बापाला बाप म्हनाया लाज ती कसली रं..??

बापाला बाप म्हनाया लाज ती कसली रं..??

लई दिस झालं मला भेटायचं म्हनून माज्या मागं लागला हुता त्यो...काल येळात येळ काढून त्याला भेटायला गेलू म्या...

 



"आरं जय भीम भावा..कसा हाईस..?? लई दिसापास्न तूला भेटायचं म्हनत व्हतो बग.." त्यो गळ्यात गळा घालत म्हनाला.

 


"म्या लई झ्याक..तुजं बोल कसं चाललंय..??" असं म्हणत सुरु झालेल्या आमच्या औपचारिक संभाषणानं कधी वैचारिक वळण घितलं त्येचा पत्त्याच आमाला लागला न्हाई.

 


"खरंच आंबेडकरांचं लाई उपकार हाईत भावा आपल्यावर..आंबेडकरांनी आपल्यासाटी ह्ये केलं..आंबेडकरांनी आपल्यासाटी त्ये केलं..आंबेडकर नसते तर आज आपली, या देशाची अवस्था काय झाली आस्ती..." त्यो घडाघडा बोलता व्हता आन म्या गप गुमान त्याचं आईकत बसल्यालो.

 


त्येच्या जवळचा समदा 'stock ' संपल्यावर, आपण लाई झ्याक भाषण दिलंय अशा अविर्भावात त्यो म्हनाला. "भावा, तू बी लयं छान ल्हीतोस बरं का..आवडतं आपल्याला..आता तू सांग तुजं ह्या समद्यावर काय मत हाय..?? "

 



लय येळापासून त्येचंच आईकून घेत असलेल्या मला माजं त्वांड उघडायची संदी आताशा कुटं भेटली व्हती. आता या अतिशान्याला म्या काई वैचारिक सांगाया जावं ते हे बेनं मला येळोयेळी 'क्रॉस' करीत बसनार हे मला कवाच समजून आलतं. तवा त्या भानगडीत नं पडता म्या उगा खोटं-नाटं हसू आणत त्येला म्हनालो- " वा भावा, तुला बाबासायबांबद्दल अभिमान हाय हे बघून मला लयं बरं वाटलं बग..तू त्या बाबतीत लयं जागरूक हाईस ह्येच्या बद्दल बी मला तुजं कवतिक वाटतं. पर मला एक गोष्ट सांगचील का खरीखरी..??"

 



"आता तुज्याशी खोटं का बोलीन भावा मी.." त्यो शाना लग्गीच म्हनाला.

 



मी हसलू आन म्हनालू- "भावा सांच्याला तुजा बाप कामावनं घरी येतो तवा त्याला तू कसं आवाज देतोस रं..?? "काय कांबळे आलात व्हय घरी..??' किंवा मंग "काय कांबळे, आज माज्यासटी काय आणलंत का नाई येताना...??" अस म्हन्तुस का तू..??''

 



"आरं खुळा झालास का काय तू..?? आपल्या बा ला आसं कुणी हाक मारील व्हय..?? म्या त्येंना "आन्ना' म्हणतो ल्हानपनापास्नच.." त्यो मला खुळ्यात काडत म्हनाला.

 



तसा म्या म्हनालो- "मग भावा, मगाधरनं म्या आईकतोय..."आंबेडकरांनी हे केलं, आंबेडकरांनी त्ये केलं.." आसंच तू मला सांगत व्हतास..बापाला बाप म्हनाया लाज ती कसली रं..?? आक्खं जग त्येंना 'बाबासाहेब' म्हनून वळखत. आईचं प्रेम अन बापाची माया दिउन आन त्याच अधिकारानं त्येंनी आपल्यावर या सबंध देशावर प्रेम केलं..त्येंना कुन्या परक्यागत 'आंबेडकर' असं का म्हन्तुस..?? 'बाबासाहेब' नुसतं माहित असल्याला किंवा त्येच्यावर प्रेम नसलेलाच माणूस त्येंचा उल्लेख 'आंबेडकर' असा करू शकतो. त्येंना 'वाचलेला, जाणून घेतलेला, समजून घेतलेल्या कुनाच्याबी तोंडून त्येन्च्यासाठी 'बाबासाहेब' हेच नाव निघतं..मग आता तूच समज तू ह्येच्यापैकी कोणत्या गटात बसतोस..??"

 


"भावा, माफ कर मला, आसं समजावून सांगितलंच नव्हतं रे कुनी आजवर..बाकीची समदी आंबेडकर म्हणत्यात म्हनून मला बी तसंच बोलायची सवय लागल्याली..पार आजपासून बापाला बापच म्हनित जाईन..आज 'बाबासाहेब' नव्यानं समजले बग मला.." त्यो भरल्या डोळ्यांनं म्हनाला.

 



"मी म्हटलं, आरे आसं वाईट नगं वाटून घीउस. आनी फक्त म्या सांगतोय म्हनून बी तू कोणता निर्णय घेऊ नगस..तुज्या मनाला जर पटलं तरच बग..आनी आंबेडकर बोलन हे काही पाप न्हाय रे, ते तर त्येंचं नावच हाय आन भारताभाईर सारं जग त्यांना त्याच नावानं वळखतं..पार 'बाबासाहेब' या विशेषणात जो गोडवा हाय तो येगळाच हाये भावा..निदान आपण तरी तो वापरलाच पायजे नाय का..??" म्या हसत म्हनालो.

 



त्यो बी आता परसन्न होउन हसत व्हता.






लेखं- गौरव गायकवाड.

पदमश्री नामदेव ढसाळ... एक झंझावात !!



पदमश्री नामदेव ढसाळ... एक झंझावात !

माझ्या नामूनं आजपतोर पैसं साठवलं आसतं, तर पाच परसाची हीर भरली असती. पर, त्याच्या हिरीला खालून भोक हाय. या जलमात काय, पुढल्या सात जलमी त्याच्या हिरीत पानी ठरनार नाय... हे बोल होते साळुबाईचे; कवी नामदेव ढसाळ यांच्या आईचे. ढसाळांचं जगणं किती मनस्वी होतं, याचा हा जिताजागता पुरावाच होता.



या उधळमाधळ जगण्यामुळं ढसाळांना पैशाची कायमच ददात असायची. त्यामुळे बेदरकारपणे परंपरेच्या भिंती तोडणारा नामदेव हयातभर दुस-याच्या खिशात हात घालत राहिला. खिसा गरम असला की संगतीच्या कार्यकर्त्यांची चंगळ असायची. दिवसदिवस टॅक्सीने फिरायचा. सकाळी भाड्याने घेतलेली टॅक्सी थेट रात्रीच सोडायचा. वाटेल त्या हॉटेलात वाटेल ते खाऊ घालायचा. पैसे नसले की नुसतं झोपून राहायचा...



एकदा मोतीराम कटारेला त्यानं दादरच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाजवळ कटिंग चहा पाजला. गाडीवाल्याच्या हातात शंभराची नोट टेकवून, रस्ता ओलांडून चालता झाला. कार्यकर्त्यांवर तो इतकं प्रेम करायचा की, ते क्रूर ठरायचं. कार्यकर्त्यांना तो कुठे नेईल, याचा पत्ता नसायचा. त्याचं वागणं, जगणं सारंच बेबंद असायचं. त्याच्या पहिल्यावहिल्या ‘गोलपिठा’ कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ भयानक होतं. गुप्तरोगाच्या दवाखान्याची पावती त्याने त्यासाठी वापरली होती. तो कवितासंग़्रह अनिरुद्ध पुनर्वसू म्हणजे नारायण आठवले यांना त्याने दोनशेत विकला. कशासाठी? झोपडीवर पावसाळ्यात प्लास्टिकचा कागद टाकायचा होता म्हणून. पैशासाठी नामदेवने ब-याच लांड्यालबाड्या केल्या. ज्या ‘मातोश्री’वर दगड फेकले तिथेच नंतर पैसेही मागितले. निवडणुकांत पँथरच्या वाट्याचे तिकीट विकण्याचा उद्योग पैशासाठीच केला. नामदेवनं टॅक्सीही चालवली. मात्र, टॅक्सीत कवितांची वही कायम बरोबर असायची. कुठं कविता वाचन असलं की टॅक्सी साइडला लावून टेचात कविता सादर करायचा. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात असाच एकदा गेला. तिथं कोणी संधी देईना. शेवटी कशीबशी कविता सादर केली. वन्समोअरची दाद मिळाली. पण, या पठ्ठ्याने वन्समोअरची संधी घेतली नाही. माणसं न वाचताच हे कविता करताहेत, असं उपस्थित कवींना सुनावून आला... सत्तरीच्या दशकात राज्यात दलित अत्याचारांनी कळस गाठला होता. नामदेवनं भूमिगत राहून संघर्ष करण्याचं ठरवलं होतं; पण अत्याचाराचं क्षेत्र व्यापक असल्यामुळे दलित पँथर या लढाऊ संघटनेचा घाट घातला. आणीबाणीला पँथरचा पाठिंबा होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये नामदेवचं वजन वाढलं. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी नामदेवला मंत्रिपदाची ऑफर देऊ केली होती. पार्लमेंटरी राजकारणापेक्षा आपल्याला रस्त्यावरचं राजकारण आवडतं, असं म्हणत अशा संधीला लाथाडण्याचं धाडस नामदेवासारखा फकीर करू शकत होता.




