भटक्या-विमुक्त तरुणींचा संघर्ष !!
जग वेगाने बदलते आहे. त्या बदलाचा रेटा उपेक्षित वंचित थरालाही बसतो आहे. विशेषत: भटक्या विमुक्तांची युवापिढी या बदलांना कशी सामोरी जातेय याचा शोध घेतला जायला हवा. या वर्गाला सामाजिक प्रतिष्ठा नाही, आर्थिक पाठबळ नाही, की परंपरागत शिक्षणाची शिदोरीही गाठीशी नाही. त्यांच्या दिमतीला आहे फक्त भणंगपणा, असुरक्षितता, अभाव आणि कंगाली. दारिद्र्य रेषेखालील जगणे वाट्याला आलेल्यांची संख्या या समाजात ९४% आहे. केंद्र सरकारने २००६ साली नेमलेल्या रेणके आयोगाच्या सर्व्हेप्रमाणे ९८% लोक भूमिहीन आहेत. ७२% लोकांकडे रेशनकार्ड नाही. ९८% लोकांना बॅंकेचे अर्थसहाय्य मिळालेले नाही. हे लोक पालावर किंवा झोपडपट्तीत राहतात. त्यांचे हातावर पोट असते. त्यांच्या वाट्याला सदैव हिडीसफिडीस येत असते. हा देशातील सगळ्यात दुर्बल, दुर्लक्षित घटक असुन तो सर्वाधिक निरक्षर, गरीब आणि साधनहीन वर्ग आहे.
सोलापुरच्या आश्रमशाळांना जोडुन मुलांच्या उमलत्या वयात त्यांच्यामधील अंधश्रद्धा घालविण्यासाठी, निसर्गशेती आणि कष्टाच्या माध्यमातुन त्यांना स्वता:च्या पायावर उभे करणे, विचारी, विज्ञाननिष्ट बनविणे यासाठी "जीवन शिक्षण प्रकल्प" आम्ही राबवला. सुरुवातीला या उपक्रमात मुलींचा सहभाग नव्हता. आम्ही प्राधान्यक्रम बदलायचे ठरवले. उपक्रमात मुली याव्यात यासाठी खास प्रयत्न केले. हळुहळु यश येवु लागले. या शिक्षण उपक्रमातुन तयार झालेल्या १२ मुली पुढे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकायला गेल्या. त्यांनी आभियांत्रिकीचे उच्चशिक्षणही घेतले. त्या शिकल्या नी स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. आता त्या मोकळा श्वास घेत आहेत. एका पिढीत त्यांनी घेतलेली ही भरारी ग्रामिण भागात कौतुकाचा विषय ठरली. या मुलींमधे जन्मजात उर्जा असतेच. संधी मिळाली की ती झेप घेते.
भटक्या प्रवृतीमुळे आईवडील एका गावी स्थीर नसल्याने मुलांचे शिक्षण होवु शकत नाही. त्यातल्या त्यात मुलींना शिकवण्याची तर कल्पनाच त्यांच्या मनाला शिवत नाही. मुली शिकल्यासवरल्या तर त्यांच्या लग्नासाठी अडचणी येणार अशी भिती मनात असते. या घटकांकडे बघण्याचा सर्वसाधारण समाजाचा दृष्टीकोनही ब-याचवेळा पुर्वग्रहदुषित असतो. त्यामुळे जिद्दीने कुणी आपल्या मुलामुलींना शिकवायचे व मुलांनी शिकायचे म्हंटले तरी कशी परवड वाट्याला येते त्याचे एक उदाहरण फ़ार बोलके