लग्नसराईत उरकले जातात ४00 बालविवाह.... यवतमाळ जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची पायमल्ली !!
विश्वास बसणार नाही; पण पुरोगामी महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात आजही लग्नसराईत एक दोन नव्हे तर तब्बल ४00 बालविवाह उरकले जातात. कायद्याच्या अज्ञानापोटी सामाजिक संस्थांच्या डोळ्यांत धूळ फेकत अतिदुर्गम भागात हा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती लोकमतच्या हाती आली आहे.
बालविवाहावर पायबंद घालण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. युनिसेफसारखी संस्थासुद्धा जागृती करून बालविवाह रोखत असताना मुलीचे हात लवकर पिवळे करण्याच्या उद्देशाने आदिवासीबहुल यवतमाळ जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा सर्रास पायदळी तुडविला जात आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा १९२९ नुसार मुलाचे वय २१ व मुलीचे वय १८ वर्षे असणे गरजेचे आहे.
बालविवाह होऊ नये म्हणून विविध जनजागृतिपर उपक्रम राबविले जातात. गावस्तरावर आणि जिल्हास्तरावर बालहक्क संरक्षण समित्या काम करतात. तरी या सर्वांना अनभिज्ञ ठेवून पालक बालविवाह लावत आहेत. यामध्ये मुलगी १८ वर्षांच्या आतील असून मुलगा मात्र विवाहयोग्य वयाचा असतो.
युनिसेफने यवतमाळ जिल्ह्याच्या सात तालुक्यांत एनजीओंना बालविवाह रोखण्यासाठी नियुक्त केले आहे. जिल्ह्याच्या इतर नऊ तालुक्यांत मात्र एनजीओ नसल्यामुळे तिथे बालविवाहाच्या प्रकारात वाढ होत असून याचे आकडे मात्र प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत.
यवतमाळ जिल्ह्यातील १२0५ ग्रामपंचायतींपैकी ७२५ ग्रामपंचायतींनी बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसभेतून ठरावही घेतला आहे. उर्वरित ४८0 ग्रामपंचायतींमध्ये असे कुठेच ठराव घेतले गेले नसल्याने या ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत येणार्या गावांमध्ये बालविवाह खुलेआम होत असल्याची माहिती आहे.हे बालविवाह रोखण्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याची व ग्रामपंचायतीची असतानाही याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
दुसर्या गावात जाऊन उरकले जातात बालविवाह-
अनेक गावांत बालविवाह लक्षात येईल म्हणून दुसर्या गावात मंदिरात जाऊन मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह विधी उरकला जातो. यवतमाळ तालुक्यात नुकताच एक बालविवाह रोखण्याचा प्रयत्न झाला असताना कुटुंबीयांनी कोणालाही न जुमानता कळंब येथील मंदिरात गुढीपाडव्याच्या दिवशी विवाह उरकविला. मोजकेच नातेवाईक व मोजक्याच पत्रिका छापून हे विवाह पार पाडले जातात.
२0१३ मध्ये जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात सर्वाधिक ११, वणी तालुक्यात सहा, पांढरकवडा तालुक्यात पाच, यवतमाळ तालुक्यात नऊ, दारव्हा तालुक्यात चार, झरी तालुक्यात एक, असे एकूण ३६ बालविवाह रोखण्यात आले. विशेष म्हणजे यवतमाळ तालुक्यातील एका खेड्यातील पाच बालविवाहांचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते. परंतु अनधिकृतपणे बालविवाह होणारी संख्या मात्र स्वयंसेवी संस्थांच्यासुद्धा कल्पनेपलीकडची आहे. जिल्ह्यात एकूण २0४0 गावे असून पाच गावांतून एक बालविवाह अशी सरासरी काढली तरी हा आकडा ४00 वर जात आहे. जिल्ह्यात युनिसेफ अंतर्गत सात तालुक्यांत ४५ क्षेत्रीय संघटक व सात तालुका समन्वयक हे बालविवाह रोखण्यासाठी काम करीत आहेत.
मार्च ते मे या कालावधीत बालविवाह मोठय़ा प्रमाणात होतात. मागील दोन महिन्यांत यवतमाळ जिल्ह्यात एकूण ३६ बालविवाह रोखण्यात स्वयंसेवी संस्थांना यश आले आहे. अनाथ बालिका, एकल पालकत्व, आर्थिक विवंचना, कायद्याचे अज्ञान व गावातील नातेवाइकांचे दबावतंत्र यामुळे बालविवाहांत वाढ होत आहे. बालविवाह थांबवून मुला-मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून नंतर योग्य वयात विवाह लावून देणे गरजेचे आहे. किशोरी बैठका व गावकर्यांच्या सहकार्यातून हे प्रकार थांबविले जाऊ शकतात.
लेखं - सुनील भेले, युवा वेध संस्था, यवतमाळ
धन्यवाद - लोकमत
संदर्भ - http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=NagpurEdition-2-1-21-04-2013-bdcf8&ndate=2013-04-21&editionname=nagpur
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!