नामदेवची बंडखोरी सेंद्रिय होती. सत्यकथेविरोधात बंड म्हणून अनियतकालिकाची चळवळ चालू झाली. त्यात नामदेवही होता. अनियतकालिकवाले आत्यंतिक कलावादी आहेत. सामाजिक, राजकीय भूमिका वर्ज्य मानतात, म्हणून नामदेवनी आपल्याच मित्रांविरोधात बंड पुकारले. स्वत:च विद्रोहीचे अंक काढण्यास सुरुवात केली; पण नामदेवाच्या विद्रोहात निर्व्याजता होती. नामदेवची ‘माण्साने’ ही कविता म्हणजे, विद्रोहाचा कळस. ही कविता विद्रोहीच्या अंकात छापायला बाबूराव बागूलांनी विरोध केला होता. राजा ढालेंच्या आग्रहामुळे ती छापली गेली. पण, बागूलांबद्दलचा नामदेवचा आदर तसूभरही कमी झाला नाही. बागूलांना तो ‘घनघोर युद्धाचे सरसेनापती’ असे संबोधायचा.




ताज हॉटेलच्या गल्लीतील ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ हे नामदेवच्या आवडीचं ठिकाण. रात्री-अपरात्री नामदेवची गाडी तिथे धडकायची. कबाबवर सारे ताव मारायचे. ‘डल्ली’ला अभिजनवर्गात मान्यता मिळवून देण्यात नामदेवच कारणीभूत. वडील कत्तलखान्यात ढोरं उचलायचे.त्यामुळे तेच घरी यायचं. बाप वारल्यावर त्यांच्या दहाव्याला नामदेवनं बिर्याणीच ठेवली होती. तरुणपणात नामदेवला खाण्याचं वेड होतं; उतारवयात दुस-यांना खाऊ घालण्याचं लागलं. त्याला कुत्र्याचं भारी वेड होतं. ‘गजल’ आणि ‘ठुमरी’ अशा दोन पॉमेरॅनियन जातीच्या कुत्र्या त्याच्याकडे होत्या. त्यांना झालेली पिले, तो आपल्या आवडत्या माणसांना भेट द्यायचा. कित्येकदा दौ-यात त्याच्या सोबत कुत्री असायची. महागड्या हॉटेलातलं जेवण मागवायचा, पहिल्यांदा कुत्र्यांना; मग कार्यकर्त्यांना. त्यानंतर स्वत: खायचा. त्याच्या अशा वागण्याने कोणी म्हणायचे, विषप्रयोग करू नये म्हणून नामदेव असं करतोय. कोणी म्हणे, घरातली पहिली भाकर कुत्र्याला, अशी त्याच्या आजीची शिकवण आहे.... नामदेव दोन जगांत एकाच वेळी वावरायचा. त्यामुळे त्याच्यावर अनेक आरोप झाले. संशय घेतले गेले. त्याला गद्दार, पळपुट्या ठरवले; पण त्याचं वागणं बदललं नाही. अर्धा समाजवादी असूनही त्यानं आणीबाणीला पाठिंबा दिला. मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध करून सर्वांना उरावर घेतले.



हिजडे आणि वेश्यांचा देशातला पहिला मोर्चा काढण्याचा मान नामूकडेच जातो. सावकाराच्या पिळवणुकीला विरोध करण्यासाठी 1971मध्ये त्याने हा मोर्चा काढला. या मोर्च्यात लेखक, चित्रकार यांना सामील केले. पण नामदेव बेशिस्तीचा महामेरू होता. त्यामुळे कविता सोडता त्याचं एकही काम पूर्णत्वास गेलं नाही. अर्थात, त्याची त्याला तमा नव्हती.



पँथरचा तो संस्थापक होता. पँथर नावाची महागडी सिगारेट कुलाब्यात मिळत असे. हजारात दहा सिगारेटी मिळायच्या. पँथर नाव आहे, म्हणून त्या ओढायचा. सिगारेट संपल्याचं घरी कळायचं; तशीच गाडी कुलाब्याकडे वळवायचा. पेट्रोल, खर्च, काळवेळ असली गणितं कधी त्याच्या गावी नव्हती. त्याला कुठलंही व्यसन वर्ज्य नव्हतं. पण, मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्धर आजाराचं निदान झालं, तसं त्यानं दारूच्या एका थेंबालाही शिवलं नाही. किती वर्षे, 22 वर्षे! पण बरोबरच्यांना मात्र पाजायचा. शेवटी शेवटी तो म्हणायचा, दुस-यांना पाजून हल्ली मलाच चढते.



अंडरवर्ल्डचे नामचीन अरुण गवळी आणि हाजी मस्तानशी त्याचा दोस्ताना होता. नामदेवनं कामाठीपु-यात एकदा दाऊद इब्राहिमला चोपला होता, म्हणे. एका पत्रकार मित्राला, त्यानं असंच एकदा गाडीत कोंबलं आणि दगडी चाळीत नेलं. तिथल्या बंदुका त्याच्या हातात दिल्या. नामदेव आणि भाई संगारेला अरुण गवळी दरवर्षी नेमाने कपडे घ्यायचा म्हणे. बंडखोरी करणारी माणसं नामदेवला परमप्रिय होती. ज्या मुली आंतरजातीय विवाह करायच्या, त्यांना तो फारच सन्मान द्यायचा. कार्यकर्त्यांना टोपण नावानं हाका मारायची त्याची सवय होती. अपना शागीर्द, गाववाला क्रांतिकारक, कोलाज अशी त्याने अनेकांना नावे बहाल केली होती... रा. सु. गवई आणि दादासाहेब रुपवते अशा बड्या नेत्यांकडे सत्तरीच्या दशकात मोटारी होत्या. दलित पँथरच्या चळवळीत स्वत:च्या गाडीत फिरणारा नामदेव पहिला नेता ठरला. टोयाटोपासून इनोव्हापर्यंतच्या सगळ्या गाड्या त्यानं फिरवल्या. मनमौजी कपडे आणि दिमतीला उंची सिगार, असा त्याचा रुबाबदार वावर असायचा. कशाचीही पर्वा न करणारा बेडर, असा त्याचा पिंड होता. अंगावरचे रंगीबेरंगी कपडे हे त्या स्वभावाचे निदर्शक होते. वेळापत्रक, नियोजन, संघटनात्मक शिस्त, भविष्याची तरतूद या गोष्टी नामदेवच्या वळचणीला नव्हत्या. तो कोणाला वेळेवर भेटायचा नाही. आपल्या सोयीप्रमाणे तो इतरांकडे धडकायचा. खिशातले पैसे संपले, तरी उद्याची चिंता नसायची. पैसे कुठं जातात; उद्याचे उद्या बघू, असं तो म्हणायचा.



