाजीला जाऊन मुंडन करतात आणि स्वतःच्या डोक्‍यावरचं पापाचं ओझं त्याच्या चरणी उतरवतात, हा एक गमतीदार विरोधाभासच आहे. देव काय पापं टांगण्याची खुंटी असतो?




अमका देव नवसाला पावतो, ही अंधश्रद्धा असेल नसेल; ती देवादेवात भेदभाव करणारी नक्कीच आहे. बाकीचे देव काय कमी दर्जाचे, कमी पॉवरफुल्ल असतात का? मुळात नवस बोलून देव पावतो, हेही पटत नाही. देव काही शासकीय अधिकारी नसतो, त्याला नवसाची "लालूच' कशाला हवी? तो तर भावाचा भुकेला असतो! देवाकडं काही मागण्यासाठी भक्ती करणं, ही निरपेक्ष भक्तीच नव्हे. देवानं शरीर दिलंय, बुद्धी दिलीय, आणखी काही मागायचं कशाला? शेवटी हे तर खरंच ना, की "गॉड हेल्प्स देम हू हेल्प देम सेल्व्हज्‌!' सचिन तेंडुलकर देव मानत असला तरी तो प्रयत्नांत काहीच कसर ठेवत नाही, हे महत्त्वाचं. "यू डू युवर बेस्ट; गॉड विल डू द रेस्ट!' यातलं "डू युअर बेस्ट' हेच खरं. बाकीचं मग देव, नियती, परिस्थितीवर सोडून द्यावं.




"श्रद्धावान लभते ज्ञानम्‌! असंही म्हणतात. गुरूवर श्रद्धा ठेवावी लागते कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी तपासून बघता येत नसते. पण मिळालेल्या ज्ञानाची वेळोवेळी चिकित्सा करावीच लागते. तशीच ती "धर्मा'चीही करावी लागते. प्रत्येक श्रद्धा ही खरं तर अंधश्रद्धाच असते असं म्हणतात. कारण श्रद्धेचा अर्थच "पुराव्या'शिवाय ठेवलेला विश्‍वास'. हे खरं असलं तरी कुणावर आणि कशावर श्रद्धा ठेवावी, हे आपण डोळसपणे ठरवू शकतो!




श्रद्धेच्या मर्यादाही माहिती हव्यात. श्रद्धेमुळे मनःशांती मिळू शकते; नोकरी नाही मिळू शकत किंवा परीक्षेत सर्वोत्तम गुणही मिळत नाहीत! अलीकडे बाबा, बापूंचं प्रस्थ वाढतं आहे. काही तर विष्णूचे अवतार मानले जातात. मुळात "विष्णू' होता की नाही यावर वाद आहेत, तर त्याचा "अवतार' कसा मानायचा? ही "डोळस श्रद्धा' म्हणता येईल का? आणि हो आताशा टीव्हीवर "शिवशक्ती कवच', "महालक्ष्मी कवच' या जाहिराती झळकत आहेत. सोन्याचं ते कवच विकत घेतलं की घरात पूर्ण समृद्धी. संकटं सगळी म्हणे गायब! किती छान!  सरकारनं ही कवच घेऊन घरटी वाटून टाकावीत म्हणजे दे शात समृद्धी नांदेल. संकटं येणारच नाहीत! आपण सश्रद्ध आहोत की मूर्ख? अभिनव कल्पनाच प्रभावी!


लेखं- शिवराज गोर्ले.


आजची स्त्री खरंच स्वतंत्र आहे का??

आजची स्त्री खरंच स्वतंत्र आहे का??


 
आजच्या युगामध्ये स्त्री हि पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पहावयास मिळते. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करताना प्रगती पथावर आहे. अर्थाजानामध्येही ती पुरुषाएवढीच काही ठिकाणी त्यापेक्षाही जास्त करताना दिसते. साहजिकच पूर्वीपेक्षा आताच्या युगात स्त्रीला समाजात मोठे स्थान प्राप्त झाले आहे. ते तिने स्वत:च्या कर्तृत्वाने, कष्टाने, बुद्धीमतेने मिळविलेले आहे. यात शंकाच नाही. एकूण सर्वच बाबतीत स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत. हे जरी खरे असले तरी या सर्व गोष्टी काही ठराविक वर्गापुरत्या मर्यादित आहेत. काही ठराविक स्त्रियांच्या बाबतीत खऱ्या आहेत. स्त्री सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे असे म्हटले तरीही तिच्यावर अन्याय होताना आजही दिसून येतोच आहे. आजही वर्तमानपत्र उघडले कि जास्तीत जास्त स्त्रीयांबाबाताच्याच अन्यायाच्या बातम्या जास्त असतात. नवविवाहितेच्या आत्महत्या, सुनेचा छळ करून मारले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या अश्या बातम्याच जास्त असतात.

 



सुशिक्षित वर्गातही पहिली पत्नी सुगरण, सुस्वभावी, समजूतदार असली तरीही तिला मुलीचं झाल्या तर तो दोष तिचाच समजून पतीचा दुसरा विवाह लावला जातो. मुलगा व मुलगी होणे हे स्त्रीच्या हातात नसते हे न कळण्या इतपत समाज मागासलेला तर आता नाही ना? तरी पण या ठिकाणी काही गुन्हा नसताना स्त्रीला अन्याय सहन करावा लागतो. साधारणपणे लग्नाला ५-६ वर्षे झाली न घरात पाळणा हलण्याची चिन्हे दिसली नाहीत कि योगीबाबा, डॉक्टर तपासण्या चालू होतात. त्यात प्रथम स्त्रीच्याच केल्या जातात. मुल जन्माला येण्यासाठी दोघेही तेवढेच जबाबदार असतात. पण स्त्रीला प्रथम दोष लावण्यात येतो. का? तिच्यात काही दोष नाही असे समजल्यास कसातरी तयार होऊन पुरुष डॉक्टरकडे जायला तयार होतो. या चाचण्यात स्त्रीच्यात दोष निघाला तर पुरुष या कारणावरून तिच्या संमतीने अथवा तिच्याशी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्यास सिध्द होतो. पण पुरुषांमध्ये दोष आढळला तर एक तरी स्त्री त्याच्यापासून घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचे आपल्याला आढळते का ??