आहे. परभणी जिल्ह्यातील सुमन भैरोबा पवार या पारधी जमातीच्या मुलीला तिच्या आईवडिलांनी शिकवायचे ठरविले. भटकेपणामुळे वेगवेगळ्या गावात शिकवावे लागले तरी त्यांची तयारी होती. जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील नरलाद गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पाचवीत तिचा प्रवेश घेतला. गावातील प्रमुख पालकमंडळी बिथरली, म्हणाली "पारधी मुलीच्या संगतीने आमची मुले बिघडतील. शाळेत पारध्यांची मुले मुली असताच कामा नये." सरपंच, पंचायत सदस्य, गाव पाटील व कर्तेधर्ते लोक यांनी मुख्याध्यापकांना निक्षून सांगितले की, पारधी मुलीला शाळेतून काढून टाका नाही तर आम्ही आमची मुले शाळेत पाठवणार नाही, मग शिकवा एकट्या पारध्याच्या पोरीला. अशा तर्हेने मुख्याध्यापकावर दबाव आणुन सुमन भैरोबा पवार या पारधी मुलीस जबरदस्तीने शाळा सोडल्याचा दखला देउन शाळेतुन काढुन टाकण्यात आले. लोकधाराच्या स्थानिक पदाधिकार्यांनी या प्रकरणाला वाचा फ़ोडली. आम्ही प्रक्ररण धसास लावायचे ठरवले. राष्ट्रीय आयोगाने राज्य शासनास या प्रकरणात लक्ष घालण्याची शिफ़ारस केली. विधानसभेत हा प्रश्न चर्चेस आला. संबंधितावर कारवाई करण्यात आली. सुमनची शाळा पुन्हा एकदा सुरु झाली पण दुस-या गावात. तिचे एक वर्ष वाया गेले. पुढे ह्या मुलीने जिल्हा पातळीवरील आंतरशालेय उंच उडी क्रिडास्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. राज्यस्पर्धेसाठी तिची निवड झाली. सुमन म्हणते, "आमची गणती माणसात केलीच जात नाही. चळवळीमुळे आम्हाला आधार व न्याय मिळाला, नाहीतर काही खरे नव्हते." अशाप्रकारे शिक्षणाच्या संधी नाकारल्या गेलेल्या भटक्यांच्या लाखो मुली आज देशात आहेत.
चोरी करणे किंवा भिक मागणे हे नेहमीच वाईट आहे. पण चोरी केल्याशिवाय किंवा भिक मागितल्याशिवाय असंख्यांना जगताच येणार नाही अशी व्यवस्था असणे त्याहून जास्त वाईट समजले पाहीजे. दुबळ्यांचे शोषण करुन त्यांची भूक भागविणे आणि भूक वापरुन त्यांचे शोषण करणे हे परंपरेने चालत आलेल्या विषम समाजव्यवस्थेचे लक्षण आहे. आजही राजकारणी, जमिनदार, पोलिस व गुंड यांच्यापैकी काही लोक ही शोषणव्यवस्था मोठ्या खुबीने जपताना दिसतात. जन्मत: गुन्हेगार समजण्याचा कलंक ज्यांच्या माथी लागला आहे त्या तरुणांनी या सापळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी पोलिस व गावगुंड ते विफ़ल करण्याचा प्रयत्न करतात.
आधुनिकीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण यावर आधारित विकासप्रक्रियेचाही त्यांच्यावर विपरित परिणाम झालेला आहे. राजस्थानमधील बनासकाठा येथील सरानिया जातीचे लोक सायकलवर फिरुन चाकुला धार लावायचे परांपरागत काम करीत असत. आजकाल या कामाची गरजच उरलेली नसल्याने स्त्रियांना नाईलाजाने पोटापाण्यासाठी समाजाला मान्य नसलेला रस्ता स्विकारावा लागला. त्या अप्रतिष्टीत व्यवसायात ढकलल्या गेल्या. टिव्ही, सिनेमा, यासारख्या करमणुकींच्या आधुनिक साधनांमुळे अनेकांचा परंपरागत व्यवसाय बुडाला. बहुरुप्यांचे सोंग घेऊन आपल्या अभिनय कौशल्याने लोकांची करमणुक करुन काही मुले पोट भरतात. काही तरुण साडी नेसून हिजड्याचे सोंग घेउन भिक मागतात. गेल्या जून महिन्यात नागपूरमधील कळमना भागात चार बहुरुपी तरुण भिक्षा मागायला गेले. त्यांना चोर समजुन वस्तीतील लोकांनी दिवसाढवळ्या दगडांनी ठेचुन मारले. तिघेजण जागेवरच मेले. अर्धमेल्या अवस्थेमधला एक पोलीसांच्या मदतीमुळे दवाखान्यातील उपचारानंतर कसाबसा वाचला. या हत्याकांडाची पुरोगामी महाराष्ट्रात साधी चर्चासुद्धा झाली नाही. भटक्या जमातींच्या संघटनांनी मोर्चे, निदर्शने, कॅंडल मार्च, शिष्ट्मंडळे इत्यदी मार्गांनी निषेध नोंदवला. केवळ संशयावरुन लोकांचा जमाव एव्हढा क्रुर कसा होतो? दिल्लीच्या बलात्कर प्रकरणात संतप्त तरुणाई रस्त्यावर आली. इथे भटक्या जमातींचे निर्दोष तरुण हकनाक मेले असताना मानवी हक्कासाठी लढणा-या अनेक संघटना गप्प राहिल्या. मिडियाबाबतही हाच अनुभव आला. एरव्ही पाचपाच लाखांची भरपाई देणार्या सरकारने या भटक्यांच्या गरिब बायकांना मात्र मोठया मुश्किलीने एक लाख रुपये दिले. या महिलांचे माहेर आणि सासर दोन्ही साधनविहिन. सरकार आणि समाज उदासीन. त्यांनी जावे तर जावे कुठे? मुलींची लग्ने लहान वयात झालेली असतात. पोरवडा वाढलेला असतो. २५ किंवा ३० वयाची मुलगी एव्हाना चारपाच मुलांची आई झालेली असते. नवर्याने सोडलेल्या मुली परित्यक्तेचे जिणे जगत राहतात. विधवा आणि परित्यक्ता यांची स्थिती फारशी वेगळी नसते. समाजात दैववादाचा पगडा असतो. अंधश्रद्धांचा बुजबुजाट झालेला असतो. जातपंचायती पुरुषप्रधान असतात. सगळीच मानसिकता पराभुत आणि परिस्थितीशरण असते. लाचारी, भणंगपणा यामुळे प्रबोधन, वाचन, चिंतन यांचा मागमुस नसतो.
ऐतिहासिक विकास प्रक्रियेत झालेल्या उलथा-पालथी व फेरबदल यांचा परिणाम म्हणून भटक्या जमातींच्या जगण्यातही अनेक बदल झाल्याचे स्पष्ट दिसते. जसे प्राचिनकाळी एकसंघ असलेल्या नाथ संप्रदायाचे डवरी गोसावी, नाथ जोगी, जोगी, गारपगारी, किंगरीवाले, भराडी असे वेगवेगळे गट पडले. मिळेल तो व जमेल तो मार्ग उपजिविकेसाठी स्वीकारण्यात आला. भटकत भटकत मुंबईत दाखल झालेल्या नाथपंथी डवरी गोसावी जमातीच्या लोकांनी स्टोव्हदुरुस्ती, छ्त्र्यादुरुस्ती, रद्दी कागदाचा व्यापार, भंगार गोळा करणे आणि विकणे तसेच परंपरागत पद्धतीने नाथाच्या-गोसाव्याच्या रुपात भिक्षा मागणे इ. व्यवसाय स्विकारले. व्यसानाधिन किंवा दुबळ्या पुरुषांच्या कुटूंबातील महिलांनी गायींच्या आधारे उपजिविका करण्याचा मार्ग स्विकारला. ८० वर्षांपासून