फँड्री.. शालू आणि जब्याची जातीयवादी अनोखी प्रेमकहाणी !!

फँड्री.. शालू आणि जब्याची जातीयवादी अनोखी प्रेमकहाणी !!



मी सहसा चित्रपट पहात नाही. पण फँड्री पाहू पाहू असं करत करत शेवटी डॉ. नानासाहेब प्रधान यांच्या आग्रहामुळे त्यांच्या सहवासात ''फँड्री'' पहाण्याचा योग आला. चित्रपटातील अनेक प्रसंग त्यांच्या बरोबरच्या चर्चेतून समजले.



 



कलाकृती अप्रतिम आहे. कथा, पटकथा, छायाचित्रण, दिग्दर्शन, कलाकार सर्वच भट्टी इतकी छान जमली आहे की एक मी चित्रपट पहात नाही तर जिवंत अनुभव पहात आहे, अनुभवत आहे असा भास झाला.

 



भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. आपल्या देशवासीयांबद्दलची समानतेची भावना सांगणार्यात या आपल्या प्रतिज्ञेच्या ओळी… भारतीय राजघटनेच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर विशेष भर देण्यात आला आहे. तर घटनेच्या कलम १४ ते १८ मध्ये समतेचा अधिकार आणि कलम १७ मध्ये अस्पृश्यता निवारणाच्या मुद्याचा समावेश आहे. पण ही घटना आणि त्यातील कलम हे पूर्णपणे लागू झाले आहेत काय ? ही घटना भारतीय नागरिकांसाठी आहे. पण समाजात आज किती तरी लोक असे आहेत ज्यांना आपण ‘भारतीय’ आहोत म्हणजे काय आहोत हे देखील माहिती नाही. कित्येकांना तर अन्न, वस्त्र, निवार्या सोबतच ‘माणूस’ म्हणून जगण्याचा अधिकारच नाकारला गेला आहे. समाजातील अशा वर्गाबद्दल अतिशय प्रभावीपणे भाष्य करण्याचं काम ‘फँड्री’ या चित्रपटाने केलं आहे. ‘फँड्री’ ही वरकरणी प्रेमकथा वाटत असली तरी या कथेचा गाभा मात्र खूप खोलवर आहे. कारण प्रेमकथेच्या पलीकडे जाऊन ती इथल्या समाज आणि जातीव्यवस्थेवर प्रखरपणे भाष्य करते? ‘नावात काय आहे?’ असं शेक्सपिअर म्हणतो. पण नावात काही नसलं तरी आडनावात खूप काही आहे हे भारतीय समाजव्यवस्था बघितल्यानंतर लक्षात येतं. आडनावावरून ‘त्या मागची जात’ शोधण्याचा प्रयत्न होतो आणि त्यावरून इतर सामाजिक संदर्भ जोडले जातात. त्यामुळे गोखलेच्या मुलाने कुलकर्णींच्या मुलीवर प्रेम केलं तर ते वावगं ठरत नाही. पण गोखलेंचा मुलगा कांबळे, माने आडनाव असणार्या मुलीच्या प्रेमात पडतो त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावतात हे वास्तव आजही समाजात कायम आहे. याच वास्तवावर अचूकपणे बोट ठेवण्याचं काम ‘फँड्री’ करतो. प्रेमासारख्या निर्मळ भावनेलाही जेव्हा जातिव्यवस्थेचं कोंदण लागतं, तेव्हा होणारी वेदना आणि त्याच्यातून निर्माण होणारा विद्रोह या दोन्ही गोष्टी चित्रपटात जब्या या पात्राच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने पडद्यावर उतरवल्या आहेत.

