दुसऱ्यासारख वागलं तर स्वतासारखं कधी जगणार - सिनेअभिनेत्री विद्या बालन !!

दुसऱ्यासारख वागलं तर स्वतासारखं कधी जगणार - सिनेअभिनेत्री विद्या बालन !!


 

मुझे ना अँक्च्युली ये फॅशन के मायने समझ में नही आते है.!’

 


खळखळून हसत विद्या बालन सांगत होती. खूप टीका होते एरवीही तिच्या स्टाईल स्टेटमेण्टवर. तिला फॅशन सेन्सच नाही, असं म्हणून फॅशनपंडित नावं ठेवतात आणि तरीही मोकळे केस, वजनदार झुमके आणि सिल्कच्या साड्या अशा ‘अवतारा’त ती फिल्म फेस्टिव्हल, अँवॉर्ड शो ते फिल्मी पाटर्य़ांमध्ये वावरत असते. अलीकडेच तिच्या ‘कान्स’मधल्या साड्यांना आपल्या फॅशन एक्स्पर्टनं ‘काकूबाई’ लेबल चिकटवून टाकलं. त्यात आता ती ‘घनचक्कर’ नावाच्या आगामी सिनेमात एक हट्टय़ाकट्टय़ा-बलदंड­ पंजाबिणीची भूमिका करतेय. भडक कपडे घालून ‘मॉडेल’सारखं दिसण्याचा आटापिटा करणारी एक फॅशनवेडी गृहिणी विद्यानं साकारली आहे.


 

तिला विचारलं की, एवढी टीका होते तुझ्या फॅशन आणि स्टाईल स्टेटमेण्टवर; पण तुझ्या लेखी काय आणि किती महत्त्व आहे फॅशनेबल असण्याला.?

 


विद्याला हसूच फुटलं, फॅशनबिशन काही कळत नाही हो मला असं म्हणत ती सांगते, ‘मला वाटतं फॅशन म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीचं एक्स्टेन्शन असावं. जे आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल तेच घालणं म्हणजे फॅशन, आपण आपल्यापुरती केलेली कुठलीही गोष्ट म्हणजे आपली फॅशन. बाकी काहीही आणि कुणासारखंही दिसण्याचा प्रयत्न केला तरी ते ‘ऑड’च दिसतं. पण अनेक जणींच्या ही गोष्ट लक्षातच येत नाही. फॅशन मॅगझिन्समध्ये मॉडेल्सचे जे फोटो छापतात तसे कपडे घालून काही आपण रोज वावरू शकत नाही. त्या ‘मॉडेल्स’इतका सडपातळही नसतोच आपला बांधा. मग त्यांनी जे फक्त फोटोशूटमध्ये घातलं ते आपल्या अंगावर कसं बरं दिसेल.? पण बर्‍याच जणींना तसंच दिसायचा ‘सोस’ असतो. जिवाचा आटापिटा करतात त्याच्यासाठी. ‘घनचक्कर’मधली माझी भूमिकाही तशीच आहे. हट्टीकट्टी पंजाबी बाई, खात्यापित्या घरची, पण दिसलं मॅगझिन, आवडला ड्रेस की काप तो फोटो, जा दुकानात, आण स्वस्तातलं कापड आणि शिवा तसाच ड्रेस हा तिचा खाक्या. ते भयाणच दिसतं. असा उद्योग कितीतरी बायका घरबसल्या करतात, सिरियल्समध्ये दिसणार्‍या बायकांसारख्या साड्या नेसतात आणि तसेच कपडेही घालतात. पण तेच म्हणजे ‘फॅशनेबल’ नसतं. आपलं व्यक्तिमत्त्व, आपली ओळख आणि आपला स्वभाव यांना एक आयाम देणारे कपडे म्हणजे आपली फॅशन एवढंच मला कळतं आणि म्हणून व्यक्तिगत आयुष्यात जे मला बरं दिसतं तेच मी घालते, कुणी काही का म्हणेना.!’


 

 - म्हणूनच विद्यानं ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर साड्याच नेसल्या का.?

 


ती म्हणते, ‘अर्थात. मी साडीतच छान दिसते हे मीच कशाला, कुणीही सांगेल.! आणि मलाही साडी नेसली की जास्त कॉन्फिडण्ट वाटतं. साडी जितकी ट्रॅडिशनल तितकीच आधुनिकही दिसते. खरंतर सेक्सी दिसते. मग असं असताना तिथं सगळे विदेशी गाऊन घालतात म्हणून मीही घालावेत का.? मी माझ्या ‘देसी’ अवतारातच गेले कारण मी तशीच आहे, तशीच वावरते इथे. मग तिथे लोक अमुक प्रकारचे कपडे घालतात, तमुक फारच फॅशनेबल म्हणून मी तेच करावं असा काही नियम नाही.’