मुंबईत हा व्यवसाय चालू आहे. वेगवेगळ्या मंदिरांपुढे या महिला गाया घेवुन बसतात. देवदर्शनाला येणारे भाविक गाईच्या पुजेचे पुण्य पदरी बांधून घेण्यासाठी त्या बाईजवळचाच चारा विकत घॆवून त्या गायीला खावु घालतात. या कमाईवर त्या बाईचे घर चालते. मुंबईत एक हजार कुटुंबे गायीवर जगतात. ते सगळे चेंबुर, घोडपदेव, शिवडीभागातील झोपडपट्ट्यात राहतात. ह्या गाया दुधवाल्या भय्यांकडुन भाड्याने आणलेल्या असतात. या महिलांच्या घरातील तरुण व्यसनाधिन किंवा बेरोजगार आहेत. शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना काही भविष्यच नाही. मुंबईचे शांघाय करायला निघालेल्या मुंबई महापालिकेने MCGM 441 C Rule (Impounding of Cattle) या नियमाप्रमाणे या गायवाल्या महिलांच्या पोटावर पाय द्यायला सुरुवात केली अहे. मंदिरापुढे गायी घेउन बसलेल्या या महिला गायी घेउन परत जाताना ती जागा स्वच्छ करुन किंवा सारवून जातात. दिवसभर रहदारीला, लोकांना, भक्तांना त्रास होणार नाही अशारितीने एका कडेला बसलेल्या असतात. तरीपण गाई जप्त करुन त्यांच्यावर खटले भरले जातात. दहा हजार रुपयांचा दंड या महिलांना केला जातो. एवढी मोठी रक्कम त्यांना परवडत नाही. दुधवाल्या भय्यांकडुन घेतलेल्या गायी तर परत कराव्याच लागतात. त्यामुळे ही सारी कुटूंबे जबर व्याजाच्या कर्जाखाली दबलेली आहेत. या महिलांच्या व्यवसायाला अभय देवून त्यांच्या कुटूंबातील इतर मुलामूलींना योग्य त्या कौशल्याचे प्रशिक्षण देवून त्यांना उद्योग व्यवसायासाठी संधी व साधने पुरविली तर येत्या ५/१० वर्षात त्यांना मंदिरापुढे गायी घेवून बसण्याची गरज भासणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबईत पाल किंवा झोपडीत राहणा-या या कुटुंबाना हक्काचे घर आणि एक पर्यायी व्यवसाय मिळणे हे त्यांचे निकडीचे व ऐरणीवरचे प्रश्न आहेत.
महाराष्ट्र शासनाला सादर केलेला बारबाला संदर्भातला सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा काळेंचा सर्व्हे सांगतो की, ८०% बारबाला ह्या नट, राजनट, डोंबारी, कोल्हाटी, बेडीया, सरानिया, कालबेलिया, कबूतरा, पेरणा इ. साधनविहिन भटक्या जमातीतून आलेल्या आहेत. ठिकठिकाणी विखूरलेल्या या जमातींच्या कुटूंबाना पोसण्याची जबाबदारी या बारबालाच पार पाडतात. डान्सबार बंद केले गेले. पण बेकार झालेल्या बारबालांच्या निराधार कुटूंबियांना सन्मानाने जगण्याचा मार्ग व साधने पुरविली गेली का?
भटक्या जमातीतील निरक्षर महिलांच्या कर्तृत्वाचा एक उत्साहवर्धक अनुभव आहे. सोलापूर येथील निसर्गेशेतीच्या प्रयोगात दोन महिलांचा सहभाग आहे. या प्रयोगाला महाराष्ट्र शासनाचा ’सेंद्रिय शेतीचा शिल्पकार’ हा किताब मिळाला आहे. या महिलां म्हणजे शेती क्षेत्रातल्या प्राध्यापक आहेत असे प्रयोगास भेट देणारे अनेक शेतीतज्ञ मानतात. त्या त्यांचे अनुभव व आकलन त्यांच्या भाषेत समजावून सांगतात. प्रत्यक्षात हुकमी व विक्रमी उत्पादन काढतात. तरुणींच्या व महिलांच्या हातात जादु आहे. त्या मेहनती व प्रतिभावंत आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण, संधी व साधने दिल्यास सर्वांचेच भविष्य उज्वल आहे.