 



ऐन तारुण्यात पतीच्या अपघाती निधनाने विधवा झालेल्या मुली आपण पाहतो. मुला बाळ नसेल तर ठीक किमान दुसर्या विवाहाचा विचार तरी केला जातो पण जर पदरी लहान एक दोन मुले असतील तर तिला आपले उभे आयुष्य एकटीने काढावे लागते. तरी ती त्या कच्च्या बछ्याना सांभाळत त्यांचे सगळे करते. मुलांना व्यवस्थित वाढवून त्यांचे शिक्षण वैगरे करून त्यांना मोठ्या हुद्द्यावर बसविलेल्या मतांची अनेक उदाहरणे आपण पाहतो. पण हेच जर एखाद्या पुरुष्याबाबातीत त्याची पत्नी अचानक सोडून गेली तर एका वर्षाच्या आतच त्याच्या दुसर्या लग्नाची बोलणी सुरु केली जाते मुलांना कोण सांभाळणार, घरातले कोण करणार, स्वत:ची सर्वच गरज भागवण्यासाठी दुसरे लग्न करतो. त्यामध्ये त्याचा स्वार्थच असतो सगळा खरे तर! स्त्री आपल्या पतीच्या प्रेमाखातर त्याच्या आठवणीवर सगळे आयुष्य काढण्यास तयार होते. त्याच्या मुलांना मोठे करते. स्वताचा विचारही ती कधी करत नाही पण पुरुषांचे तसे नसते.


 



आपला समाजही त्यास तेवढाच जबाबदार आहे. एखाद्याची पहिली पत्नी तरून वयात गेली कि लगेच त्याला वर्षाच्या आत लग्नासाठी प्रस्ताव येतात. मुलांना सांभाळायला, घरात लक्ष्मी हवी, एकटा किती दिवस राहणार, पण असा प्रस्ताव तरून विधावेकडे क्वचितच अपवादाने पाहायला मिळतो. नाही तर तिलाच तूच पांढऱ्या पायाची म्हणून नवऱ्याला घालवून बसली असा आरोप तिच्यावरच करण्यात येतो. स्त्री हि लग्न करून तुमच्या घरी आपले माहेर, बहिण-भाऊ, आई-वडील यांना सोडून येते. तुमच्या घरची जबाबदारी उचलते. तुमच्या मुलांना जन्म देते. त्यांना मोठे करते. वेळ प्रसंगी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. एकटा पुरुष किंवा स्त्री हि फारसा पराक्रम नाही गाजवू शकत दोघांनाही एकमेकांची साथ सारखीच हवी असते. हा संसाररूपी रथ एका चाकाच्या सहाय्याने चालवता येत नाही तरी सुद्धा कायम स्त्रीवरच अन्याय का?? आपला समाज कितीही बदलला तरी स्त्रीवर होणारे अन्याय कधी संपणारच नाहीत का? पेपरमध्ये रोज नवविवाहितेच्या आत्महत्या , सुनेचा छळ करून मारले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या अश्या बातम्या येणे कधी थांबेल का??

 



ह्या स्त्रीवरील अन्यायला जबाबदार कोण?? तिला कधी न्याय मिळेल कि नाही?? याला उत्तर सापडेल कि नाही?? असे अनेक प्रश्न आपल्या आधुनिक समाजातही अनुत्तरीतच राहत आहेत. सर्व क्षेत्रात सतत पुढे जाण्यासाठी धावणारा आपला समाज स्त्रियांच्या बाबतीत मागे का जातो?? हीच आज आपल्या समाजाची मोठी खंत आहे. कोणीतरी येईल हि परिस्थिती बदलेले या आशेवर कधीपर्यंत राहणार आपण?? या साठी जास्त काही करण्याची पण गरज नाही आपण प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांबद्दल मनात आदर ठेवून त्यांना मानपानाची वागणूक दिली तरी खूप फरक पडू शकेल. आपली आई, बहिण, बायको, मुलगी यांना माणूस मानून त्यांच्यात भेदभाव न करता वागले तरी खूप काही घडेल. कारण परिवर्तन नेहमी आपल्यापासून सुरु केले तर त्याचा फायदा जास्त होतो.





 


लेखं- राधिका घोडके.

भिडेवाड्याच्या शोधात !!

भिडेवाड्याच्या शोधात !!
 


