महात्म्यांचे कष्ट वाया गेले नाहीत !!

महात्म्यांचे कष्ट वाया गेले नाहीत !!
 





  
ते म्हणाले, ‘मला वाटते, धर्मवादी आणि जातीयवादी शक्ती पूर्वीपेक्षा जास्त बळकट झाल्या आहेत!’ म.फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पेललेल्या आव्हानांपेक्षा मोठे आव्हान आपल्यासमोर उभे ठाकले आहे, असा काहीसा त्यांचा आव होता. विचारवंत म्हणविणार्‍यांचा असाच आव असतो, हे मला माहीत असल्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले.




खरोखरीच धर्मवादी आणि जातीयवादी शक्ती बळकट होत आहेत का? आणि तसे जर होत असेल तर म. फुलेंपासून महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी सर्व महात्म्यांचे कष्ट वाया गेले असे म्हणायचे का? धर्मवाद, जातवाद जर नष्ट होणारा नव्हता आणि तो बळकटच होणारा होता, तर या महात्म्यांनी तो नष्ट होणार आहे, असे कसे सांगितले? त्यांनी आमची दिशाभूल तर केली नाही? असे अनेक प्रश्न भरभर माझ्या मनात आले.




तीस एक वर्षांपूर्वी माझा आंतरधर्मीय विवाह झाला, त्यावेळी अशी लग्ने अपवादात्मक व्हायची. तेव्हा मी तिरस्कार, संताप, कुतूहल आणि कौतुक अशा निरनिराळय़ा प्रतिक्रिया अनुभवल्या होत्या. आम्ही त्याच सुमाराला गावातील आंतरजातीय व आंतरधर्मीय जोडप्यांचे संमेलन घेतले होते. त्यावेळी यादी केली होती, ती वीसपर्यंतही गेली नव्हती. आज काय परिस्थिती आहे? अलीकडे म्हणजे ३0-४0 वर्षांनंतर पुन्हा एकदा यादी करायला बसलो. आता माझ्या तालुक्याच्या गावात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेली हजार एक जोडपी शोधता आली. आणखीन किती असतील कोणास ठाऊक. जनगणनेत आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहितांची नोंद करावी, अशी आमची सूचना होती. तिची कोणी दखल घेतली नाही. जनगणनेत नोंद झाली असती तर निश्‍चित आकडा सांगता आला असता; पण ढोबळमानाने असे दिसते की, मिश्रविवाहांचे प्रमाण पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वाढले आहे. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांची संख्या हे जातीयवाद आणि धर्मवाद मोजण्याचे एकक मानले तर नि:संदिग्धपणे आपण म्हणू शकतो की, धर्मवादी आणि जातीयवादी शक्ती पूर्वीपेक्षा दुबळय़ा झाल्या आहेत आणि परिवर्तनवादी शक्तींचे बळ वाढले आहे. महात्म्यांचे कष्ट वाया गेले नाहीत. त्यांच्या स्वप्नाच्या दिशेने इतिहासाची पावले पडत आहेत.




पूर्वी जातीय आणि धार्मिक संघटनांची संख्या कमी होती. आता ती वाढली आहे. पूर्वी जे लोक स्वत:ला राज्यकर्ते मानत असत व आपल्या दानतीचा ज्यांना मोठा अभिमान होता, ते आता ‘आम्हाला मागासवर्गीय मानून आरक्षण द्या’ अशी याचना करू लागले आहेत. धार्मिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. धर्मासाठी आपला जीव द्यायला आणि इतरांचा जीव घ्यायला मागे-पुढे पाहिले जात नाही, या विसंगतीचा अर्थ काय?




याचा अर्थ एवढाच की धर्मवाद आणि जातीयवाद मानणार्‍यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. एकेकाळी पृथ्वीतलावर प्रचंड मोठे प्राणी होते.. डायनॉसॉर.. त्यांचा जेव्हा अंत जवळ आला, तेव्हा म्हणे त्यांनी प्रचंड गदारोळ केला. असे वाटायचे की, जणू आता हे जग नष्ट होऊन जाईल. अखेर डायनॉसॉर नष्ट झाले. पृथ्वी नष्ट झाली नाही. त्यातून एवढाच अर्थ काढता येईल की, धर्मवादी आणि जातीयवादी डायनॉसॉरांचा अंतकाळ आता जवळ आला आहे म्हणून ते अधिक आक्रमक झाले आहेत.




निसर्गाने माणसाला माणूस म्हणून जन्माला घातलेले असते. जन्मत: कोणी हिंदू किंवा मुसलमान नसतो. मराठा किंवा माळी नसतो. ब्राह्मण किंवा दलित नसतो. धर्म आणि जातीचा शिक्का इतरांनी त्यावर मारलेला असतो. जोपर्यंत आपला समाज एका डबक्यात होता तोपर्यंत या अशास्त्रीय गोष्टी शास्त्र म्हणून त्याच्यावर लादता आल्या. जेव्हा समाज प्रवाही होतो तेव्हा अशी सक्ती करता येत नाही. डबके साचले तर त्यात किडे होतात; पण वाहते पाणी निर्मळ होत जाते. तसे समाज बुरसटलेल्या विचारांचा गाळ बाजूला सारत पुढे जातो. जोपर्यंत नवे तंत्रज्ञान नव्हते तो पर्यंंत आहारात फरक होता. पेहरावात फरक होता. भिन्न जाती-धर्माच्या समूहांमध्ये राहणीमानात, रीतीरिवाजात फरक होता. आता तसे राहिले आहे का? पुष्कळ फरक पडला आहे. मुलं-मुली एकत्र वावरताना दिसतात. त्यांच्या वेशभूषा आणि राहणीमानावरून कोण कोणत्या जातीचा आणि धर्माचा आहे, हे ओळखता येत नाही. भिन्न जाती-धर्माचे लोक पूर्वीपेक्षा जास्त एकत्र काम करू लागले आहेत. हा बदल सहन होत नसल्यामुळे जातीयवादी आणि धर्मवादी संघटना जास्त आक्रमक झाल्या आहेत.




आमच्या महात्म्यांना इतिहासक्रमाची दिशा कळत होती. त्यांनी पाहिलेली स्वप्ने हा काही कल्पनाविलास नव्हता. तो वास्तवात येणारा इतिहासक्रम होता. त्यांना तो ओळखता आला. आमच्या विचारवंतांना बदलते वास्तव नीटपणे कळत नाही, ही खरी शोकांतिका आहे.





लेखं- अमर हबीब सर.




संदर्भ- http://­onlinenews1.lokmat.co­m/staticpages/­editions/today/main/­DetailedNews-All.php?­nid=EditorialEdition­-16-1-05-01-2014-032­0e&ndate=2014-01-06&­editionname=editoria­l



धन्यवाद- दै.लोकमत.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...