सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या आद्यशिक्षीका होत. ज्या काळात स्त्रियांना चूल व मुल यापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले होते. मनुस्मृतीने स्त्रियांवर बंधने टाकली होती व समाजव्यवस्थेने ही बंधने बिनदिक्कत स्वीकारले होते, त्याकाळात सावित्रीबाई फुले ह्या महात्मा ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून समाजक्रांतीच्या चळवळीत अग्रेसर होत्या. आपले कार्य तडीस नेण्यासाठी त्यांनी सनातनी ब्राम्हणी समाजाकडून अपमान व अंगावर शेणखताचा मारा सहन केला. मुलीना शिकवायला जाताना त्यांच्या साडीवर शेण व चिखल फेकून खराब करण्यात येत असे परंतु आपल्या कार्यापासून त्या तसूभरही मागे सरल्या नाहीत. आजच्या स्त्रियांना जे स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाई फुलेना जाते. परंतु आजची स्त्री सावित्रीबाईला विसरून अज्ञान व काल्पनिक सरस्वतीचे गुणगान गाते हा एक दुर्व्यविलास आहे.
आंबेडकरी विचाराची जनता सावित्रीबाईची जयंती संपूर्ण देशभर साजरी करताहेत. परंतु सावित्रीबाई ज्या माळी समाजातून पुढे आल्या व जगप्रसिध्द झाल्या तो माळी समाज सावित्रीबाईची जयंती करताना दिसत नाही. वैदिक धर्माच्या जोखडात विलीन झालेला माळी समाज सावित्रीबाईना आपला समजत नाही हे फार मोठे दुर्दैव्य होय. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले सारख्या हिरे-रत्नाची पारख आजही बहुजनच काय, समस्त भारतीयांना करता आली नाही.
सावित्रीबाईच्या समकालीन व्यक्तींनी त्यांची चारित्र्यशीलता, गुणसंपन्नता व त्यांच्या करारीपनाची अनेक ठिकाणी नोंद केली आहे. गोविंद गणपत काळे हे ज्योतिबा व सावित्रीबाईस ओळखत होते. गोविंद काळे भारताच्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी लिहितात, महात्मा ज्योतीराव जे एवढ्या मोठ्या योग्यतेस चढले त्याचे बरेच मोठे श्रेय त्यांच्या सुपत्नीस (सावित्रीबाईस) जाते. राग म्हणून काय चीज आहे ते सावित्रीबाईच्या गावीच नव्हते. ति नेहमी हसतमुख असे. तिचे हसू गालावर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला मोठा आनंद वाटत असे व त्यांच्या करिता ती मोठ्या आवडीने गोड जेवण तयार करीत असे. ती फार ममताळू व दयाळू होती. तिने जन्मास आल्यावर विद्यादानाचे काम तर केलेच परंतु तितकेच अन्नदानही केले. तात्यांना म्हणजे ज्योतीबाना भेटण्यास आलेल्या मंडळीस आग्रहाने जेवावयास लावणे हे जणू तिचे मुख्य काम होते. ज्योतीराव सावित्रीबाईस मान देत असत. ते बोलताना सावित्रीबाईस ‘आहो व काहो’ या बहुमानार्थी शब्दांनी हाक मारीत असत. तर सावित्रीबाई ज्योतीबाना ‘शेटजी’ या नावाने हाक मारीत असत.
गोविंद काळे म्हणतात, ज्योतिबा व सावित्री या दोघात पतीपत्नीत्वाचे मोठे प्रेम भरले होते. सावित्रीबाईनी नको म्हटलेले काम तात्या (ज्योतीबास लोक तात्या या नावाने संबोधित असत.) करीत नसत. सावित्रीबाई फार सुविचारी व दूरदृष्टीची होती. त्यांचे लग्न झाले तेव्हा ज्योतिबा ११ वर्षाचे तर सावित्री ह्या ७ वर्षाच्या होत्या. सावित्री बाईचे माहेर पुण्याजवळील झगडयाची वाडी होय. सावित्रीचे वडील गावचे पाटील असून श्रीमंत होते. या झगडे पाटलांनी ज्योतिबा व सावित्रीची लग्नाची मिरवणूक हत्तीवर बसून काढली होती. सावित्रीबाई स्वरूपवान होत्या. त्यांच्या विषयी आप्तजनात मोठा आदर होता. स्त्री शिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायात त्यांच्याविषयी पूज्यभाव निर्माण झाला होता. पुण्यातील काही मोठ मोठ्या सुशिक्षित बाया त्यांना भेटण्यासाठी येत असत. पंडिता रमाबाई व डाक्टर आनंदीबाई जोशी यांचा त्यात समावेश होता. पुण्यात असताना व्हाईसरायच्या पत्नी पुष्कळ वेळा सावित्रीबाईकडे बोलण्यासाठी येत असत.