थोर महापुरुष महात्मा फुले विषयी त्यांच्या साहित्यातून बराच काही वाचाल होत पण त्यांनी १५ मे १८४८ ला भिडेवाडा येथे सुरु केलेली देशातील पहिली शाळा विषयी बरच कुतूहल होत . तो भिडेवाडा किती महान असेल या महापुरुषाचा सहवास लाभलेला म्हणून काही वर्षापूर्वी मी आणि माझा अभियंता मित्र राहुल जाधव भिडेवाडा शोधण्यासाठी निघालो . राहुल ला फक्त एव्हढंच माहित होत कि बुधवारपेठे मध्ये कुठेतरी आहे म्हणून ! बुधवारपेठेतून आम्ही पायी चालू लागलो . चालताना जणू तो काळच त्या रस्त्यामधून flashback झाल्यासारखे झाले . शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा नायनाट पेशव्यांनी करून नुसता माज पेशव्यांनी वाढवला असेल , जातीयतेचा उत निर्माण करून इथल्या शुद्र समाजावर अन्याय अत्याचार याच रस्त्यावर हे पेशवे करीत असतील , इतक्या भयंकर परिस्थिती मध्ये महात्मा फुले , सावित्रीबाई फुलेंनी बहुजन समाजाच्या उद्धाराचा जो वसा घेतला असेल तो किती किती महान आहे . ब्राह्मणी कामांध चेहरे , शेण गोटे खाऊन सगळ्या अडचणींना तोंड देऊन सावित्रीमाई ने जो स्त्री जातीचा उद्धार केला त्याची सर बदकावर बसून बदकाला त्रास देणाऱ्या काल्पनिक सरस्वतीला कुठून येणार असे अनेक विचार मनात येउन चालत होतो भिडेवाड्याच्या शोधात ! रस्त्याने चालताना अचानक देहविक्री करणाऱ्या स्त्रिया नजरेस पडल्या . मनात वाटल , पेशव्यांनी अनैतिकपणाचा किती अंत केला असेल . परराज्यातून स्त्रिया लुटून आणून त्यांना उपभोगुन त्यांना या गलिच्छ व्यवसायात ढकलुन अत्याचाराचा हा हा कार माजविला असेल . ज्या ब्राह्मण पेशव्यांनी असले घाणेरडे कृत्ये केले तिथे माझा महात्मा या स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांच्या अनौरस मुलांसाठी शिक्षणाचे दार उघडे करून त्यांना सन्मार्गाला लावण्याचे महान कार्य आमच्या महात्मा फुले आणि सावित्रीमाई ने केले खरच त्याला तोड नाही . जेव्हढा आदर आई वडिलांसाठी असेल त्याहुनी अधिक आदर फुले दांपत्याविषयी अधिकाधिक वाढत होता , प्रत्यक्ष तो काळ अनुभवतोय कि काय हे पाहून मन भरून आले.


 



चालताना अनेकांना हा प्रश्न होता कि भिडेवाडा कुठे आहे ,पण तिकडून उत्तर यायचं कि भिडेवाडा काय आहे ? आमच हेच उत्तर ठरलेल असायचं कि मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेनी भिडेवाड्यामध्ये सुरु केली होती . अनेकांची महात्मा फुले बद्दलची अनास्था पाहून मन नाराज होत होत, दुपारची वेळ झाली होती . समोरच एक हॉटेल दिसलं वाटल अगोदर आता काहीतरी खाऊन घ्याव . बिलाचे पैसे द्यावे आणि हॉटेल मालकाला विचारावं कारण याला कदाचित माहित असेल पण कसलं काय त्यालाही काही माहित नव्हत . समोर असलेल्या पोलिस चौकीमध्ये बसलेल्या पोलिसालाही आम्हाला हेच विश्लेषण द्यावे लागले मग त्याने आम्हाला योग्य पत्ता दिला . येउन भिडेवाड्याजवळ आलो तर त्याची स्थिती पाहून मन हेलावून गेल कारण जीर्ण झालेला हा भिडेवाडा खूप मोडकळीस आलेला होता , त्यामध्ये अतिक्रमण करण्यात आलेले दुकाने पाहून तर मनात अधिक राग निर्माण झाला.


 


फुले ,शाहू , आंबेडकर याचं नाव घेऊन येणार सरकारसहित महात्मा फुले , सावित्रीमाई फुले मुळे शिकलेले पण स्वतःची ओळख नसलेले आणि तेव्हढेच हुकलेले लोक पाहून या महात्म्याची होणारी हेळसांड खूप वेदानादाई होती .दुसर एक आश्चर्य म्हणजे भिडेवाड्याच्या विरुद्ध दिशेला पाहल तर "श्रीमंत दगडूशेठ हलवाई चा गणपती " नटून थटून आलेल्या स्त्रियांनी आणि मुलीनी घेरलेला दिसला . ज्या महापुरुषाने ,सावित्रीमाईने अतोनात हाल सोसून या समाजासाठी झिजले खासकरून सावित्रीमाई ! मुली शिकल्या पाहिजे पुढे गेल्या पाहिजे म्हणून आयुष्य वेचले. मुली शिकल्या प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या . दगडू गणपतीच्या दर्शनासाठी मरत असलेल्या नटलेल्या मुलींची सावित्रीबाई विषयी असलेली अनास्था बघून मनात आक्रोश निर्माण होत होता पण आजही दगडू चा गणपती अधिकाधिक श्रीमंत होत आहे आणि अडगळीत पडलेला भिडेवाडा शेवटची घटका मोजीत आहे . दगडू गणपती ला मिळणाऱ्या देणग्या पाहल्या असता दिवस अपुरा पडतो , त्या देणगी देणारामध्ये रामदास आठवले चे नाव वाचून तर पारा अधिक चढतो पण अशा लोकांकडे दुर्लक्ष करून फुले शाहू आंबेडकरांचे विचार प्रसार करू हे ध्येय केंव्हाचेच उरी बांधले होते.

 



भिडेवाड्याचे फोटो काढत असताना दगडूगणपतीच्या रांगेतले आमच्याकडे येउन हे का गणपतीचे फोटो न काढता या पडक्या वाड्याचे फोटो काढत आहेत म्हणून विचारात होते त्यावर त्यांना या वाड्याचे काय महत्व आहे हे सांगितल्यावर तेच महानग महानगी भिडेवाड्याचेही फोटो काढू लागली … हा खूप मोठा विरोधाभास होता .




