पुण्यातील मुलुखावेगळा रिक्षाचालक !

आजारपणात अथवा अपंगत्व असो मध्यमवर्गीय नागरिक सोय म्हणून रिक्षाचा वापर करतात. मात्र अनेकदा या रुग्णांच्या किंवा अपंग व्यक्तींच्या वाहतुकीसाठी रिक्षावाले तयार होत नाहीत, हा अनेकांचा अनुभव आहे. मात्र, पुण्यात एक रिक्षाचालक रुग्णांची आणि अपंगांची वाहतूक करायला कधीच नाही म्हणत नाही. तर उलट त्यांना मदत व्हावी या उद्देशाने, त्यांनी गेली अडीच वर्षे ही वाहतूक कोणताही मोबदला न घेता केली आहे.

अजीज इनामदार या जेमतेम ३५ वर्षे वयाच्या रिक्क्षाचालकाने हे रूग्णसेवेचे व्रत अंगीकारले आहे. याला कारण आहे त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग. अजीज यांची पत्नी काही वर्षांपूर्वी पेरालिसिसने आजारी पडली आणि जादा सुट्ट्यांच्या कारणानं हातची नोकरीही गेली. जगण्यासाठी पैसा लागतो आणि त्यासाठी काहीतरी काम तर केलच पाहिजे म्हणून शेवटी इनामदार यांनी रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. रिक्षा चालवून जे काही पैसे हातात पडतील त्यावर तीन मुलं, पत्नी असा पाच जणांच्या कुटुंबाचा गाडा इनामदार
हाकतात. मात्र, पत्नीच्या आजारपणात तिला रुग्णालयात नेताना त्यांना फार त्रास सहन करावा लागला. एकतर रुग्णालयात जायला लवकर वाहन मिळायच नाही, मिळालं तरी रिक्षावाले भाडं नाकारायचे. शेवटी अक्षरश: स्वत: उचलून घेत त्यांनी आपल्या आजारी पत्नीला अनेकदा रुग्णालयात नेले आहे. आपल्याबाबतीत जे झालं, ते इतर रुग्णांच्या बाबतीत होऊ नये असा निश्चय अजीज यांनी केला आणि मग त्यातून अजीज यांनी सुरू केली ही आगळीवेगळी समाजसेवा !

आपल्या रिक्षाच्या धंद्यातून वेळ काढत इनामदार आपल्या परिसरातील रुग्ण आणि अपंगांची मोफत वाहतूक गेल्या अडीच वर्षांपासून करत आहेत. यामध्ये आपल्याला समाधान मिळते असे ते सांगतात. अनेकदा गरीब रुग्णांकडे औषधासाठीही पैसे नसतात, तर वाहतुकीसाठी पैसे देणार कसे. अशांना या मोफत वाहतुकीमुळे खूप मोठा दिलासा मिळतो. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांतील समाधान माझ्यासाठी मोलाच आहे
असे इनामदार म्हणतात. तसेच इतर रिक्षाचालकांनीही रुग्ण आणि अपंगाची वाहतूक करणे न टाळता त्यांना मदत करावी असेही ते आवर्जूनपणे सांगतात.

ज्या गरजू रुग्णांना रुग्णालयात जायचं असेल, मेडिकल मध्ये जायचं असेल किंवा अपंगांना कोणत्या कामासाठी बाहेर जायचं असेल ते अजीज इनामदार यांना ९६५७८७८६१५ दूरध्वनीवरून संपर्क साधू शकतात. अनेकदा रिक्षावाल्यांना त्यांच्या सोईने भाडे हवे असतात, त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात नेहमीच वाद होतात. त्यातही रुग्ण, अपंग प्रवासी म्हटले की भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांच्या डोळ्यात अजीज इनामदारांनी आपल्या या मोफत सेवेच्या माध्यमातून झणझणीत अंजन घालत समाजसेवेच एक उदाहरणच घालून दिले आहे.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...