 



चित्रपटाची कथा साधी आहे. पण ती प्रचंड अस्वस्थ करून सोडणारी वाटली. कचरू माने आणि कुटुंबीय असेच गरिबीचे चटके सहन करणारे, त्या दाहक अनुभवातून जाणारे आहे. कचरू स्वतः, त्याची बायको , दोन मुली पैकी एक विवाहित पण सासरी न नांदता परत माहेरी आलेली, दुसरी लग्नाळू अन् एक मुलगा १४-१५ वर्षाचा जांबुवंतराव, पण सर्वजण त्याला 'जब्या' हाक मारतात, असे पाच जणांचे कुटुंब ! … जब्याला शिक्षणाची विलक्षण ओढ आहे, शाळेत जायला त्याला फार आवडते, त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. घरात नांदणारं अठराविश्व दारिद्र्य, घरात कुणालाच शिक्षणाचा गंधही नसताना जब्या मात्र शिक्षणाची आवड मनापासून जोपासतोय. ज्या दिवशी कामाला गेल्यामुळे शाळेत जाऊ शकला नाही त्या दिवसाचा होमवर्क जब्या दुसर्यााला विचारतो व चिमणीच्या उजेडात अभ्यास पूर्ण करतो. शिकून सवरून त्याला मोठं माणूस व्हायचंय. त्यामुळे परंपरेने आलेल्या किंवा लादलेल्या संस्कृतीला, गावगड्याच्या कामाला तो नकार देतो. पण नियती त्याच्यावर सूड उगवते. शिकणे हा जसा हेतू आहे तसेच वर्गातील शालू नावाची उच्च जातीची असलेली मुलगी त्याला मनापासून आवडलेली ! तिच्यावर त्याचे एकतर्फी प्रेम ! तिच्यासाठी काहिही करायची त्याची तयारी एवढी कि, जीव सुध्दा द्यायची. तिचे त्याच्यावर प्रेम आहे की नाही याचा त्याला अंदाजही घेता येत नाही. पण तिच्या ओढीने तो तिला मिळविण्यासाठी एकीव गोष्टींवर आधारीत म्हणजे काळी चिमणी मारून तिची राख जर शालूच्या डोक्यावर टाकली तर ती त्याच्यावर वश होईल. यासाठी तो जिवाचा आटापिटा करतो. जब्याचा मित्र त्याला या कामी प्रोत्साहन देत असतो. घरची गरीबी, त्यामुळे शिकतांना काम करावं लागणं. त्यामध्येच मनात उमटणारे तरंग...त्यामध्ये वडिलांना हातभार लावण्यापेक्षा शिक्षणाने आपल्या जगण्याला दिशा मिळेल... अन् अर्थात प्रेमाला...त्या सगळ्यामध्ये जगण्याचा अन् स्वप्नांचा संघर्ष दाखवण्याचा स्ट्रोक वेगळा असला तरी तो एकजीव वाटतो. कारण घरच्या परिस्थितीशी झगडणारा...एका मुलीचा उद्धवस्त झालेला संसार... दुसरी मुलीचं लग्न अन् त्यासाठी हुंडा... अन् मुलाला मात्र जीन्स हवीय... या स्ट्रगलमध्ये गुरफटलेला प्रेमाचा सिक्वेन्स... त्यात ती मुलगी शालू ही उच्चवर्णीय.

 



बापाला मात्र त्याने जेव्हा जेव्हा काम मिळेल तेव्हा मदत करावी असे वाटते अन् ते स्वाभाविकही आहे. चार हात काम करायला लागले तर तेवढा ताण कमी होईल हा हेतू. तो पूर्णपणे निरक्षर. एका प्रसंगात तो जब्याचे दफ्तर, वह्या, पुस्तके उचलतो. जब्याने शालूला लिहिलेले, पण न दिलेले प्रेमपत्र (चिठ्ठी) असते ! जब्या शालूला लिहिलेल्या पत्रात खाली स्वतःचा उल्लेख 'जांबुवंतराव' म्हणून करतो. कोणीतरी आपल्याला मान द्यावा, हे मनापासून त्याला वाटते. पण बापाला कोठे वाचता येतयं? तो जब्याला दप्तर नीट ठेवायला सांगतो. कचरूच्या चेहर्याेवरील भाव पाहून आपल्यालाच अपराधी वाटत. निरक्षरतेची समस्या आजही आपल्याला भेडसावतेय !