आज भिडेवाडा अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्यावर अतिक्रमण झालेले आहे ,शासनासह सर्वांनी या कडे दुर्लक्ष केल्यामुळे तो उपेक्षेचे केंद्र झालेला आहे एव्हढंच काय तर भिडेवाडा हा आज दारूचा अड्डा झालेला आहे , सर्वांच्या दुर्लक्ष्यामुळे ऐतिहासिक भिडेवाड्याची हि दुरवस्था झालेली आहे. भिडेवाडा बचाव समिती यासाठी कित्येक वर्षापासून लढा देत आहे पण आता महात्मा फुलेंच्या वंशजांनी हा वाडा सर्व जनतेमिळून ताब्यात घेण्याचे ठरविले आहे त्याची उपेक्षा थांबविण्यासाठी हेच आंदोलन आता हाच मार्ग बाकी आहे .



२८ नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन खरच शिक्षक दिन म्हणून निदान महाराष्ट्र शासनाने तरी पाळावयास हवा. महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य सर्व समाजापर्यंत पोहचावे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हीच क्रांतीबाला वाहिलेली श्रद्धांजली ठरेल. महात्मा ज्योतिबा फुलें या महान क्रांतीबाला कोटी कोटी प्रणाम !!!



लेखं- प्रवीण जाधव.

नवर्‍याने लादला 'एचआयव्ही': अनिता पाटील ठरताहेत 'मृत्युंजय'... 'ती' करतेय समदु:खींची सेवा !!

१ डिसेम्बर जागतिक एडस दिन विशेष... नवर्‍याने लादला 'एचआयव्ही': अनिता पाटील ठरताहेत 'मृत्युंजय'... 'ती' करतेय समदु:खींची सेवा !!




स्वत:ची काहीही कसूर नसताना 'एचआयव्हीग्रस्त'पण लादल्या गेलेल्या तरुणीने निराश न होता आपल्या समदु:खी माताभगिनी आणि बाळांना सार्‍या समाजाचे प्रेम मिळावे.. त्यांना जास्तीत जास्त आयुष्य लाभावे..यासाठी अदम्य, अथक प्रयत्न चालवले आहेत.. ही 'मृत्युंजय' तरुणी आहे, अनिता पाटील.



एकूणच सारे आकाश अंधारून आले असताना प्रकाशकिरण बनलेल्या अनिता यांनी दिल्लीच्या 'पॉझिटिव्ह पीपल लिव्हिंग वुईथ एचआयव्ही' च्या सहकार्याने 'विहान (सूर्यकिरणे) काळजी व आधार केंद्र' १ जून २०१३ पासून जळगावच्या दीक्षितवाडीतील 'अप्सरा' इमारतीत रोज १२ ते १४ तास त्यांची या सेवाकार्यात अथक धडपड सुरू असते. समाजाने एचआयव्हीग्रस्तांना प्रेम दिले, समाजावून घेतले तर अनेक एचआयव्हीग्रस्त महिलांना देहविक्रीच्या गर्तेतून आणि प्रसारातून बाहेर पडता येईल.. अन् २०१५ पर्यंत 'शून्य' वाढ या उद्दीष्टापर्यंत पोचता येईल, असा विश्‍वासही त्यांनी 'लोकमत'ने साधलेल्या संवादात व्यक्त केला. १ ते ७ डिसेंबर या कालावधित विविध उपक्रम घेण्यात येत आहेत, याची माहितीही त्यांनी दिली.



१ डिसेंबर हा 'जागतिक एड्स् दिन'..त्या निमित्ताने स्वकार्याने शेकडोंच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणार्‍या या ज्योतीशी हा संवाद झाला.



अनिता पाटील या मूळच्या बोरखेडा ता.धरणगावच्या रहिवासी. त्या जळगावातील वाघुळदेनगर परिसरात आई लताबाई व वडील ईश्‍वरलाल पाटील यांच्यासमवेत राहात आहेत. पिंप्रीच्या कन्या विद्यालयात आणि पुढे धरणगावला त्यांचे शिक्षण झाले आहे. १९९८ मध्ये त्यांचे भुसावळच्या युवकाशी लग्न झाले.. आणि त्यांच्या आयुष्याला दु:खद वळण मिळाले.. नवरा ९३ पासून एचआयव्हीग्रस्त होता, हे सासरच्यांना माहीत असूनही त्यांनी लपवून ठेवल्याचा अनिता पाटील यांचा आरोप आहे. पुढे अनिता यांना वजन कमी होणे, अंगावर पुरळ येणे, जखम बरी न होणे.. असा त्रास होऊ लागला. सासरचे लोक मूलबाळ होऊ देण्यास विरोध करीतही होते. पण (सत्य माहित नसल्याने) अनिताने जुमानले नाही.. गर्भधारणा झाल्यावर तिच्या डॉ.केळकर यांच्याकडे १३-१४ प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. रिपोर्ट घेण्यासाठी त्या दवाखान्यात गेल्या असता नवर्‍याने ते परस्पर नेल्याचे कळले.. सासरच्यांनी टाळाटाळ केली.. अखेर तिसर्‍या दिवशी अनिताने दवाखान्यात जात रिपोर्टबाबत माहिती मिळवली आणि तिला सत्य कळले. घरी जाते तो सासू, सासरे आणि नवरा यांची घरात गोलकार बैठक बसली होती. वर तिला 'तू कोठे गेली होतीस, तुझे रिपोर्ट चांगले आहेत.' अशी बतावणी ते करू लागले. वादावादीनंतर सासू म्हणाली की तुला सत्य जाणायचे असेल तर आधी वैष्णवी माता हातात घे.. शपथ घे.. की तू सारे काही समजून घेशील! गुप्त ठेवशील.. कुठेच बोलणार नाही' मी शपथ घेताच त्यांनी नवर्‍याला लग्नाआधी पाच वर्षापासून एड्स् असल्याने व तू एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेस' असे सांगितले. 'लपवालपवी का केली?.. मी माहेरी जाते' असे काही विचारात असतानाच माझी शुद्ध हरपली.. शुद्धीवर आल्यावर मी रडत असताना ते म्हणाले चूप बैस, कुठे बोलू नकोस' . पुढे त्यांनी 'मला याचा त्याचा कॅन्सर आहे..' असे लोकांना सांगायला सुरुवात केली. पुढे मी भावाला फोन केला.दिवाळीत तो घरी आला.. सासूच्या विरोधाला न जुमानता त्याने आम्हा दोघांना मुंबईच्या जे.जे.हॉस्पिटलला नेले. तेथे तपासणीसाठी रक्त घेत असताना नवर्‍याने 'तपासणीची गरज नाही..' असे म्हणत पाच वर्षापासून एचआयव्हीग्रस्त असल्याची कबुली दिली.



