'पुरोगामी' होणे म्हणजे काय..??
स्वतःला 'पुरोगामी' विचारांचे म्हणवणाऱ्या माझ्या तथाकथित मित्रांना.... मैत्रिणींना.... माझे इतकेच सांगणे आहे कि, केवळ चार-चौघात आलो कि पुरोगामित्वाचे डोस देणे व मनातून वा घरात त्याच जुन्या बुरसटलेल्या विचाराचे पाईक असणे असे दुटप्पी वागणे आता बंद करा. बाहेर आल्यावर आम्ही कसे पुरोगामी विचाराचे? हे ओढून ताणून दाखवायचे नि घरात लग्न व शुभ कार्य असले कि, मुहूर्त पहायचे, पत्रिका बघायच्या, मंगळ-अमंगळ पहायचे, घरा-गाड्यांवर लिंबू-मिरच्या टांगायच्या तसेच केवळ ब्राह्मण वा खालच्या जातीतला आहे म्हणून समोरच्याला शिव्या घालताना स्वतः मात्र आपण 'क्षत्रिय किंवा वैश्य' (शेवटी चातुर्वाण्याचेच भाग) असल्याचा अवास्तव अभिमान बाळगायचा यालाच दुटप्पीपणा म्हणतात हे लक्षात घ्या. अशाने तुमच्या पुरोगामित्वाचा बुरखा टराटर फाटला जातो हे तुमच्या गावीही नसते; पण आम्हाला ते दिसते, जाणवते. ऐकिवात असलेला दुतोंडी साप मी प्रत्यक्षात पाहिलेला नाही परंतु अशा लोकांकडे पाहिल्यास ते खरेच अस्तित्वात आहेत याची जाणीव होते.
कुणी केवळ अमुक जातीचा वा धर्माचा म्हणून त्याचा राग वा कौतुक करू नका. आम्हाला ब्राह्मण विरोधी ठरवणाऱ्या महाभागांच्या लक्षात आले असेल कि नसेल हे आम्हाला माहित नाही, परंतु डॉ. दाभोलकर हे सुद्धा ब्राह्मण होते. परंतु त्यांच्या हत्येने आम्हाला झालेले दु:ख आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. कारण दाभोलकर सर हे ब्राह्मण होते कि आणि कोणत्या जातीचे? याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. पुरोगामी विचार स्वीकारलेला किंवा 'जुने जाऊ द्या मरणा लागुनी..." म्हणत आधुनिकतेची कास धरून त्याप्रमाणे चालणारा, चांगले बदल घडवून आणणारा माणूस हा 'आमचा' असतो... तोच सर्वांना 'आपला' वाटू लागतो. त्याला कोणती जात नसते, कोणता धर्म नसतो.. तो केवळ 'माणूस'च असतो... तुमच्या आमच्या सारखा..!!
तेव्हा 'पुरोगामी' होणे म्हणजे काय..?? तर माणसाला 'माणसाची' ओळख देऊन त्याला 'माणसासारखे' वागवणे होय, समानतावादी व विज्ञानवादी बनणे होय. कुणाचा जाणूनबुजून द्वेष करणे नव्हे..!!!!
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!