प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करून ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या
मुलांना शाळेची वाट दाखवण्याचे दावे शासनाकडून करण्यात येत असले, तरीही
प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य़ मुलांच्या संख्येत भारताचा क्रमांक जगात चौथा
आहे, तर जगात पौगंडावस्थेतील सर्वाधिक शाळाबाह्य़ मुलेही भारतातच आहेत.
युनेस्कोच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
युनेस्कोचा 'द एज्युकेशन फॉर ऑल ग्लोबल मॉनिटरिंग रिपोर्ट २०१३-२०१४' बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. मुलांचे पोषण, शिक्षण याबाबतची पाहणी युनेस्कोने केली.
बाल्यावस्थेतील मुलांची काळजी आणि शिक्षण, प्राथमिक शिक्षण, प्रौढ
साक्षरता, शिक्षणातील महिला आणि पुरूषांचे प्रमाण आणि शिक्षणाची गुणवत्ता
या मुद्दय़ांची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये भारतातील प्राथमिक
शिक्षणाचे वास्तव समोर आले आहे.
गेली अनेक वर्षे शिक्षणाचे
सार्वत्रिकीकरण करण्यासाठी झटणाऱ्या भारतामध्ये आज घडीलाही पौगंडावस्थेतील
सर्वाधिक शाळाबाह्य़ मुले आहेत. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू
झाल्यानंतरही दोन वर्षांनी जगातील सर्वाधिक शाळाबाह्य़ मुले असलेल्या
देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या जगात ५ कोटी ३० लाख
शाळाबाह्य़ मुले आहेत. त्यातील १ कोटीपेक्षा अधिक मुले भारतात आहेत. मात्र,
तरीही २००६ च्या तुलनेमध्ये भारतातील परिस्थितीत सुधारणा झाली असल्याचेही
या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २००६ च्या तुलनेत भारतातील शाळाबाह्य़
मुलांचे प्रमाण हे साधारण ७० टक्क्य़ांनी कमी झाले आहे. शाळांचे वाढते
शुल्क, शालेय साहित्याच्या वाढत्या किमती, शाळांमधील सुविधा, सामाजिक
जनजागृतीचा अभाव अशा काही कारणांमुळे मुलांना शाळेपासून दूर रहावे लागत
असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जगातील शाळाबाह्य़ मुलांच्या संख्येत २०१० च्या तुलनेत १० टक्क्य़ांनी घट झाली आहे.
सर्वाधिक शाळाबाह्य़ मुले असलेल्या जगातील पाच देशांमध्ये पहिल्या
क्रमांकावर नायजेरिया, दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान, तिसऱ्या क्रमांकावर
इथिओपिया, चौथ्या क्रमांकावर भारत, पाचव्या क्रमांकावर फिलिपाईन्स हे देश
आहेत. प्रौढ साक्षरतेच्या बाबतीत मात्र भारताची अवस्था चांगली असल्याचे
दिसत आहे. पन्नास टक्क्य़ांच्या जवळपास प्रौढ हे साक्षर असल्याचे या अहवालात
म्हटले आहे. महिलांच्या शिक्षणाबाबतही जगाच्या तुलनेत भारताची अवस्था
चांगली असून प्रौढ महिलांपैकीही साधारण ६० टक्के महिला साक्षर असल्याचे
दिसत आहे.
(साभार – लोकसत्ता)
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!