आजही जातात हुंडाबळी !!

आजही जातात हुंडाबळी !!



'वयात आलेली पोर अन् बापाच्या जिवाला घोर' ही म्हण मराठीत प्रचलित आहे. एकदा मुलगी वयात आली, की एखादं 'चांगलं' स्थळ पाहून तिचं लग्न लावून दिलं की बाप जबाबदारीच्या ओझ्यातून मोकळा, अशी मानसिकता आपल्या समाजामध्ये आहे. मग या वयात आलेल्या मुलीसाठी घरच्यांच्या दृष्टीनं चांगलं स्थळ आलं, की ते हातचं जाऊ नये यासाठी

 


प्रयत्न सुरू होतात. वरपक्षाकडून केल्या जाणार्‍या अवास्तव अपेक्षा आणि मोठा हुंडा देण्याचं कबूल करत बाप आपल्या लेकीचं लग्न लावून देतो. मात्र, हे लग्न जमवताना हुंडा म्हणून ठरलेली रक्कम देता न आल्यानं मुलीला सासरी जाचाला सामोरं जावं लागतं. वरपक्षाच्या अपेक्षाही मग वाढत जातात. कुठं नवीन व्यवसाय सुरू करायचा, नवी नोकरी शोधायची, घर घ्यायचंय, गाडी घ्यायची म्हणून माहेरच्यांकडून पैसे आण असे म्हणत आजही मुलींना सासरी जाच सहन करावा लागतोय आणि मुलीच्या सासरच्यांच्या मारुतीच्या शेपटासारख्या वाढणार्‍या मागण्या पूर्ण करता येत नाहीत, सासरी जाच सहन होत नाही म्हणून आजही हुंडाबळी जात आहेत.

 



कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळी रोखण्यासाठी कितीही कठोर कायदे केले तरी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 'मुलगी म्हणजे बापाच्या जिवाला घोर' ही आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हुंडाबळी थांबणार नाहीत हेही खरंच! मागच्याच आठवड्यात लग्नात राहिलेल्या हुंड्याचे दोन लाख रुपये आणि पाच तोळे सोनं दिलं नाही म्हणून सासरी होणार्‍या त्रासाला कंटाळून स्नेहल क्षीरसागर या २१ वर्षीय नवविवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुळात सध्याच्या प्रगत, पुढारलेल्या जगात हुंडाबळी जात नाही असं अनेकांचं मत आहे; पण अशा काही घटना समोर आल्या की, जग बदललं असलं तरी आपली मानसिकता बदलत नाही, हे स्पष्ट होतं. आपल्या बारावीपर्यंत शिकलेल्या मुलीला सिव्हिल इंजिनीअर असणार्‍या मुलाचं स्थळ आलं. मग काय ते मागतील ती रक्कम देऊ अन् लग्न लावून देऊ असं स्नेहलच्या आई-वडिलांना वाटलं खरं. त्यांना हे वाटणं चुकीचं नव्हतंच. कारण कोणत्याही आई-वडिलांना आपल्या मुलीचं वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही. त्यांनी मुलाकडच्यांच्या मागणीप्रमाणे हुंडा द्यायचं कबूल केलं. मात्र, हुंड्याची पूर्ण रक्कम देता न आल्यानं सासरी स्नेहलला त्रास होऊ लागला अन् केवळ लग्नानंतर सहाच महिन्यांनी तिनं या त्रासाला कंटाळून आपला जीवनप्रवास संपवला. या घटनेत आता सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. त्यांना शिक्षा होईल वगैरे कायदेशीर भाग आहे. मात्र, आपल्या सुरेख, आनंदी आयुष्याची स्वप्नं पाहणार्‍या एका तरुणीचा बळी हा 'हुंडा' नावाच्या व्यवस्थेच्या प्रकारानं घेतला आहे.

 


खरं तर हुंडाबळी जाणं ही आपल्या समाजव्यवस्थेतील नवी घटना नाही. तर, तो या व्यवस्थेचा भाग बनला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकीकडं सगळं वातावरण बदलत असताना अनेक बाबी आजही आपली मानसिकता बदलायला तयार नाहीत. आपलं जुनाट वळण सोडायला आपण तयार नाही. वर्षानुवर्षं समाजात रुजलेल्या रूढीपरंपरांचा पगडा आपल्यावर आजही खोलवर आहे. राहणीमानात आधुनिकता आली असली तरी जुनाट परंपरा अन् त्यातही सोयिस्कर परंपरा आजही आपण सोडायला तयार नाही आहोत.वयात आलेल्या मुलीला तिच्या दृष्टीनं चांगलं नाही, पण घरच्यांच्या दृष्टीनं चांगलं स्थळ आलं की, ते स्थळ हातचं जाऊ नये यासाठी वरपक्षाने केलेल्या अवास्तव मागण्या पूर्ण करण्याचं मान्य केलं जातं. पण, मुळातच लग्न ठरवताना बाजारात जाऊन आपल्याला आवडलेल्या वस्तूची आपण बोली लावतो, तशीच मुलीची बोली लावली जाते. यातून समोरच्यांच्या मागण्या मारुतीच्या शेपटापर्यंत वाढतच जाणार्‍या असतात अन् त्या पूर्ण करताना मात्र मुलीचा बाप कोलमडून जातो. बरं इतकं करूनही मुलगी सुखात राहील याची खात्री त्याला नसते. सतत एका दडपणाखाली त्याचं वावरणं सुरू असतं.या सगळय़ा गोष्टी टाळायच्या असतील तर लग्न जमवतानाच मुलीच्या बापानं हुंडा देणार नाही, हे ठणकावून सांगायची आवश्यकता आहे. पण, जेव्हा 'वयात आलेली पोर अन् बापाच्या जिवाला घोर' ही आमची मानसिकता बदलेल तेव्हाच ते शक्य होईल.


 


धन्यवाद- दै.पुण्यनगरी.


 


लेखं- अश्विनी सातव/डोके.  (लेखिका पत्रकार आहेत.)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...