चर्मकारानो, 'हरि'जन होऊ नका !!

चर्मकारानो, 'हरि'जन होऊ नका !!




मेलेल्या जनावराचे कच्चे कातडे पक्के करणे, त्याला रंग, रूप, आकार देणे, त्याचे चप्पल, बूट बनविणे ! हा आमचा परंपरागत व्यवसाय. या व्यवसायातून आम्ही हजारो वर्ष लोकांची सेवा केली, करीत आहोत. ही चरण सेवा करूनही आम्ही अस्पृश्य, उपेक्षित… आम्ही दलित … आम्ही हरिजन म्हणे ! आमचा आणि हरिचा कांही संबंध नाही. आम्हाला कधी कुणी हरीचे दर्शन घेऊ दिले नाही. मंदिरात जाऊ दिले नाही … तरीही आम्ही 'हरि'जन कसे ?

 




गांधीने आम्हाला 'हरि'जन कसे काय म्हटले ? हे काय षड्यंत्र आहे ? आमचा आणि हरीचा कधी संबंध येऊ दिला नाही ! आम्हाला हरीच्या जवळ जाऊ दिले नाही, तरीही आम्ही हरिजन कसे ? आम्ही हरी दर्शनाला गेलो, हरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला धक्के मारून मंदिराच्या बाहेर हाकलून दिले ! लाथा घातल्या आम्हाला ! मारून, शिव्या घालून मंदिराच्या बाहेर हाकलून दिले आम्हाला, तरीही आम्ही हरिजन कसे ?

 




आम्हालाच नव्हे तर आमच्या हरीला म्हणजे आमच्या देवालाही शिव्या घातल्या या लोकांनी. "चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा !" आम्ही कधी प्रश्न विचारला नाही, आमचा देव कोणता ? आमच्या देवाला खेटरांचीच पूजा का ? तुमचा देव कोणता? तुमच्या देवाला कश्याची पूजा ? आमचा देव कोणता ? तुमचा देव कोणता ? देवांचा हा भेदभाव कुणी निर्माण केला ? त्याला अगोदर खेटरांची पूजा का नको ? असे प्रश्न आणि असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत. हे प्रश्न समस्त चर्मकार समाजाच्या मनात निर्माण झाले पाहिजेत !

 




कांही वर्षांपूर्वी चर्मकार सुपुत्र व बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी आणि बहन मायावती यांच्या मनात हे प्रश्न निर्माण झाले होते. त्यांनी इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारला. आम्ही हरिचे जण… तर तुम्ही कोण ? आम्ही हरिचे जण तर तुम्ही शैतानाचे जण काय ? आम्ही हरिचे जण तर आम्हाला हरिजन म्हणणारे गांधी आणि त्याची समस्त पिलावळ ही शैतानाची पैदास आहे काय ? मान्यवर कांशीरामजी आणि बहन मायावती यांनी आम्हाला तेंव्हा सावध केले होते, परंतु आम्ही गाफील राहिलो, आजही गाफील आहोत.

 




मान्यवर कांशीरामजी आणि बहन मायावती यांच्याही अगोदर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आम्हाला सावध केले होते. 'हरिजन' हा गांधीचा भूल भुल्लैय्यां आहे, बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईपासून दलितांना अलग पाडण्यासाठी गांधीने हरिजनचे शास्त्र व शस्त्र वापरले, तेंव्हा त्याला कांही चर्मकार बळी पडले होते आणि आजही बळी पडत आहेत ! हातात हरीचे निशाण घेवून आजही चर्मकार नाचत आहेत, ही एक फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल !!

 




हातात हरीचे निशाण घेवून नाचणाऱ्या चर्मकाराना एक प्रश्न विचारावा वाटतो कि, या हरीने आजवर चर्मकाराना काय दिले? आमच्या बापजाद्यांनी हजारो वर्ष हरीची उपासना केली, सनातनी लोकांनी आम्हाला हरीच्या मंदिरात येऊ दिले नाही, ज्यांनी आम्हाला हरिजन म्हटले त्या लोकांनी आम्हाला हरीच्या मंदिरात तर येऊ दिले नाही परंतु गावातही राहू दिले नाही, गावकुसाबाहेर, सर्व गावाचे घाण पाणी वाहून येते त्या घाणेरड्या नाल्याच्या कडेला, उतारावर, उकीरड्याच्या कडेला आमच्या झोपड्या, उंच टेकड्यांवर त्यांचे वाडे आणि बंगले… ते वेशीच्या आत… आम्ही वेशीच्या बाहेर.. स्मशानभूमी आमच्या शेजारी… आम्हाला सोबत स्मशानभूमीतील शैतानांची… कारण आम्ही शैतानच ना त्यांच्या हिशोबाने ! त्यांनी आम्हाला माणूसच समजले नाही… फक्त हरिजन म्हटले, त्यातच आम्ही खूष आहोत !!