ग्रंथाच्या पानाच्या संख्येवर लेखकाचं थोरपणं नसतं, असं त्याचं मत होतं. म्हणून अनेकांना इंटलेक्चुअल म्हणून त्यानं नाकारलं. आपली कविता मात्र कोणत्याही कसोट्यांवर घासून बघा, असं त्याचं आव्हान होतं. कवीपणाचा प्रचंड अभिमान बाळगणारा नामदेव ‘आपून आजून खरी कविता लिहिलेली नाही’ असं सांगायचा. आपल्याला अशी कविता लिहायची आहे, त्या कवितेनं वाचणा-याचा अख्खा दिवस खायला पाहिजे, असं म्हणायचा.



१९७० ते १९७५  ही पाच वर्षेच नामदेवची खरी. इतर वर्षे त्याने केवळ संधिसाधूपणा केला, असाही त्याच्यावर आरोप झाला; पण नामदेव त्याच्या मस्तीत वागला, जगला. अनेकांची आयमाय काढली. शंकराचार्यांना जोड्यानं मारलं, मंत्रालयावर सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या, भातात दारू ओरपून खाल्ली, कामाठीपु-यात शिंदळकी केली, मित्रांवर खोटेनाटे आरोप केले, घरातल्यांची-बायको-मु­लाची, इव्हन स्वत:च्या शरीराची थोडीशीही तमा बाळगली नाही. पण, कवितेतली नामदेवची उडी मात्र चुकली नाही.


कवितेत नामदेव मांजरासारखा राहिला. उलटं फेका, सुलटं फेका; तो पायावरच पडणार. भीमशक्ती-शिवशक्तीच्य­ा वळचणीला नेली; पण जाती अन् शोषणाला बगल नाही दिली. कवीपणाबरोबर येणाऱ्या जगाच्या जबाबदारीचं भान ठेवलं. जातीचा प्रश्न पृष्ठभागावर आणला. संघर्ष आणि सर्जनशीलतेचा संबंध प्रस्थापित केला. कविता त्याचं राजकीय हत्यार होतं. म्हणून तो म्हणायचा, माझी एक कविता म्हणजे एक मोर्चा आहे...






धन्यवाद- दै.दिव्यमराठी









नोट- छायाचित्रात नामदेव ढसाळ सर आणी त्याच्या पत्नी मल्लिका अमर शेख आहेत.




लेखं- अशोक अडसूळ.


संविधान सभेतील भाषणे... प्रजासत्ताक दिन चिरायू होवो... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो !!

संविधान सभेतील भाषणे... प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो !!


मी माझे मित्र , आणि साथी डॉ. आंबेडकरांचे प्रथमदर्शनी अभिनंदन केले नाही तर मी माझ्या कर्तव्यात कसूर केली असा त्याचा अर्थ होईल. मी डॉ. आंबेडकर यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.संविधानाच्या प्रस्तावाला निश्चित रूप व आकार देण्यासाठी त्यांनी आपला अमुल्य वेळ आणि शक्ती खर्च त्याबद्दल हे सभागृह त्यांचे अभिनंदन करते.



विचार- पंडित लक्ष्मीनारायण मित्रा (संविधान सभेतील भाषणातून)




आता संविधानाच्या मसुद्याविषयी संविधान मसुदा समिती निर्धारित शर्तीच्या पलीकडे गेली आहे, अशी मला भीती वाटते. जे संपूर्ण संविधान आपणापुढे प्रस्तुत करण्यात आले आहे ते संविधान सभेने जी तत्वे निर्धारित केले होते त्याही पलीकडे गेले आहे, अशी मला भीती वाटते. या संपूर्ण मसुद्यात कॉंग्रेसच्या दृष्टीकोणाचा कोठे मागमूसही दिसत नाही. या मसुद्यात गांधीवादाच्या सामाजिक, राजनैतिक विचाराचे कोठेही प्रतिबिंब दिसत नाही. विद्वान डॉ. आंबेडकरांना आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणात गांधींचा उल्लेख करावा असा एकही प्रसंग त्यांना आढळत नाही किंवा कॉंग्रेसचा उल्लेख करावा असा एकही प्रसंग त्यांना आढळत नाही. पण यात आश्यर्य वाटण्यासारखे काहीही नाही. संपूर्ण संविधानात विशेषत्वाने कॉंग्रेसची विचारसरणी आणि आदर्श यांचा अभाव आहे, असे मला वाटते... मुलभूत अधिकारासंदर्भात डॉ. आंबेडकर हे विद्वान प्राध्यापक आहेत. मी त्यांच्या विद्वत्तेचा क्षमतेचा आदर करतो. संविधानाचा मसुदा हि त्यांचीच निर्मिती आहे, कलाकृती आहे. असे मला वाटते.



विचार- श्री. अरुणचंद्र गुहा, पश्चिम बंगाल (संविधान सभेतील भाषणातून)





अध्यक्ष महोदय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण काळजीपूर्वक ऐकणाऱ्या सदस्यांपैकी मी एक आहे. या संविधानाचा मसुदा तयार करतांना त्यांना किती कष्ट सहन करावे लागले असतील. तरीही त्यांनी किती उत्साहाने हि जबाबदारी पार पडली याची मला जाणीव आहे. पण त्याचवेळी हे संविधान जे आपणाकरिता एवढे महत्वाचे आहे त्याचा मसुदा तयार करतांना मसुदा समितीने जेवढे लक्ष द्यावयास पाहिजे होते तेवढे दिले नाही याची मलाही जाणीव आहे. या सभागृहाला याची जाणीव असेल कि, याच सभागृहाने मसुदा समितीवर ज्या सात सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी... एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला म्हणून त्यांच्या जागी दुसऱ्यांना नियुक्त करण्यात आले नाही. एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली. एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले त्यांचीही जागा भरली गेलीच नाही दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकाणात व्यस्त होते, गुंतलेले होते आणि त्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली होती. एक किंवा दोन सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही. याचा अंतिम परिणाम असा झाला कि , संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. आंबेडकर यांच्यावर आली आणि हे महत्वपूर्ण कार्य निसंशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले यात तिळमात्र शंका नाही.याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत.


विचार- श्री.टी टी. कृष्णम्माचारी (संविधान सभेतील भाषणातून)





डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील काही भाग (२६ जानेवारी १९५०, संसद भवन)-



“आज २६ जानेवारी १९५० रोजी आपण सर्व एका विरोधाभासाच्या आयुष्यात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपण समानता अनुभउ परंतु आर्थिक आणि सामाजिक बांधणीमध्ये आपण प्रत्येक व्यक्तीची किंमत मान्य करणार आहोत कि नाही ?”


 

“आणखी किती काल आपण हे असे विषमतेचे आयुष्य जगायचे? किती दिवस आपण सामाजिक आणि आर्थिक विषमता सुरु ठेवणार आहोत? हे असेच सुरु राहिले तर राजकीय स्वातंत्र्य धोक्यात येईल. असमानतेचे बळी ठरलेले लोक मेहनतीने बनवलेली संविधानिक आणि लोकशाही प्रणीत व्यवस्था उखडून टाकतील.”


 


"मला ठामपणे वाटते कि हि घटना अतिशय उत्तम ठरते जर ती तितकीच लवचिक असेल आणि शांततेत तसेच युद्धप्रसंगात देशाला एकसंघ ठेवेल, खरंच मला असे वाटते. परंतु जर काही अनुचित किंवा चुकीचे घडले तर घटना चुकीची आहे असे नसून घटना वापरणारे दुष्ट आणि खलकारक असतील."


 


"खरया अर्थाने जगामध्ये भारत हा कुठला देश नाहीच आहे, अजून हा खऱ्या अर्थाने देश घडायचं आहे असे मी मानतो. आपण एक राष्ट्र आहोत असे मानाने म्हणजे निव्वळ भ्रम आहे. १००० प्रकारच्या जातींमध्ये विभागलेला समाज एक राष्ट्र, एक देश कसा काय होऊ शकतो ? लवकरच आपल्याला कळून येईल कि जगाच्या सामाजिक आणि मानसिक तत्वप्रणाली वर आपण देश या संज्ञेत बसत नाही."


 


"स्वातंत्र्य हि बाब आनंद होणारी आहे यात वाद नाही परंतु हे स्वातंत्र्य आपल्यावर भल्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा टाकते. या स्वातंत्र्यमुळे आता आपण काहीही चूक झाले कि त्याचे खापर ब्रिटीश सरकार वर फोडू शकत नाही, या नंतर काहीही चुकीचे घडेल त्यासाठी सर्वस्व आपणच जबाबदार असणार आहोत आणखी कुणी नाही. वेळ फार झपाट्याने बदलत आहे."


