रजनीकांतचे दत्तक वडील

स्वत:ला बालपणात वडिलांचे छत्र मिळाले नाही; पण हजारो मुलांच्या डोक्यावर वडिलांचे छत्र धरण्याचे शिवधनुष्य पेलणार्‍या माणसाचे नाव कल्याणसुंदरम्. सामाजिक कार्यकर्ते कल्याणसुंदरम् आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले आहेत. या ब्रह्मचारी राहण्यामागे कारण होते, की त्यांना आपली सगळी संपत्ती गरीब लोकांसाठी खर्च करायची होती.

शरीराने अगदी किरकोळ, पण चेहर्‍यावरून कायम आनंदी दिसणारे कल्याणसुंदरम् वयाने वृद्ध झाले आहेत. त्यांना स्वत:चे कुटुंब नाही; परंतु त्यांनी हजारो मुलांना आश्रय दिला आहे. त्यांना बोलायला खूप आवडते; परंतु त्यांचा आवाज ऐकताक्षणी असे वाटेल, जणू तुम्ही एखाद्या खूप लहान मुलासोबतच बोलत आहात. त्यांचा आवाज कणखर किंवा भारदस्त अजिबातच नाही. उलट, एखादा लहान मुलगा खूप ओरडून बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, असेच काहीसे वाटून जाते. इतक्या साधारण व्यक्तीने लक्षावधी रुपये दान करून अनेक मुलांची आयुष्ये साकारली आहेत, ही गोष्ट मात्र थक्क करणारी आहे. त्यांना अनेक मानचिन्हे व बक्षिसे मिळाली. प्रत्येक बक्षिसाची रक्कम त्यांनी लहान मुलांसाठी देऊन टाकली.

तमिळनाडूच्या एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या कल्याणसुंदरम् यांना अल्प वयातच वडील गमावण्याचे दु:ख पचवावे लागले. आईनेच त्यांचा सांभाळ केला आणि गरिबांसाठी काम करण्याचे संस्कार मनात रुजवले. आज ते सुमारे ७५ वर्षांचे झालेले आहेत. त्यांनी सर्व पगार गरजू मुलांसाठीच आयुष्यभर खर्च करण्याचा संकल्प केला व तो आयुष्यभर जपला.

काही लोक जीवनासाठी अनेक संकल्प करीत असतात. या महामानवाने मात्र जीवनालाच संकल्प बनवले. कल्याणसुंदरम् म्हणतात, ‘‘पैसे मिळविण्याचे तीन मार्ग आहेत. पहिला पैसे स्वत: कमावणे, दुसरा वारसा हक्काने पैसे मिळणे व तिसरा लोकांकडून दानरूपात मिळविणे; पण पैसे मला आकर्षितच करीत नाहीत. मला आनंद मिळतो तो स्वत: कमावलेला पैसा गरजूंसाठी खर्च करण्यातच.’’

कल्याणसुंदरम् यांचा जन्म ज्या खेड्यात झाला, ते अस्सल भारतातलं अठराविश्‍वं दारिद्रय़ानं पुजलेलं खेडं होतं. रस्ते, शाळा तर सोडाच; पण आगपेटी विकत घ्यायला दुकानसुद्धा नव्हतं. शाळा तर दहा मैल लांब. त्यांच्या लहानग्या पावलांना तर ती लांबच लांब वाटे. त्यातून त्यांना एकटे जावे लागे. आपला एकटेपणा दूर व्हावा म्हणून त्यांनी गावातल्या इतर मुलांना शाळेत येण्यास प्रोत्साहित केले. मुलांची फी भरणे, त्यांना पुस्तकं व गणवेश पुरवणे, असे मार्ग त्यांनी शोधून काढले. त्यांची युक्ती काम करू लागली. त्यांना सवंगडी मिळू लागले आणि मुलांना शिक्षण. त्यांची समाजसेवा अशीच नकळत सुरू झाली आणि मुलांसोबत गंमत करताना शाळेची वाटही सुखकर झाली.

याच वाटेने चालताना त्यांनी शिक्षणाची साथ सोडली नाही. ग्रंथालयशास्त्रातही सुवर्णपदक मिळविले व तमिळ साहित्य आणि इतिहासातसुद्धा एम.ए. केले. त्यांची पदवी मिळविण्याची जिद्दसुद्धा आगळीवेगळीच म्हणावी लागेल. त्यांना तमीळ भाषेत एम.ए. करायचे होते. त्यांनी कॉलेज गाठले. तिथल्या संस्थापकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, की कल्याणसुंदरम् यांनी इतर विषय निवडावेत; पण कल्याणसुंदरम् तमीळचाच आग्रह घेऊन बसले. अखेर एम.टी.टी. कॉलेजच्या संस्थापकांनी त्यांना प्रवेशही दिला आणि कल्याणसुंदरम् यांच्या पुढील शिक्षणाची सोयही लावून दिली.

