छत्तीस वर्षांपुर्वी टिळक मरण पावले त्यावेळी साऱ्या भारताला दुःख
झाले, पण त्या दुःखाचे स्वरुप सामुदायीक होते, वैयक्तीक नव्हते. गांधीच्या
मृत्युमुळे हजारो लोक घाव मोकळुन शोक करत आहेत, असा देखावा काहीसा पहावयास
मिळाला नाही. पण, डा.आंबेडकरांच्या मृत्युनंतर त्यांचे लक्षावधी अनुयायांचे
त्यांच्यावरील अमर्याद प्रेमाचे आणि त्यांच्या आकस्मिक मृत्युने त्यांना
झालेल्या अपरंपार शोकाचे जे ह्रदयद्रावक निदर्शन आम्हाला पहावयास मिळत आहे.
त्याला खरोखरच तुलना नाही.
आंबेडकरांचा मृत्यु हा प्रत्येक अस्पृश्याला आपल्या जन्मदात्या पित्याच्या
मृत्युसारखा वाटतो. आंबेडकरांच्या मृत्युची वार्ता ऐकुण त्यांच्या कित्येक
अनुयायांना दुःखतिरेकाने मुर्छा आली. कित्येक भिंतीवर डोके आदळुन शोक करु
लागले. आंबेडकरांचे शव जेव्हा सांताक्रुझच्या विमानतळावर आले, तेव्हा
जमलेल्या असंख्य अनुयायांनी ''बाबा आम्हाला सोडुन कसे गेलात हो!'' असा
हंबरडा फोडला. त्याने दगडाचे काळीज देखील दुभंगली असती. राजगृहात
अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह ठेवला असताना भोवतालच्या एक मैलाच्या
परीसरात त्यांच्या लेकरांचा प्रचंड महासागर जमला होता. त्याची कल्पना तो
डोळ्यांनी प्रत्यक्ष ज्यांनी पाहिली त्यांच्याखेरीज इतरांना कशी येईल...?
हिंदु कॉलोनीत राहणारे स्पृश्य हिंदु रहिवाशी तो अभुतपुर्व देखावा पाहुन
हतबद्ध झाले होते. डॉ. आंबेडकरांना देवाप्रमाणे मानणारे लक्षावधी लोक ह्या
मुंबई शहरात आहेत, ह्याची आम्हाला आजपर्यंत कल्पना नव्हती. स्मशानामध्ये
अग्नीसंस्काराच्या वेळी तर लोकांच्या शोकाचा महापुर अंतःकरणाचे बांध फोडुन
बाहेर पडला, आंबेडकरांच्या आणि कार्याचे आम्ही वर्णन जेव्हा करु लागलो..
तेव्हा लोक टाहो फोडुन एवढ्या मोठमोठ्याने रडु लागले कि, निसर्गालादेखील
त्यांचे सांत्वन करता आले नसते. साऱ्या स्मशानात आसवांचा अक्षरशः पाऊस
पडला. एका माणसासाठी लक्षावधी लोक अशाप्रकारे अश्रु ढाळताना आणि शोक करताना
आम्ही तरी कधी बघितले नव्हते आणि कोणी पाहिले असतील असे वाटत नाही.
लक्षावधी अनुयायांचे आंबेडकरांवर एवढे विलक्षण प्रेम का आहे....?? याच्या
स्पृश्य हिंदु समाजातील लोकांनी खरोखरच विचार करायला हवा. आंबेडकर जोपर्यंत
जीवंत होते तोपर्यंत अस्पृश्य समाजाला कोणाचे भय नव्हते, सरकारचे ना
स्पृश्य हिंदु जनतेचे. आंबेडकर म्हणजे सिंह होते, त्यांच्यापुढे उभे
राहण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती. आंबेडकरांनी एक डरकाळी फोडली कि
शत्रुच्या छातीत धडकी भरत त्यांचे विरोधक त्यांना चराचरा कापत असत. कोणी
कितीही विद्वान असला किंवा मुत्सुदी दिसला तरी त्याची आंबेडकरांसमोर डाळ
शिजत नसे. बुद्धीमता, चरित्र्य ह्यांचे ते हिमालय होते. अस्पृश्य समाजाला
केवढा आधार होता त्यांचा आज हिमालय ढासळला म्हणुन ते रडत आहेत. पाच हजार
वर्षात असा महान नेता त्यांना लाभला नव्हता, असा महान नेता कोणत्या जन्मी
लाभणार ह्या एका विचाराने त्यांची ह्रदये शतदा विदीर्ण होत आहेत !!
-अचार्य अत्रे यांचा लेख
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!