प्रत्येक राष्ट्राचा विकास हा त्या राष्ट्रातील नागरिकांच्या बहुआयामी विकासावर अवलंबून असतो. भारतासारख्या देशाला लागलेली जातीयतेची किड हा देशावरील सर्वात मोठा कलंक आहे. हा कलंक धुवून काढणे आणि जातीयता मुक्त भारत राष्ट्राची निर्मिती करणे हेच एकमात्र उद्दिष्ट घेऊन आकारास आलेल्या ‘कॅम्पेन फॉर कास्ट फ्री इंडीया’ या अभियानाचे भूमिकापत्र आम्ही आपणास सादर करित आहोत.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाचे आपण नागरिक. आपला देश बदलत्या काळासोबत अधिकाधिक विकसित होण्यासोबतच येथील प्रत्येक नागरिक सुखी, समृद्धी आणि संपन्न व्हावा या इच्छेने प्रत्येकाचे मन तळमळत असते. परंतू सत्य परिस्थिती नेमकी याच्या उलट असल्याचे आपणास पहायला मिळत आहे. नानाविध धर्म, शेकडो पंथ, हजारो जाती समुहात विभागला गेलेला भारतीय समाज हा वरकरणी जरी एक वाटत असला तरी राष्ट्रीयत्वाच्या भावनेखाली त्यांचं एकत्रितपण अजूनही तितकेसे विकसित झालेले नाही हेच कटू सत्य आहे.
जातीयवादाच्या विषवल्लीने पोखरलेला येथील पुरातन समाज आजही जातीय विद्वेषाच्या पखाली बेमालूमपणे वाहताना आपण पाहत आहोत. गेल्या काही वर्षांत वेगाने कार्यन्वित झालेल्या कट्टर धर्मांध प्रवृत्ती, भांडवली संस्था विशेषकरून जातीयवादाला बळकटी देणाऱ्या आणि क्रोनी कॅपटलीझम चा पुरस्कार करणाऱ्या उद्योजक घराण्यांचा राजकारणातील वाढता हस्तक्षेप सोबतच जातीय अत्याचारांची वाढती प्रकरणे हे एका सशक्त समाजाचे उदाहरण असूच शकत नाही.
भारतीय समाज हा इतक्या गुंतागुंतीने विभागला जाण्याचे एकमात्र कारण म्हणजे इथली जातीव्यवस्था आणि जातीव्यवस्थेतून उगम पावलेली जात-वर्ग-पितृसत्ताकवादी मानसिकता. स्वातंत्र्याने पासष्टी प्रवेश केलेला असताना देखील देशातील जातीय असमानता आपण संपवण्यात अयशस्वी ठरलो आहोत. याला एकमात्र जबाबदार घटक ही जातीयताच आहे.
आज देशातील प्रत्येक नागरिक दुस-या नागरिका पासुन जातींमुळे दुर झाला आहे. त्यांच्यात उच्च-नीच, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आहे. समतामधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाच्या मनात बंधुत्वाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. त्यातूनच एकतेचे तत्व अंमलात आणले जाऊ शकते. देशातील राजकिय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांना प्रभावीपणे सोडवण्यासाठी समता आणि समानतेचे तत्व आचरणात आणणे गरजेचे आहे
जो पर्यंत या देशात बंधुत्वाची भावाना रुजत नाही तोपर्यंत ईथे लोकशाही देखील ख-या अर्थाने रुजणार नाही व पर्यायाने या देशाचे राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही. जाती हि देशाच्या बंधुत्वाच्या पर्यायाने एकतेच्या-अखंडतेच्या आड येणारी कृत्रिम व्यवस्था आहे व राष्ट्रविरोधी देखील आहे. त्यामुळे जातीव्यवस्था नष्ट करणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे. जातीमुक्त राष्ट्राची निर्मिती करणे हीच या अभियानाची मुख्य भूमिका आणि गाभा आहे. एका भारतीयाला दुस-या भारतीयापासुन दुर करणारी, त्यांच्यात बंधुत्वा ऐवजी शत्रुत्व निर्माण करणारी जातीव्यवस्था नष्ट करणे हि काही एका विशिष्ट जातीची नाही तर प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरीकाची जबाबदारी आहे.
‘कॅम्पेन फॉर कास्ट फ्री इंडिया’ हे अभियान देशभरातील तमाम समविचारी संघटनांना एकत्रित आणून एका किमान समान कार्यक्रमाअंतर्गत कार्यान्वित करण्यासाठी जबाबदार असणार आहे. जातिनिर्मूलनाच्या कार्यात सहभागी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना जातीमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी एका किमान समान कार्यक्रमावर एकत्र आणण्याची जबाबदारी हे अभियान उचलणार आहे.
येत्या काळात जातीय अत्याचारासंदर्भात असलेली उपाययोजना अत्यंत कठोर पद्धतीने राबवली जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व उपाययोजनांचा पाठपुरावा करण्याची भूमिका हे अभियान घेत असून जातीमुक्त भारत राष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प आम्ही करत आहोत.
- Vaibhav Chhaya