नंतर मी पुन्हा सासरी गेले.. भावाला का सांगितले, म्हणून माझा राग आणि मला त्रास सुरू झाला. महिनाभरात मला घराबाहेर काढण्यात आले. आम्ही भाड्याचे घर घेतले. नंतर आम्हाला घराची वरची खोली देण्यात आली. पुढे तर वीज व पाणीही तोडले. मारहाणही व्हायला लागली. मी अखेर फसवणूक, मारहाण इ.बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पण तेथील पोलीस अधिकारी सांगायला लाज वाटेल, एवढे घाण घाण बोलला.



मैं भी तो जी रही हू... शबानाने दिली प्रेरणा-


अखेर निराश होऊन पंच फारकत घेऊन माहेरी बोरखेड्याला गेली. भावाने पुन्हा जे.जे.ला दाखल केले. तेथे एकाहून एक दु:खी रुग्ण पाहून आणि त्यांच्या कहाण्या ऐकून आपण स्वत:साठी आणि यांच्यासाठी खूप काही करू शकतो, ही जाणीव झाली. डॉ.अलका देशपांडे यांनी तुम्ही यांची सेवा करा, त्यांना प्रेरणा द्या, हा विचार देत आणखी हिंमत दिली, स्वयंसेवी संस्थांची माहिती दिली.२००५ आणि ०६ मध्ये तेथेच सेवा दिली.. शबाना पटेल या स्वयंपीडित समाजसेविकेची भेट झाली. प्रशिक्षणप्रसंगी तिने 'मैं भी तो जी रही हू' असे म्हणत मला या क्षेत्रात पूर्ण सेवा देण्याचे आव्हान दिले अन् तू ते स्वीकारले तर तुझी पाठ थोपटेन' अशा शब्दात माझ्यात जिद्द निर्माण केली अन् मी पुढे 'नेटवर्क ऑफ ठाणे बाय पीपल लिव्हिंग वुईथ एचआयव्ही' या संस्थेत काम करू लागले.


■ द्रौपदीचे लज्जारक्षण कृष्ण हा जसा भाऊ .. तसे भाऊ उन्मेश यानेच माझे रक्षण केले.. नवर्‍याने लपवलेला आजार आणि मला झालेला संसर्ग कळल्यावर अनेकदा माझ्या पायाखालची जमीन सरकली, मला जगावेसे वाटेना, अनेकदा मी बेशुद्ध पडली.. क्षीण झाली, आपण मरणार असे दीर्घकाळ वाटत राहिले.. पण सत्य पचवण्याचा, जगण्याचा आणि लढण्याचा धीर दिला तो भाऊ उन्मेशने.. तो विक्रोळी (मुंबई) ला एका कंपनीत मोठय़ा पदावर आहे.. त्यानेच सारे दवाखाने केले..



■ २००६ मध्ये त्यानेच प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याबरोबर 'आपण बाळाला एचआयव्हीपासून वाचवू शकता' असा संदेश देणार्‍या चित्रपटात सहभागी होण्याची संधी मिळवून दिली. त्यामुळे माझी ओळख जाहीर झाल्याने मी आता बिनदिक्कत एचआयव्हीग्रस्त म्हणून वावरत सामाजिक कार्य करीत आहे. नि:स्वार्थ सेवेचा झेंडा हाती घेतला आहे. तो फडकवित ठेवणार आहे.



जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.एन.लाळीकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.कुणाल पाटील व सहकार्‍यांचे खूप सहकार्य त्यांना या कार्यात लाभत आहे. भावाने जळगावला घरही घेऊन दिले.. आणि आईवडीलही आपल्या अशा लेकरांना दोन शब्द प्रेमाचे देत नाहीत, अशा जगात माझे आई वडील माझ्याजवळ येऊन राहात असल्याचेही त्यांनी सांगितले २०१० पासून मी जळगावात या जीवांना सेवा देत आहे. आतापर्यंत संस्थेने सुमारे अडीच हजार लोकांची नोंदणी केली असून त्यांना स्वत: पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट करून मार्गदर्शन, शासकीय, निमशासकीय योजनांची माहिती देत आहे. रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करणे, विनामूल्य रक्त व वैद्यकीय सेवा मिळवून देणे, आधारकार्ड, पिवळे कार्ड आणि अन्य सेवा मिळवून देणे, भेदभाव विसरुन त्यांना प्रेमाची वागणूक तसेच संदर्भ सेवा, कायदेविषयक सेवा मोफत दिली जात आहे, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.