 




सनातनी उच्चवर्णीय जातीयवादी माणसांनी आम्हाला गावकुसाबाहेर ठेवले, हरकत नाही ! जातीयवादी लोक जातीयवाद करणार नाहीत तर काय करतील ? ते त्यांचे काम करतील, परंतु ज्या हरीचे निशाण डोक्यावर घेऊन आम्ही शेकडो वर्षांपासून नाचत आहोत, त्या हरीने आमच्यासाठी काय केले ? हरी तर सर्वश्रेष्ठ आहे म्हणतात, या सर्वश्रेष्ठ हरीने त्या जातीयवादी लोकांना समजून सांगायला पाहिजे होते, ऐकत नसतील तर आपल्या सर्वश्रेष्ठ शक्तीने विषमतावादी वर्तन करणाऱ्या जातीयवादी लोकांना चांगली कडक शिक्षा करायला पाहिजे होती. दलितांना, हरिजनांना गावकुसाबाहेर ठेवता काय ? थांबा मी तुम्हाला गावातच ठेवत नाही असा कांही तरी चमत्कार या हरीने करायला पाहिजे होता परंतु तसे कांहीही या हरीने, ईश्वर, राम आणि कृष्णाने केले नाही, हे चर्मकार समजून घेणार आहेत कि नाही ?

 




हरिजन बनून, हरीचे निशाण हातात घेवून, जय गुरु 'देव' म्हणून गुरु रविदास जयंतीच्या मिरवणुकीत नाचणाऱ्या चर्मकारानो, या हरीला कधी जाब विचारणार आहात कि नाही ? आम्हाला गावकुसाबाहेर का ठेवले ? गावाच्या मुख्य विहिरीवर पाणी का भरू दिले नाही ? शाळेत सर्व मुलांबरोबर का बसू दिले नाही ? पंक्तीत बसून सर्वांबरोबर का जेवू दिले नाही ? उकिरड्यावर कुत्र्या-मांजरांबरोब­र आमच्या लेकरांनी तुम्ही फेकलेले तुमचे उष्टे अन्न खाल्ले… ताजे अन्न खाऊ दिले नाही, चांगले नवे वस्त्र लेऊ दिले नाही, लग्नाच्या वरातीत आम्हाला घोड्यावर बसू दिले नाही… जातीच्या नावाने सतत शिव्या, मारहाण, अन्याय-अत्त्याचार, खून, आया-बहिणींच्या अब्रूवर घाला… आमच्या महिलांना नग्न करून रस्त्यावरून फिरविण्यात आले…. या सर्व वेळी हा हरी कुठे लपला होता ?

 




क्रांतिकारी महामानव गुरु रविदास यांनी भक्तीचे नव्हे तर मानव मुक्तीचे आंदोलन केले. "भक्ती भ्रम है सो जाण !" असा संदेश गुरु रविदास यांनी दिला. भक्तीला त्यांनी भ्रम असे समजले. गुरु रविदास यांच्या अनुयायांनी मात्र नेमके त्यांच्या उलटे आचरण सुरु केले आहे. रविदासाना त्यांनी भक्तीमार्गात गुंतविण्याचा प्रयत्न चालविला आहे. आधीच हिंदू धर्मातील सर्व कर्मकांडात आणि भक्तीमार्गात गुंतलेल्या या चर्मकार समाजाला नव्याने स्थापन झालेल्या 'रविदासिया धर्माने' आणखी पार बुचकाळ्यात टाकले आहे. 'रविदासिया धर्मात' नामदान, नामजप, किर्तन, प्रवचन, भजन, भंडारा हे सारे हिंदू धर्म पद्धती प्रमाणे होत आहे. हिंदू धर्मात पालखी निघते तशी गुरु रविदास जयंतीची मिरवणूक निघत आहे. "जय रविदास" ऐवजी "जय" केवळ हिंदू धर्माची नक्कल करून काय साध्य होणार आहे ? या सनातन पद्धतीने समाज परिवर्तन होणार आहे काय ? केवळ भक्तीने समाज परिवर्तन होणार आहे काय ? गुरुचा गुरुद्वारा असतो, गुरु रविदास यांचा देखिल गुरुद्वारा असायला पाहिजे परंतु तसे न होता मोठ्या प्रमाणात मंदिरे निर्माण केली जात आहेत, या मंदिरांना धाम, धर्मस्थान, पवित्र स्थान वगैरे विशेषणे दिली जात आहेत. पहिले धाम, दुसरे धाम, तिसरे धाम…. अशी नामकरणे केली जात आहेत. सर्व कांही हिंदू धर्माचीच नक्कल केली जात आहे. अक्कल गहाण ठेऊन अंधानुकरण केले जात आहे. देव, दैव, हरी, धाम, नामदान या सर्व खुळचट कल्पना आहेत. त्यामुळे आमचे भले झाले नाही.

 




आमचे बापजादे हजारो वर्षांपासून इमाने-इतबारे हरीची उपासना करीत आले, त्यामुळे त्यांचे कांहीही भले झाले नाही, शिक्षण, आरक्षण, संरक्षण हे सर्व बुद्ध, बसवेश्वर, रविदास, कबीर, फुले, शाहू आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाले, याचे भान न ठेवता, या महामानवांचे उपकार न मानता चर्मकार समाज हरी… हरी… करीत "हरिजन " होऊ पाहत आहे ! हा 'हरि'जन, चर्मकार समाजाला प्रगतीच्या वाटेवर न घेऊन जाता पुन्हा एकदा सनातनी काळोख्या अंधारातच घेवून जाणार आहे, म्हणून म्हणतो चर्मकारानो, 'हरि'जन होऊ नका …!

 




लेखं- चंद्रप्रकाश देगलूरकर, संस्थापक, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद



 



मोबाईलं न- ०९४२३७८१११४

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...