आयुष्याच्या एका वळणावर ते आपल्या बालीश आवाजाला पार कंटाळून गेले होते. त्या न्यूनगंडातून आत्मघात करण्याच्या विचारात असताना त्यांची भेट झाली थामीझवानन या ‘व्यक्तिमत्त्व घडवा’ अशा आशयाचे पुस्तक लिहिणार्‍या लेखकाशी. या लेखकाने कल्याणसुंदरम् यांना मंत्र दिला, ‘‘तू कसा बोलतो, हे महत्त्वाचे नाही. लोक तुझ्याबद्दल कसे बोलतात, हे महत्त्वाचे.’’ या शिकवणीने गुरुमंत्राचे काम केले आणि कल्याणसुंदरम्नामक चालते-बोलते मंदिर उभे झाले.

अर्थदानाबद्दल कल्याणसुंदरम् सांगतात, की भारत-चीन युद्धाच्या वेळी पं. नेहरूंच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांनी आपली सोन्याची साखळी मुख्यमंत्री कामराज यांना दिली होती. त्या वेळी ते प्रथम वर्षामध्ये शिकत होते.

ग्रंथपाल म्हणून सेवा करताना कमावलेले सर्व पैसे ते गरजू मुलांसाठी खर्च करीत असत. स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी ते फावल्या वेळेत हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करून दोन वेळचे जेवत. सेवानवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कमही (सुमारे दहा लक्ष रुपये) त्यांनी गरजू मुलांसाठी देणगी म्हणून देऊन टाकली. संसार थाटला तर समाजसेवेला मुकावे लागणार, या कल्पनेने त्यांनी लहान संसाराऐवजी खूप मोठय़ा संसाराला पसंती दिली. गरिबीची खरी कल्पना यावी म्हणून कल्याणसुंदरम् रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपायचे.

मेलकारीवेलामकुलम इथे जन्म झालेल्या माणसाची ही अफलातून कथा. प्रत्येक मावळणारा दिवस त्यांच्या गरजूंसाठी काम करण्याच्या निर्धाराला बळ देत गेला. काही खादीचे शर्ट आणि धोतर जवळ बाळगणारा हा ‘गांधीवादी’ तिरुनलवेलीच्या मेडिकल कॉलेजला देहदानाचा संकल्प करून मोकळा झालेला आहे. हा नश्‍वर देह मृत्यूनंतरही विद्यार्थ्याच्या कामी यावा, असं त्यांना मनापासून वाटतं. त्याच्या सडपातळ देहात निर्धाराची माती कुठं लपली आहे, हे मात्र त्याच्यानंतरही सापडणं अवघडच आहे. त्यांची पायातली प्लॅस्टिकची चप्पल तर इतकी स्वस्त असते, की तिला चिखलसुद्धा चिकटत नाही. नवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम एका क्षणात दान करून ते मोकळे झाले.

स्वत: दु:ख भोगणार्‍या व्यक्तीला इतरांचे दु:ख कळते; पण कल्याणसुंदरम् यांचे बालपण अशा अभावांनी र्जजर नव्हते मुळी. ते एका श्रीमंत शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांना मिळणार्‍या खाऊच्या पैशातूनसुद्धा ते इतर मित्रांची मदत करू शकत; पण कनवाळूपणा कुठून आला कुणास ठाऊक? सेंट झेवियर कॉलेजमधील या पदवीधराने झोपडपट्टीतल्या मुलांच्या संगोपनाची कास धरली. आपल्याला समाजसेवेसाठी पुरेशी रक्कम मिळावी, या अपेक्षेने तमिळमध्ये प्रसिद्ध होणार्‍या ‘आनंद विकटन’ या मासिकाच्या संपादकांची भेट घेतली. आपल्या संस्थेला दान मिळण्याच्या उद्देशाने मासिकात लिहावे, हा त्यांचा हेतू होता. मासिकाचे संपादक एस. बालसुब्रह्मण्यम् यांना वाटले, की ते एखाद्या प्रसिद्धीला हपापलेल्या तरुणाशी बोलत आहेत. त्यांनी कल्याणसुंदरम् यांना ‘पहिली पाच वर्षे समाजसेवा करा, मग पाहू!’ असे सांगून बोळवण केली. त्यांच्या बोलण्याचा राग न मानता त्याची चांगली बाजू पाहून कल्याणसुंदरम् तेथून बाहेर पडले.