 

लेखं- चंदू नेवे, जळगाव


 

धन्यवाद- दै.लोकमत.

आधार गट, बचत गटातून जनजागृती- सत्यशोधक मनीषा तोकले ताई !!

आधार गट, बचत गटातून जनजागृती- सत्यशोधक मनीषा तोकले ताई !!



 

''बीड येथे १९९६ मध्ये राहायला आलो आणि तेव्हापासून आजपावेतो माझा मानवी हक्कासंदर्भातील कामाचा आलेख वाढताच आहे. रचनात्मक व संघटनात्मक अशा दोन्ही बाबींवर काम करण्याचे मी ठरवले होते. त्यानुसार एकशे वीस गावांत आधार गट स्थापन केले. साडेतीनशे बचत गटांची स्थापना करून सुमारे साठ हजार महिलांचे संघटन उभारले. पैसा कमावून महिलांना स्वत:च्या पायावर उभे करणे हा त्याचा एकमेव उद्देश नसून यामार्फत गावागावात स्त्री-भ्रूणहत्या व मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी व कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ चा प्रसार करण्याचे महत्त्वाचे काम यामार्फत केले जाते.'' सांगताहेत गेली सतरा वर्षे सामाजिक कार्यातून महिला जागृती करणाऱ्या मनीषा तोकले.


 



माझा जन्म येलम समाजातला. माझे वडील गुरांचे प्रसिद्ध डॉक्टर होते. बाबांच्या वेगवेगळय़ा गावांत होणाऱ्या बदलीमुळे मला ग्रामीण भागातील बोलीभाषेची, आपलेपणाची शिकवण त्या काळातच मिळाली. परळी येथील दवाखान्याच्या क्वार्टरमध्ये राहत असताना दलित मुलींबरोबर मैत्री झाली. एके दिवशी त्या मैत्रिणीच्या घरी गेले असता तिथल्या वातावरणाने माझ्या विचारांना कलाटणी मिळाली. दलित समाजाविषयी माझ्या मनात असणारे अनेक समज यानिमित्ताने पुसले गेले. समाजातील या वंचित घटकांबद्दल आत्मीयता वाटू लागली. पुढे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या विचारांचा प्रभाव वाढू लागला आणि तेव्हापासून वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारविरोधात मी मानवी हक्क संघटनेद्वारे उभी राहू लागले ते आजपर्यंत.


 



१९९० साली लातूरमधील राजर्षी शाहू महाविद्यालयात मी बी.ए.ला प्रवेश घेतला. त्या वेळी समवयस्क तरुणांचा मैत्रीगट तयार करून 'भाकवान' हे अंधश्रद्धेवर, तर 'आम्ही सारे हिंदू आहोत' हे हिंदू धर्मातील वाईट चालीरितींवर प्रहार करणारे नाटक आम्ही सादर केले. याच काळात 'खेडी विकास मंडळ (देवणी)' या संस्थेची ओळख झाली. या संस्थेअंतर्गत गावोगावी जाऊन नवीन आर्थिक धोरणाच्या विरोधात एक लाख लोकांच्या सह्य़ांचे निवेदन सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला. याच वेळी लातूर शहरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे सर्वेक्षण सुरू झाले. त्यात मी, जनाबाई पाटील, शांता रेड्डी प्रामुख्याने होतो. या वेळी गांधी मार्केटजवळ, शाहू चौकात, लाकडी आडय़ाजवळील तसेच सिंध टॉकीजजवळ राहणाऱ्या वेश्यांच्या आयुष्याविषयी, समस्यांविषयी संपूर्ण सर्वेक्षण केले. वास्तवाचे विदारक दर्शन मन हेलावून टाकणारे होते. एका वेश्येच्या घरी गेले, त्या वेळी एक माणूस तिला अक्षरश: बदडून काढत होता. कारण विचारले तर म्हणाला, 'ही आज दुसऱ्या माणसासोबत का बोलली? ती फक्त माझीच आहे. तिने दुसऱ्याशी बोलताही कामा नये.' तिच्यावरच्या व अन्य वेश्यांवरील अन्यायामुळे वेश्यांसाठी काम करण्याची माझी इच्छा अधिकच तीव्र झाली.

 



मानवी हक्क अभियानाचे बीड येथील कार्यकर्ते आणि महार असणारे अशोक तांगडे यांच्याशी लहानपणापासूनच परिचय होता. तांगडे कुटुंबीयांनी माझ्यावर सामाजिक जाणिवेचे संस्कार घडविले होते. या कुटुंबातील अशोक यांच्याशी माझा १४ एप्रिल १९९३ रोजी डॉ. आंबेडकर जयंतीदिनी विवाह पार पडला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतल्या कामगारांच्या मोर्चात मी आणि अशोक सहभागी झालो. लग्नाचा आनंद उपभोगण्यापेक्षा आम्ही लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुरुंगामध्ये होतो. लग्न अविस्मरणीय असतेच, पण माझ्यासाठी वेगळ्या अर्थाने लक्षणीय ठरले. त्यानंतर चंद्रपूर येथे आम्ही संसार सुरू केला ते एक तवा, एक वाटी, एक ग्लास, एक थाळी व स्टोव्ह यावर.


 


३० सप्टेंबर १९९३ च्या भूकंपाच्या वेळी मी लातूरला होते. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी आम्ही 'खेडी विकास मंडळा'मार्फत विविध साहित्यांचे वाटप केले. स्वयंसेवी संस्था व सरकार यांच्या समन्वयाने भूकंपग्रस्तांना नियोजनबद्ध मदत करता यावी यासाठी समन्वय समिती स्थापन केली. मी व अशोकरावांना दहा गावांची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती. आम्ही ती समर्थपणे पेलू शकलो, मात्र त्या वेळचे दिवस अत्यंत तणावाचे गेले.