 



या कैकाडी कुटुंबाची मातृभाषा वेगळीच आहे. ती फक्त कचरू व त्याची बायको बोलू शकतात. मुलांना ती भाषा बोलायची लाज वाटते. माझी मातृभाषा अहिराणी आहे पण मला ती बोलायची संधी मिळत नाही. हळूहळू अनेक बोलीभाषा अशाच मृत होताहेत याचे हे एक सबळ कारण आहे. आपल्या देशात आज अशा किती तरी भटक्या विमुक्त जाती-जमाती आहेत. ज्यांची एक वेगळी बोलीभाषा आहे. त्या भाषेला लिपी नसली तरी ती भाषा अस्तित्वात आहे. एक मोठा वर्ग ती भाषा बोलतो. पण त्यांच्या भाषिक, सामाजिक प्रश्नांची चर्चा इथे होताना कधीच दिसत नाही. एरव्ही मराठी भाषेच्या अस्मितेचं राजकारण करणार्या नेत्यांना महाराष्ट्रातील या नागरिकांच्या प्रश्नाचं, त्यांच्या भाषेचं भानही असल्याचं जाणवत नाही. अनेकांच्या लेखी तर त्यांचं अस्तित्वही नाही.

 



चित्रपटाचे कलाकार अभिनय करतात असे कुठेच वाटत नाही. कृत्रिमतेचा कोठे लवलेशही नाही. सर्वच स्वाभाविक. सर्व कलाकार भूमिका करत नसून ती भूमिका स्वत: जगत असल्याचा फिल म्हणजे जबरदस्तच. जब्याच्या बाबतीतही हेच खरे ! या चित्रपटातील सर्वच कलाकारांचे कौतुक करावे. चित्रपट अतिशय वास्तववादी वाटतो. प्रत्येकाने आपापली भूमिका चोख पार पाडली आहे. कोणत्याही गाण्याशिवाय, ग्लॅमरस घटकांशिवाय केलेला हा सिनेमा मनाला भावून जातो. सगळ्याच बाबतीत सिनेमा सरस झाल्यानं थेट भिडतो.

 



जातीव्यवस्थेमधील दाहक वास्तव मांडणारा हा चित्रपट आहे. कुणाच्याही भावनांना धक्का न लावता,त्या न भडकवता, अत्यंत अभ्यासपूर्ण व सहजतेनं यात भाष्य केलं आहे.

 



सिनेमा म्हणून पाहिलं तर फँड्रीमध्ये एकतर्फी लव्हस्टोरी आहे, चिमणीचा सस्पेन्स आहे. कधी उडणार्याल काळया चिमणीच्या स्वरूपात तर कधी रॉकेलचा धूर सोडणार्याा चिमणीच्या स्वरूपात. बाप-मुलाचा संघर्ष आहे, पाठलाग आहे. याशिवायही अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत ज्यामध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे. गावातल्या कोणत्याही जमातीत अगदी उघडपणे होणारा हुंड्याचा व्यवहार आहे, गावातल्या रिकामटेकड्या जगण्यात हातातल्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे. हाताला काम नसलं तरी डोक्यात आयपीएलची नशा आहे, अशा अनेक गोष्टी चित्रपटात अगदी सूचकपणे सतत पेरलेल्या आहेत. या गोष्टी सहजपणे सिनेमात येत राहतात आणि त्याच सहजतेने मुख्य कलाकारांचं जगणं, त्यांची सुख-दु:खं, त्यांचं हतबल होणं पडद्यावर दिसत राहतं, त्यांच्या वेदनेशी आपणही अगदी लगेच एकरुप होऊन जातो.

