मानवी शरीर रचनेतील उर्जा मिर्मितीचा स्त्रोत म्हणजे हृदय होय.
हृदयाची रचना आणि मुख्य कार्य :-
हृदयाचे प्रमुख कार्य शरीरामध्ये रक्ताभिसरण करणे होय. एखाद्या पंपिंग स्टेशन प्रमाणे हे इंद्रिय काम करते. हृदयाकडे आलेले रक्त आत घेते व बाहेर टाकते. हृदयाला चार कप्पे वर दोन कर्णिका व खाली दोन जीवनिका असतात. उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते. हृदय सतत आकुंचन व प्रसरण पावते. त्याचा वेग मिनिटाला ६० ते १०० ठोके असतो. उजव्या बाजूला शरीराकडून आलेले रक्त फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसामध्ये रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जाऊन प्राणवायू शोषला जातो. हे रक्त हृदयाच्या डाव्या कर्णिकेत आणले जाते. येथून ते डाव्या जीवनिकेतून शरीरभर पोहचवले जाते.
हृदय विकाराचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
अ ) जन्मजात हृदयविकार
ब ) झडपांचा हृदयविकार
क ) हृदय रक्तवाहिन्यांचा विकार
अ ) जन्मजात हृदयविकार :- जन्मजात हृदयविकार केवळ २ टक्के प्रमाणात आढळतो. हल्ली गर्भाशयाच्या सहाव्या महिन्यात सोनोग्राफीमध्ये याबाबतचे निदान आणि उपचार आता शक्य झाले आहेत. साधारणतः हृदयाला छिद्र असण्याचे प्रकार आपल्याकडे आढळतात. जीवनिकेच्या पडद्याला असणारे छिद्र, कार्निकेच्या पडद्याला असणारे छिद्र, हृदयाच्या झाडापा आकुंचित असणे असे या आजाराचे स्वरूप असते. या आजाराने ग्रस्त झालेली मुले पिंक बेबी गटात येतात. यावर विनाशस्त्रक्रिया इलाज करणे शक्य आहे.
दुसरा प्रकार म्हणजे ब्लू बेबी. हा गुंतागुंतीचा हृदयविकार असून यामध्ये शुद्ध व अशुद्ध रक्त याचे मिश्रण होऊन किंवा फुफ्फुसाचा रक्तप्रवाह कमी प्रमाणात होत असल्याने रक्ताभिसरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन शरीराला रक्त पुरवठा केला जातो. त्यामुळे या विकाराने त्रस्त रुग्णांची काय निळसर होते. तथापि जन्मजात हृदयविकारावरील उपचारासाठी हृदय शस्त्रक्रियेने उजवा व दावा कप्पा वेगळे करणे, फुफ्फुसाचा रक्त पुरवठा वाढविणे हे आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने शक्य आहे.
ब ) झडपांचा हृदयविकार :- हृदयाला चार झडपा असतात. दोन उजवीकडे आणि दोन डावीकडे. वर्तमानपत्रांच्या कागदासारखी पातळ पडद्याची त्यांची रचनाअसते . यामध्ये उद्भवणाऱ्या आजाराला झडपांचा ( व्होल्व ) हृदयविकार म्हटले जाते. भारतामध्ये मोठ्या संख्येतील समाज हा मुलभूत सुविधानभावी गलिच्छ वस्तींमध्ये आपले जीवन कंठतो. दाटीवाटीच्या लोकसंख्येत राहणे आणि योग्य आहार न मिळणे यामुळे हृदयाचे स्नायू बळकट होत नाहीत आणि पर्यायाने झडपादेखील पूर्णशक्तीने काम करीत नाहीत. अशा स्थितीत रुग्णांना या पद्धतीचा आजार होण्याची शक्यता अधिक असते. भारतात हा आजार अधिक आढळतो. बलून उपचाराद्वारे झडपांमधील अरुंद्पणा कमी करण्याचे काम केले जाते. बर्याचदा झडपा खराब होऊन दुरुस्तीपलीकडे गेल्यास शस्त्रक्रियेने झडप बदलून कृत्रिम झडप लावणे हेही कमी धोक्याच्या पद्धतीने करता येते.
क ) हृदय रक्तवाहिन्यांचा विकार :- हृदय चालविण्यासाठी नियमित, समप्रमाणात आणि सातत्यपूर्ण रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते. त्यामुळे रक्तवाहिन्या या निकोप असणे गरजेचे असते. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरी यांच्यामध्ये येणाऱ्या अडथळ्याने हा पुरवठा कमी होऊ शकतो. रक्तवाहिनी आकुंचन पावते किंवा अरुंद होते. त्यामुळे हृदयाच्या स्नायूवर परिणाम होतो. तसेच रक्ताभिसरणाच्या नियमित प्रक्रियेमध्ये अडथळा येउन त्याचा शरीरावर परिणाम होतो. अस्वस्थता वाढते व पुढे हृदयविकाराचा झटका येतो.
