उसळता चेंडू डोक्याला लागल्याने कोमात गेलेला ऑस्ट्रेलियाचा झुंजार फलंदाज फिलिप ह्युज याचे आज भारतीय वेळेनुसार सकाळी निधन झाले. सिडनी येथील व्हिन्सेंट रुग्णालयात वयाच्या २५व्या वर्षीच त्याने अखेरचा श्वास घेतला. ह्युजच्या अकाली निधनामुळे क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेदरम्यान गोलंदाजाने टाकलेला उसळता चेंडू डोक्याला लागल्याने मंगळवारी ह्युज मैदानावरच कोसळला होता. ह्युजची प्रकृती परवापासून गंभीरच होती.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापकीय कार्यकारी संचालक पॅट होवार्ड यांनी सांगितले, 'आम्ही खेळाडूंशी बोलून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. या कठीण स्थितीत खेळाडूंच्या पाठीशी उभे राहण्यासाठी खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांचे काउन्सिलिंग आम्ही सुरूच ठेवणा र आहोत. या कठीण काळात खेळाडू, क्रिकेटशी संबंधित सगळे जण ह्युजच्या कुटुंबियांसोबत आहोत.'
ह्युजला कसोटी सामन्यांसाठी संधी मिळण्याची शक्यता होती. 'न्यू साउथ वेल्स'चा गोलंदाज शॉन अॅबॉटच्या बाउन्सरवर हुक मारण्याच्या प्रयत्नात असताना चेंडू ह्युजच्या डोक्यावर आदळला. हेल्मेट परिधान करूनही त्याला चेंडूचा आघात सहन झाला नाही. तो तत्काळ मैदानावर कोसळला. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
दरम्यान, शेफील्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेची फेरी रद्द करण्यात आली आहे. व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलँड आणि टास्मानिया यांच्यातील सामनेही रद्द करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!