घातक रसायनांमुळे कॅन्सर, अल्सर, त्वचारोगांसोबतच वंध्यत्वाचाही धोका...
धावपळीच्या दिनचर्येत फक्कड चहाचा एक घोटसुद्धा ताजेतवाणे करतो. पण, आपण हा चहा प्लास्टिकच्या कपात घेत असाल तर सावधान! प्लास्टिकच्या कपात सतत चहा किंवा गरम पदार्थ घेणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. गरम पदार्थांमुळे प्लास्टिकमधील घातक रसायने त्यात विरघळतात. पोटात जातात. आता तर प्लास्टिकच्या बाटलीतील औषधेही सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
चहाचा घोट घेतल्यानंतर थोड्यावेळासाठी तरतरीत वाटत असले तरी त्यातून शरीरात जाणाऱ्या घातक रसायनांमुळे कॅन्सर, अल्सर आणि त्वचारोगांना आमंत्रण मिळते. प्लास्टिकची बाटली किंवा कपात बिस्फिनॉल-ए आणि डायथॉइल हॅक्सिल फॅलेट आदी घातक घटक आढळतात. गरम पदार्थाच्या संपर्कात आल्यास ते त्यात विरघळतात. प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिणेही आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे. स्वच्छतेसाठी म्हणून बाटली वारंवार धुतली जाते. या धुण्याने त्यातील रसायने पाण्यात मिसळू लागतात. त्यातून शरीरात हार्मोन्सचे बॅलन्स बिघडते आणि कॅन्सर व त्वचा रोगांचा धोका वाढतो, असे रॉकलॅन्ड रुग्णालयाचे डॉ. एम. पी. शर्मा यांनी सांगितले.
जेवढे गरम तेवढेच घातक खाद्य पदार्थांसाठी प्लास्टिकच्या भांड्यांचा वाढता वापर घातक आहे. सतत प्लास्टिकच्या कपातून चहा पिणे, प्लास्टिक बॉटल आणि प्लेट्सचा वापर करणे हे आरोग्याच्यादृष्टीने घातकच आहे. जेवढा गरम पदार्थ यात दिला तेवढी घातक रसायने झटपट मिसळतात. त्यातून येणारे काही रासायनिक पदार्थ हे डाऊन सिंड्रोम आणि काही मानसिक आजारांस कारणीभूत ठरतात. प्लास्टिकची बॉटल उन्हात गरम होत असेल तरी त्यातील पाणी पिणेही घातक आहे. त्यामुळे प्लास्टिकचे कप, बाटल्या, ताटांचा वापर शक्य तेवढा कमी ठेवणेच आरोग्याच्या हिताचे आहे, असे डॉ. दास यांनी सांगितले.
धन्यवाद : महाराष्ट्र टाईम्स
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!