 


''जेव्हा आम्ही राजकीय लोकशाही स्थापन करीत आहोत तेव्हा हे सुद्धा अपेक्षित आहे कि, आम्ही आपला आदर्श आर्थिक लोकशाही हाच ठरविला पाहिजे. आम्हाला अपेक्षित नाही कि आम्ही अशी यंत्रणा निर्माण करावी कि ज्यामुळे लोकांनी फक्त यावे आणि सत्ता प्राप्त करावी. जे लोक सरकार बनविणार आहेत त्यांच्यापुढे भारतीय संविधान एक आदर्श ठेवू इच्छितो. हा आदर्श आर्थिक लोकशाही हाच आहे.




डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान चा आम्हास गर्व आहे, भारतीय गणराज्यदिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!




जय भारत !!!




या अमुल्य माहितीसाठी धन्यवाद- प्रशांत वंजारे सर.


महात्म्यांचे कष्ट वाया गेले नाहीत !!

महात्म्यांचे कष्ट वाया गेले नाहीत !!
 





  
ते म्हणाले, ‘मला वाटते, धर्मवादी आणि जातीयवादी शक्ती पूर्वीपेक्षा जास्त बळकट झाल्या आहेत!’ म.फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पेललेल्या आव्हानांपेक्षा मोठे आव्हान आपल्यासमोर उभे ठाकले आहे, असा काहीसा त्यांचा आव होता. विचारवंत म्हणविणार्‍यांचा असाच आव असतो, हे मला माहीत असल्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले.




खरोखरीच धर्मवादी आणि जातीयवादी शक्ती बळकट होत आहेत का? आणि तसे जर होत असेल तर म. फुलेंपासून महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी सर्व महात्म्यांचे कष्ट वाया गेले असे म्हणायचे का? धर्मवाद, जातवाद जर नष्ट होणारा नव्हता आणि तो बळकटच होणारा होता, तर या महात्म्यांनी तो नष्ट होणार आहे, असे कसे सांगितले? त्यांनी आमची दिशाभूल तर केली नाही? असे अनेक प्रश्न भरभर माझ्या मनात आले.




तीस एक वर्षांपूर्वी माझा आंतरधर्मीय विवाह झाला, त्यावेळी अशी लग्ने अपवादात्मक व्हायची. तेव्हा मी तिरस्कार, संताप, कुतूहल आणि कौतुक अशा निरनिराळय़ा प्रतिक्रिया अनुभवल्या होत्या. आम्ही त्याच सुमाराला गावातील आंतरजातीय व आंतरधर्मीय जोडप्यांचे संमेलन घेतले होते. त्यावेळी यादी केली होती, ती वीसपर्यंतही गेली नव्हती. आज काय परिस्थिती आहे? अलीकडे म्हणजे ३0-४0 वर्षांनंतर पुन्हा एकदा यादी करायला बसलो. आता माझ्या तालुक्याच्या गावात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेली हजार एक जोडपी शोधता आली. आणखीन किती असतील कोणास ठाऊक. जनगणनेत आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहितांची नोंद करावी, अशी आमची सूचना होती. तिची कोणी दखल घेतली नाही. जनगणनेत नोंद झाली असती तर निश्‍चित आकडा सांगता आला असता; पण ढोबळमानाने असे दिसते की, मिश्रविवाहांचे प्रमाण पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वाढले आहे. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांची संख्या हे जातीयवाद आणि धर्मवाद मोजण्याचे एकक मानले तर नि:संदिग्धपणे आपण म्हणू शकतो की, धर्मवादी आणि जातीयवादी शक्ती पूर्वीपेक्षा दुबळय़ा झाल्या आहेत आणि परिवर्तनवादी शक्तींचे बळ वाढले आहे. महात्म्यांचे कष्ट वाया गेले नाहीत. त्यांच्या स्वप्नाच्या दिशेने इतिहासाची पावले पडत आहेत.




पूर्वी जातीय आणि धार्मिक संघटनांची संख्या कमी होती. आता ती वाढली आहे. पूर्वी जे लोक स्वत:ला राज्यकर्ते मानत असत व आपल्या दानतीचा ज्यांना मोठा अभिमान होता, ते आता ‘आम्हाला मागासवर्गीय मानून आरक्षण द्या’ अशी याचना करू लागले आहेत. धार्मिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. धर्मासाठी आपला जीव द्यायला आणि इतरांचा जीव घ्यायला मागे-पुढे पाहिले जात नाही, या विसंगतीचा अर्थ काय?




याचा अर्थ एवढाच की धर्मवाद आणि जातीयवाद मानणार्‍यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. एकेकाळी पृथ्वीतलावर प्रचंड मोठे प्राणी होते.. डायनॉसॉर.. त्यांचा जेव्हा अंत जवळ आला, तेव्हा म्हणे त्यांनी प्रचंड गदारोळ केला. असे वाटायचे की, जणू आता हे जग नष्ट होऊन जाईल. अखेर डायनॉसॉर नष्ट झाले. पृथ्वी नष्ट झाली नाही. त्यातून एवढाच अर्थ काढता येईल की, धर्मवादी आणि जातीयवादी डायनॉसॉरांचा अंतकाळ आता जवळ आला आहे म्हणून ते अधिक आक्रमक झाले आहेत.




निसर्गाने माणसाला माणूस म्हणून जन्माला घातलेले असते. जन्मत: कोणी हिंदू किंवा मुसलमान नसतो. मराठा किंवा माळी नसतो. ब्राह्मण किंवा दलित नसतो. धर्म आणि जातीचा शिक्का इतरांनी त्यावर मारलेला असतो. जोपर्यंत आपला समाज एका डबक्यात होता तोपर्यंत या अशास्त्रीय गोष्टी शास्त्र म्हणून त्याच्यावर लादता आल्या. जेव्हा समाज प्रवाही होतो तेव्हा अशी सक्ती करता येत नाही. डबके साचले तर त्यात किडे होतात; पण वाहते पाणी निर्मळ होत जाते. तसे समाज बुरसटलेल्या विचारांचा गाळ बाजूला सारत पुढे जातो. जोपर्यंत नवे तंत्रज्ञान नव्हते तो पर्यंंत आहारात फरक होता. पेहरावात फरक होता. भिन्न जाती-धर्माच्या समूहांमध्ये राहणीमानात, रीतीरिवाजात फरक होता. आता तसे राहिले आहे का? पुष्कळ फरक पडला आहे. मुलं-मुली एकत्र वावरताना दिसतात. त्यांच्या वेशभूषा आणि राहणीमानावरून कोण कोणत्या जातीचा आणि धर्माचा आहे, हे ओळखता येत नाही. भिन्न जाती-धर्माचे लोक पूर्वीपेक्षा जास्त एकत्र काम करू लागले आहेत. हा बदल सहन होत नसल्यामुळे जातीयवादी आणि धर्मवादी संघटना जास्त आक्रमक झाल्या आहेत.




आमच्या महात्म्यांना इतिहासक्रमाची दिशा कळत होती. त्यांनी पाहिलेली स्वप्ने हा काही कल्पनाविलास नव्हता. तो वास्तवात येणारा इतिहासक्रम होता. त्यांना तो ओळखता आला. आमच्या विचारवंतांना बदलते वास्तव नीटपणे कळत नाही, ही खरी शोकांतिका आहे.





लेखं- अमर हबीब सर.




संदर्भ- http://­onlinenews1.lokmat.co­m/staticpages/­editions/today/main/­DetailedNews-All.php?­nid=EditorialEdition­-16-1-05-01-2014-032­0e&ndate=2014-01-06&­editionname=editoria­l



धन्यवाद- दै.लोकमत.
चर्मकार बंधु-भगिनीनो किती दिवस दुसऱ्याने केलेल्या आंदोलनाचे फायदे घेत राहणार??