 


असं निक्षून सांगता सांगता विद्या थांबते आणि एक दीर्घ श्‍वास घेऊन म्हणते, ‘खरं सांगू?- कुणी अमुक करतं म्हणून आपण तेच करावं, सगळे लोक ज्याला फॅशनेबल म्हणतात त्याला आपणही फॅशन म्हणून आपल्या अंगाखाद्यावर मिरवावं हेच मला मान्य नाही. ‘जस्ट बी युवरसेल्फ’ हेच मी स्वत:ला सांगते. वागणं-बोलणं-कपडे-मेक­अप आणि विचार हे सगळं आपलं आपल्यासारखं असलेलं बरं, किती अनुकरण करणार लोकांचं.? किती कॉपी करणार दुसर्‍याची? आणि मला सांगा का करायची मी कॉपी? कुणीतरी - कुठेतरी ठरवतं की, अमुक म्हणजे फॅशनेबल आणि आपण आंधळेपणानं तेच उचलून घ्यायचं, मला नाही पटत हे.!’

 


विद्या पुन:पुन्हा सांगते, ‘अमुकच म्हणजे फॅशन, तमुक म्हणजेच स्टायलिश असं काही नसतं. तुमचं काम हीच तुमची ओळख. तेच जर धड नसेल तर तुम्ही कितीही पुटं चढवली फॅशनची तरी तुम्ही वेगळे दिसतच नाही. कसं दिसणार? सगळ्या जणी साच्यातून काढल्यासारख्याच तर फॅशन करतात.’

 


विद्या एका वाक्यात सांगते, ‘जो भी करो, अपनी पर्सनॅलिटीके हिसाब से करो, बाकी जिन्हे जो समझना है समझे.!’

 


पण आता लग्नबिग्न झालं तिचं, असं स्वत:ला वाटेल तेच करण्याचं स्वातंत्र्य उरतं का लग्नानंतर.? का डोकावतातच ‘दुसर्‍या’ कुणाच्या आवडीनिवडी आपल्याही आयुष्यात.? कितीही नाही म्हणा बदलतंच प्रत्येकीचं आयुष्य लग्नानंतर, विद्याचंही बदललंच असणार.?

 


विद्या म्हणते, ‘बदललं ना, जबाबदारी आणि कामं वाढली फार. मी आणि माझा नवरा वेगळे राहतो, त्यामुळं घर आणि काम सांभाळता सांभाळता माझीही जगातल्या इतर बायकांसारखीच तारांबळ उडते. धावपळ होते. पण आपलं एक घर आहे, कुटुंब आहे, तिथं काम करून वेळेत परतायचं आहे, या भावनेनंही मस्त वाटतं. भराभर काम केलं की जायचं आपल्या घरी. मला वाटतं लग्नानं मला ही ‘सुरक्षित’ असण्याची भावना दिली. ‘अ सेन्स ऑफ सिक्युरिटी.’ खरंतर त्याच्याचसाठी मी लग्न केलं. आणि तशीही मी जरा जुनाट विचारांचीच आहे, लग्न न करता नुसतंच कुणाबरोबर राहणं मला काही जमलं नसतं. माझ्या दृष्टीनं नात्यातली कमिटमेण्ट सगळ्यात महत्त्वाची. उद्या मुलंबाळं झाली तर त्यांच्यासाठीही आईवडिलांचं लग्न झालेलं असणं तसं सुरक्षितच.’

 


विद्या वाक्य पूर्ण करता करता थांबते आणि म्हणते, ‘याचा अर्थ मी लगेच मुलाबाळांचा विचार करतेय असं नाही, जनरली काय होतं ते मी सांगतेय.! मुद्दा काय, तुम्ही जसे आहात तसेच तुम्हाला स्वीकारणारा लाईफ पार्टनर मिळाला तर लग्नही आनंदच देतं. पण त्याच्यासाठी तुम्ही बदलायला लागलात स्वत:ला तर तो वरवरचा बदल फार काळ नाही टिकत, उलट आपल्याला आपल्या गुणदोषांसह कुणी स्वीकारतंय म्हटल्यावर अधिक ‘अर्थपूर्ण’ होतं आयुष्य.!’

 


बदल हवाच असेल तर तो स्वत:साठी, स्वत:ला हवा म्हणून करायचा, ‘चालतं काय’ याचा विचार करून नाही, असं फॅशनच्या बाबतीत सांगणारी विद्या व्यक्तिगत जगण्याविषयीही तेच सांगते. तिला कुणी घनचक्कर म्हणो, पण असं जगूनच तर तिनं स्वत:चं एक स्थान निर्माण केलंय फिल्म इंडस्ट्रीत.

 


- तमाम सुंदर नट्यांच्या गर्दीत म्हणूनच तर ती वेगळी दिसते.!



लेखं- मेघना ढोके.


धन्यवाद - दै लोकमत.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...