एन्जिओप्लास्टी म्हणजे काय :-
प्रत्यक्ष शस्त्रक्रिया न करता शरीरातील रक्तवाहिन्यातील अडथळे दूर करण्याची प्रक्रिया म्हणजे एन्जिओप्लास्टी होय. रक्तवाहिन्यांच्या भागांमध्ये आलेले अडथळे शरीरामध्ये छोटी नळी टाकून त्या ठिकाणचा अरुंद झालेला भाग बलूनने मोठा केला जातो. यामध्ये धातूचा स्टेंट वापरला जातो. रक्ताची गुळणी होऊ नये किंवा शरीराला अपाय होणार नाही, अशा औषधीयुक्त रसायनांनी हा स्टेंट तयार केला जातो. औषधीयुक्त स्टेंट अधिक प्रमाणात वापरले जातात.
बायपास सर्जरी म्हणजे काय :-
एन्जिओप्लास्टी केल्यानंतर पुन्हा ब्लॉकेज उद्भवणे किंवा जेव्हा दोन व अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतात तेव्हा अथवा एन्जिओप्लास्टी यशस्वी होत नाही अशा वेळेस बायपास सर्जरीचा निर्णय घेतला जातो. ऑनपंप आणि ऑफपंप अशा दोन प्रकारे हि शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेमध्ये जोडण्यात येणाऱ्या रक्तनलिका रोहिणी प्रकारातील असल्यास अधिक फायदेशीर ठरते. एन्जिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाला अधिक कार्यक्षमतेने जगणे शक्य होते. या दोन्ही उपचाराने आयुष्यच वाढते असे नसून अधिक सक्षमतेने जीवन जगणे शक्य होते.
हृदयविकाराची कारणे :-
* स्थूलपणा
* अतिधुम्रपान
* मधुमेह
* उच्च रक्तदाब
* रक्तातील चरबीचे ( कोलेस्ट्रेरॉल ) वाढलेले प्रमाण
* व्यायामाचा अभाव
* अधिक बैठे काम
* मानसिक आणि शारीरिक ताण
हृदयविकाराची लक्षणे :-
बर्याच वेळा छातीत दुखणे, धडधडणे
पाठीच्या दोन फेर्यांमध्ये दुखणे ( दोन्ही बाजूंना )
डाव्या हाताला दुखणे
पोटाच्या वरच्या भागाला दुखून उलट्या होणे
प्रचंड अस्वस्थता वाटणे
रक्तदाब वाढणे
धाप लागणे
रक्ताच्या गुठळीमुळे झटका येणे.
परिणाम :-
हृदय रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या आणि आकुंचन स्थिती व अंतरस्थरावर जाडेपणामुळे रक्तपुरवठा प्रभावित होतो.
त्यामुळे हृदयाच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो व हृदयाचे स्नायू प्राणवायूच्या कमी पुरवठ्यामुळे अकार्यक्षम होतात.
काळजी अशी घ्यावी :-
१) नियमित रक्तदाब, मधुमेह आणि रक्तातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण याची तपासणी
२) ईसीजी काढून त्यातील बदलानुसार पुढील तपासण्या कराव्यात.
३) हृदयाची आकुंचन / प्रसरणाची बाजू तपासणारी इको चाचणी करणे
४) वैद्यकीय सल्ल्यानुसार ऐन्जीओग्राफी ( हि १०० टक्के निदान करणारी सुरक्षित आणि महत्त्वाची चाचणी )
५) हृदयाच्या स्नायूंचे रक्ताभिसरण ( परफ्युजन स्कॅन ) यामुळे हृदयाला कोणत्या भागात रक्तपुरवठा होतो हे माहिती पडते, हि तपासणी गरजेनुसार करावी.
६) आयव्हस ( अल्ट्रासाउंड ) चाचणी - हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये असलेल्या अडथळ्यांचे निदान करते.
७) हृदयाच्या रक्त वाहिनीतील प्रवाहाची नोंद करणारी चाचणी
८) ७० टक्क्यांपेक्षा अधिक अडथळे ( ब्लॉकेज ) असतील तरच एन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी सुचविली जाते.
९) रक्ताचा प्रवाह ५० टक्के किंवा अधिक सुरु असला तर त्यावर औषधोपचार सुचविला जातो.
याशिवाय नियमित संतुलित आहार , क्षार व चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळणे , नियमित व्यायाम आणि तणावरहित जीवनशैली आवश्यक आहे.
- डॉ. के. एन. भोसले ( जे जे रुग्णालय हृद्य विभागाचे प्रमुख )
- शब्दांकन - प्रवीण टाके.
सौजन्य - लोकराज्य ( महाराष्ट्र शासन )