चर्मकारांना आंदोलनाची परंपरा नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे कितीही मोठा अन्याय झाला तरी तो समाज रस्त्यावर येत नाही. चर्मकार समाजाला लहान-लहान आंदोलनातून तशी सवय लावणे काळाची गरज आहे. कोणी कार्यकर्ता तशे प्रयत्न शून्यातून समाज जागृतीचे काम करत असल्यास त्याला प्रोत्साहनदेणे आपले कर्तव्य आहे.  चर्मकार समाजाला रस्त्यावर येवून अन्याया विरुद्ध आवाज उठविण्याची /करण्याची सवय लावणे अत्यंत गरजेचे आहे. किती दिवस दुसऱ्याने केलेल्या आंदोलनाचे फायदे घेत राहणार, चर्मकार समाजातील खासदार आमदार नगरसेवक हे कोणाच्या आंदोलनाचे फळ आहे ?? कधीतरी स्वतःच्या पायावर उभे राहवेच लागणार. सुरुवात करा, आंदोलनाच्यादृष्टीने चर्मकार समाज अजून बाल्याअवस्थेत आहे. हे आपल्या समाजाला कळायला हवे... हिंदु-हिंदु करुन अजुनही... ब्राह्मणीव्यवस्थेचे गुलाम बनलेले आहेत.... देव देव करण्यातच जिंदगी घालवत आहेत.



चर्मकार समाजाला कायम वापरले गेले आहे याची जाणीव आपल्या समाजाला नाही. महाराष्ट्रात या समाजाची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार १२ लाख आहे. मात्र ५९ अनुसूचित जातीपैकी फक्त चर्मकारानाच सर्वात जास्त राजकीय प्रतिनिधित्व मिळाले आहे. लोकसभेत, विधानसभेत चर्मकार मागासवर्गीयांच्या प्रश्नावर राखीव मतदार संघातून निवडून आलेल्या चर्मकार खासदार आमदारांनी कितीदा तोड उघडले याची जरा आकडेवारी राहिली माहिती द्यावी?? अजूनही सारख्याच गुणवत्तेचे बौद्ध व चर्मकार असे उमेदवार नोकरीसाठी, निवडणुकीसा­ठी व इतर कोणत्याही स्पर्धेसाठी उभे झाल्यास चर्मकार उमेदवारास पसंती दिली जाते. बौद्धांच्या संघर्षाला बोथट करण्यासाठी चर्मकार समाज उपयोगी पडत असल्यामुळे प्रस्थापित तथाकथित सवर्ण हिंदू चर्मकाराना संघर्ष न करताही सर्व लाभ मिळवून देतात. चर्मकारांची लोकसंख्या शहरी भागात जास्त व ग्रामीण भागात कमी आहे. यामुळे गावातील जातीयतेचे चटके त्यांना सोसावे लागत नाही. यामुळे चर्मकार संघर्षापासून अलिप्त आहेत.



विचार-  Lata Baile ताई ,  Sunil Khobragade सर.

मनुस्मृती दहन आणि भारतीय महिला दिवस !!
 


25 डिसेंबर 1927 रोजी प्रतीकात्मक पद्धतीने केलेल्या मनुस्मृती दहनाची आठवण आजही प्रकर्षाने जागी होते. महाडच्या चवदार तळ्याचा खुला वापर आणि काळाराम मंदिर प्रवेशाचा संदर्भ यामागे होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केलेल्या त्या कृतीतून एकाच वेळी जातिभेद आणि स्त्रीदास्य या दोहोंच्या अंतासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त झाला होता. मनुस्मृती दहनाची कृती हिंदू धर्मातील भेदभाव आणि शोषणाला समर्थन देणार्‍या विचारसरणीच्या विरोधात होती. त्यातूनच समता, न्याय आणि परस्पर आदर यावर आधारित समाज तयार होईल याची बाबासाहेबांना खात्री होती. त्या वेळी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘ज्ञान ही पुरुषांची किंवा कोण्या एका जातीची मक्तेदारी नाही. सर्व जातीतील स्त्री-पुरुषांना ते उपलब्ध असायला हवे...’ स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरही समतेच्या आंदोलनाला यातून पाठबळ मिळाले आहे.      



 

1970च्या दशकापासून सक्रिय असलेली स्त्री चळवळ अनेक बाजूने वाढली. स्त्रियांवर कुटुंबात आणि कुटुंबांबाहेर होणार्‍या हिंसेच्या प्रश्नावर काम केले. दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, कष्टकरी आणि आदिवासी स्त्रीचे आजच्या समाजव्यवस्थेत तिहेरी शोषण होते, ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. त्यामुळे 1990च्या दशकात या स्त्रियांच्या प्रश्नांभोवती वेगवेगळ्या संघटना तयार झाल्या. त्याचाच एक भाग म्हणून 1996 मध्ये ‘विकास वंचित दलित राष्ट्रीय महिला परिषद’च्या डॉ. प्रमिला लीला संपत यांनी चंद्रपूर येथे हजारो महिलांच्या साक्षीने मनुस्मृती दहन दिवस ‘भारतीय महिला दिन’ म्हणून जाहीर केला. त्यामागचा विचार असा होता : प्राचीन काळी मनुस्मृतीने स्त्री आणि शूद्र यांना दुय्यम मानले. स्वातंत्र्यानंतर घटनेत वर्ग, वर्ण, लिंग आणि जातिभेदाला नकार देत समतेचे तत्त्व आपण स्वीकारले; पण आजही अनेक बाबतींत घटनेच्या विरोधात जाऊन मनुस्मृतीच्या पाठबळाने असा भेदभाव केला जातो. त्याचे भान जागृत ठेवण्यासाठी मनुस्मृती दहन दिवस आणि भारतीय महिला दिवस यांची सांगड घालायला हवी. त्यामुळे अशा भेदभावाला विरोध करण्याची आपली ताकद वाढेल. हा विचार गेल्या दशकात आपलासा होत आहे. त्याप्रमाणे अनेक शहरांतून या भारतीय महिला दिवशी स्त्री-पुरुष आणि जातिभेदांवर आधारित शोषणाच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वळवण्यात येते. 



 