या समाज घटकात भिन्न व्यवसाय, भिन्न भाषा, भिन्न देव-देवता आणि जातपंचायतीचे भिन्न नियम असून त्यांच्यात जाती व्यवस्थेची उच्च-निचता पूरेपूर भरलेली आहे. रस्त्यावर भिक्षा मागून जगणा-या या जमातीच्या तरूणींना दिल्लीच्या तक्तावर कोणा पक्षाचा कोण माणुस बसलेला आहे याचे काहीही सोयरसुतक नसते. कॉंग्रेस, भाजपा, कम्युनिस्ट या पक्षांच्या विचारधारा, सामाजिक मतप्रवाह, फ़ॅशन, आधुनिकता,स्त्रीमुक्ती, मानवी हक्क यांची बर्याचजणींना प्राथमिक ओळखही नसते. अशा तरुणींचे संघटन करणे अत्यंत कठिण असले तरी गरजेचे आहे. देशातील या जमातींची लोकसंख्या सुमारे १३.५ कोटी असुन त्यातल्या सात कोटी महिला आहेत. यात सुमारे चार कोटी एव्हढ्या मोठ्या संख्येने असणार्या तरुणींबद्दल बोलताना सरसकट विधाने करणे अवघड अहे. सर्वत्र दिसणारा कल आणि प्रातिनिधिक चित्र रेखाटायचा हा प्रयत्न आहे.
लोकशाही संघटित व जागृत समाज घटकांना न्याय देते. शासनाचे लक्ष प्रभाविपणे वेधून घेण्यासाठी देशभरातील सर्व जमातींच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्र करुन एक सामुहिक व्यासपीठ उभारावे ही कल्पना पुढे आली. तरुणतरुणींच्या पुढाकारातुन "लोकधारा राष्ट्रिय समन्वयाची" निर्मिती करण्यात आली. ही नॅशनल ऍडव्हायझरी कौन्सिल, केंद्रीय नियोजन आयोग तसेच सामाजिक न्याय मंत्रालय यांना तळातल्या वास्तवाची माहिती व तज्ञ सल्ला पुरविणारी देशातील १८ राज्यात कार्यरत असलेली संघटना आहे. भटक्या-विमुक्त समाजातील तरुणतरुणींमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांना श्रम व प्रतिष्टेवर आधारित व्यवसाय परिवर्तनाकडे नेणे, गुन्हेगारीचा शिक्का पुसणे आणि संघटित शक्तीच्या जोरावर त्यांना राजकीय निर्णयप्रक्रियेचा घटक बनविणे, विकासाची व्यापक दृष्टी देणे, नेतृत्व विकासासाठी प्रयत्न करणे यावर संघटनेचा भर आहे.
या समाजातील काही तरुणी आणि महिलांची उदाहरणे बघितली की त्यांच्या जगण्यातील आजची गुंतागुंत आणि संघर्षगाथा कळते. गंगु भटक्याविमुक्तातील मुंबई महानगरात राहणारी एक तरुणी. केंद्र सरकारच्या उपक्रमात नोकरी करणारी. भटक्यातल्याच पण वेगळ्या जातीच्या तरुणाच्या प्रेमात पडलेली. मुलाला पदवीधर असुनही चांगली नोकरी नसल्यामुळे तिच्या या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. पण ती ठाम होती. तिने निर्धाराने हे लग्न केले. पुढे मुलाला चांगली नोकरी मिळाली. दोघेही सामाजिक परिवर्तनासाठी झोकुन देवुन काम करु लागले. स्वत: सन्मानाचे जीवन जगत त्यांनी एक संघटना उभारुन तिच्यामार्फत अनेकांचे संसार उभे केले.देशातील सर्वाधिक असंघटित असणार्या व विखुरलेल्या या जातीजमातींना एकत्र करण्यासाठी मंच निर्माण केला.