 



'तुझा झगा गं झगा गं ' करत जिवलग दोस्ताला गाण्यात गुंफणारा लोभस जब्या आणि पिर्यादची दोस्ती मस्त. पिर्याी पाठोपाठ चंक्या अफलातून. तो कलंदर चंक्या मोहवून टाकतो. 'तुझा विश्वास आहे ना, मग होईल' भिडलंच. त्याचं आणि जब्याचं नातं केवळ देखणं आहे.

 



फँड्री गोष्ट आहे एका सामाजिक विषमतेची ज्यात आपला समाज अजूनही गुरफटला आहे आणि त्यातून बाहेर येणार्याटला परत परत कसं त्यातच ढकललं जातं याची.

 



स्वतःला फुले, शाहू, आंबेडकरांचे आणि पुरोगामी विचारसरणीचे वारसदार म्हणवून घेणार्या समाजाच्या पुरोगामीपणाचा बुरखा ‘फँड्री’ फाडतो.पुरोगामीपण हे केवळ विचारांतून नाही तर जगण्यातून आलं पाहिजे हा संदेशही या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आलाय. विचारात आलेलं पुढारलेपण आपल्या कृतीत आहे का असा प्रश्न ‘फँड्री’ आपल्या मनात निर्माण करतो.

 



जब्या हा अकोळनेर या एका लहानशा गावातील एका मागास जातीतील अत्यंत गरीब कुटुंबामधला पंधरा सोळा वर्षाचा मुलगा, ज्याला त्याच्याच शाळेमधील शालू ही एका पाटील या वरच्या जातीतील आणि श्रीमंत घरातील मुलगी आवडते. वरकरणी ह्या एका ओळीत संपणार्याी कथेत दिग्दर्शकाने खूप सार्याा बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जब्या अशा एका जमातीमधे जन्माला आला आहे की ज्यांना गावातील ‘फँड्री’ म्हणजेच डुक्करे पकडण्यासारखे खालचे काम करावे लागते जे त्याला स्वतःला मान्य नाही. जब्याचे वडील कचरू माने हा एक उतारवयाकडे झुकणारा गरीब माणूस, ज्याला आपल्या मुलाला शाळा सोडून काम करायला लावणं आणि तसच पारंपारिक डुक्करे पकडण्यासाठी त्याच्या इच्छेविरुद्ध ओढणं आणि मग यातूनच जब्याचा त्याच्या वडिलांबरोबर आणि समाजसंस्थेविरुद्धचा संघर्ष म्हणजेच फँड्री !

 



जब्याची तरल प्रेमकहाणी उभी करत असतानाच त्याचं एका गरीब कुटुंबात जन्माला आल्याने त्याची होणारी ससेहोलपट, ऐन शिकण्यासवरण्याच्या काळात वडिलांसोबात कष्ट करून कुटुंबाला करावी लागणारी मेहनत, हलक्या प्रतीची कामे शाळेतल्या मुलांसमोर आणि तसेच आपल्या आवडत्या मुलीसमोर करायला लागू नयेत म्हणून करायला लागणारी धडपड अशी बरीचशी अंगे समोर आणण्यात चित्रपट यशस्वी झालाय. जब्याची कौटुंबिक आणि सामाजिक फरफट बर्याुचदा काळीज चिरून जाते. साध्या साध्या आणि दैनंदिन गोष्टीत दाखवून दिला जाणारा जातीय कमीपणा आपल्यातल्या ‘मनाला’ला सुद्धा विचार करायला लावतो. जब्याचं जाणतं अजाणतं वय, मग त्यातून त्याचा समाजव्यवस्थेविरुद्ध होणारा नकळत विरोध, पण तोच समाज त्या विरोधाला झुगारून त्याला परत परत त्यातच ढकलणार्या् या समाजाबद्दल राग आल्यावाचून राहत नाही. ही सामाजिक तेढ दाखवण्यात जेवढा हा चित्रपट यशस्वी झालाय तेवढाच यशस्वी तो एका लहानश्या खेड्यातलं दैनंदिन जीवन दाखवण्यात सुद्धा तितकाच यशस्वी झालाय. गावातली समाजव्यवस्था, राहणीमान, बोली या गोष्टी तर उत्तम साधल्या आहेतच परंतु गावात आजकाल शौचालय नसून इंटरनेट कनेक्शन वाले मोबाईल फोन, फेसबुक, आयपीएल सारख्या लेटेस्ट गोष्टींचं आकर्षण दाखवून दिलं आहे.