 


मानवाधिकारासंबंधी हाताळलेली कामे -

 

१) कौटुंबिक अत्याचार - १०८० प्रकरणे.
२) दलित अत्याचार - २८० प्रकरणे.
३) आंतरजातीय विवाह - १७ प्रकरणे.
४) दलित महिला अत्याचार - २७० प्रकरणे.



 


१९९६ साली बीड येथे राहायला आलो आणि तेव्हापासून आजपावेतो मानवी हक्कासंदर्भातील माझ्या कामाचा आलेख वाढताच आहे. रचनात्मक व संघटनात्मक अशा दोन्ही बाबींवर काम करण्याचे मी ठरवले होते. त्यानुसार एकशे वीस गावांत आधार गट स्थापन केले. साडेतीनशे बचत गटांची स्थापना करून सुमारे साठ हजार महिलांचे संघटन उभारले. पैसा कमावून महिलांना स्वत:च्या पायावर उभे करणे हा त्याचा एकमेव उद्देश नसून यामार्फत गावागावात स्त्री-भ्रूणहत्या व मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी व कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ चा प्रसार करण्याचे महत्त्वाचे काम यामार्फत केले जाते.

 


एकदा एक वेगळाच अनुभव सामोरा आला. रामचंद्र माने नावाच्या कार्यकर्त्यांने आम्हाला वैदू समाजाच्या पंचायतीत नेले. तिथे एक प्रकरण सुरू होते. एका वैदूने दुसऱ्या वैदूकडे आपली पत्नी गहाण ठेवून दहा हजार रुपये घेतले. ती महिला दोन वर्षे त्या वैदूकडे राहिली. त्या वेळी त्यांना मुलगा झाला. दोन वर्षांनंतर त्या महिलेच्या पतीने त्या वैदूचे दहा हजार रुपये व्याजासकट परत केले, मात्र मुलगा तो सांभाळण्यास तयार नव्हता. या वेळी पंचायतीने निर्णय दिला की, ज्याच्यापासून या महिलेला मूल झाले त्याच्या पालन पोषणाचा पूर्ण खर्च मुलाच्या पित्यानेच उचलायला हवा. प्रकरण पंचायतीपर्यंत जाणे, त्यांनी न्याय देणे यादरम्यान त्या महिलेच्या मनात चाललेली भावना व तिची होणारी होरपळ कदाचित एक स्त्री म्हणून फक्त मला समजून घेता येत होती. बाकी सर्व फक्त माना डोलवत होते.

 


आणखी एका उदाहरणाने सामान्य स्त्रीमधील असामान्यत्व अधोरेखित होण्यास मदत झाली. माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे राहणाऱ्या राधाबाई सुरवसे यांची कहाणी. अवघ्या बाराव्या वर्षी लग्न झालेल्या या बाईंचा नवरा दहावी पास होता, मात्र शेतातल्या कुठल्याच कामाची सवय त्याला नव्हती. हे लक्षात येताच राधाबाईने रोजंदारीवर दुसऱ्यांच्या शेतात राबून प्रपंचाचा गाडा हाकला. त्याच वेळी गावात घडलेल्या दलित अत्याचाराच्या एका घटनेने राधाबाईंच्या आयुष्यालाही कलाटणी मिळाली. या घटनेविरोधात दलित समाज संघटित झाला. गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आतापर्यंत कधी साजरी झाली नव्हती. ती साजरी करण्यासाठी राधाबाईंनी माझ्या सांगण्यावरून पुढाकार घेतला. गावात त्यांना मानसन्मान मिळू लागला. हळूहळू दारूविक्रीचा धंदा सोडून तिने महिलांचे बचत गट स्थापन केले. गटातील महिलांना बँकेच्या व्यवहारात मदत करणे, त्यांना कर्ज मिळवून देणे ही कामे आनंदाने केली. यासह दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत १४ कुटुंबांना २८ एकर जमीन मिळवून दिली. माजलगाव तालुक्यात १५० घरकुले, अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या १६० लोकांना कर्ज मंजूर करून घेतले. ३५ बचत गट स्थापन करून स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे केले. १०० रुपयांपासून सुरू केलेला संसाराचा गाडा राधाबाईने सत्तर लाख रुपयांवर नेला. तिच्यातील स्त्रीशक्तीने मलाही अंतर्मुख केले.

 



२०१० मधल्या काळेगाव येथे घडलेल्या घटनेचाही इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. एकतर्फी प्रेमातून भरदुपारी दीपाली घाडगे या दहावीत शिकणाऱ्या मुलीवर रॉकेल टाकून अत्यंत निर्घृणपणे जाळण्यात आले. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री दहा वाजता मला दूरध्वनी आला.मी ताबडतोब काळेगाव गाठले. त्या मुलीच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. पोस्टमार्टेम झाल्यानंतर त्या मुलावर तात्काळ पोलीस कारवाई करावी, अशी मागणी आम्ही सर्वानी लावून धरली. काही वर्षांनंतर न्याय मिळाला व कायद्याने त्या आरोपीला शिक्षा झाली. या खटल्यातील पाठपुरावा कामी आल्याने समाधान वाटले.

