आज "स्त्री मुक्ती दिन... "भारतातील पाहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्‍या "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले" यांचा आज (३ जानेवारी) जयंती , त्यांच्या क्रांतीकारी विचारांना कोटी कोटी प्रणाम !!


हिंदुधर्मातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पिढीजात अनिष्ठ रुढी परंपरेविरुद्ध अफाट धर्मांध शक्तीच्या विरोधात ज्योतिबा फुलेंच्या पावलावर पाऊल टाकून, त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जातीभेदाच्या व धर्मरुढीच्या बेडया तोडून, समदु:खी स्त्रियांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांच्यावर लादलेल्या गुलामगिरीतून कायमची मुक्तता करण्यासाठी रणमैदानी उतरल्या. हालअपेष्टा, यातना सहन करुन व अपमानाची पर्वा न करता बहुजन समाजाची विशेषत: सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांची निस्वार्थपणे अविरत सेवा करण्यासाठी मोठया धैर्याने पुरुषासारखा संघर्ष करावा लागला. स्त्री उद्धाराकरीता संपूर्ण आयुष्य चंदानसारखे झिजून बहुजन स्त्रियांची कायमचीच मुक्तता केली. स्त्री व पुरुषांवर क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी अनंत उपकार करुन ठेवले आहेत. त्यांच्या या प्रभावी प्रेरणेने जीवनमान प्रकाशमय झाले असून, स्त्रियांना भक्कम पाठबळ प्राप्त होऊन एकप्रकारची चालना मिळाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाईंच्या कार्यामुळेच आज स्त्री ही स्त्री स्वातंत्र्याच्या हक्कासाठी पुरुषांना आव्हान करीत मोठया हिम्मतीने बंड करण्यास पुढे येऊ लागली आहे.

 




सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर आपणास असे दिसून येईल की, पेशवाईच्या काळात मनुस्मृतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर पूर्णत: बंदी होती. त्यांना कुठलेच अधिकार नव्हते. शूद्रातिशूद्र सोडून बाकी पुरुषांनाच सर्वाधिकार होते. स्त्रियांना पुरुषांची एक उपभोग वस्तू म्हणून बघितले जात होते. बालविवाह, पतीच्या मृत्युनंतर केशवपन, सती जाणे, पुनर्विवाहास(स्­त्रियांच्या) बंदी, त्यांच्याशी व्याभिचार, शिक्षणास बंदी, अंधश्रद्धा, अज्ञान इत्यादी अत्याचार, हिंदुधर्माच्या नावाखाली या अनिष्ट चालीरिती सर्रास राजरोसपणे सुरु होता. त्यांनी आधारगृहे सुद्धा चालविली. स्त्रियांचे जीवन अगदी अंधारमय करुन, गुलामापेक्षाही वाईट वागणूक देऊन, अत्याचाराच्या खोल दरीत लोटून उद्धवस्त केले जायचे. या विरोधात त्या शेवटपर्यंत लढल्या.

 



क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षीच ज्योतिबा फुलेंशी १८४० मध्ये झाला. त्यावेळी ज्योतिबा फुलेंचे वय १३ वर्षांचे होते. समविचारांच्या व्यक्ती एकत्रित येऊन महाराष्ट्राच्यासामाजिक क्षेत्रात परिवर्तनाचा पाया घालणाऱ्या व्यक्तीपैकी पहिले युगपुरुष खऱ्या अर्थाने ठरले. विवाह झाल्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी ज्योतिबा फुलेंकडून शिक्षणाचे प्रथम धडे घेतले. त्यानंतरच त्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षिकेचे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित शिक्षिका म्हणून बाहेर पडल्या. फुलेंनी
  
पुणे शहरी १ मे, इ.स. १८४७ साली सर्वात प्रथम मुलींची पहिली शाळा काढली. त्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीमाईं या शिक्षिकेचे काम करु लागल्या. शाळेत शिकावयास जात असताना दररोज त्यांच्यावर प्रस्थापितांचे टवाळके शेणमाती, चिखल व दगडधोंडयांचा वर्षाव करुन, टवाळकी, निंदा व घाणेरडया शब्दात बोलून त्यांचा अतोनात छळ करायचे. हा सारा छळ त्यांनी मुकाटयानी सहन केला. त्या कधीच डगमगल्या व घाबरल्या नाहीत. तसूभरही खचून न जाता त्यांनी आपले शिक्षणदानाचे काम अविरतपणे मोठया कष्टाने, नेटाने व धैर्याने सातत्याने सुरुच ठेवले.