क्षमाली एका लेखकाची, नेत्याची मुलगी. तिचे वडील बंडखोर आणि मनस्वी होते. ते नोकरीत असताना सामाजिक अन्यायाचे बळी ठरले. नोकरी गमवावी लागली. सहा बहिणी आणि एका भावाला सांभाळण्याची जबाबदारी अचानकपणे क्षमालीच्या अंगावर आली. लहान वयात परिक्षा बघणारी बरीच संकटे आली तरी मोठ्या जिद्दीने आणि हिंमतीने तिने घर सावरले. रांगेला लावले. तिचे हे धाडस अनेक मुलींना प्रेरणादायी ठरले.
सीमा एक नृत्यांगना आणि रंगकर्मी. करियर उभारण्यासाठी मेहनत घेणारी.तिने आवडलेल्या मुलाशी घरच्यांच्या विरोधात जावुन लग्न केले. नोकरी, संसार, घर चालवण्यासाठी तिची सतत धडपड चालु असते. लहानपणापासुन नास्तिक घरात वाढलेली असुनही पती आणि सासरच्या मंडळींसाठी सारे देवधर्म सांभाळताना तिची तारांबळ होत असते.
श्वेता एका मेंढपाळ कुटंबातल्या पत्रकाराची मुलगी. ग्रामीण भागात वाढलेली, शिक्षण घेतलेली. पुढे उच्च शिक्षणासाठि मुंबईत आलेली. सामाजिक विज्ञानाचे उच्चशिक्षण घेतानाच एका होतकरु दलित मुलाच्या प्रेमात पडली. जिद्दिने विवाह करुन आता नॊकरी व संसार करणारी.बहिणीच्या उच्च शिक्षणासाठी माहेर आणि नवर्याच्या पुढील शिक्षणासाठी सासर अशा दोन्हींना बळ देण्यासाठी कार्यरत असलेली.
संगिताचा विवाह एका डॉक्टरशी झाला होता. तिचा नवरा लेखक नी कार्यकर्ता होता. त्याचे लेखनामुळे जसजसे नाव होवु लागले तसतशी डोक्यात हवा जावु लागली. आर्थिक कमाईसाठी कष्टांऎवजी कर्जाचे डोंगर उपसण्याकडे कल वाढु लागला.थातुरमातुर उद्योग उभे करण्यात आले. लवकरच देणेकर्यांचा तगादा चुकवण्यासाठी परागंदा होण्याची वेळ आली. त्यातच अकाली अपघाती मृत्यू झाला. नवरा वारला तेव्हा संगिताच्या पदरात एक मुलगा होता.विवाहामुळे संगिताचे शिक्षण अर्ध्यावरच सुटलेले होते. तिने ते पुन्हा सुरु केले. चांगली नोकरी मिळवली. मुलाला शिकवले. पुढे एका चांगल्या अधिकार्याकडुन तिला लग्नाची मागणी आली. पण मुलाच्या भवितव्यासाठी तिने पुनर्विवाह करायचा नाही असा निर्णय घेतला.
मराठवाड्यातील सलमा. तिची आई भटक्याविमुक्त समाजातील तर वडील ब्राह्मण.प्रागतिक विचारांचे आईवडील सार्वजनिक कामात रमलेले. दुर्धर आजाराशी झुंझताना वडील अकाली गेले. सलमाने उच्च शिक्षण घेवुन.एका सामाजिक कार्यकर्त्याशी विवाह केला. आईवडीलांचा सामाजिक कामाचा वारसा चालु ठेवला. तिची बांधिलकी सेक्युलर विचारधारेशी आहे.
विमलताईचे आत्मकथन लक्ष वेधुन घेणारे ठरले.ती गावखेड्यातुन शहरात आलेली. नवर्याच्या प्रोत्साहनामुळे शिकली.लेखिका झाली.