 



पारधी वस्तीवर पोलीस आले की, सर्वजण घाबरून घरात बसतात. कारण कुठेही चोरी, पाकीटमारी झाली की पोलीस आधी पारधी वस्तीवर येतात आणि किमान चार-पाच लोकांना तुरुंगात टाकतात व प्रकरण दाबतात. मात्र मी २०१२ साली बगेवाडी येथील पारधी वस्तीवर बीडचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टांकसाळे यांना सोबत घेऊन दिवाळी साजरी केली. त्या पारधी वस्तीवर पहिल्यांदा दिवाळी साजरी करण्यात आली होती. त्यानंतर सरकारदरबारी खेटे घालून या लोकांसाठी मी रेशनकार्ड व मतदान ओळखपत्र मिळवून देण्याचे काम केले. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरले.

 



संघटनात्मक कामाचा पसारा दिवसेंदिवस वाढतच होता. अशातच १७ ऑक्टोबर २०१२ ला माझ्या पतीचे पोटाच्या कर्करोगाचे ऑपरेशन झाले. त्या वेळी पैशांची व मनुष्यबळाची अडचण जाणवली. या वेळी बीड पत्रकार संघाने पन्नास हजार रुपयांची मदत केली. आमच्या सामाजिक कार्याची ही पोचपावतीच म्हणायला हवी.

 



'जिथे महिलेवर मारण्यासाठी हात उगारला जातो, तो तिथेच रोखण्यासाठी हात निर्माण झाला पाहिजे' हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही 'समजदार जोडीदार' हा उपक्रम वीस गावांमध्ये राबवला, ज्यात आम्ही पुरुषांनाही सहभागी करून घेतले. याशिवाय दीडशे गावात 'आधार गट' स्थापन करून कौटुंबिक हिंसाचारात होरपळणाऱ्या महिलांना सहकार्य करण्याचे काम सुरू केले. यातला महत्त्वाचा भाग हा की, हे काम गावातील अर्धशिक्षित महिला करीत आहेत. या चौथी-पाचवी शिकलेल्या महिलांच्या तक्रारी घेण्यास अनेकदा पोलीस टाळाटाळ करतात. त्या वेळी ही अर्धशिक्षित, खेडवळ महिला या पोलिसांना कायद्याच्या भाषेतच ज्या प्रकारे ठणकावून सांगते ते बघून समाधान वाटते. गावागावात सावित्रीच्या लेकी, तिचा वारसा ताठ मानेने पुढे नेताहेत हेच खरे.

 



मानवाधिकाराची कास धरणे, मानवी हक्क या मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट केलेल्या बाबीसाठी काम करणे वाटते तितके सोपे नसते. सुरुवातीला मला याचा फार त्रास झाला. विविध केसच्या निमित्ताने धमक्या यायच्या, केस फिरवावी म्हणून अनेक प्रलोभने दाखवली जायची. पोलिसांचा ससेमिरा आमच्यामागे नेहमीच असायचा, मात्र डगमगून चालणारच नव्हते. चालणार नाही. कारण अन्याय, अत्याचारग्रस्त महिला माझी झोप उडवते आणि त्यातूनच तिला न्याय मिळावा यासाठी मी धडपडते. अशा अनेकजणी मला ताई म्हणून हाक मारतात. मोठय़ा बहिणीच्या आश्वासक सल्ल्यानुसार कृती करतात. त्याची जबाबदारीही वाटते आणि आनंदही. अजून काय हवं आयुष्यात? २०११ साली २८८ देहविक्रय करणाऱ्या महिलांना पिवळे रेशनकार्ड मिळवून दिले, तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ भाऊबीजेची भेट म्हणून मिळवून दिला. त्यांचे फुललेले चेहरे पाहिले आणि माझी दिवाळी साजरी झाली.

 



वैयक्तिक आयुष्यातही मी समाधानी आहे. अंकुर व अमन ही माझी मुलं. अंकुर बारावीत तर अमन सहावीत असून टी.व्ही.वरच्या बातम्या बघताना त्याला महिलांवरच्या अत्याचाराची बातमी दिसली की तो धावत माझ्याकडे येतो. मला सांगतो, 'आई तू यांच्या मदतीला तात्काळ जायला हवे.' तेव्हा खरोखरच मी करत असलेल्या कामाचे मला सार्थक वाटते.

 



डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनच्या माध्यमातून आमचे १५० वकील बांधव मराठवाडय़ात कुठेही दलितांवर, महिलांवर अन्याय, अत्याचार झाला तर या केसेस घेतात.




 



या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लखनौ येथे पार पडलेल्या 'युनो' व 'महिला बालकल्याण विभाग, भारत सरकार'च्या 'मिलेनियम डेव्हलपमेंट गोल'च्या परिषदेत बोलण्यासाठी विषय दिला होता. 'वंचित घटकातील महिलांच्या समस्या आणि दलित-आदिवासी स्त्रियांच्या विकासासाठी २०१५ पर्यंत अन्याय, अत्याचारमुक्त करून स्वावलंबी जीवन कसे जगता येईल याविषयी मार्गदर्शन करणे.' देशभरातील विविध भागांतील महिला या वेळी उपस्थित होत्या. समाजव्यवस्थेत महिलांना दुय्यम समजले जाते, यासाठी शासनाने स्वतंत्र धोरण राबवावे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या महिलांना स्वत:च्या अस्तित्वाच्या जाणिवेसाठी शिक्षण, सकस आहार द्यायला हवा, अशी भूमिका मी मांडली. अशा विचारमंथनातून न्यायाच्या दिशेने वाटचाल होते, ती होईलच, यावर माझा विश्वास आहे.

 


संपर्कासाठी पत्ता -
मनीषा तोकले
ए-१, के. के. प्लाझा, जुना नगर रोड, बीड.
भ्रमणध्वनी- ९६३७५३५८८०





 

शब्दांकन- संतोष मुसळे

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...