 

असाच एक दिवसाचा प्रसंग, त्या शाळेत जात असताना ब्राम्हणी टवाळक्या मुलांनी त्यांना रस्त्यात छळणे सुरु केले. त्यातील एका टवाळखोर मुलगा रस्त्यात उभा राहून दम देऊन बोलू लागला, 'ए सटवे तू उद्यापासून शाळेत शिकवायला जाणे बंद कर? नाही तर तुझी रस्त्यातच अब्रू लुटीन?' त्याच्या या आक्रमक बोलण्याने क्रांतिज्योती सावित्रीमाईं फुले या संतापल्या. क्षणातच स्वत:ला सावरुन व हिम्मत करुन (सहनशीलतेची सीमा ओलांडल्यावर) त्या मस्तावलेल्या टवाळक्याच्या थोबाडात चपला हाणल्या. त्यांचा तो अग्निक्रोध बघून बाकीचीही टवाळखोर मुलं तेथून पसार झाली. शाळा सुटल्यावर क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी ज्योतिबा फुलेंजवळ घडलेला प्रकार सांगितला. ही बातमी वाऱ्यासारखी पुणे शहरी जिकडेतिकडे पसरली. उस्ताद लहुजी साळवे(ज्योतिबांचे गुरु) यांनाही वार्ता कळली. त्यांनी फुले दांपत्याच्या घरी जाऊन दोघांनाही मोठा धीर दिला. तू घाबरु नकोस बेटी ! उद्यापासून मी तुला शाळेत पोहचवून देण्याचे काम करीन. पाहू मग कोण 'लाल' रस्त्यात आडवा येतो, नि अंगाला हात लावतो ते? त्याचे तंगडे तोडून त्याच्याच हातात देईन ! तरच लहु साळवे नावाचा. त्याकाळी शूद्रातिशूद्रांना शिकणे म्हणजे महाभयंकर काम होते. मग स्त्रियांना शाळा शिकणे तर कोसोदूर होते. सावित्रीमाईंनी हिम्मत वा धैर्य बाळगून ज्योतिबांना साथ देण्यासाठी समाजाची, हिंदुधर्म ग्रंथाची व त्यांच्या छळाची अजिबात पर्वा केली नाही आणि ज्योतिबा फुलेंच्या सहवासात राहून त्यांनी पाच वर्षात २० शाळा चालवून दाखवल्या.

 




आत्महत्या करण्यास निघालेल्या एका काशी नावाच्या ब्राम्हण व गरोदर असलेल्या विधवा स्त्रीला सावित्रीमाईंनी जीवदान दिले. घरी आणून तिचे बाळंतपण केले आणि जन्मास आलेल्या मुलास दत्तक घेतले. परंतु हिंदुधर्माच्या ठेकेदारांना ते रुचले नाही व आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांना जाती-धर्मावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. अशा अडल्या नडल्या व वाळीत टाकलेल्या अशा अनेक स्त्रियांना त्यांनी मायेची सावली व उब देऊन त्यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यांना चांगल्या तऱ्हेने जगता यावे म्हणून त्यांच्यात या कुजलेल्या मनाच्या समाजासाठी बंड करण्यास व प्रसंगी लढण्याकरीता उत्साह व पाठबळ दिले. सारजा व गणेश या प्रेमीयुगुलाचा समाजाच्या क्रोधाग्नीतून बचाव करुन आंतरजातीय विवाह लावून दिला.

 



गावोगावी फिरुन सभा-संमेलने घेऊन स्त्रियांना शाळेत घाला, अस्पृश्यता पाळणे, हुंडापद्धती, सतीप्रथा, बालहत्या बंद करा. विधवांचे पुनर्विवाह लावून द्यावे, केशवपन थांबवावे, आधारगृह चालवावे इ. मौलिक विचार त्या सतत मांडून प्रचार व प्रसार करु लागल्या. बहुजन समाजाकडून याला चांगला प्रतिसाद मिळून स्त्रियांत चेतना निर्माण होऊ लागली. सावित्रीमाईंच्या या आव्हानामुळे अनेक स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. स्त्रियांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कमी होऊ लागले. बालहत्या, विधवा स्त्रियांचे केशवपन, सती जाण्यास आळा बसला, विधवाचे पुनर्विवाह होऊ लागले. क्रांतिज्योती सावित्रीमाईं फुले या खऱ्या अर्थाने स्त्री उद्धारक,  स्त्री मुक्ती चळवळीची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व समतावादी असे मोठया अभिमानाने म्हटले जाते. त्यांनी केलेल्या योगदानामुळेच सर्व स्त्रियांचा विकास झालेला आहे व आजही होत आहे. म्हणून आजची स्त्री ही समाजापुढे जाती धर्माच्या भिंतीला हादरे देऊन, ताठमानेने उभी राहून पुरुषांशी सुद्धा स्पर्धा करु लागली आहे आणि स्त्रियांच्या अनेक संघटना उभारुन अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढे उभारण्याचे व चळवळी चालवण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत आहेत. अशा या स्त्रीमुक्ती चळवळीची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, स्त्री उद्धारक, समतावादी समाज सुधारक व युगस्त्री क्रांतिज्योती सावित्रीमाईं फुले यांनी बहुजन समाजाला योग्य दिशा देऊन साऱ्या समाजाला आयुष्यभर प्रकाश देऊन सर्वांचे जीवन प्रकाशित केले. आयुष्यभर धडपडणाऱ्या आणि सातत्याने संघर्ष करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्लेग या आजाराने १० मार्च १८९७ साली क्रांतिज्योत कायमचीच विझली. त्यांच्या या जयंतीदिनी व जागतिक स्त्रीमुक्ती दिनानिमित्त त्याना विनम्र अभिवादन.


तुमचाच मित्र... निलेश कळसकर(सोबत प्रबोधन टीम)


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...