सावित्री बाईस प्रसिद्धीचा मुळीच हव्यास नव्हता. ज्योतीबांचे मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी सुरु केलेल्या ‘गृहिणी’ या मासिकात त्या लेख लिहीत असत. परंतु हे लेख त्या आपल्या नावाने प्रसिध्द न करता टोपण नावाने वा मैत्रिणीच्या नावाने प्रसिध्द करीत असत. विद्यार्थिनीचा सावित्रीबाईला विशेष लळा होता. शाळेची व स्वत:जवळची पुस्तके त्या विद्यार्थीनीना वाटत व त्याना घरी बोलावून जेवण देत असत. सावित्रीबाईचा पोशाख ज्योतिबा फुल्यासारखा साधा असे. त्यांच्या अंगावर अलंकार नसत. गळ्यात केवळ एक पोट व मंगळसुत्र असे. त्या कपाळावर भले मोठे कुंकू लावीत असत. त्यांच्या घरात स्वच्छता हे एक वैशिष्टय होते. त्यांच्या दिवाणखाण्यात थोडाही केरकचरा अथवा धूळ पडलेली त्यांना खपत नसे. सावित्रीबाईच्या हाताखाली घरातील कामासाठी एक बाई व एक गडी नेहमी असे. त्या स्वत: स्वयंपाक करीत असत. ज्योतीबांच्या खाण्याची व प्रकृतीची त्या फार काळजी घेत असत. तात्या सन १८८८ च्या सुमारास जेव्हा पक्षाघाताने आजारी पडले तेव्हा सावित्रीबाईच्या सेवेमुळेच तात्यासाहेब आजारातून जगू शकले.
महात्मा फुल्यांचा मृत्यू झाल्यानंतर बाबा फुले व महादबा फुले या ज्योतीबांच्या भाऊबंदानी ज्योतिबाच्या शवास आम्हीच खांदा देवू व टीटवे (गाडगे) आम्हीच पकडू असा आग्रह धरला होता. तथा यशवंतराव या दत्तक पुत्रास टिटवी धरण्यास त्यांनी विरोध दर्शविला. या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये त्या डगमगल्या नाहीत. बाबा फुले व महादबा फुले याचा विरोध मोडून काढीत सावित्रीबाईनी स्वत: टीटवे (गाडगे) हातात घेतले होते. व निरनिराळ्या जातीच्या लोकासोबतच सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रेतास खांदा द्यावयास सांगितले होते. मृत्यूनंतर केस देणे व भाताचे पिंड पाडून कावळ्यापुढे टाकणे ही प्रथा होती परंतु सावित्रीबाईनी ह्या सर्व खुळ्या प्रथांना फाटा दिला होता. त्यांचा हा निर्णय क्रांतिकारी होता.
दुसरे समकालीन लक्ष्मणराव देवराव ठोसर लिहितात, ज्योतिबा हे कंत्राटदार होते. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळत असत. परंतु ते सर्व पैसे समाजकार्यासाठी खर्च करीत असत. सावित्रीबाई स्वभावाने प्रेमळ व गोड होत्या. त्यांनी ज्योतीबांच्या मृत्युनंतर अत्यंत हलाकीत दिवस काढले. त्याही परिस्थितीत त्यांनी यशवंत या दत्तक पुत्रास डाक्टर बनविले होते. त्या यशवंतवर फार प्रेम करीत असत. यशवंतरावाचे लग्न त्यांनी सत्यशोधकी मताप्रमाणे लावले होते. या लग्नाचा समाजावर खूप चांगला परिणाम झाला होता. लक्षमण कराडी जाया लिहितात, ज्योतीरावानी त्यांच्या घरी बोर्डिंग काढल्यानंतर आम्ही तिथे शिकावयास गेलो तेव्हा सावित्रीबाई आम्हास मोठ्या प्रेमाने वागवीत. त्यांच्यासारखी प्रेमळ बाई मी अजून सुध्दा कोठे पहिली नाही. मला वाटते, माझ्या आईपेक्षा सुध्दा जास्त प्रेम ती माझ्यावर करीत असे. ती आपल्या आईपेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करतात हे बोर्डिंग मधल्या सर्व मुलांना वाटत असे. पुण्यात प्लेगची साथ आली होती. माणसे पटापट मरायची. सावित्रीबाई प्लेगची लागण झालेल्याची सेवा करायला लागली. परंतु त्याच प्लेग मुळे त्या आजारी पडल्या. ज्योतीबा व सावित्रीबाई यांचे दत्तकपुत्र यशवंत फुले हे डाक्टर होते. ते लगेच पुण्यास आले. प्लेगच्या साथीमध्ये रुग्णाची सेवा करताना त्यालाही प्लेगची लागण झाली. या साथीतच सावित्रीबाई व यशवंताला मृत्यू आला.
सावित्रीबाईचे चारित्र्यसंपन्न व करारीपनाचे जीवन हे आजच्या स्त्रियांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादाई आहे. घरातला कर्ता पुरुष समाजकार्यात गुंतला असताना त्यांच्या खांद्यास खांदा लावून स्वत:लाही समाजकार्यास झोकून देण्याची प्रेरणा भारताच्या या प्रथम शिक्षिकेकडूनच मिळेल यात शंकाच नाही. परंतु त्यासाठी गरज आहे ती सावित्रीबाईचे चारित्र्य वाचण्याची व ते समजून घेण्याची. सावित्रीबाईचे गुण बहुजन व भारतीय स्त्रीमध्ये उतरल्यास नव्या समाजव्यवस्थेची पायाभरणी होण्यास फार वेळ लागणार नाही. ताराबाई शिंदे व मुक्ता या सावित्रीच्या विद्यार्थिनीनी जसे धर्माच्या ठेकेदारास व व्यवस्थेस प्रश्न केले तो जिगर भारतीय स्त्रियामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. सावित्रीबाई ज्या करारीपनामुळे संकटांना सामोरे गेल्या व नव्या युगाची व विचाराची पायाभरणी केली त्या कर्तुत्वामुळेच सावित्रीबाईना बहुजन समाजाच्या मनाच्या कप्प्यात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
- रवी ताटे
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!