भेदभावाचे समर्थन करणार्‍या विचारसरणीचा पगडा समाजमनावर आजही आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. जयपूर न्यायालयासमोर मनूचा पुतळा स्थापन केला आहे. तो हटवण्यासाठी गेली कित्येक वर्षे आंदोलने होत आहेत; पण ते दुर्लक्षित राहते. राजस्थान सरकारच्या महिला विकास प्रकल्पात साथी म्हणून काम करणार्‍या भटेरी गावातील भंवरीदेवीने तिच्या कामाचा भाग म्हणून बालविवाह रोखला; पण ते घर होते उच्चजातीय मुखियाचे. जात आणि वर्ग हितसंबंध डिवचल्याने धडा शिकवण्यासाठी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दाद मागण्यासाठी कोर्टात गेलेल्या भंवरीदेवीला खोटी ठरवत न्यायाधीश निकालात म्हणतात, ‘खालच्या कुम्हार जातीच्या  भंवरीवर उच्च जातीतील ज्येष्ठ ब्राह्मण बलात्कार कसे करतील?’ या संतापजनक निकालाचा स्त्री आंदोलनाने निषेध केला. तर उच्च जातीच्या समर्थनार्थ समविचारी राजकीय पक्षाच्या पुढाकाराने बलात्कारींचा जाहीर सत्कार केला. ही घटना सन 1997 ची आहे. आजही बलात्काराची शिकार होणार्‍यांमध्ये दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, कष्टकरी आणि आदिवासी स्त्रियांची संख्या जास्त आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यांतील नफ्याला बांधलेल्या अर्थव्यवस्थेत या स्त्रिया ‘अतिगरीब’ आणि ‘असंघटित’ स्तरांत वेगाने ढकलल्या जात आहेत. आपले रोजी-रोटीचे, जगण्याचे घटनादत्त हक्क मागण्यासाठी न्याय्य लढा देणार्‍या स्त्रियांवर ‘नक्षलवादी’ म्हणून शिक्का मारून खोट्या केसेसखाली त्यांना तुरुंगात डांबले जाते. तेथे त्यांचा अनन्वित छळ केला जातो. माध्यमांत थोडासा बोलबाला झालेले सोनी सोरी या छत्तीसगढमधील   गोंड आदिवासी शिक्षिकेचे अलीकडील उदाहरण आहे. दिल्लीमधे 16 डिसेंबर रोजी झालेल्या निदर्शनात बेलवर सुटलेल्या सोनी सोरीने भाग घेतलेला. त्या वेळी ती म्हणाली, ‘माझे शिक्षण झाल्याने मी अन्यायाची दाद मागण्याचे धैर्य दाखवले. माझी लढाई चालूच आहे; पण माझ्यासारख्या कितीतरी स्त्रिया तुरुंगात डांबलेल्या आहेत. त्यांना आपण कोणता गुन्हा केला हे माहीतही नाही. त्यांना कोण न्याय मिळवून देणार?’ सोनी सोरीने विचारलेल्या प्रश्नाने आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. घटनेतील हक्क प्रत्यक्ष मिळवायचे असतील, तर अनेक पातळीवर संघर्ष करायला हवा, या वास्तवाकडे ती आपले लक्ष वळवते. आज सर्व जाती-वर्गातील स्त्रियांच्या (आणि पुरुषांच्याही) जगण्याला स्वतंत्र भारताच्या घटनेचा आधार असण्याऐवजी त्यांच्या त्यांच्या धर्म आणि जातींच्या अस्मितांचा आधार बळकट होत आहे. समताधिष्ठित समाजासाठी ही धोक्याची बाब आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे सप्टेंबर महिन्यात ‘बहू-बेटी बचाव महापंचायत’ भरवून, वास्तवाचा आधार  नसलेले भडक व्हिडिओ दाखवून समाजात मुस्लिम द्वेष पेटवून दिला. त्यानंतर दंगली घडवण्यात आल्या. त्यामध्ये मुस्लिम समाजातील स्त्रियांवर अमानुष हिंसा करण्यात आली. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त केली. मुले-बाळे पोरकी झाली. आज मदत छावणीतील कडाक्याच्या थंडीत गारठणारी तीन लेकरांची आई म्हणते, ‘माझ्याजवळ एकच कोट आहे. त्यामुळे दर तीन दिवसांतून तो मी एकाला घालते. तेवढीच एक रात्र पाळी-पाळीने ऊब मिळते.’ थंडीने कित्येक लहानगी मरण पावल्याने नुकतेच न्यायालयाने राज्य शासनाला प्रश्न विचारले आहेत. या गोष्टीने आपले समाजमन का हेलावत नाही, हा प्रश्न जणू ती लहानगी विचारत आहेत. एवढेच नव्हे, तर मोदींच्या प्रचाराच्या सभेत ज्या सदस्यांवर दंगलीतील सहभागाचे गुन्हे दाखल आहेत अशांचा सत्कार करण्यात आला. आपले सामाजिक न्याय या संदर्भातील व्यवहार संसदेपेक्षा ‘धर्मसंसदे’नुसार व्हावेत याला दुजोरा देणारी गोष्ट नुकतीच अहमदाबाद येथे घडली. ‘आसाराम आणि त्यांच्या मुलावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामागे षड्यंत्र होते आणि याचा निवाडा ‘धर्मसंसद’ करेल,’ असे सांगण्यात आले. ही गोष्ट देशातील पोलिस - न्याय यासारख्या घटनादत्त प्रक्रियेला आव्हान देणारी आहे. शिवाय स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांचे निराकरण करण्याऐवजी तो झालाच नाही, अशी आवई उठवणे गैर आहे. 



 

आज वरील संदर्भांची उजळणी करणे अत्यंत निकडीचे आहे. समताधिष्ठीत समाजाची आस असणार्‍या सर्वांसाठी यातून मार्ग काढण्याचे आव्हान आहे. आजचे वास्तव दाहक असले, तरी ते बदलणे आवश्यक आहे. सामान्य स्त्री-पुरुष प्रचंड धैर्य दाखवत वास्तवाला सामोरे जात आहेत. मुद्दा आहे आपण त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा. संकुचित अस्मिता न उगाळता दलित, मागासवर्गीय, कष्टकरी, आदिवासी आणि अल्पसंख्याकांच्या जगण्याचा अर्थ लावण्याचा. सम्यक सामाजिक परिवर्तनासाठी काही गोष्टी सजगतेने करण्याचा. समतेसाठी पितृसत्ताकता-जात-धर्म-अर्थ आणि राजसत्ता या सर्वांबरोबर संघर्ष करण्याचा. हा संघर्ष सर्वंकष होण्यासाठी मनुस्मृती दहन आणि भारतीय महिला दिवस या दोन्हींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.  




संदर्भ- http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-manusmriti-dahan-diwas-on-25-dec-4474259-NOR.html


 

लेखं- अरुणा बुरटे.

आज "स्त्री मुक्ती दिन... "भारतातील पाहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्‍या "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले" यांचा आज (३ जानेवारी) जयंती , त्यांच्या क्रांतीकारी विचारांना कोटी कोटी प्रणाम !!


हिंदुधर्मातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पिढीजात अनिष्ठ रुढी परंपरेविरुद्ध अफाट धर्मांध शक्तीच्या विरोधात ज्योतिबा फुलेंच्या पावलावर पाऊल टाकून, त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जातीभेदाच्या व धर्मरुढीच्या बेडया तोडून, समदु:खी स्त्रियांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांच्यावर लादलेल्या गुलामगिरीतून कायमची मुक्तता करण्यासाठी रणमैदानी उतरल्या. हालअपेष्टा, यातना सहन करुन व अपमानाची पर्वा न करता बहुजन समाजाची विशेषत: सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांची निस्वार्थपणे अविरत सेवा करण्यासाठी मोठया धैर्याने पुरुषासारखा संघर्ष करावा लागला. स्त्री उद्धाराकरीता संपूर्ण आयुष्य चंदानसारखे झिजून बहुजन स्त्रियांची कायमचीच मुक्तता केली. स्त्री व पुरुषांवर क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी अनंत उपकार करुन ठेवले आहेत. त्यांच्या या प्रभावी प्रेरणेने जीवनमान प्रकाशमय झाले असून, स्त्रियांना भक्कम पाठबळ प्राप्त होऊन एकप्रकारची चालना मिळाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाईंच्या कार्यामुळेच आज स्त्री ही स्त्री स्वातंत्र्याच्या हक्कासाठी पुरुषांना आव्हान करीत मोठया हिम्मतीने बंड करण्यास पुढे येऊ लागली आहे.

 




सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर आपणास असे दिसून येईल की, पेशवाईच्या काळात मनुस्मृतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर पूर्णत: बंदी होती. त्यांना कुठलेच अधिकार नव्हते. शूद्रातिशूद्र सोडून बाकी पुरुषांनाच सर्वाधिकार होते. स्त्रियांना पुरुषांची एक उपभोग वस्तू म्हणून बघितले जात होते. बालविवाह, पतीच्या मृत्युनंतर केशवपन, सती जाणे, पुनर्विवाहास(स्­त्रियांच्या) बंदी, त्यांच्याशी व्याभिचार, शिक्षणास बंदी, अंधश्रद्धा, अज्ञान इत्यादी अत्याचार, हिंदुधर्माच्या नावाखाली या अनिष्ट चालीरिती सर्रास राजरोसपणे सुरु होता. त्यांनी आधारगृहे सुद्धा चालविली. स्त्रियांचे जीवन अगदी अंधारमय करुन, गुलामापेक्षाही वाईट वागणूक देऊन, अत्याचाराच्या खोल दरीत लोटून उद्धवस्त केले जायचे. या विरोधात त्या शेवटपर्यंत लढल्या.

