..तेच खरे दलित साहित्य!

चंद्रपूर येथे ४ मार्च १९८९ रोजी झालेल्या अखिल भारतीय मराठी दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी पुलंनी केलेल्या भाषणाचे संकलन..
मित्रहो,
दलित साहित्य संमेलनाला जमलेला हा नुसता समुदाय नाही. माणसांच्या गर्दीच्या रूपाने दिसणारी फुले, आगरकर, आंबेडकरांनी जिवाची तमा न बाळगता ज्ञानाग्नीला साक्षी ठेवून केलेल्या तपाला आलेली फळं आहेत. त्यापुढे मला उभं राहायला मिळणं हा मी माझ्या आयुष्यातला धन्यतेचा क्षण मानतो. 'जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत' या भावनेला दाद देणारा एक मित्र तुम्ही माझ्यात पाहिलात याचं मला समाधान वाटलं.
परंपरेने डोळे मिटून स्वीकारलेल्या साहित्यविषयक, कलाविषयक, समीक्षाविषयक आणि साक्षात vv02इतिहासविषयक कल्पनांना एखाद्या स्फोटासारखा नकार देत विद्रोही साहित्य ज्वालांच्या इंद्रधनुष्यासारखं मराठी साहित्याच्या आकाशात दिसायला लागलं. केशवसुतांच्याच 'परि एक एक जो नवा शब्द तू शिकसी, शक्ती तयाची उलथिल सर्व जगासी' या ओळीचा जबरदस्त प्रत्यय आला. दलित जीवनातल्या दु:खाचं यापूर्वी दर्शन घडलं नव्हतं असं नाही. या बाबतीत माटे मास्तरांचा उल्लेख जरूर करायला हवा; पण हे दर्शन आणि आंबेडकरी प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या या नव्या कवींनी, कथाकारांनी आणि आत्मचरित्रकारांनी घडवलेले दर्शन यात जमीन-अस्मानाचा फरक होता. आजवर हे दर्शन सद्हेतूनंच घडवलेलं होतं; पण त्यामागं प्रयोजन दलितेतर समाजात दलितांविषयी सहानुभूती निर्माण व्हावी हे होतं. त्या समाजात जुन्या बुरसटलेल्या शोषक जगाला उलथविण्याची शक्ती निर्माण व्हायला पाहिजे, ही आच नव्हती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असते असं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे 'धम्म'. धम्म या शब्दानं समाजात माणसांचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी 'धम्म' म्हटलं. बाबासाहेबांनी धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला असं झालं नाही, तर निखळ आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला.
गावकुसाबाहेर राहणाऱ्यांना गावातला माणूस ठाऊक होता तो आपल्याला रक्त फुटेस्तोवर कष्ट करायला लावून मोठा उपकार केल्यासारखा शिळ्या भाकरीचा तुकडा टाकणारा, आपल्या सावलीलासुद्धा अपवित्र मानणारा असा एक हुकूमशहा एवढंच आणि गावातल्या माणसांच्या लेखी गावकुसाबाहेर राहणारा माणूस म्हणजे दारोदारी झाडलोटीपासून ते मलमूत्रांची घाण उपसण्याची 'नियतं कर्म कुरु' ही साक्षात भगवंताची आज्ञा पाळण्याशिवाय गत्यंतर नसलेला आणि बरेचसे कष्ट नि भूतदयेपोटी घातलेली भीक एवढय़ावर जगणारा एक मनुष्यधारी प्राणी एवढंच ठाऊक असायचं. अशा या उन्मत्तांच्या टाचेखाली रगडल्या जाणाऱ्या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं.
चवदार तळ्याचं पाणी सर्वाना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रूढी पाळणाऱ्या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती. आज आपण ज्याला विद्रोही दलित साहित्य म्हणतो, त्याच्या निर्मितीमागची शक्तीही बाबासाहेबांनी जागवलेल्या या आत्मविश्वासातून लाभली आहे, असं मला वाटतं. या घटनेपासून दलित समाजात जे नवचैतन्य निर्माण झाले त्यातूनच आपल्या जीवनाची कथा ही कुठल्याही सहानुभूतीची, दयेची किंवा औदार्याची अपेक्षा न बाळगता रोखठोकपणानं मांडली गेली.
जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्च-नीच भेद ठरविणाऱ्या रूढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. विद्रोहाला मानतं. मग तो विद्रोह स्त्री-मुक्तीविषयक असो, स्पृश्यास्पृश्य भेदाविरुद्ध असो, आदिवासींच्या पिळवणुकीबद्दल असो, भटक्यांच्या जीवनातल्या यातनांबद्दल असो, नरकाची दहशत आणि स्वर्गाची भुरळ घालून फसवणाऱ्या बुवा-बाबांबद्दल असो, या अनिष्ट गोष्टींशी विद्रोहाची भूमिका घेऊन जे साहित्य उभं राहतं ते दलित साहित्य.
जीवनात विज्ञाननिष्ठा न मानता बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग जपासाठी आणि पूजेसाठी व्हायला लागला, तर एका महान क्रांतीच्या इतिहासातील ती भयानक शोकांतिका ठरेल. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल; पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी, यासाठी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे असं मी मानतो.
(शांता शेळके संपादित आणि परचुरे प्रकाशन प्रकाशित पु. ल. देशपांडे यांच्या 'मित्रहो' या पुस्तकाच्या सौजन्याने)
संकलन- शेखर जोशी
दै. लोकसत्ता

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...