किरण एक गरिब तरुणी. स्पर्धा परिक्षेत यश मिळवुन उपविभागीय अधिकारी झाली. परंपरेने नाचगाणे करुन पोट भरणार्या कोल्हाटी समाजातील ही मुलगी आज उत्तम प्रशासकाचा पुरस्कार मिळवते हे तिचे यश अभिमानास्पदच म्हटले पाहिजे.
सारिका एका विस्कळीत कुटुंबातील मुलगी. आईवडील भुकंपात वारले. नर्स असलेल्या मोठ्या बहिणीने तिला शिकवले. सारिकाने जिल्हा परिषदेत नोकरी मिळवली. तिच्यापेक्षा कमी शिकलेल्या एका मुलाशी तिने प्रेमविवाह केला. नवर्याला पुढे ५ वर्षांनी चतुर्थ श्रेणीतील नोकरी मिळाली. सारिकाच्या बहिणीची मात्र शोकांतिकाच झाली. सगळ्या कुटुंबाची जबाबदारी पेलतापेलता तिची फार परवड झाली. शोषण झाले.
भिक्षेकरी समाजातील दिगंबर आणि त्याची बायको अनुसया यांनी महापालिकेची निवडणुक लढवण्यासाठी खुप वर्षे मेहनत केली. वा‘र्ड बांधला. वा‘र्ड ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने अनुसया खुष होती.ती निवडुन येणार असा तिला आत्मविश्वास होता. रातोरात चक्रे फिरली. सत्ताधारी जातीच्या एका बाईंनी जातीचे खोटे सर्टिफिकेट मिळवुन आरक्षणात घुसखोरी केली.जातीची व्होटबं‘क वापरुन बाई अल्पशा बहुमताने निवडुन आल्या.न्यायासाठी अनुसयाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.तात्रिक प्रक्रियेत ५ वर्षे आरामात निघुन गेली.भटक्यांच्या ताटातला घास पळवण्यात आला. न्याय मिळेपर्यंत ५ वर्षे संपुन गेली होती.
अलकाताई आणि उज्वलाताई या राजकिय पक्षात काम करणार्या तरुणी.महत्वाकांक्षी,मेहनती. महिला आरक्षणामुळे अलकाताईला महत्वाच्या पदावर जावुन निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली.
या समाजातील बहुतेक तरुणींना घरातील तसेच सामाजिक निर्णयप्रक्रियेत काहीच स्थान नसते. उपजिविकेसाठी जिवनाधारच नसल्याने जगणे सैरभैर असते. महिलांचे तर माहेर आणि सासर दोन्ही साधनविहिन असतात. हक्काचे घर नाही, सामाजिक प्रतिष्टा नाही. भविष्याची कोणतीही तरतुद नाही.अशा हिंदोळ्यावर जगताना पुरुष व्यसनी बनतात. बायकांना मारहाण करु लागतात. उत्तरप्रदेशातील बुंदेलखंडमधील मेंढपाळसमाजातील संपत पाल या महिलेने या कौटुंबिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी "गुलाबी गॅंग" स्थापन केली. मार खाणार्या महिला एकत्र आल्या आहेत. प्रेमाने सांगुनही जे नवरे ऎकत नाहीत त्यांना संघटनेच्या माध्यमातुन चोप देण्याचा कार्यक्रम केला जातो. आज या संघटनेच्या २२००० हजार सदस्य आहेत. यावरुन कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न किती भयावह आहे त्याची कल्पना येवु शकेल. भटक्या समाजातील एक महिला पुढाकार घेते आणि तिचे एका चळवळीत रुपांतर होते ही घटना महिला चळवळीसाठी ल्क्षणीय होय.
ही काही अपवादात्मक उदाहरणे बघितली की अशा अंधारमय परिस्थितीतही परिवर्तनाची चाहुल लागते. हा तरुणींचा बदलता चेहराच उद्याच्या भारताचा नकाशा उजळवुन टाकु शकेल.
संदर्भ- http://pallavi-renake.blogspot.in/2013/07/blog-post_31.html
लेखं- अॅड. पल्लवि रेणके.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!