 



क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षीच ज्योतिबा फुलेंशी १८४० मध्ये झाला. त्यावेळी ज्योतिबा फुलेंचे वय १३ वर्षांचे होते. समविचारांच्या व्यक्ती एकत्रित येऊन महाराष्ट्राच्यासामाजिक क्षेत्रात परिवर्तनाचा पाया घालणाऱ्या व्यक्तीपैकी पहिले युगपुरुष खऱ्या अर्थाने ठरले. विवाह झाल्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी ज्योतिबा फुलेंकडून शिक्षणाचे प्रथम धडे घेतले. त्यानंतरच त्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षिकेचे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित शिक्षिका म्हणून बाहेर पडल्या. फुलेंनी
  
पुणे शहरी १ मे, इ.स. १८४७ साली सर्वात प्रथम मुलींची पहिली शाळा काढली. त्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीमाईं या शिक्षिकेचे काम करु लागल्या. शाळेत शिकावयास जात असताना दररोज त्यांच्यावर प्रस्थापितांचे टवाळके शेणमाती, चिखल व दगडधोंडयांचा वर्षाव करुन, टवाळकी, निंदा व घाणेरडया शब्दात बोलून त्यांचा अतोनात छळ करायचे. हा सारा छळ त्यांनी मुकाटयानी सहन केला. त्या कधीच डगमगल्या व घाबरल्या नाहीत. तसूभरही खचून न जाता त्यांनी आपले शिक्षणदानाचे काम अविरतपणे मोठया कष्टाने, नेटाने व धैर्याने सातत्याने सुरुच ठेवले.

 

असाच एक दिवसाचा प्रसंग, त्या शाळेत जात असताना ब्राम्हणी टवाळक्या मुलांनी त्यांना रस्त्यात छळणे सुरु केले. त्यातील एका टवाळखोर मुलगा रस्त्यात उभा राहून दम देऊन बोलू लागला, 'ए सटवे तू उद्यापासून शाळेत शिकवायला जाणे बंद कर? नाही तर तुझी रस्त्यातच अब्रू लुटीन?' त्याच्या या आक्रमक बोलण्याने क्रांतिज्योती सावित्रीमाईं फुले या संतापल्या. क्षणातच स्वत:ला सावरुन व हिम्मत करुन (सहनशीलतेची सीमा ओलांडल्यावर) त्या मस्तावलेल्या टवाळक्याच्या थोबाडात चपला हाणल्या. त्यांचा तो अग्निक्रोध बघून बाकीचीही टवाळखोर मुलं तेथून पसार झाली. शाळा सुटल्यावर क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी ज्योतिबा फुलेंजवळ घडलेला प्रकार सांगितला. ही बातमी वाऱ्यासारखी पुणे शहरी जिकडेतिकडे पसरली. उस्ताद लहुजी साळवे(ज्योतिबांचे गुरु) यांनाही वार्ता कळली. त्यांनी फुले दांपत्याच्या घरी जाऊन दोघांनाही मोठा धीर दिला. तू घाबरु नकोस बेटी ! उद्यापासून मी तुला शाळेत पोहचवून देण्याचे काम करीन. पाहू मग कोण 'लाल' रस्त्यात आडवा येतो, नि अंगाला हात लावतो ते? त्याचे तंगडे तोडून त्याच्याच हातात देईन ! तरच लहु साळवे नावाचा. त्याकाळी शूद्रातिशूद्रांना शिकणे म्हणजे महाभयंकर काम होते. मग स्त्रियांना शाळा शिकणे तर कोसोदूर होते. सावित्रीमाईंनी हिम्मत वा धैर्य बाळगून ज्योतिबांना साथ देण्यासाठी समाजाची, हिंदुधर्म ग्रंथाची व त्यांच्या छळाची अजिबात पर्वा केली नाही आणि ज्योतिबा फुलेंच्या सहवासात राहून त्यांनी पाच वर्षात २० शाळा चालवून दाखवल्या.

 




आत्महत्या करण्यास निघालेल्या एका काशी नावाच्या ब्राम्हण व गरोदर असलेल्या विधवा स्त्रीला सावित्रीमाईंनी जीवदान दिले. घरी आणून तिचे बाळंतपण केले आणि जन्मास आलेल्या मुलास दत्तक घेतले. परंतु हिंदुधर्माच्या ठेकेदारांना ते रुचले नाही व आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांना जाती-धर्मावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. अशा अडल्या नडल्या व वाळीत टाकलेल्या अशा अनेक स्त्रियांना त्यांनी मायेची सावली व उब देऊन त्यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यांना चांगल्या तऱ्हेने जगता यावे म्हणून त्यांच्यात या कुजलेल्या मनाच्या समाजासाठी बंड करण्यास व प्रसंगी लढण्याकरीता उत्साह व पाठबळ दिले. सारजा व गणेश या प्रेमीयुगुलाचा समाजाच्या क्रोधाग्नीतून बचाव करुन आंतरजातीय विवाह लावून दिला.

 



गावोगावी फिरुन सभा-संमेलने घेऊन स्त्रियांना शाळेत घाला, अस्पृश्यता पाळणे, हुंडापद्धती, सतीप्रथा, बालहत्या बंद करा. विधवांचे पुनर्विवाह लावून द्यावे, केशवपन थांबवावे, आधारगृह चालवावे इ. मौलिक विचार त्या सतत मांडून प्रचार व प्रसार करु लागल्या. बहुजन समाजाकडून याला चांगला प्रतिसाद मिळून स्त्रियांत चेतना निर्माण होऊ लागली. सावित्रीमाईंच्या या आव्हानामुळे अनेक स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. स्त्रियांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कमी होऊ लागले. बालहत्या, विधवा स्त्रियांचे केशवपन, सती जाण्यास आळा बसला, विधवाचे पुनर्विवाह होऊ लागले. क्रांतिज्योती सावित्रीमाईं फुले या खऱ्या अर्थाने स्त्री उद्धारक,  स्त्री मुक्ती चळवळीची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व समतावादी असे मोठया अभिमानाने म्हटले जाते. त्यांनी केलेल्या योगदानामुळेच सर्व स्त्रियांचा विकास झालेला आहे व आजही होत आहे. म्हणून आजची स्त्री ही समाजापुढे जाती धर्माच्या भिंतीला हादरे देऊन, ताठमानेने उभी राहून पुरुषांशी सुद्धा स्पर्धा करु लागली आहे आणि स्त्रियांच्या अनेक संघटना उभारुन अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढे उभारण्याचे व चळवळी चालवण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत आहेत. अशा या स्त्रीमुक्ती चळवळीची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, स्त्री उद्धारक, समतावादी समाज सुधारक व युगस्त्री क्रांतिज्योती सावित्रीमाईं फुले यांनी बहुजन समाजाला योग्य दिशा देऊन साऱ्या समाजाला आयुष्यभर प्रकाश देऊन सर्वांचे जीवन प्रकाशित केले. आयुष्यभर धडपडणाऱ्या आणि सातत्याने संघर्ष करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्लेग या आजाराने १० मार्च १८९७ साली क्रांतिज्योत कायमचीच विझली. त्यांच्या या जयंतीदिनी व जागतिक स्त्रीमुक्ती दिनानिमित्त त्याना विनम्र अभिवादन.


तुमचाच मित्र... निलेश कळसकर(सोबत प्रबोधन टीम)


"विजयस्तंभ"- अन्याय, अस्पृश्यतेविरुद्ध महारांनी पुकारलेले पहिले बंड !!

"विजयस्तंभ"- अन्याय, अस्पृश्यतेविरुद्ध महारांनी पुकारलेले पहिले बंड !!

 भिमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ या दिवशी ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन. एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वा खालील महार बटालियनच्या ५००  सैनिकांनी २५००० पेशवे सॆन्याचा पराभव केला. महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा इथं ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही नेहमी मानवंदना देण्यासाठी याठिकाणी यायचे.


 


छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशव्यांनी मराठेशाही संपुष्टात आणली. पेशवाईत शूद्रांच्या गुणवत्तेस अत्यंत अल्प मूल्य व वाव होता. या कालखंडातील सर्व राज्यकर्त्यांनी महारादी सर्वच अस्पृश्य लढवय्या जातींचा फक्त आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. त्यांच्या शौर्याचे केवळ काठी, तोडे, कडे इत्यादी नगण्य इनाम म्हणून देऊन कौतुक केले. कधी कधी तर फक्त शाबासकी देऊनच बोळवण केली जाई. स्वराज्य व सुराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणा-या महारांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलखाची शान भारतखंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकत ठेवला; पण त्यांची पायरी कधीच बदलली नाही. बाजी निंबाळकर व नेताजी पालकर या मुसलमान झालेल्या सरदारांना मोठ्या सन्मानाने हिंदू धर्मात घेतले. पुन्हा सरदारकी बहाल केली; परंतु अस्पृश्यांच्या गळ्यात मडके व कमरेला खराटा बांधून ठेवण्याचा जागतिक विक्रम केला.


