सरसकट सर्व ब्राह्मणांना दूषण लावणे हे अयोग्यच !!

सरसकट सर्व ब्राह्मणांना दूषण लावणे हे अयोग्यच !! 

 


 

मला समाजातील काही प्रवृत्तींचा विचार करता नवल वाटते. डॉ. बाबासाहेबांची चार पुस्तकं वाचून किंवा भगवान बुद्धाचे, कबिरांचे, ज्योतीबांचे ४ विचार वाचले कि त्यांना आपण फार मोठे झालो आहोत अथवा हे सगळे महापुरुष आपल्यालाच कळाले आहेत अशा अविर्भावात ते मग सरसकट सर्व ब्राह्मणांचा वा हिंदूंचा तिरस्कार करू लागतात, त्यांना दुषणे लावू लागतात आणि माझ्या मते ही समाजविघातक प्रवृत्ती आहे.





अगदी पूर्वकाळात सुद्धा होणार्या अन्यायावर लोक व धर्मक्षोभाची पर्व न करता परखडपणे मत मांडणारे, त्याला विरोध करणारे ब्राह्मण सुद्धा होतेच. त्याकाळात जसजसे शक्य झाले तसतसे याला विरोध करण्यात अशा ब्राह्मणांचा पुढाकार होता.डॉ. बाबासाहेबांच्या समीप असलेल्या लोकांत, चळवळीत सुद्धा ब्राह्मण होते, जे जन्माने ब्राह्मण असले तरी बाबासाहेबांच्या समतावादी विचारांनी पुरते प्रभावित होते. बुद्धाच्या भिक्खू संघात प्रचंड संख्येत ब्राह्मण होते, ज्यांनी विषमतावादी ब्राह्मण्य सोडून बुद्धाच्या वैज्ञानिक व समताधीष्टीत शिकवणुकीचा स्वीकार केला होता. परंतु ते केवळ ब्राह्मण आहेत किंवा तत्कालीन विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या हिंदू धर्मातील लोक आहेत म्हणून बाबासाहेबांनी वा बुद्धाने त्यांना झिडकारले नाही..तर त्यांच्यातील बदलाचे स्वागत करून त्यांना आपलेसे केले, स्वतःच्या नातेवाईकाइतके प्रेम व आदर त्यांना दिला. छत्रपति शिवरायांनी सुद्धा जातीचा हा भेद आपल्या मावळ्यांमध्ये कधी केला नाही. कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला मारणाऱ्या शिवरायांनी बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा तिरस्कार केला नाही. कारण जग तिरस्काराने नाही तर प्रेमाने जिंकता येते हीच या महापुरुषांची शिकवण.





त्यामुळे सरसकट सर्व ब्राह्मणांना दूषण लावणे हे अयोग्यच. असे करण्याने जे ब्राह्मण्याचा त्याग करून समाजात समता, बंधुता नांदावी यासाठी प्रयत्न करीत असतात, अशा माझ्या हिंदू व ब्राह्मण बंधूंवर अन्याय केल्यासारखा होईल. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन एकसंध भारत घडवायचाय कुणाला दुखावून नाही. चांगल्याचे चांगुलपण स्वीकारायला शिका. त्याला जाती व धर्माची जोड देऊ नका.खरे भेदी हे ब्राह्मणेतर सुद्धा असू शकतात, त्यांना ओळखायला शिका. कारण, ब्राह्मण्य (म्हणजेच विषमता) ही सर्व जाती-धर्मातील लोकांत समान आढळते, त्यासाठी जन्मतःच कुणी ब्राह्मण असण्याची गरज नसते. जिथे ब्राह्मण्य आढळेल तिथे विरोध हा कडाडून व्हायलाच हवा, पण सरसकट तिरस्कार नसावा. तेव्हा धर्म हे बंधुभावाचे उगमस्थान असावे, द्वेषाचे नव्हे.





विशेष टीप: लेखाचा गर्भितार्थ जाणून घ्यावा. या लेखाचा अर्थ आम्ही पूर्वी झालेले अन्याय, इतिहास विसरलो आहोत किंवा कुण्या कारणाने त्याकडे कानाडोळा करत आहोत असा होत नाही.लेखाची मानवतावादी बाजू समजून घ्यावी आणि मगच प्रतिक्रिया द्यावी.



लेखं- गौरव गायकवाड.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...