 



चित्रपटाच्या नावावरून या चित्रपटात काय असेल याचा बोध होत नाही. मध्यतंरापर्यंत फँड्री’ म्हणजे काळी चिमणी वाटते. मात्र ‘फँड्री’ म्हणजे काय हे समजायला चित्रपटाच शेवट गाठायला लागतो. फँड्री हा कैकाडी भाषेतला शब्द आहे. तर फँड्री’ म्हणजे डुक्कर [pig]. गावात उकीरडयावर वावरणारं डुक्कर म्हणजे फँड्री. माझ्यामते फँड्री म्हणजे सामाजिक विषमतेतून बाहेर पडण्याची धडपड.

 



समाजातील जातीव्यवस्था आज ठळकपणे दिसत नसली, तरीही कुणाच्याच मनातून जात कधी जात नाही. हेच खरं ! मग ते सरकारी दरबारी का असेना आयु. विजय कांबळे यांच्या उदाहरणा सारखं !

 



डुक्कर पकडण्याचं काम करण्यासाठी गावच्या पाटलाने सांगितल्यावर नकार देणार्या जब्याला नियती ते डुक्कर पकडण्याच्या कामासाठी कशी जुंपते. या अवघड वळणाची ही गोष्ट चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीने मांडली आहे. त्यामध्ये येणारी जत्रा, लग्नाची बोलणी, फँड्री हा एक वेगळा अनुभव आहे. आपल्याला एका वेगळ्या अनुभवविश्वाशी जोडणारा तो दुवा आहे. हा सिनेमा आपल्यातल्या श्वापदाच्या उन्मत्त होण्यावर... त्याच्या उन्मादाला आवर घालण्यावर... वृत्तींवर प्रवृत्तीवर... मुखवटे घातलेल्या चेहर्यां वर... त्यांच्या मानसिकतेवर... जगण्यावर... अस्तित्त्वावर... अन् माणूस म्हणून जगू पाहणार्या् निरागस आयुष्यांच्या भावविश्वावर उजेड टाकतो.. त्या पोळलेपणात आपण होरपळतो...पण त्या मधल्या निरागस भावनेच्या निखार्याावरची फुंकर...मारताना जरा जपून ती राख तुमच्या डोळ्यात जाण्याची... त्यामुळे डोळ्याच्या कडा पाणवण्याची शक्यता अधिक आहे.

 



सिनेमाचा शेवटचा सीन ज्याला आपण घेऊन बाहेर पडतो… जब्याने शेवटचा मारलेला दगड पार डोक्यात घुसतो. एकंदरीत फँड्री वेगळ्या धाटणीचा, सामाजिक संस्थेवर बोट ठेवणारा आणि तितकंच प्रभावीपणे विचार करायला लावणारा सिनेमा आहे. चित्रपटातले सर्वात उत्तम आणि आणि प्रभावी सीन म्हणजे जब्या आणि त्याची बहीण पकडलेले डुक्कर खांद्यावर घेऊन जात असताना बॅकग्राउंडला असणारी जब्या शिकत असलेल्या शाळेच्या भिंतीवर काढलेली राजश्री शाहू महाराज, क्रांतीबा फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची चित्रे. या महामानवांच्या सामाजिक चळवळी कशा आपण धुळीत मिळवल्यात याची करून देणारी जाणीव काळीजाच्या चिंध्या चिंध्या करून टाकते.

 


चित्रपट समीक्षण- श्रीराम पवार सर.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...