१९९२मध्ये तमिळनाडूत भयंकर पूर आला. या पुरात अनाथ झालेल्या १0,000 मुलांना कल्याणसुंदरम् यांनी दत्तक घेतले व सर्वार्थाने त्यांचा सांभाळ केला. त्यांच्या या सेवेने थोर शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी इतक्या प्रभावित झाल्या, की त्यांनी आपल्या घरी बोलावून कल्याणसुंदरम् यांचा सत्कार केला. पुढे सुब्बलक्ष्मींना एस. बालसुब्रह्यण्यम् यांच्या घरी एका लग्न समारंभात गाण्यासाठी आमंत्रित केले होते. कार्यक्रमासाठी त्यांना बालसुब्रह्मण्यम् यांनी पैसे देऊ केले असता, या गायिकेने त्यांना मिळणारे मानधन कल्याणसुंदरम् यांना द्यावे, अशी विनंती केली. भल्या-भल्यांना मोहिनी घालणार्‍या या माणसाला प्रत्यक्ष भेटण्यास एस. बालसुब्रह्मण्यम् उत्सुक होते. ही काळाची किमयाच होती, की काही वर्षांनी एस. बालसुब्रह्मण्यम् यांच्याच हस्ते कल्याणसुंदरम् यांचा सत्कार समारंभ होत होता. तोपर्यंत एस. बालसुब्रह्मण्यम् हे सर्व काही विसरूनही गेले होते. दोघांची भेट झाल्यावर कल्याणसुंदरम् यांचा आवाज ऐकून बालसुब्रह्मण्यम् यांना तो आवाज पूर्वी ऐकल्यासारखा वाटला. कल्याणसुंदरम् यांनी त्यांना पहिल्या भेटीच्या घटनेचे स्मरण करून दिले व योग्य मार्ग दाखविल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. बालसुब्रह्मण्यम् अवाक होऊन या व्यक्तिमत्त्वाकडे बघतच राहिले. दोघांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बालसुब्रह्मण्यम् यांनी सांगितलेल्या ‘५ वर्षां’ऐवजी तब्बल २७ वर्षे कुठल्याही प्रसिद्धीशिवाय ते आपले कार्य करीत होते. कमावलेली पै न् पै गरजूंसाठी खर्च करीत होते.

प्रसिद्धीपासून दूर राहण्याचे कारण विचारले असता, त्यांचं लहानसं उत्तर होत, ‘‘मला काम करण्यात आनंद मिळत होता. त्या आनंदात प्रसिद्धी मिळविण्यासारखं काहीच नव्हत!’’ बालसुब्रह्मण्यम् यांनी त्यांच्या मासिकातून ही सेवा जगासमोर आणली. त्यांची सेवा जगजाहीर झाल्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांना १ लक्ष रुपये रोख बक्षीस दिले.

या ‘दिलदार’ माणसाने तेही १ लक्ष रुपये जिल्हाधिकार्‍यांना अनाथांच्या शिक्षणासाठी दान करून टाकले. कल्याणसुंदरम् यांची इच्छा नसताना जिल्हाधिकार्‍यांनी या बातमीला प्रसिद्धी देऊन टाकली. मग तर त्यांच्यावर पुरस्कारांचा पाऊसच पडायला लागला. या दानशूराने एकाही दमडीला हात न लावता परस्परच सर्व पुरस्कार दान करून टाकले. ते म्हणतात, ‘‘वडिलोपार्जित संपत्तीतून दान करताना मला समाधान लाभले नाही. स्वत:ला मिळणारे पैसे असे सत्कारणी लागले, की बरे वाटते!’’ किती सोपे आहे हे तत्त्वज्ञान? पण जगायला किती अवघड? पण ते असे रोज जगतात आहेत. तेही वर्षानुवर्षे.

त्यांची ही सेवा व त्यांचे वाढते वय पाहून सुपरस्टार रजनीकांत याने कल्याणसुंदरम् यांना चक्क वडील म्हणून दत्तक घेतले. रजनीकांतच्या भावनांचा मान ठेवून कल्याणसुंदरम् यांनी दोन आठवडे त्या कुटुंबासोबत घालवले. अखेर ते त्यांना म्हणाले, ‘‘मला या मोहजाळात कैदी झाल्यासारखे वाटते आहे. मला सेवेच्या कामावर जाऊ द्या. गंजण्यापेक्षा झिजणे बरे नाही का?’’ रजनीकांत व लता या दाम्पत्याने त्यांना जड अंत:करणाने निरोप दिला. वडील दत्तक घेण्याची ही घटना बहुतांश लोकांनी पहिल्यांदाच ऐकली असावी.

तिरुनलवेली जिल्ह्यामधील नानगुरारी तालुक्याच्या मेलाकारुवेलांगुलम या लहानशा गावी दिनांक १0 मे १९४0 रोजी जन्म झालेला, वडिलोपार्जित सर्व संपत्ती दान करणारा, सेवेत असताना पूर्ण पगार दान करणारा व सेवानवृत्तीच्या सर्व रकमेसह गरजूंसाठी चेन्नईत ‘पालम’ (तमीळमधे सेतू) सुरू करणारा हाडामांसाचा माणूस या पृथ्वीवरच राहतो. यावर विश्‍वास कसा ठेवावा, हा प्रश्नच आहे.

प्रा. डॉ. शिरीष उर्‍हेकर ( दै. लोकमत )

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...