 

अशा अनेकानेक पशुतुल्य अन्याय, अत्याचार व अस्पृश्यतेच्या विरोधात त्या वेळी महारांचे सरदार दुसरे सिदनाक यांनी स्वाभिमान प्रकट करून श्रीमंत बाजीराव पेशव्यांना विनंती केली होती की पेशवाईत महारादी अस्पृश्य जाती-जमातींना अस्मितेने वागवले जावे. महार सैनिक मायभूमीसाठी प्राण देण्यास तयार आहेत; पण त्यांची ही विनंती पेशव्यांनी अतिशय तिरस्काराने अमान्य केली होती आणि म्हणून महारांची संख्या अल्प असूनही ते पेशव्यांविरुद्ध अत्यंत शौर्याने व त्वेषाने लढले. प्राणांची आहुती देऊन अस्पृश्यतेची अत्युच्च परिसीमा गाठलेल्या पेशव्यांचा अभूतपूर्व पराभव केला.


 

यावरून स्पष्ट होते की महार सैनिक ब्रिटिशांच्या आमिषाला बळी पडून किंवा पोटासाठी पेशव्यांच्या विरोधात लढले नसून त्यांची लढाई समता, अस्मिता यासाठी होती. अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले हे त्यांचे प्रथम बंड होते.




 

भीमा-कोरेगावची लढाई :-


 

एक निमित्त- हे युद्ध पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावरील भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात लढले गेले. या युद्धाचे स्वरूप मोठे विचित्र व भयानक होते. हे युद्ध इंग्रजांनी महारांच्या बळावर पेशवाईविरुद्ध लढले असले तरी याचे खरे स्वरूप अस्पृश्यता व अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई असेच होते. महार मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करणे हे त्यांचे एकच ध्येय होते. हजारो वर्षांच्या अन्यायाला कायमची मूठमाती देण्यासाठी पेटलेल्या मानसिकतेची जिद्द होती. या लढाईच्या निमित्ताने महारांना नामी संधी सापडली होती.


 

या युद्धाचे दुसरे एक वैशिष्ट्य असे होते की, पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या ३० हजार होती. यापैकी ५  हजार पायदळ व २५  हजार घोडदळ होते. त्यापैकी २०  हजार तर निवडक प्रशिक्षित अरब घोडेस्वार होते. त्या तुलनेत इकडे इंग्रजप्रणीत केवळ ८३४ महार सैनिक होते. तरीही निकराचा लढा देऊन त्यांनी आपल्यापेक्षा ४० पट जास्त असलेल्या पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवून दिला.

 

१६  तास झुंज देऊन महार सैनिकांनी अखेर १  जानेवारी १८१८  च्या सायंकाळी ६  वाजता पेशव्यांच्या बलाढ्य सैन्यावर कब्जा केला. एवढ्या मोठ्या सैन्यापुढे एवढ्याशा सैन्याचा टिकाव लागणे अशक्यप्राय होते. तशी परिस्थितीसुद्धा निर्माण झाली होती; पण न्यायासाठी मरण पत्करू अशा बाण्याने महार सैनिक प्राणपणाने लढले. कारण त्यांना माहीत होते की कोणत्याही परिस्थितीत आपणास माणसाचे जगणे जगू दिले जात नाही. जगू दिले जाणार नाही. असे मृत जीवन जगण्यापेक्षा न्यायासाठी, हक्कासाठी लढत लढत मेलेले बरे.


 

जगापुढे एक नवा इतिहास निर्माण होईल. ते पेटून उठले होते. भीमा कोरेगावच्या या लढाईत शूद्र-महार सैनिकांनी शेवटी इंग्रजांना विजय मिळवून दिला. इंग्रजांनी यापूर्वी पेशवाईशी दोन वेळा केलेल्या लढाईत इंग्रजांना मोठी हार पत्करावी लागली होती. कोरेगावच्या या लढाईत ८३४  शूद्र-महार सैनिकांपैकी २७५  तर पेशव्यांच्या ३०  हजारपैकी ६०० सैनिक कामी आले.



 


विजयस्तंभाची निर्मिती -


 

ज्या महार अस्पृश्य सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली, त्यांच्या व त्या दिवसाच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक भव्य ऐतिहासिक असा क्रांतिस्तंभ निर्माण केला व समतेच्या या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा संगमरवरी शिलेवर मराठी व इंग्रजी भाषेत कोरली.


 

१७९५  मध्ये खर्ड्याची लढाई पेशव्यांना जिंकून देणारे, प्रतापगड, वैराटगड, रायगड, जंजिरा, पुरंदर इत्यादी ठिकाणी मराठी मातीचे इमान राखणारे महार कोरेगावच्या लढाईत १८१८  मध्ये म्हणजेच अवघ्या २३  वर्षांत पेशवाईविरुद्ध का लढले? ब्रिटिशांसारख्या परकीय सत्तेला विजय मिळवून देण्यात महारांचे प्रयोजन काय? मराठी मुलखाबद्दलची त्यांची अस्मिता अचानक का बदलली? ते देशद्रोही, फितूर होते काय? अशा प्रश्नांची उत्तरे हा दीपस्तंभ- क्रांतिस्तंभ देत राहील यात शंका नाही.



 

विजयस्तंभाला डॉ. आंबेडकरांची मानवंदना -



 

१  जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतिस्तंभाला प्रथम भेट देऊन आपल्या सहका-यांसमवेत मानवंदना देऊन त्या वर्षी स्मृतिदिन साजरा केला. या ऐतिहासिक मानवंदनेनंतर दरवर्षी १  जानेवारीला लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी व सैनिक तसेच मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कुटुंबासह विजयस्तंभाला भेट देऊन मानवंदना देऊन आदरांजली अर्पण करतात.



 

विजयस्तंभाची आजची स्थिती -



 

क्रांतिस्तंभाची आजची स्थिती अत्यंत निराशाजनक आहे. २५ जुलै १९८९  रोजी या क्रांतिस्तंभाला विजेचा हादरा बसून वरचे चार थर कोसळले आहेत. बरीच नासधूस झाली आहे. अजून बराचसा भाग कधी कोसळेल याचा नेम नाही. स्तंभाला सगळीकडून फुगवटा आला आहे. शहिदांची नावे कोरलेली संगमरवरी भव्य शिलाही दुभंगली आहे. या क्रांतिस्मारकाचे पुनरुत्थान, संरक्षण, संवर्धन करणे तर सोडाच, शासन याची साधी डागडुजीही करीत नाही. परिसराला संरक्षक भिंत नाही. सुशोभीकरण नाही. शासनाची, धर्मादाय नागरी संस्थांची ही अनास्था काय दर्शवते? कदाचित असे वाटत असावे की हे स्मारक लवकर उद्ध्वस्त झालेले बरे!


 


आपल्या लोकांच्या मुक्तीचा संघर्ष अजून संपलेला नाही. १८१८  रोजीची लढाई जिंकून आपल्या पराक्रमी लोकांनी पेशवाई सत्ता संपवली. परंतु १९४७  नंतर संपूर्ण भारतावर जातीवाद्यांची सत्ता निर्माण झाली आहे. आता एखाद्या ठिकाणी युद्ध करून ती सत्ता संपवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला देशभर तयारी करावी लागेल. निरनिराळ्या जातीमध्ये विभाजित झालेल्या लोकांना जागृत करून एकत्र जोडावे लागेल.



शिका...!!! संघटीत व्हा...!!! संघर्ष करा...!!! हा बाबासाहेबांचा कानमंत्र खर्या अर्थाने आत्मसात करावा लागेल....!!!




आम्ही मारत नाही
उगीचच बढाई ,
जरा आठवा यार हो ,
भीमा-कोरेगावची लढाई…!

पुन्हा रूजू पाहतेय,
नव्याने पेशवाई,
नेकीने व्हा सज्ज,
अन् एकीने करा चढाई…!

 


(कवी-भारत लढे)






लेख संकलन- निलेश कळसकर(सोबत प्रबोधन टीम)

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...